घरकुलाच्या नावाखाली अवैध वाळू उपशाची एसआयटी चौकशीची आ. विजयसिंह पंडित यांची मागणी

गेवराई तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली 100 कोटींचे वाळू सिंडीकेट सुरू असल्याचा गंभीर आरोप

बीड —  घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून देण्याच्या शासनाच्या योजनेचा गैरफायदा घेत गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उत्खनन सुरू असल्याचा गंभीर आरोप आमदार विजयसिंह पंडित यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र विशेष तपास पथक (SIT) मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी राज्य शासनाकडे केली असून दोषींवर कारवाई होईपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे स्पष्ट केले.

श्री क्षेत्र राक्षसभुवन येथे शनिवारी पत्रकार परिषदेत बोलताना आमदार पंडित यांनी महसूल आणि पोलीस विभागातील काही अधिकारी व वाळू माफियांच्या संगनमतातून सुमारे 100 कोटी रुपयांचे वाळू सिंडीकेट कार्यरत असल्याचा आरोप केला.

घरकुल योजनेच्या नावाखाली लाखो ब्रास वाळू उपसा?

शासनाच्या धोरणानुसार घरकुल लाभार्थ्यांना बांधकामासाठी पाच ब्रास वाळू उपलब्ध करून देण्यात येते. गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथील गोदावरी नदीपात्रातून ही वाळू पुरविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आमदार पंडित यांच्या म्हणण्यानुसार, गेवराईसह बीड जिल्ह्यातील विविध पंचायत समित्यांकडून सुमारे 1,600 लाभार्थ्यांची यादी प्रशासनाला देण्यात आली आहे. या संख्येनुसार केवळ आठ हजार ब्रास वाळू उत्खनन अपेक्षित असताना प्रत्यक्षात लाखो ब्रास वाळूचा उपसा होत असल्याचा दावा त्यांनी केला.

अजस्त्र यंत्रसामग्री, पोकलेन मशीन आणि शेकडो टिप्परच्या माध्यमातून दिवस-रात्र वाळू उपसा व वाहतूक सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

धार्मिक स्थळे आणि परिसराला धोका

राक्षसभुवन परिसरातील स्मशानभूमी, दशक्रिया विधीची जागा, मंडप व्यावसायिकांसाठी राखीव क्षेत्र तसेच पुरातन मंदिरांच्या परिसराला या उत्खननामुळे धोका निर्माण झाल्याचा दावा आमदार पंडित यांनी केला.

स्थानिक ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांनी अनेक वेळा तक्रारी केल्यानंतरही संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

ओटीपी गोळा करण्यासाठी दलालांचे जाळे’

घरकुल लाभार्थ्यांच्या नावावर वाळू उचलण्यासाठी काही ठिकाणी लाभार्थ्यांचे ओटीपी मिळविण्यासाठी दलालांची फौज कार्यरत असल्याचा आरोपही आमदार पंडित यांनी केला. अनेक लाभार्थ्यांना माहिती न देता किंवा काही आर्थिक मोबदला देऊन ओटीपी मिळविले जात असल्याचा दावा त्यांनी केला.

तसेच रात्रीच्या वेळेत प्रशासन आणि पोलिसांच्या उपस्थितीत वाळू उपसा होत असल्याचे आरोप करत, सहकार्य न करणाऱ्या वाळू व्यावसायिकांवर कारवाई केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले.

शासनाकडे लेखी तक्रार

या संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत (SIT) चौकशी व्हावी यासाठी शासनाकडे लेखी निवेदन दिले असून दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत संघर्ष सुरू राहील, असे आमदार विजयसिंह पंडित यांनी स्पष्ट केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles