Home जिल्हा बीडच्या विकासासाठी आ.संदीप क्षीरसागर यांचा जोरदार पाठपुरावा; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची घेतली भेट

बीडच्या विकासासाठी आ.संदीप क्षीरसागर यांचा जोरदार पाठपुरावा; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची घेतली भेट

0
5
मुंबई — बीड शहराच्या विकासाला गती देण्यासाठी आणि रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आ. संदीप क्षीरसागर यांनी मुंबईत शासनाकडे जोरदार पाठपुरावा सुरू केला आहे. बीड शहरातील अंतर्गत महामार्गाचे रुंदीकरण करणे आणि नगर परिषदेच्या विकासकामांवरील स्थगिती उठवणे या दोन प्रमुख मागण्यांसाठी त्यांनी मंगळवारी (दि.९) रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. महामार्ग रुंदीकरणासाठी केंद्रीय निधी उपलब्ध करून देण्यासाठी आ. संदीप क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन बीड शहरातील रस्ते विकासावर चर्चा केली.
           सोलापूर–बीड–धुळे हा राष्ट्रीय महामार्ग बीड शहरातून जातो. हा मार्ग बीडच्या व्यापाराचा आणि दळणवळणाचा प्रमुख दुवा आहे. या मार्गावर वाढती वाहतूक, नागरिकांची गैरसोय आणि सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता रस्त्याचे रुंदीकरण व आधुनिकीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. केंद्रीय मार्ग निधी कार्यक्रम सन २०२५-२६ अंतर्गत या कामाचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून, या प्रस्तावास विशेष बाब म्हणून तातडीने मंजुरी द्यावी, अशी मागणी आ.क्षीरसागर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
         तसेच शहरातील भाजी मंडईच्या मंजूर कामांवरील स्थगिती उठवण्यासाठी आ. क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. बीड नगर परिषदेला वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विकासकामांच्या निधीवर सध्या स्थगिती आहे. ही स्थगिती तातडीने उठवण्याची मागणी त्यांनी केली. या निधीतून महात्मा फुले नवीन भाजी मंडई परिसराचे सुशोभीकरण व नूतनीकरण, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील भाजी मंडईचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. निधीअभावी ही कामे रखडली असून सर्वसामान्यांना याचा फटका बसत आहे. त्यामुळे संबंधित विभागाला तात्काळ कामे सुरू करण्याचे निर्देश द्यावेत, अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली.
                दरम्यान बीडकरांना चांगले रस्ते, सुरक्षित प्रवास आणि आधुनिक पायाभूत सुविधा मिळाव्यात यासाठी माझा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. बीडच्या विकासासाठी आवश्यक असलेला प्रत्येक निधी आणि प्रत्येक प्रकल्प मंजूर करून घेण्यासाठी मी कटिबद्ध आहे. असा विश्वास आ.संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here