बीड — जिल्ह्यात भेसळखोर, मुदतबाह्य अन्नपदार्थ विक्रेते आणि प्रतिबंधित गुटखा विक्रेत्यांविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाने मोठी धडक मोहीम सुरू केली आहे. आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार 25 मे 2026 पासून जिल्हाभर विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत असून अनेक ठिकाणी छापेमारी करून अन्नपदार्थांचे नमुने आणि मोठ्या प्रमाणात साठा जप्त करण्यात आला आहे.
या मोहिमेदरम्यान केज तालुक्यातील विविध आस्थापनांची तपासणी करून मिठाईचे दोन नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. पाटोदा तालुक्यातील दोन दूध संकलन केंद्रांवर तपासणी करून दूधाचे दोन नमुने प्रयोगशाळेसाठी जप्त करण्यात आले. तर माजलगाव येथे 71 किलो रिफाइंड सोयाबीन तेलाचा साठा जप्त करण्यात आला.
याशिवाय शिरूर शहरात अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी कारवाई करत 158 किलो अन्नसाठा जप्त केला. या साठ्याची किंमत सुमारे 24 हजार 806 रुपये असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, बीड तालुक्यातील वासनवाडी येथील एका लस्सी उत्पादन केंद्रावर टाकलेल्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तपासणीदरम्यान मुदतबाह्य अन्नपदार्थांचा वापर करून लस्सीचे उत्पादन सुरू असल्याचे आढळले. यावेळी 102 लिटर लस्सीचा साठा ताब्यात घेऊन जागेवरच नष्ट करण्यात आला. नष्ट करण्यात आलेल्या मालाची किंमत सुमारे 8 हजार 125 रुपये असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
अन्न सुरक्षा विभागाने घेतलेले सर्व नमुने प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. संबंधित अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
दुसरीकडे, जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा विक्रेत्यांविरोधातही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. 30 मे रोजी बीड शहरातील एका पानटपरीवर छापा टाकून तब्बल 2 लाख 60 हजार 570 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. या प्रकरणी संबंधिताविरुद्ध बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यानंतर 31 मे रोजी तलवडा येथील पानटपरीवरून 5 हजार 392 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. तसेच 2 जून रोजी वडवणी येथील एका किराणा दुकानातून 23 हजार 580 रुपयांचा गुटखा जप्त करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
अन्न व औषध प्रशासन विभागाने आगामी काळातही भेसळयुक्त अन्नपदार्थ, मुदतबाह्य वस्तू आणि प्रतिबंधित पदार्थ विक्रेत्यांविरोधात नियमित धाडसत्र सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे. या सलग कारवायांमुळे जिल्ह्यातील भेसळखोर आणि बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

