लिंबागणेश चा राष्ट्रीय महामार्गावर “मृत्यूचा सापळा”; भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू

बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे राष्ट्रीय महामार्ग ५४८ डी वर कार आणि दुचाकीच्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांनी गतिरोधक व सुरक्षा उपायांची मागणी केली आहे.

मृत्यूचा सापळा’ पुन्हा ठरला घातक; नागरिकांकडून गतिरोधक व सुरक्षा उपायांची मागणी

लिंबागणेश —  बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे राष्ट्रीय महामार्ग 548 डी वर शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. भालचंद्र विद्यालय परिसरात कार आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी महामार्गावरील वाढत्या अपघातांबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार (दि. 15 मे) रोजी रात्री सुमारे पाऊणे बारा वाजण्याच्या सुमारास टाटा कंपनीची विस्टा कार (क्र. MH 05 AX 0388) आणि हिरो स्प्लेंडर दुचाकी (क्र. MH 44 AA 6226) यांच्यात समोरासमोर भीषण धडक झाली. धडक इतकी जबरदस्त होती की दुचाकीवरील दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. नेकनूर पोलीस स्टेशनचे सहायक फौजदार विठ्ठल राठोड आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालय, बीड येथे हलविण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर दोघांनाही मृत घोषित केले.
या अपघातात मृत्यूमुखी पडलेले दुचाकीस्वार बबन काशिनाथ लगास आणि ज्ञानदेव विष्णू लगास (दोघे रा. चिखलबीड, ता. जि. बीड) असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे चिखलबीड गावावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग 548 डी वरील लिंबागणेश परिसरात वारंवार अपघात होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. विशेषतः भालचंद्र विद्यालय परिसरात वाहने भरधाव वेगाने धावत असल्याने हा भाग ‘अपघातप्रवण झोन’ बनला आहे. येथे तातडीने गतिरोधक बसविणे, वेगमर्यादा फलक उभारणे, रात्रीच्या वेळी प्रकाशव्यवस्था सुधारणे आणि वाहतूक नियंत्रणासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles