परळीतील मराठा भवन मराठा समाजाची उन्नती,सामाजिक सलोखा व एकतेचे मंदिर ठरेल – आ. धनंजय मुंडे
परळी — हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याला अभिप्रेत अशा प्रकारची सामाजिक एकोप्याची संस्कृती महाराष्ट्राची आहे.परळी शहरात व मतदारसंघात हीच सामाजिक सलोखा व एकतेची ताकद वर्षानुवर्षे आपल्या पाठीशी राहिलेली आहे. जात, धर्म,, पंथ या पलीकडे जाऊन कायमच आपण राजकारणात काम केले आहे. महाराष्ट्रात नावलौकिक होईल अशा प्रकारचे देखणे व वैभवशाली मराठा भवन आपल्या या परळीत आपण उभे करू आणि या माध्यमातून सबंध महाराष्ट्राला सामाजिक एकतेचा संदेश देऊ. या दृष्टीने परळीत उभे राहणारे मराठा भवन हे सामाजिक उन्नती बरोबरच अठरापगड जातीच्या एकतेचे मंदिर ठरेल असा विश्वास माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.
आ.धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने मराठा भवन उभारणीसाठी तब्बल 28 गुंठे जागा विकत घेऊन वैद्यनाथ मंदिर च्या परिसरात, अतिशय मुख्य रस्त्यावरील ही जागा हस्तांतरित करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षापासून सकल मराठा समाजाची ही भावना व मागणी लक्षात घेऊन स्वतः लक्ष घालत आ.धनंजय मुंडे यांनी छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या औचित्यावर सकल मराठा समाजाला मराठा भवन उभारणीसाठी ही जागा हस्तांतरित केली. मराठवाड्यात तालुकास्तरावर स्वतंत्रपणे उभे राहणारे हे पहिलेच मराठा भवन ठरणार आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने याबद्दल आ.धनंजय मुंडे यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत. याच अनुषंगाने मराठा युवा मंचच्या वतीने परळी वैजनाथ येथे आज आ.धनंजय मुंडे, नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई धर्माधिकारी आणि या मागणीचा पाठपुरावा करणाऱ्या मराठा सेवकांचा कृतज्ञता समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी मराठा भवन उभारणीसाठी पुढाकार घेतल्याबद्दल मराठा युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष बालासाहेब कडबाने यांच्या वतीने आ. धनंजय मुंडे, नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई धर्माधिकारी, मराठा सेवक सेवकराम जाधव, देवराव लुगडे महाराज, नितीन शिंदे, शिवाजी देशमुख ,दिलीप माने त्याचबरोबर ही जागा देणाऱ्या राजेंद्र सोनी तसेच माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकार, नगरपरिषदेचे गटनेते वैजनाथ सोळंके, मराठा समन्वयक प्रा. शंकर कापसे आदींचा हृदय सत्कार करण्यात आला.
यावेळी पुढे बोलताना आ. धनंजय मुंडे यांनी सांगितले की, एक लोकप्रतिनिधी या नात्याने हे आपले कर्तव्य आहे . आपल्या हृदयापासून मराठा भवन हे मोक्याच्या ठिकाणी आणि अतिशय दर्जेदार व वैभवशाली व्हावे ही आपली कायमच भूमिका होती. नगरपरिषदेच्या अनेक खुल्या जागा या मराठा भवन साठी उपलब्ध होत्या मात्र महाराष्ट्रात नावलौकिक होईल अशा प्रकारचे सामाजिक उत्थनाचे हे मंदिर योग्य जागेवरच उभे राहिले पाहिजे ही आपली भूमिका होती. त्या दृष्टीने वैद्यनाथ मंदिर परिसरातीलच जागा नाथ प्रतिष्ठानच्या वतीने विकत घेतली.या ठिकाणी आता सुसज्ज व वैभवशाली मराठा भवन उभे राहणार आहे. मराठा भवन मध्ये समाज उपयोगी उपक्रम राबवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मुला मुलींचे वसतीगृह, शिकवणी क्लासेस, अभ्यासिका, नोकरी मार्गदर्शन केंद्र आदी विद्यार्थी कलागुण विकसित करण्यासाठीचे उपक्रम या भवन मधून राबवण्यात येणार आहेत. उद्योग, व्यवसाय मार्गदर्शन, व्यवसायातील बारकावे, येणारी आव्हाने, उद्योजक, व्यावसायिकांचे परिचय मेळावे आदी आयोजित करण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर वधू-वर परिचय मेळावे, सामूहिक विवाह कार्य, शिक्षण, आरोग्य, कौटुंबिक, सामाजिक ,व्यावसायिक यासह अनेक विषयावर प्रबोधन मार्गदर्शन मिळावे आयोजित करण्यासाठी मराठा भवन उपयुक्त ठरणार आहे. सर्व गुणसंपन्न पिढी घडविण्याच्या दृष्टिकोनातून ही वास्तू एक महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी पुढे बोलताना आ.मुंडे यांनी सांगितले की, राजकारणात काम करत असताना आपण कधीही जात ,धर्म पंथ याचा लवलेशही लागू दिला नाही. मध्यंतरीच्या काळात हा सामाजिक समतोल बिघडवणाऱ्या काही घटना घडल्या, त्या आडून आपल्याला खलनायक ठरवण्याचा प्रयत्न झाला. मात्र आपण याविषयी कधीही व्यक्त झालो नाही. याचे कारण आपल्याला याची जाणीव आहे की गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात काम करत असताना 18 पगड जाती समूहाची हीच ताकद मला लढण्याची शक्ती देत आली आहे. मध्यंतरीच्या काळात जे काही झाले ते झाले, ते सहन केले मात्र सामाजिक विस्कटलेली घडी आपल्याला पुन्हा एकदिलाने,एकजुटीने आणि सामाजिक सलोख्यातून उभी करावी लागणार आहे.त्यादृष्टीने संबंध महाराष्ट्राला या सामाजिक एकतेचा संदेश देणारे परळीतील मराठा भवन हे प्रतीक ठरेल. सर्वांच्या योगदानातून अतिशय वैभवशाली मराठा भवन आपण उभे करू. त्याचबरोबर सामाजिक सलोखा, सामंजस्य आणि शिवरायांच्या स्वराज्याला अभिप्रेत अशी सामाजिक संरचना अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनीच कटिबद्ध राहावे असे आवाहन यावेळी धनंजय मुंडे यांनी केले.
यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा सेवक देवराव लुगडे महाराज यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा .रविंद्र जोशी यांनी तर आभार प्रदर्शन शंकर कापसे यांनी केले.या कार्यक्रमास राजकीय सामाजिक कार्यकर्ते मान्यवर प्रतिष्ठित नागरिक व परळीतील सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

