मुंबई — अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाल्याच्या विक्रीविरोधात राज्यव्यापी ‘गुटखा मुक्त महाराष्ट्र मोहीम’ हाती घेतली आहे या मोहिमेअंतर्गत राज्यभरात मोठी कारवाई करण्यात आली आहे. प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि तत्सम तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध साठवणूक, वाहतूक व विक्रीविरोधात राबविण्यात आलेल्या विशेष धाडसत्रात 195 ठिकाणी छापे टाकून 192 जणांना अटक करण्यात आली. या कारवाईत सुमारे 1.99 कोटी रुपयांहून अधिक किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार धाराशीव, धुळे, नांदेड, पुणे, मुंबई आणि इतर जिल्ह्यांमध्ये एकाचवेळी धाडसत्र राबविण्यात आले. या मोहिमेमुळे गुटखा माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.
परांडा, सावंगी टोलनाका आणि नांदेडमध्ये मोठी कारवाई
धाराशीव जिल्ह्यातील परांडा येथे करण्यात आलेल्या कारवाईत 1 कोटी 2 लाख 67 हजार रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला.
तर समृद्धी महामार्ग वरील सावंगी टोलनाका परिसरात टाकलेल्या धाडीत 60 लाख 50 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
महाराष्ट्र-तेलंगणा सीमेलगतच्या नांदेड भागात करण्यात आलेल्या कारवाईत 17 लाख 52 हजार रुपये किमतीचा गुटखा व वाहने जप्त करण्यात आली.
याशिवाय पिंपरी-चिंचवड येथील मोशी परिसरात छापा टाकून 6 लाख 19 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून 6 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
विभागनिहाय कारवाईचा आढावा
कोकण विभाग – 79 धाडी, 78 जणांना अटक
पुणे विभाग – 52 धाडी, 52 जणांना अटक
मुंबई विभाग – 15 धाडी, 30 जणांना अटक
नागपूर विभाग – 8 धाडी, 8 जणांना अटक
छत्रपती संभाजीनगर विभाग – 9 धाडी, 8 जणांना अटक
अमरावती विभाग – 2 धाडी, 1 जण अटकेत
शून्य सहनशीलता’ धोरणाचा इशारा
अन्न व औषध प्रशासन विभागाने स्पष्ट केले आहे की, राज्यात प्रतिबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार आहे. ‘गुटखा मुक्त महाराष्ट्र, निरोगी महाराष्ट्र’ ही मोहीम नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी निर्णायक ठरत असून जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात सरकारने शून्य सहनशीलता (Zero Tolerance) धोरण स्वीकारले आहे.




