बीडमध्ये मुस्लिम समाजाचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला; ‘स्वयंघोषित गोरक्षकांवर गुन्हे दाखल करा’ची मागणी

बीड —  शहरातील मोमीनपुरा भागात पोलिसांच्या कारवाईदरम्यान स्वयंघोषित गोरक्षकांनी घरांची कुलपे तोडून दहशत निर्माण केल्याचा आरोप करत ऑल इंडिया जमियतुल कुरैश संघटना आणि मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची भेट घेतली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

शुक्रवारी झालेल्या या भेटीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शेख मुजीब, जेष्ठ नगरसेवक मोईन मास्टर, गटनेते फारुक पटेल, खुर्शीद आलम, भागवत तावरे यांच्यासह अनेक नगरसेवक व समाजातील प्रतिनिधी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, ११ मे २०२६ रोजी मध्यरात्री पेठ बीड पोलिसांनी मोमीनपुरा परिसरात कारवाई केली. या कारवाईत कथित गोरक्षकांनाही सहभागी करून घेण्यात आले. संबंधितांनी अनेक घरांची कुलपे तोडली, घरात घुसून दबाव टाकला आणि संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले. महिला व लहान मुले उपस्थित असतानाही संबंधितांनी आक्रमक वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यावेळी कारवाईचे व्हिडिओ शूट करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले. या व्हिडिओंमुळे बीडमधील कायदा व सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता असल्याचा इशाराही शिष्टमंडळाने दिला.
शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करताना सांगितले की, गोवंश हत्या बंदी कायद्याला विरोध नसला तरी त्या कायद्याच्या आडून खासगी स्वयंघोषित गोरक्षकांना सहभागी करून घेत पोलिसांनी केलेली कारवाई आक्षेपार्ह आहे. या संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी करून संबंधित गोरक्षकांसह त्यांना कारवाईत सहभागी करून घेणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी.

सना मलिक यांच्याकडेही मागणी

कुरेशी समाजाच्या प्रश्नांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वी सकारात्मक भूमिका घेतली होती. त्याचप्रमाणे बीड प्रकरणातही आमदार सना मलिक यांनी लक्ष घालावे, अशी विनंती शेख मुजीब यांनी केली.

शब्बीर मामूंसारखा गोरक्षक कोण?”

हिंदू-मुस्लिम सलोखा वाहक भागवत तावरे यांनी यावेळी परखड भूमिका मांडताना, “शिरूरचे पद्मश्री शब्बीर मामू यांच्यासारखा खरा गोरक्षक कोण आहे?” असा सवाल उपस्थित केला. धर्माच्या नावावर तेढ निर्माण करून समाजातील सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles