मुजोर रिक्षाचालकांना वाहतूक शाखा व आरटीओचा दणका; २५ चालकावर कारवाई

बीड —  शहरासह परिसरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि अवैधरित्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात जिल्हा वाहतूक शाखा व प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) संयुक्त कारवाई करत २५ रिक्षाचालकांवर तब्बल ९५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. या कारवाईमुळे नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांमध्ये खळबळ उडाली आहे.

प्रभारी पोलीस अधीक्षक चेतना तिडके व अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या आदेशानुसार तसेच जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक वैभव पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. आरटीओचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बालाजी धन्वे यांच्या सूचनेनुसार मोटार वाहन निरीक्षक जगदीश चौधरी, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक आश्विनी मोरे, महेश भोसले व चालक दराडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

शुक्रवारी (दि. ५ जून) शहरातील विविध भागांत राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत ऑटो रिक्षा, अप्पे रिक्षा आणि इतर वाहनांसह एकूण ४० वाहनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये परवान्याविना प्रवासी वाहतूक, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक, वाहनांची आवश्यक कागदपत्रे नसणे, फिटनेस व विमा नियमांचे उल्लंघन अशा विविध प्रकारच्या नियमभंगाच्या घटना आढळून आल्या.

तपासणीदरम्यान विमा नसणे, पीयूसी प्रमाणपत्र नसणे, वाहन परवाना कालबाह्य होणे, विनापरवाना वाहन चालविणे तसेच नो-पार्किंग नियमांचे उल्लंघन करणे या बाबींवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली.

ही संयुक्त मोहीम छत्रपती शिवाजी महाराज चौक, अण्णाभाऊ साठे चौक, बसस्थानक परिसर आणि इतर गर्दीच्या ठिकाणी राबविण्यात आली. कारवाईत जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार सखाराम घोलप, मनोज जायभाये, अजिनाथ मुंडे, फुलचंद जाधव, शेषनारायण गाडे तसेच पोलीस अंमलदार संतोष मोरे, शुभम सानप, चालक दत्ता कदम व नारायण वाघमारे यांनी सहभाग नोंदविला.

वाहतूक व्यवस्थेत शिस्त निर्माण करणे आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी सांगितले. भविष्यातही अशा प्रकारच्या कारवाया सातत्याने सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर यांनी वाहनचालकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याची शपथ दिली. “वाहतुकीचे नियम पाळू, नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेऊ,” असा संकल्प वाहनधारकांकडून करून घेण्यात आला.

वाहनचालकांनी सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत बाळगून वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा जिल्हा वाहतूक शाखेने दिला आहे. या मोहिमेमुळे अवैध प्रवासी वाहतुकीला आळा बसण्यास मदत होणार असून नियमांचे पालन करणाऱ्या नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles