Home क्राईम “तू मला का बोलत नाहीस?” तरुणीवर चाकूने जीवघेणा हल्ला! परळीत खळबळ

“तू मला का बोलत नाहीस?” तरुणीवर चाकूने जीवघेणा हल्ला! परळीत खळबळ

0
6

परळी — शहरात एकतर्फी प्रेम आणि चारित्र्याच्या संशयातून एका तरुणीवर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पंचशीलनगर परिसरात राहणाऱ्या 23 वर्षीय तरुणीवर एका तरुणाने चाकूने सपासप वार करून गंभीर जखमी केले. या घटनेमुळे परळी शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धाराशिव जिल्ह्यातील जवळा गावची रहिवासी असलेली पीडित तरुणी शिक्षण आणि कामानिमित्त परळी वैजनाथ येथील पंचशीलनगर परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होती. शुक्रवारी मध्यरात्री सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी अनंत पाटलोबा गित्ते (रा. मालेवाडी, ता. परळी वैजनाथ) हा तिच्या राहत्या ठिकाणी पोहोचला.

यावेळी चारित्र्याच्या संशयावरून दोघांमध्ये वाद झाला. वाद वाढल्यानंतर आरोपीने “तू मला का बोलत नाहीस?” असे म्हणत तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने जवळील चाकू काढून तिच्या उजव्या हातावर, पोटावर आणि डाव्या हाताच्या दंडावर वार केले.

या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या वैद्यकीय अहवालानंतर शनिवारी दुपारी परळी शहरातील संभाजीनगर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत हत्येच्या प्रयत्नासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम 109, 118(1), 118(2), 115(2) आणि 351(2) अंतर्गत गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संदीप चव्हाण करत आहेत.

परळी शहरात अलिकडच्या काळात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून, या घटनेनंतर “परळीत नेमकं चाललंय तरी काय?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here