छत्रपती मल्टीस्टेट घोटाळा  प्रकरणी दोन संचालक अटकेत, चार दिवसांची पोलिस कोठडी

जालना — बीड जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील शेकडो ठेवीदारांची आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोपाखाली छत्रपती मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या आणखी दोन संचालकांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. राजीव सतीश काळे (वय 40, रा. गेवराई, जि. बीड) आणि विठ्ठल पांडुरंग रुचके (वय 47, रा. सिरसदेवी, जि. बीड) अशी अटक करण्यात आलेल्या संचालकांची नावे आहेत. न्यायालयाने दोन्ही आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.


आर्थिक गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती मल्टीस्टेट सोसायटीचे अध्यक्ष संतोष बसवंत भंडारी, संचालक मंडळातील सदस्य आणि व्यवस्थापक यांनी ठेवीदारांना अधिक व्याजदराचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणावर ठेवी स्वीकारल्या होत्या. मात्र, मुदतपूर्ती झाल्यानंतर ठेवीदारांना त्यांची रक्कम परत न देता आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.
तपासादरम्यान संतोष भंडारी हे स्वतः ठेवीदारांच्या घरी जाऊन गुंतवणुकीसाठी प्रवृत्त करत असल्याचे समोर आले आहे. तसेच संस्थेच्या छत्रपती संभाजीनगर, बीड आणि जालना जिल्ह्यात एकूण 21 शाखा कार्यरत असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे.
फिर्यादी आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे आतापर्यंत 1 कोटी 31 लाख 44 हजार रुपयांच्या फसवणुकीची नोंद झाल्याचे पोलिसांनी सांगितले. तपासादरम्यान अटक करण्यात आलेल्या दोन्ही संचालकांचा गैरव्यवहारात सक्रिय सहभाग आढळून आल्याने त्यांना सोमवारी ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई जालन्याचे पोलिस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अपर पोलिस अधीक्षक विक्रम साळी आणि आर्थिक गुन्हे शाखेचे प्रभारी उपअधीक्षक सुरेश उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सपोनि मिथुन घुगे, उपनिरीक्षक शैलेश म्हस्के यांच्यासह आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची सूत्रे हाताळली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles