मुंबई — महाराष्ट्रातील विविध शिक्षक संघटनांनी ९ जुलै रोजी राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. मतदार यादीच्या विशेष सघन पुनरावलोकन (SIR) मोहिमेत शिक्षकांची बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) म्हणून नियुक्ती करण्यात येत असल्यामुळे अध्यापनावर परिणाम होत असल्याचा दावा संघटनांनी केला आहे. त्यामुळे शिक्षकांना या गैर-शैक्षणिक जबाबदाऱ्यांमधून पूर्णपणे मुक्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.
आंदोलनाचा भाग म्हणून राज्यातील अनेक ठिकाणी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, जिल्हास्तरीय शिक्षण विभाग कार्यालयांबाहेर निदर्शने केली जाणार आहेत. तसेच मोठ्या संख्येने शिक्षक मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणार आहेत.
शिक्षक संघटनांच्या प्रमुख मागण्यांमध्ये २०१३ पूर्वी नियुक्त शिक्षकांना TET परीक्षेतून सूट, शिक्षकांसाठी अधिक व्यावहारिक TET धोरण आणि नवीन पदोन्नती धोरणात अनुभव व ज्येष्ठतेला प्राधान्य देण्याची मागणी करण्यात आली आहे.
संघटनांचे म्हणणे आहे की, BLO आणि इतर प्रशासकीय कामांमुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर अपेक्षित वेळ देता येत नाही. याचा थेट परिणाम शिक्षणाच्या गुणवत्तेवर होत असून, शिक्षकांना केवळ शैक्षणिक जबाबदाऱ्यांवर लक्ष केंद्रित करता यावे, यासाठी गैर-शैक्षणिक कामांतून मुक्त करणे आवश्यक आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून TET नियम, पदोन्नती धोरण आणि गैर-शैक्षणिक कामांबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे. मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही शिक्षक संघटनांनी दिला आहे.
९ जुलैला राज्यभर शिक्षकांचे आंदोलन; शाळा बंद ठेवण्याचा निर्णय
लाचखोर ढाकरेच्या ढोपरात एसीबीची लाथ; महावितरणचा कार्यकारी अभियंता जेरबंद
अंबाजोगाई — बीड जिल्ह्यात लाचखोरीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसतानाच अंबाजोगाई येथील महावितरण कार्यालयातील कार्यकारी अभियंता मनीष कुंडलिक ढाकरे यांना 5 हजार रुपयांची लाच स्वीकारताना बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी (दि. 7) रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे महावितरण विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा एक्वा प्लांट असून त्यासाठी ट्रान्सफॉर्मर बसविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. या प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी आणि आवश्यक स्वाक्षरी करण्याच्या बदल्यात मनीष कुंडलिक ढाकरे यांनी 5 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले.
तक्रारदारांनी याबाबत बीड एसीबीकडे तक्रार दाखल केल्यानंतर अधिकाऱ्यांनी तक्रारीची पडताळणी करून सापळा रचला. त्यानुसार मंगळवारी (दि. 7) मनीष कुंडलिक ढाकरे यांनी तक्रारदाराकडून 5 हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना कार्यालयातच रंगेहाथ ताब्यात घेतले.
या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. दरम्यान या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
देवपिंपरी शिवारातील जुगार अड्ड्यावर गेवराई पोलिसांची कारवाई
गेवराई — पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधातील मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई करत देवपिंपरी शिवारातील जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत सहा जणांना ताब्यात घेण्यात आले असून रोख रक्कम व मोटारसायकलींसह एकूण 4 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याच्या निर्देशानुसार गेवराई पोलिसांनी विशेष पथक तयार केले होते. या पथकाने 6 जुलै 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजता अंतरवलीकडे जाणाऱ्या पांदण रस्त्यालगत, देवपिंपरी शिवारातील गायरान जमिनीवरील गोठ्यात सुरू असलेल्या ‘तीर्रट’ जुगारावर अचानक छापा टाकला.
छाप्यादरम्यान सहा जण जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत रोख रक्कम आणि मोटारसायकली असा एकूण 4.25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी सरकारतर्फे दाखल फिर्यादीवरून गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 411/2026 नोंद करण्यात आला असून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार सुंदर राठोड करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक अप्पासाहेब रोकडे, सुंदर राठोड, रविंद्र राऊत, धनंजय सुळ आणि रामराजे यांनी सहभाग घेतला.
लाडकी बहिणींना 2,100 रुपये मिळणार? नव्या अहवालामुळे पुन्हा रंगली चर्चा; सरकारने केले स्पष्ट !
मुंबई — राज्यातील लाखो महिलांसाठी महत्त्वाची ठरलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने या योजनेअंतर्गत मिळणारी मासिक आर्थिक मदत 1,500 रुपयांवरून 2,100 रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, या वाढीची अंमलबजावणी नेमकी कधी होणार, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
दरम्यान, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने (EAC-PM) प्रसिद्ध केलेल्या अभ्यास अहवालामुळे 2,100 रुपयांच्या चर्चेला पुन्हा वेग आला आहे. या अहवालात महाराष्ट्रातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ओडिशातील ‘सुभद्रा योजना’ यांचा अभ्यास करण्यात आला आहे.
अहवालानुसार, वाढती महागाई आणि जीवनावश्यक खर्च लक्षात घेता अशा थेट आर्थिक मदत देणाऱ्या योजनांतील लाभाची रक्कम वेळोवेळी पुनरावलोकन करून आवश्यक असल्यास वाढवण्याचा विचार सरकारने करावा, अशी शिफारस करण्यात आली आहे.
अभ्यासात असेही नमूद करण्यात आले आहे की, या योजनेचा लाभ मिळाल्यानंतर महाराष्ट्रातील लाभार्थी महिलांच्या बँक खात्यांतील सरासरी शिल्लक 84 टक्क्यांनी वाढली, तर त्यांच्या मासिक खर्चात 46 टक्क्यांची वाढ झाली आहे. हा खर्च प्रामुख्याने आरोग्य, शिक्षण आणि कुटुंबाच्या दैनंदिन गरजांसाठी करण्यात आल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.
यासोबतच महिलांना केवळ आर्थिक मदत देण्याऐवजी डिजिटल साक्षरता, कौशल्य विकास आणि स्वयं-सहाय्यता गटांशी जोडण्यावर भर देण्याची शिफारसही अहवालात करण्यात आली आहे, जेणेकरून त्या दीर्घकालीन आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतील.
दरम्यान, योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर अर्जांची छाननी करण्यात आली. ई-केवायसी पूर्ण न करणे, पात्रतेच्या अटी पूर्ण न होणे तसेच अर्जातील त्रुटी अशा कारणांमुळे अनेक महिलांचा लाभ बंद करण्यात आला आहे.
याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की, पात्र असलेल्या कोणत्याही महिलेला योजनेतून वगळण्यात आलेले नाही. केवळ पडताळणीत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ थांबवण्यात आला आहे.
महत्त्वाचे म्हणजे, सध्या 2,100 रुपयांच्या आर्थिक मदतीबाबत राज्य सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा किंवा अंमलबजावणीची तारीख जाहीर झालेली नाही. त्यामुळे लाभार्थी महिलांनी केवळ अधिकृत घोषणांवरच विश्वास ठेवावा.
राम मंदिरातील चोरीवरून उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘रामरक्षा’ आंदोलनाला सुरुवात
मुंबई — अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरीच्या प्रकरणावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असून, राज्यव्यापी ‘रामरक्षा’ आंदोलनाला मुंबईतून प्रारंभ झाला आहे. दादर येथील हनुमान मंदिरात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रामरक्षा महाआरती आयोजित करण्यात आली. यावेळी खासदार संजय राऊत तसेच पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
महाआरतीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी राम मंदिरातील कथित चोरीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली. राम मंदिर उभारणीसाठी अनेक कारसेवकांनी बलिदान दिले असून, मंदिरासाठी भाविकांनी दिलेल्या देणग्यांचा हिशेब जनतेसमोर यायला हवा, अशी मागणी त्यांनी केली.
तसेच, “आम्ही श्रद्धाळू हिंदू आहोत, पण कुणी मंदिर लुटत असेल तर ते कदापि सहन करणार नाही. राम मंदिराला दिलेलं दान कुठे गेलं? शिवसेनेने दिलेली चांदीची वीट कुठे आहे?” असे सवाल उपस्थित करत त्यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली.
उद्धव ठाकरे यांनी पुढे सांगितले की, चोरीप्रकरणाचा निष्पक्ष निकाल लागेपर्यंत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष शांत बसणार नाही. राज्यभर सुरू करण्यात आलेले ‘रामरक्षा आंदोलन’ हे जनतेच्या भावनांशी जोडलेले आंदोलन असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, मुसळधार पावसातही मुंबईतील या आंदोलनाला ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत आंदोलनाला प्रतिसाद दिला.
नेकनूर पोलिसांची तत्पर कारवाई; श्रीरामपूरमधून बेपत्ता पीडित मुलीचा सुरक्षित शोध
बीड — जिल्ह्यातील नेकनूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक 253/2026 प्रकरणात बेपत्ता झालेल्या पीडित मुलीचा यशस्वी शोध घेण्यात नेकनूर पोलिसांना यश आले आहे. विशेष पथकाच्या तत्पर कारवाईमुळे संबंधित मुलगी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात सुरक्षित अवस्थेत आढळून आल्या.
तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याशी समन्वय साधत कारवाई केली. त्यानंतर श्रीरामपूर शहर पोलिसांच्या मदतीने पीडित मुलीला सुरक्षित ताब्यात घेण्यात आले. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना पुढील तपासासाठी नेकनूर पोलीस ठाण्याच्या पथकाच्या ताब्यात देण्यात आले.
या प्रकरणात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 137(2) अंतर्गत गुन्हा दाखल असून, पुढील तपास नेकनूर पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.ही यशस्वी कारवाई विशाल क्षीरसागर आणि सखाराम कदम यांनी पार पाडली.
शेतकऱ्यांची “साई “च्या नावे नॅचरल लूट; पाचात पडून “गवतात” लोळायचं अन शेतकऱ्याचा “बळी” देऊन “राम” घालवायचा नवा धंदा?
बीड — कारखानदारीच्या धंद्यामध्ये आदर्श निर्माण करणाऱ्या स्व. अजित पवारांच्या पक्षाच्या एका नेत्याने नावाप्रमाणेच शेतकऱ्यांचा “बळी” देऊन त्याच्यातला “राम” घालवून श्रद्धेचा बाजार मांडला आहे. “पाचात पडून गवतात लोळायचं”अन् शेतकऱ्यांच्या हिताच्या गप्पा मारत साई मंदिराच्या देणगीच्या नावाखाली पाच पाच हजार रुपयाला लुटण्याचा नवा धंदा सुरू केला आहे.“बा”ने सोडलेल्या या “पूं“(गी)ने संचालक मंडळाची “दाभाडे” शिवली गेली आहेत.या विरोधात हिरापूरच्या साईप्रसाद नॅचरल शुगर प्रायव्हेट लिमिटेड विरोधात शेतकऱ्यांनी दंड थोपटले आहेत.

एकीकडे राष्ट्रवादाच्या गप्पा मारत शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचा आव आणायचा.त्यांच्याच नावाखाली नेते म्हणून मिरवत तुंबडी भरायची कारखाने उभे करून त्यांचाच “बळी” घेत त्यांच्यातला “राम“घालवण्यासाठी वेगवेगळे फंडे आजमावयाचे हे बीड जिल्ह्याला नवे नाही. शेतकरी हिताच्या नावाखाली हिरापूर येथे साईप्रसाद नॅचरल शुगर प्रायव्हेट लिमिटेड ने 2025 – 26 मध्ये एक लाख 90 हजार टन ऊस गाळप केला. कारखान्याने शेतकऱ्यांना 2600 रुपये प्रति टन भाव देऊन शेतकरी अक्षरशः लुटला. शासनाने 10.25 टक्के साखर उताऱ्यावर 3650 रुपये एफ आर पी ठरवली आहे. 9.5 इतका जरी साखर उतारा कमी धरला तरी 3383 रुपये भाव देणे अपेक्षित होतं. पण बीड जिल्ह्याच्या दुर्दैवाने हे कोणत्याच कारखान्याच्या बाबतीत केलं जात नाही. काट्यात केलेले पाप तर वेगळाच विषय तो तर शेतकऱ्यांनी हाताळलाच नाही. “ऊस कारखान्याला जातोय ना”एवढाच मतलब शेतकऱ्यांनी ठेवला. शेतकऱ्यांच्या या शोषणाची नुसती चर्चा सुरू आहे. पण खरा प्रश्न नव्याने निर्माण झाला आहे.

कारखान्याने श्रद्धेचा बाजार मांडला
“साई “चा प्रसाद कारखान्याच्या संचालकांना पावला त्यातून कारखाना उभारला गेला. पण आता याच साई च्या मंदिर उभारणीच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या शोषणाचा नवा फंडा संचालक मंडळाने शोधून काढला. 200 हून अधिक ऊस वाहतूकदारांची पाच हजार रुपये याप्रमाणे देणगीच्या नावाखाली बेकायदेशीर वसुली केली गेली. विशेष म्हणजे कारखाना ही देवाच्या नावावर ज्या वित्त संस्थेतून हा व्यवहार केला गेला तो देखील गणेश मल्टीस्टेट को.आॅप सोसायटी यातूनच देणगीच्या पावत्या हवाली करण्यात आल्या. सगळा काळाबाजार करायचा तो देवाच्या नावावर अन् इकडे पुरोगामी असल्याचा डंका वाजवायचा हे दूटप्पी धोरण अवलंबिले जात आहे. बीड जिल्हा संत भूमी असल्यामुळे देवधर्माला मानणारा आहे. मागितलीच तर कोट्यावधी रुपयाची देणगी तो संस्थानांना देणारा आहे. शेतकरी गरीब असला तरी देवाच्या नावावर देणगी देण्याची दानत ठेवणारा आहे. पण इथे प्रश्न संचालक मंडळाने परस्पर केलेल्या शोषणाचा आहे.
कारखान्याच्या “बा” च्या “पूं ” गी ने संचालक मंडळाची दाभाडे शिवली
अबऽ ब ऽऽ”बा” कारखान्याच्या संचालकांनी देणगीची सोडलेली “पुं” गी सध्या समाज माध्यमावर चांगलीच वाजू लागली आहे. ऊस वाहतूकदारांनी अनेक वेळेला सामंजस्याची भूमिका घेत कारखाना प्रशासनाला पाच हजार रुपयाची केलेली कपात करू नये ती वापस द्यावी यासाठी विनंत्या केल्या पण शेतकऱ्याचा “बळी” देत त्याच्यातला “राम” घालवायचाच मग नव्या “पुं“गीच्या आवाजात वाहतूकदारांचा आक्रोश त्यांच्यापर्यंत कसा पोहोचणार?
शेतकरी क्रांती मोर्चा चे कुलदीप करपे यांनी या विरोधात आवाज उठवायला सुरुवात केली आहे. या संदर्भात लवकरच साखर आयुक्त पुणे, जिल्हाधिकारी बीड, प्रादेशिक साखर सहसंचालक, सहाय्यक धर्मादाय आयुक्त, न्यास नोंदणी कार्यालय येथे तक्रार करणारा असल्याचं शेतकरी नेते कुलदीप करपे यांनी “सह्याद्री माझा”शी बोलताना सांगितला आहे. शेतकऱ्यांनी साईप्रसाद कारखाने विरोधात दंड थोपटले असले तरी “महेशा” यासारखे ध्यानस्थ बसलेल्यांची “दाभाडे” मात्र सध्या तरी शिवली गेलेली आहेत.
शेतात हंडा सापडल्याची थाप ;बनावट सोन्याची नाणी विकून 5 लाखांची फसवणूक
बीड — जिल्ह्यातील चकलांम्बा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतात सोन्याचा हंडा सापडल्याचे आमिष दाखवत खासगी वाहनचालकाची तब्बल 5 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. बनावट सोन्याची नाणी विकून आरोपीने पैसे उकळल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून फरार आरोपीचा शोध सुरू केला आहे.
फिर्यादी राजकुमार बापूराव कांबळे (वय 45) हे खासगी वाहनचालक असून, त्यांची 1 जानेवारी 2026 रोजी पुण्यात मिलिंद अर्जुन निकाळजे याच्याशी ओळख झाली होती. काही दिवसांनंतर आरोपीने कांबळे यांना फोन करून आपल्या शेतात सोन्याचा हंडा सापडल्याचा दावा केला.
विश्वास निर्माण करण्यासाठी आरोपीने 16 एप्रिल रोजी कांबळे यांना बीड जिल्ह्यातील मालेगाव येथे बोलावून एक सोन्याचे नाणे नमुना म्हणून दिले. संबंधित नाणे सराफाकडून तपासल्यानंतर ते खरे असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे कांबळे यांचा आरोपीवर पूर्ण विश्वास बसला.
यानंतर 19 मे 2026 रोजी कांबळे यांनी आरोपीला 5 लाख रुपये रोख देऊन 1,000 सोन्याची नाणी असल्याची पिशवी घेतली. मात्र उदगीर येथे सराफाकडून तपासणी केली असता, सर्व नाणी बनावट असल्याचे समोर आले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
फसवणूक उघड झाल्यानंतर कांबळे यांनी आरोपीकडे पैसे परत मागण्यासाठी त्याच्या गावी अनेकदा चकरा मारल्या. मात्र आरोपी मिलिंद निकाळजे हा फरार झाला. अखेर कांबळे यांनी चकलांम्बा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी नागरिकांना अशा प्रकारच्या सोन्याचा खजिना, सोन्याची नाणी किंवा पुरातन वस्तू स्वस्तात मिळण्याच्या आमिषांना बळी पडू नये तसेच कोणताही व्यवहार करण्यापूर्वी संबंधित वस्तूंची आणि व्यक्तीची खातरजमा करण्याचे आवाहन केले आहे.
उधारी नाकारताच दुकानदारास दगडाने मारहाण करून कत्तीने केला प्राणघातक हल्ला
जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु
बीड — उधारीवर सामान न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका किराणा दुकानदारावर दारुड्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना बीड तालुक्यातील नागझरी येथे शुक्रवारी सांयकाळी घडली . मद्यधुंद अवस्थेत आलेल्या गुंडांनी वजन करण्याचे माप फेकून दिले. तसेच कत्तीने वार करून व दगडाने मारुन दुकानदाराला गंभीर जखमी केले.
नानासाहेब लक्ष्मण शिंदे (रा. नागझरी, ता. बीड) असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या किराणा दुकानदाराचे नाव आहे. नानासाहेब शिंदे यांचे नागझरी गावात किराणा दुकान आहे. शुक्रवारी सायंकाळी ते नेहमीप्रमाणे आपल्या दुकानात असताना गावातीलच दोन तरुण दारूच्या नशेत तर्र होऊन दुकानात आले. त्यांनी नानासाहेब यांच्याकडे उधारीवर सामानाची मागणी केली. मात्र, त्यांना उधारी देण्यास नानासाहेब यांनी नकार दिला.उधारी नाकारल्याचा या मद्यपींना प्रचंड राग आला. त्यांनी दुकानातच हुज्जत घालत नानासाहेब यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. रागाच्या भरात त्यांनी दुकानातील वजन करण्याचे माप फेकून दिले आणि नानासाहेब यांची गचांडी धरून त्यांना बेदम मारहाण केली. वाद एवढ्यावरच थांबला नाही, तर या मद्यपींनी आपल्या आणखी एकास घटनास्थळी बोलावून घेतले. त्यानंतर या तिघांनी मिळून नानासाहेब यांच्यावर दगड आणि कत्तीने (धारदार शस्त्र) सपासप वार केले. या अचानक झालेल्या हल्ल्यात नानासाहेब शिंदे गंभीर जखमी झाले. रक्ताळलेल्या अवस्थेत नानासाहेब यांना उपचारासाठी बीड येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत. शनिवारी दुपारपर्यंत नेकनूर पोलिसांनी रुग्णालयात जाऊन जखमी नानासाहेब शिंदे यांचा जबाब नोंदवला नव्हता. या घटनेमुळे नागरझारी परिसरात व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अशा गावगुंडांवर पोलिसांचा वचक राहिला आहे की नाही, असा संतप्त सवाल आता सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जात आहे. आरोपींना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
बीडमध्ये किराणा दुकानांवर डल्ला मारणाऱ्या अल्पवयीन टोळीचा पर्दाफाश
बीड — बीड शहरातील किराणा दुकानांमध्ये सातत्याने होत असलेल्या चोरीच्या घटनांचा अखेर शिवाजीनगर पोलिसांनी यशस्वी उलगडा केला आहे. या प्रकरणात एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले असून, त्याला किशोर न्याय मंडळासमोर हजर करण्यात येणार आहे. या कारवाईनंतर चोरीच्या आणखी अनेक घटनांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, संबंधित बालक हा किराणा दुकानांमध्ये चोरी करणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या टोळीचा प्रमुख होता. तो १४ ते १५ वर्षे वयोगटातील इतर मुलांना सोबत घेत असे. विशेष म्हणजे, पालकांची मोटारसायकल उपलब्ध असलेल्या मुलांचाच तो साथीदार म्हणून वापर करत होता.
टोळीची चोरी करण्याची पद्धतही अत्यंत चलाख होती. साथीदार मुलांना दुकानात अशी वस्तू मागण्यास सांगितले जात असे की, ती आणण्यासाठी दुकानदाराला दुकानाच्या मागील भागात जावे लागे. दुकानदार मागे गेल्यानंतर मुख्य आरोपी गल्ला उघडून त्यातील रोख रक्कम चोरत असे आणि काही क्षणांतच साथीदारांसह मोटारसायकलवरून पसार होत असे. या पद्धतीने शहरातील अनेक किराणा दुकानांमध्ये चोरी केल्याची कबुली प्राथमिक चौकशीत समोर आली आहे.
पोलिसांच्या चौकशीत या गुन्ह्यांमध्ये आणखी तीन ते पाच अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याची माहिती मिळाली असून, त्यांचा शोध सुरू आहे. या कारवाईमुळे शहरातील चोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांच्या नेतृत्वाखाली डी.बी. पथकाने कौशल्यपूर्ण तपास करत हा गुन्हा उघडकीस आणला. या मोहिमेत स.पो.नि. गुंजाळ तसेच बाळकृष्ण राहडे, सुदर्शन ठोसर, अनंत गिरी, सचिन आगलावे आणि अनिल घटमळ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
दरम्यान, संशयास्पद हालचाली किंवा चोरीसंदर्भातील कोणतीही माहिती तातडीने पोलिसांना कळविण्याचे आवाहन शिवाजीनगर पोलिसांनी नागरिकांना केले आहे.











