धारूरच्या हिंगणी तलावात होडी उलटली; दोन मुलींचा बुडून मृत्यू, गावात शोककळा

धारूर —  बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात असलेल्या हिंगणी तलावात शनिवारी सकाळी दुर्दैवी दुर्घटना घडली. तलावात पोहण्यासाठी गेलेल्या पाच मुलींमधील तिघी जणी मासेमारीसाठी वापरल्या जाणाऱ्या होडीत बसल्या असताना होडी अचानक उलटली. या दुर्घटनेत दोन अल्पवयीन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून एका मुलीला सुदैवाने वाचवण्यात यश आले आहे. या घटनेमुळे हिंगणी गावात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिंगणी येथील मासेमारी व्यवसाय करणाऱ्या कुटुंबातील पलक शामराव पारवे, दिव्या विकास कांबळे, मोहिनी भीमराव पारवे, तन्वी कोंडीराम पारवे आणि जानवी कोंडीराम पारवे या पाच मुली शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास तलावावर पोहण्यासाठी गेल्या होत्या.
तलावाच्या काठावर असलेल्या मासेमारीच्या होडीत पलक, दिव्या आणि मोहिनी या तिघी बसल्या. होडी काही अंतर आत गेल्यानंतर अचानक संतुलन बिघडून ती उलटली. त्यामुळे तिन्ही मुली पाण्यात पडून बुडू लागल्या.
मोहिनीला पोहता येत असल्याने ती स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत होती. मात्र पलक आणि दिव्या यांनी तिला पकडल्याने तिघीही पाण्यात बुडाल्या. तलावाच्या काठावर असलेल्या इतर मुलींनी आरडाओरडा केल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि तिघींनाही पाण्यातून बाहेर काढले.
या घटनेत मोहिनीला शुद्ध आली. मात्र पलक शामराव पारवे (वय १४, रा. हिंगणी) आणि दिव्या विकास कांबळे (रा. कासारवाडी, ता. परळी) यांना उपचारासाठी अंबाजोगाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणीनंतर दोघींनाही मृत घोषित केले.
या हृदयद्रावक घटनेनंतर हिंगणी परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून गावावर शोककळा पसरली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles