Home Blog Page 15

बीड पुन्हा शेतकरी आत्महत्यांमध्ये आघाडीवर; मराठवाड्यात सहा महिन्यांत ४६५ आत्महत्या

0

बीड — मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे संकट अद्यापही कायम असून शासनाच्या विविध उपाययोजनांनंतरही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली दिसत नाही. महसूल प्रशासनाच्या आकडेवारीनुसार, १ जानेवारी ते ३० जून २०२६ या सहा महिन्यांत मराठवाड्यात ४६५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. गेल्या वर्षी म्हणजे २०२५ मध्ये हा आकडा १,१३१ इतका होता.

या संपूर्ण चित्रात बीड जिल्हा पुन्हा एकदा सर्वाधिक चिंतेचा विषय ठरला आहे. ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीडमध्ये वारंवार पडणारा दुष्काळ, सिंचनाच्या अपुऱ्या सुविधा, शेतीवरील वाढते आर्थिक संकट आणि विकासाबाबतची दीर्घकालीन राजकीय अनास्था यामुळे अनेक शेतकरी अडचणीत सापडत आहेत. परिणामी, बीडची ओळख आता आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा अशीही होत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

२०२५ मधील शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी पाहिली असता, बीडमध्ये सर्वाधिक २५६ प्रकरणांची नोंद झाली. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर (२२४), नांदेड (१७०), धाराशिव (१४१), परभणी (१०४), जालना (९०), लातूर (७६) आणि हिंगोली (७०) असा क्रम होता. या १,१३१ प्रकरणांपैकी २२ प्रकरणांचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे.

चालू वर्षातही बीडची स्थिती गंभीरच असून, १ जानेवारी ते ३० जून २०२६ या कालावधीत छत्रपती संभाजीनगरमध्ये १०९, बीडमध्ये ९५, धाराशिवमध्ये ६५, नांदेडमध्ये ६१, जालना ४०, हिंगोली ३५, परभणी ३४ आणि लातूरमध्ये २६ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली आहे. सहा महिन्यांतच बीड पुन्हा सर्वाधिक प्रभावित जिल्ह्यांमध्ये असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होते.

शेतकरी आत्महत्यांबाबत शासनाकडून मदतीची प्रक्रिया सुरू असली तरी अनेक प्रकरणे अद्याप निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. यंदाच्या ४६५ प्रकरणांपैकी २१५ प्रकरणे आर्थिक मदतीसाठी पात्र, २६ प्रकरणे अपात्र, तर तब्बल २२२ प्रकरणांची चौकशी अद्याप सुरू आहे.

महसूल विभागाच्या माहितीनुसार, जानेवारी ते मे २०२६ या कालावधीत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना १ कोटी ८ लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली. त्यात जानेवारीसाठी ४६ लाख, फेब्रुवारीसाठी २४ लाख, मार्चसाठी २३ लाख, एप्रिलसाठी ९ लाख आणि मे महिन्यासाठी ६ लाख रुपयांचा समावेश आहे.

तर २०२५ मधील पात्र कुटुंबांना एकूण ९ कोटी ४५ लाख रुपयांची मदत वितरित करण्यात आल्याची माहिती महसूल प्रशासनाने दिली आहे.

मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे वाढते प्रमाण, विशेषतः बीडसारख्या दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील परिस्थिती, केवळ आर्थिक मदतीने सुटणारी नसून दीर्घकालीन सिंचन प्रकल्प, शेतीला हमीभाव, कर्जाचा ताण कमी करणे आणि ऊसतोड मजुरांच्या स्थलांतराचा प्रश्न यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याची भावना शेतकरी संघटनांकडून व्यक्त होत आहे.

घाटनांदूरमध्ये खळबळ! दगड, विटा आणि तीक्ष्ण हत्याराने तरुणाची हत्या

0

अंबाजोगाई —  तालुक्यातील घाटनांदूर येथे शनिवारी (११ जुलै) रात्री भररस्त्यात एका २३ वर्षीय तरुणाची तीक्ष्ण हत्याराने तसेच दगड-विटांनी मारहाण करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात मृत तरुणाचा मित्र गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मृत तरुणाचे नाव ज्ञानेश्वर वाकडे (वय २३, रा. पट्टीवडगाव) असे आहे.
प्राथमिक माहितीनुसार, ज्ञानेश्वर वाकडे हा शनिवारी रात्री आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून घाटनांदूरहून पट्टीवडगावकडे जात होता. दरम्यान, अण्णाभाऊ साठे चौकात काही जणांनी त्यांची दुचाकी अडवली. त्यानंतर हल्लेखोरांनी दोघांवर तीक्ष्ण हत्यारे, दगड आणि विटांनी अचानक हल्ला चढवला.
या हल्ल्यात ज्ञानेश्वर वाकडे गंभीर जखमी झाला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेला मित्र गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
घटनेनंतर मृताच्या नातेवाईकांनी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेतली असून तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. वृत्त लिहिपर्यंत या प्रकरणी अधिकृत गुन्हा दाखल झालेला नव्हता. अंबाजोगाई ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. तपासानंतर हल्ल्यामागील कारण आणि आरोपींबाबत अधिकृत माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

गँगस्टर शहजाद भट्टीशी कथित संबंध:छत्रपती संभाजी नगर,बीडसह जालन्यात एटीएस ची छापेमारी

0

छ.संभाजीनगर — मराठवाड्यात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) शुक्रवारी मोठी आणि संवेदनशील कारवाई करत छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात एकाच वेळी 150 ठिकाणी धाडसत्र राबवले. पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी कथित सोशल मीडिया संपर्काच्या तपासातून ही कारवाई करण्यात आली असून, विविध ठिकाणांहून एकूण 13 संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती एटीएस सूत्रांनी दिली आहे.
एटीएसच्या सूत्रांनुसार, छत्रपती संभाजीनगरमधून सर्वाधिक 10 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये वैजापूर येथील 2, मिसारवाडीतील 3, हर्सूलमधील 1, आरिफ कॉलनीतील 1, बायजीपुरा येथील 1 आणि शहरातील इतर भागांतील 2 संशयितांचा समावेश आहे. याशिवाय जालना जिल्ह्यातून 2 तर बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील पात्रूड येथून 1 संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.
प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानस्थित गँगस्टर शहजाद भट्टीशी संबंधित सोशल मीडिया किंवा डिजिटल युझर आयडीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील काही तरुण संपर्कात असल्याचा संशय एटीएसला आहे. या प्रकरणात एकूण 14 जण एटीएसच्या रडारवर असून, त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी राज्यभरात समांतर तपास सुरू आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची अज्ञात स्थळी कसून चौकशी सुरू असून, त्यांच्या मोबाईल फोन, सोशल मीडिया अकाउंट्स आणि डिजिटल व्यवहारांची तपासणी केली जात आहे. या चौकशीतून आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमध्ये सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क करण्यात आल्या आहेत. संशयितांचे नेटवर्क किती व्यापक आहे, त्यांच्या संपर्कामागील उद्देश काय होता आणि हा केवळ सोशल मीडियावरील संवाद होता की त्यामागे आणखी गंभीर कट रचला जात होता, याचा सर्वंकष तपास एटीएसकडून सुरू आहे.
अधिकृत तपास पूर्ण होईपर्यंत कोणत्याही निष्कर्षावर पोहोचणे योग्य नसल्याचे तपास यंत्रणांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मालक उपचारासाठी बाहेर, मुनीमाने कोरे चेक वापरून 34 लाख लाटले

0

केज — केज येथे विश्वासाच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. धान्य व्यापाऱ्याच्या व्यवसायातील सर्व आर्थिक व्यवहार सांभाळणाऱ्या विश्वासू मुनीमानेच मालकाच्या स्वाक्षरीचे कोरे धनादेश (चेक) चोरून 34 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एवढ्यावरच न थांबता दुकानातील 500 ते 600 पोती सोयाबीनची परस्पर विक्री करून 30 ते 40 लाख रुपयांचा अपहार केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार झाला आहे.
फिर्यादी हाजी मौला सालेमसाहब सौदागर (वय 65, रा. समता नगर, केज) हे केज मार्केट यार्ड परिसरात ‘सौदागर ट्रेडिंग कंपनी’ या नावाने धान्य खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. व्यवसायाचा विस्तार वाढल्याने आर्थिक व्यवहार, बँकेची कामे आणि हिशोब सांभाळण्यासाठी त्यांनी ऑक्टोबर 2022 मध्ये धारूर येथील शेख अतिक याला महिन्याकाठी 20 हजार रुपये पगारावर मुनीम म्हणून कामावर ठेवले होते. कामातील प्रामाणिकपणा आणि विश्वासार्ह वर्तनामुळे त्याने मालकाचा पूर्ण विश्वास संपादन केला होता.

उपचारासाठी राजस्थानला गेल्यानंतर साधला डाव

फिर्यादी हाजी मौला सौदागर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी राजस्थान येथे जावे लागले. 17 जून 2026 रोजी रवाना होण्यापूर्वी त्यांनी आपल्या मुलाकडे देण्यासाठी स्वाक्षरी केलेले चार कोरे धनादेश (क्रमांक 587270, 587271, 587274 आणि 587275) आरोपी शेख अतिक याच्याकडे दिले होते. हे धनादेश मुलाकडे पोहोचविण्याऐवजी आरोपीने स्वतःजवळच ठेवून त्यांचा गैरवापर करण्याचा कट रचल्याचा आरोप आहे.

बँकेच्या फोनने उघडकीस आला प्रकार

दरम्यान, 23 जून 2026 रोजी फिर्यादींना बँकेतून फोन आला. त्यांच्या खात्यातून 34 लाख रुपये वळते झाल्याची माहिती बँकेने दिली. ही माहिती मिळताच त्यांना मोठा धक्का बसला. त्यानंतर खात्याची तपासणी केली असता आरोपी शेख अतिक याने चारही धनादेशांचा वापर करून ती रक्कम स्वतःच्या तसेच त्याच्या नातेवाईकांच्या खात्यावर जमा करून परस्पर काढून घेतल्याचे समोर आले.

सोयाबीन विक्रीतही लाखोंचा अपहार

फसवणुकीची माहिती समोर आल्यानंतर व्यवसायातील इतर व्यवहारांची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी दुकानातील 500 ते 600 पोती सोयाबीन परस्पर विकून त्यातून अंदाजे 30 ते 40 लाख रुपयांचा अपहार केल्याचाही प्रकार उघड झाल्याचा आरोप फिर्यादीने तक्रारीत केला आहे. त्यामुळे एकाच आरोपीने व्यापाऱ्याला अनेक मार्गांनी आर्थिक फटका दिल्याचे समोर आले आहे.

मोबाईल बंद करून आरोपी फरार

घटना उघडकीस येताच आरोपी शेख अतिक याने आपला मोबाईल बंद केला आणि फरार झाला. राजस्थानहून 27 जून रोजी परतल्यानंतर फिर्यादींनी त्याचा शोध घेतला, मात्र तो मिळून आला नाही. अखेर त्यांनी केज पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

पोलिसांकडून तपास सुरू

फिर्यादीच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात आरोपी शेख अतिक याच्याविरुद्ध फसवणूक, विश्वासघात व संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू असून, बँक व्यवहार, धनादेशांचा वापर आणि सोयाबीन विक्री संदर्भातील आर्थिक व्यवहारांचीही पोलिसांकडून सखोल चौकशी करण्यात येत आहे.
व्यापारातील आर्थिक व्यवहारांमध्ये विश्वासू व्यक्तीकडूनच एवढ्या मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याने केजमधील व्यापारी वर्तुळात या घटनेची मोठी चर्चा सुरू आहे.

चकलांबा : गांजाची शेती उध्वस्त, 253 झाडांसह ₹48.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

0

बीड — बीड जिल्हा पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधातील विशेष मोहिमेदरम्यान मोठी कारवाई करत गेवराई तालुक्यातील सुरळेगाव शिवारातील ऊसाच्या शेतामध्ये करण्यात आलेली गांजाची लागवड उद्ध्वस्त केली. या कारवाईत गांजाची 253 झाडे, सुका व निमसुका गांजा असा एकूण ₹48 लाख 27 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
चकलांबा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गट क्रमांक 113 मधील ऊसाच्या शेतावर छापा टाकण्यात आला. तपासणीदरम्यान शेतामध्ये लहान-मोठी 253 गांजाची झाडे आढळून आली. या झाडांचे एकूण वजन 184.4 किलो असून त्यांची अंदाजित किंमत ₹46.10 लाख इतकी आहे.
याशिवाय 4 किलो 300 ग्रॅम सुका गांजा (किंमत ₹2,06,400) आणि 450 ग्रॅम निमसुका गांजा (किंमत ₹11,250) जप्त करण्यात आला. अशा प्रकारे कारवाईत एकूण ₹48,27,650 किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
या प्रकरणी मनोज ऊर्फ बादल भगवान आंधळे (वय 36), रा. नगद नारायण वस्ती, सुरळेगाव, ता. गेवराई याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास चकलांबा पोलीस करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगळे, पोलीस उपनिरीक्षक गणेश कन्हाडकर, सहाय्यक फौजदार सोमनाथ कुलकर्णी, पोलीस हवालदार विश्वनाथ प्रधान, नरेंद्र बांगर, पोलीस अंमलदार हनुमान इंगोले, संदीप गायकवाड आणि प्रशांत घोंगडे यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
दरम्यान, अमली पदार्थांची लागवड, साठवणूक, विक्री किंवा वाहतूक याबाबत माहिती असल्यास नागरिकांनी तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा अंमली पदार्थविरोधी पथकाशी 9270243200 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन बीड पोलिसांनी केले आहे. माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल.

ज्ञानराधा मल्टीस्टेट: ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी फडणवीसांचे मोठे आदेश

0

बीड — ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या ठेवीदारांना त्यांचे पैसे शक्य तितक्या लवकर परत मिळावेत, यासाठी आवश्यक सर्व प्रशासकीय आणि कायदेशीर प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. न्यायालयाकडे आवश्यक अधिसूचना काढण्याची प्रक्रिया गतीने राबविण्याबरोबरच जप्त मालमत्तांच्या लिलावासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने करण्याचे आदेशही त्यांनी प्रशासनाला दिले.
बीड जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी ज्ञानराधा मल्टीस्टेट प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली. बैठकीला जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे प्रत्यक्ष उपस्थित होते. तसेच खासदार बजरंग सोनवणे, आमदार विजयसिंह पंडित, आमदार प्रकाश सोळंके, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर आणि संबंधित विभागांचे अधिकारी ऑनलाइन सहभागी झाले.
मुख्यमंत्र्यांनी जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांचे प्रस्ताव नव्याने तयार करून त्यांचे नामांकित व्यावसायिक संस्थेकडून पुनर्मूल्यांकन करण्याचे निर्देश दिले. खासगी क्षेत्रातील निकषांनुसार पारदर्शक आणि वास्तव मूल्यांकन झाल्यास मालमत्तेचा लिलाव अधिक प्रभावी होऊन ठेवीदारांना जास्तीत जास्त रक्कम परत मिळू शकणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानराधा मल्टीस्टेटशी संबंधित 250 स्थावर, 74 जंगम मालमत्ता आणि 40 बँक खाती जप्त करण्यात आली असून त्यांचे विद्यमान मूल्यांकन 172.03 कोटी रुपये आहे. मात्र, पोलिस विभागाने मुद्रांक विभागाच्या शीघ्रसिद्ध गणकपत्रकानुसार या मालमत्तांची किंमत 399.03 कोटी रुपये असल्याचे नमूद केले आहे. व्यावसायिक मूल्यांकन कंपनीमार्फत फेरमूल्यांकन केल्यास या मालमत्तेचे मूल्य सुमारे चारपट वाढण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली.
जप्त मालमत्तांच्या लिलावासाठी बीड येथे स्वतंत्र न्यायालय स्थापन करण्याचा प्रस्ताव प्रमुख जिल्हा न्यायाधीशांनी उच्च न्यायालयाकडे सादर केला असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली.
जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सांगितले की, ज्ञानराधा मल्टीस्टेटचे 39,076 ठेवीदार आहेत. सुरेश कुटे आणि त्यांच्या निकटवर्तीयांना विनातारण व नियमबाह्य पद्धतीने कर्जवाटप करण्यात आले. ठेवीदारांच्या निधीचा वापर कुटे समूहाशी संबंधित कंपन्यांमध्ये करण्यात आला. या कंपन्यांनी त्याच मालमत्ता विविध बँकांकडे तारण ठेवून मोठ्या प्रमाणात कर्ज उचलले. कर्जाची परतफेड न झाल्याने संबंधित बँकांनी NCLT समोर दावे दाखल केले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांनी ठेवीदारांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून परताव्याची प्रक्रिया कोणताही विलंब न करता पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

बीडमध्ये ऊसतोड मजुराचे अपहरण; 4 दिवस अमानुष छळ, तोंडात लघुशंका केल्याचा आरोप

0

बीड — जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील उमापूर येथील एका ऊसतोड मजुराचे अपहरण करून चार दिवस बेकायदेशीरपणे डांबून ठेवत अमानुष छळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उचल (आगाऊ रक्कम) परत करण्याच्या वादातून हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. पीडिताच्या तोंडात लघुशंका करून मानहानी केल्याचाही गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.
पीडित देवीदास कापसे हे उमापूर (ता. गेवराई) येथील रहिवासी असून ऊसतोड मजूर म्हणून काम करतात. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, उचल रकमेसंदर्भातील वादातून मुकादम गणेश थोरात व त्याच्या साथीदारांनी त्यांचे जबरदस्तीने अपहरण केले.
अपहरणानंतर देवीदास कापसे यांना अज्ञात ठिकाणी नेऊन सलग चार दिवस डांबून ठेवण्यात आले. या काळात त्यांना अन्न-पाणी न देता लाठ्याकाठ्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच त्यांचा मानसिक छळ करत तोंडात लघुशंका केल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
देवीदास बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी शोधमोहीम सुरू केली. दरम्यान, स्थानिक सरपंचांनी पुढाकार घेत मध्यस्थी केल्यानंतर चार दिवसांनी त्यांची सुटका झाली. गंभीर अवस्थेतील देवीदास यांना बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
या प्रकरणात गेवराई पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. अपहरणानंतर पीडिताच्या वृद्ध आईने पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता सुरुवातीला तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या आरोपांमुळे पोलीस प्रशासनावर टीका होत आहे.
दरम्यान, आरोपी मुकादम गणेश थोरात व त्याच्या साथीदारांवर अपहरण, बेकायदेशीर कैद, मारहाण तसेच लागू असलेल्या इतर गंभीर कलमांसह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तातडीने अटक करण्याची मागणी होत आहे.

बीडच्या पाणीपुरवठा योजनेचा तिढा सुटणार; अपूर्ण कामांची चौकशी तर नवीन कामांना मंजुरी

0

आ. विजयसिंह पंडित यांच्या पुढाकारातून ना. सुनेत्रावहिणींच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

मुंबई — बीड नगर परिषदेच्या अमृत अभियान अंतर्गत मंजुर पाणीपुरवठा व भुयारी गटार योजनेतील कामांसंदर्भात उपमुख्यमंत्री ना. श्रीमती सुनेत्रावहिणी पवार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली. आ. विजयसिंह पंडित यांच्या पुढाकारातून आयोजित केलेल्या बैठकीमुळे बीड शहराच्या पाणीपुरवठा योजनेचा तिढा सुटणार आहे. कामे न करता कोट्यावधी रुपयांची उचल केल्याप्रकरणी कंत्राटदाराची चौकशी करून त्यांना काळ्या यादीत टाकणार, उर्वरित अपूर्ण कामांची नव्याने अंदाजपत्रके तयार करण्याच्या सूचना, महावितरणच्या थकबाकी संदर्भात तडजोडीने मार्ग काढण्याचा निर्णय बैठकीत झाल्याची माहिती आ. विजयसिंह पंडित यांनी दिली. बैठकीला नगरविकास, ऊर्जा, पाणीपुरवठा, महसुल, नियोजन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह नगर परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते. आढावा बैठकीमुळे बीड शहराच्या अमृत पाणीपुरवठा योजनेसह भुयारी गटार योजना कार्यान्वित होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

बीड नगर परिषदेला अमृत अभियान अंतर्गत सुमारे ११४.६३ कोटी रुपये किंमतीची पाणी पुरवठा योजना तर १६५.८० कोटी रुपयांची भुयारी गटार योजना सन २०१७ मध्ये मंजुर झाली होती. कंत्राटदारांनी अर्धवट कामे केलेली असतानाही त्यांना शेकडो कोटी रुपये संगणमताने अदा करण्यात आले. त्यामुळे ही योजना रखडली होती. आ. विजयसिंह पंडित यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. श्रीमती सुनेत्रावहिणी पवार यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार, दि.९ जुलै रोजी विधानभवन येथे उच्चस्तरीय आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीला खा. बजरंग सोनवणे, आ. विजयसिंह पंडित, नगराध्यक्षा प्रेमलताताई पारवे, उपनगराध्यक्ष विनोद मुळूक, नगराध्यक्ष प्रतिनिधी मुजीब शेख, गटनेते फारुक पटेल, स्थायी समिती सदस्य अमर नाईकवाडे, सभापती निजाम शेख यांच्यासह नगरविकास, ऊर्जा, पाणीपुरवठा, महसुल, नियोजन यांसह संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती आ. विजयसिंह पंडित यांनी दिली.

कामे न करता शेकडो कोटी रुपये शासन निधीची उचल केल्याप्रकरणी कंत्राटदारांची चौकशी करून दोषी कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय या बैठकीत झाला. अपूर्ण कामांचे नव्याने अंदाजपत्रक तयार करून सविस्तर प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिणी यांनी दिल्या. ईट जलशुध्दीकरण केंद्र येथील १ मे.वॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पाचे नेट मिटरींग करण्याच्या कामास महावितरणकडून मान्यता मिळाली. काडीवडगाव व ईट येथील जलशुध्दीकरण केंद्राच्या ठिकाणी आवश्यक विद्युत भार उपलब्ध करून देण्याच्या कामासह एक्सप्रेस फिडरने अखंडित व योग्य दाबाने विज पुरवठा करण्याच्या कामाचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिणी यांनी दिल्या. महावितरणच्या थकबाकी संदर्भात दंडव्याज माफ करून मुळ देयकातील रक्कमेचे टप्पे पाडणे तसेच ही रक्कम भरण्यासाठी शासन स्तरावरून निधीची उपलब्धता करणे बाबत बैठकीत चर्चा झाली. या बाबतचे सर्व प्रस्ताव दि.१४ जुलै पर्यंत सादर करून नगर विकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. के. एच. गोविंदराज यांच्या अध्यक्षतेखाली या बाबत बैठक घेण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाल्याची माहिती आ. विजयसिंह पंडित यांनी दिली.

बैठकी बाबत माहिती देताना आ. विजयसिंह पंडित म्हणाले की, स्व.अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून बीडच्या जनतेने नगर परिषदेचा कार्यभार आमच्या हाती दिला आहे. त्या विश्वासाला तडा जाणार नाही यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. मागील काळातील भ्रष्टाचारामुळे शेकडो कोटी रुपये निधी मिळूनही शहरातील नागरीकांना सुरळीत पाणीपुरवठा होऊ शकला नाही. तत्कालीन पदाधिकारी आणि कंत्राटदार यांच्या संगणमताने शेकडो कोटी रुपये अक्षरशः पाण्यात वाहून गेले आहेत. या सर्व भ्रष्टाचाराची चौकशी लवकरच होईल असेही त्यांनी सांगितले. बैठकीला उपमुख्यमंत्री ना. सुनेत्रावहिणी पवार, खा. बजरंग सोनवणे, आ. विजयसिंह पंडित, नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, उमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव डॉ. राजेश देशमुख, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव अमगोथु श्रीरंगा नायक, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या मुख्य अभियंता मनिषा पलांडे, महावितरणचे मुख्य अभियंता अरविंद बुलबुले, बीड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा प्रेमलताताई पारवे, उपनगराध्यक्ष विनोद मुळूक, नगराध्यक्ष प्रतिनिधी मुजीब शेख, गटनेते फारुक पटेल, स्थायी समिती सदस्य अमर नाईकवाडे, सभापती निजाम शेख, नगरसेवक अशफाक इनामदार, मुख्याधिकारी विक्रम मांडुरके यांच्यासह नगरविकास, पाणी पुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, वित्त व नियोजन, महसुल आदी भागातील वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

मांजरसुंबा घाटात कार अडवून अपहरण, दरोडा अन् ऑनलाइन लूट; नेकनूर पोलिसांनी 24 तासांत दोन आरोपी केले जेरबंद

0

बीड — मांजरसुंबा घाट परिसरात कार अडवून एका व्यक्तीचे अपहरण, मारहाण, दरोडा आणि ऑनलाइन व्यवहारांद्वारे सुमारे 1 लाख 80 हजार रुपयांची लूट केल्याच्या गंभीर गुन्ह्यात नेकनूर पोलिसांनी अवघ्या 24 तासांत दोन आरोपींना अटक करण्यात यश मिळविले आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गंभीर कलमांनुसार सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीपाद गंगाधरराव कुलकर्णी (वय 50, रा. वालवड, ता. भूम, जि. धाराशिव) हे कुटुंबीयांसह चारचाकी वाहनाने वालवड येथून छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना मांजरसुंबा घाटातील बळीराजा हॉटेल परिसरात आरोपींनी स्कॉर्पिओ आडवी लावून त्यांचे वाहन अडविले. त्यानंतर कोयत्याचा धाक दाखवत फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना जबरदस्तीने आरोपींच्या वाहनात बसवून मारहाण करण्यात आली.
एफआयआरनुसार, आरोपी उदयसिंह उर्फ सोनू सत्यजित सिंह जाधव रा. गणेगाव ता‌. भूम जि. धाराशिव याने  फिर्यादीला “तुझ्या आणि तुझ्या पत्नीच्या नावावरील मालमत्ता व एफडी माझ्या नावावर कर” असा दम देत दबाव टाकला. विरोध केल्यानंतर फिर्यादीच्या हातातील पाच ग्रॅम सोन्याची अंगठी आणि खिशातील 40 हजार रुपये रोख हिसकावून घेण्यात आले.
यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या एटीएम (ATM) कार्डचा पिन जबरदस्तीने विचारून घेतला. एफआयआरमध्ये नमूद केल्याप्रमाणे, निखील नावाच्या आरोपीने ध्येय साकत हॉटेल येथील स्वाइप मशीनद्वारे 40 हजार रुपये काढल्याचा आरोप आहे.
त्यानंतर आरोपींनी फिर्यादीचा मोबाईल ताब्यात घेऊन गुगल पे (Google Pay )चा पासवर्ड मिळविला. त्याद्वारे ‘सुरज ऑनलाइन सर्व्हिस सेंटर’ आणि ‘नीता मल्हारी नागटिळक’ यांच्या खात्यावर प्रत्येकी 25 हजार रुपये, असे एकूण 50 हजार रुपये ऑनलाइन हस्तांतरित करण्यात आल्याचा एफआयआरमध्ये उल्लेख आहे.
त्यानंतर फिर्यादीला गणेगाव (ता. भूम) येथे नेऊन काही काळ डांबून ठेवण्यात आले आणि वारंवार जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचाही आरोप आहे. याप्रकरणी उदयसिंह उर्फ सोनू सत्यजित सिंह जाधव रा. गणेगाव ता‌. भूम जि. धाराशिव, अजहर सय्यद, निखिल (पूर्ण नाव माहित नाही) रा. बेलगाव, पिंपळगाव ता. भूम व अन्य अनोळखी दोघा विरोधात नेकनूर  पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 277/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 310(2), 308(2), 140(3), 127(2), 127(6), 115(2), 351(3) आणि 352 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी स्वतंत्र तपास पथक तयार केले. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय माहिती आणि स्थानिक माहितीदारांच्या मदतीने तपास करत पोलिसांनी राहुल काळे व बाबू काळे (रा. भूम) या दोन आरोपींना भूम तालुक्यातील पारधी पिढीतून ताब्यात घेतले. उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली असून गुन्ह्यातील उर्वरित मुद्देमाल जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावंत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांच्या नेतृत्वाखाली  विदवान कांबळे, विशाल क्षीरसागर, तसेच भूम पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार रमेश शिंदे आणि पोलीस हवालदार क्षीरसागर यांनी संयुक्तपणे ही कारवाई यशस्वी केली.

गोरस भंडार प्रकरणात एफ डी ए ( FDA) चे स्पष्टीकरण; परवाना निलंबन बेकायदेशीर नाही

0

नागपूर — वर्धा येथील गोरस भंडार प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशाबाबत अन्न व औषध प्रशासन (FDA) नागपूर विभागाने महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. विभागाचे सहआयुक्त सचिन केदारे यांनी न्यायालयाने अन्न सुरक्षा विभागाने केलेली परवाना निलंबनाची कारवाई बेकायदेशीर ठरवलेली नसल्याचे स्पष्ट केले.
त्यांच्या माहितीनुसार, अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना कायद्यानुसार तात्काळ प्रभावाने परवाना निलंबित करण्याचा अधिकार असून, न्यायालयानेही हा अधिकार मान्य केला आहे. मात्र, संबंधित प्रकरणात गोरस भंडारला तपासणीनंतर ‘सुधार (Improvement) नोटीस’ देण्यात आली नव्हती. याच प्रक्रियात्मक त्रुटीची नोंद घेत न्यायालयाने प्रथम सुधार नोटीस बजावण्याचे निर्देश दिले आहेत.
सचिन केदारे यांनी सांगितले की, सुधार नोटीस दिल्यानंतर संबंधित आस्थापनाला उत्तर सादर करण्यासाठी कायदेशीर मुदत दिली जाईल. त्यानंतर प्राप्त उत्तर आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे अंतिम निर्णय घेतला जाईल. जर आवश्यक सुधारणा करण्यात आल्या नाहीत किंवा उत्तर समाधानकारक नसल्यास, पुढील 14 दिवसांत परवाना पुन्हा रद्द करण्याची प्रक्रिया कायद्यानुसार राबविण्यात येऊ शकते.
गोरस भंडार प्रकरणातील न्यायालयाच्या आदेशाबाबत विविध स्तरावर वेगवेगळे अर्थ काढले जात असताना, अन्न व औषध प्रशासनाने न्यायालयाच्या निर्देशांचे पूर्ण पालन करून पुढील कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रकरणांमध्ये अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत कठोर आणि कायदेशीर कारवाई सुरूच राहणार असल्याचाही पुनरुच्चार प्रशासनाने केला.