Home Blog Page 14

आश्रमशाळांतील संस्थाचालकांच्या मनमानी व भ्रष्ट कारभाराविरोधात सामाजिक न्याय भवनासमोर निदर्शने

0

कर्मचाऱ्यांची शारीरिक, मानसिक व आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप; उच्चस्तरीय ऑडिट, ऑनलाइन हजेरी व दोषींवर कारवाईची मागणी – डॉ. गणेश ढवळे

बीड — जिल्ह्यातील इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत चालणाऱ्या आश्रमशाळांमधील अनागोंदी कारभार, आर्थिक गैरव्यवहार आणि शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या शारीरिक आणि मानसिक छळाविरोधात सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली आज दि.२७ सोमवारी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे निदर्शने करण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री सुनेत्रा पवार आणि इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांना निवेदन सादर करण्यात आले.

जिल्ह्यातील ४५ आश्रमशाळांमध्ये सुमारे ७५० शिक्षक व कर्मचारी कार्यरत असून अनेक संस्थांमध्ये संस्थाचालक व त्यांच्या कुटुंबीयांचे वर्चस्व आहे. काही ठिकाणी अध्यक्ष, मुख्याध्यापक, शिक्षक आदी पदांवर एकाच कुटुंबातील सदस्य असल्याने आश्रमशाळा “प्रायव्हेट लिमिटेड कंपनी”प्रमाणे चालवल्या जात असल्याचा आरोप डॉ . गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केला.

प्रमुख मागण्या

१) सर्व आश्रमशाळांचे उच्चस्तरीय ऑडिट व ऑनलाइन हजेरी आश्रमशाळांमधील कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ऑनलाइन हजेरी सुरू करावी तसेच सर्व आश्रमशाळांचे उच्चस्तरीय समितीकडून विशेष ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.

२) अंथरवणपिंप्री तांडा प्रकरणाची चौकशी गेवराई तालुक्यातील अंथरवणपिंप्री तांडा येथील आश्रमशाळेतील महिला कर्मचारी सुरेखा विष्णू चव्हाण यांना कायदेशीर वेतनाची मागणी केल्यामुळे मानसिक, आर्थिक व शारीरिक छळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. तसेच त्यांच्या पतीवर संस्थेच्या सचिवांनी मारहाण केल्याचा आरोप करत संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

३) वडझरी आश्रमशाळेतील कथित आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी पाटोदा तालुक्यातील वडझरी येथील आश्रमशाळेत पटसंख्येबाबत अनियमितता, शिक्षक मान्यतेतील कथित नियमभंग, वेतन अपहार व शासनाची फसवणूक झाल्याचा आरोप करत संबंधितांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

४) सहाय्यक संचालकांवर कारवाईची मागणी संस्थाचालकांची कथित पाठराखण करून कारवाईस विलंब केल्याचा आरोप करत इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या बीड येथील सहाय्यक संचालकांवर प्रशासकीय कारवाई करून संबंधित प्रकरणांची तटस्थ चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.

आंदोलनात माहिती अधिकार कार्यकर्ते शेख युनुस, शेख मुबीन, शिवशर्मा शेलार, हनुमान घोडके, किष्किंधा पांचाळ,बाळासाहेब मोरे पाटील ( शिवशक्ती भिमशक्ति विचारमंच प्रदेशाध्यक्ष), माजी सैनिक अशोक येडे( जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी बीड), प्राचार्य डी.जी.तांदळे ( मार्गदर्शक मराठवाडा शिक्षक संघ बीड), नितीन जायभाये ( अध्यक्ष बीड शहर बचाव मंच), बाजीराव ढाकणे,सुहास जायभाये,ज्येष्ठ सामाजसेवक डॉ.संजय तांदळे, किसन पुंड (राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र आश्रमशाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी महासंघ),धनंजय सानप (बीड जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र आश्रमशाळा शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी महासंघ), पवार बी.एच.( जिल्हाध्यक्ष हिंगोली महाराष्ट्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महासंघ), जमजाळ आर.डी.( प्रसिद्ध प्रमुख महाराष्ट्र आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महासंघ), सहशिक्षक,संजय जायभाये, अशोक सानप, मच्छिंद्र आंधळे, राहुल थिटे,नेवळे प्रदीप, कालिदास वनवे, सतिश राठोड यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.

पंकजा मुंडेंचा वाढदिवस:बीडमध्ये ‘नादवेध’ संगीत महोत्सव; डॉ.योगेश क्षीरसागरांकडून आयोजन

0

बीडच्या कलाक्षेत्राला पाठबळ ताल साधना म्युझिक सर्कल’चे उदघाटन, कलावंतांचा विशेष पुरस्काराने सन्मान

बीड — मंत्री पंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचा विचार होता. त्यांचा वाढदिवस तरुणाईला दिशा देणारा ठरेल. ज्यांना परिस्थितीमुळे कला शिकता आली नाही, त्यांना मोफत शिक्षण मिळावे, यासाठी ताल साधना म्युझिक सर्कलच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध झाले. अलीकडे डीजेवरच गर्दी होताना दिसते, मात्र, सांस्कृतिक कार्यक्रमालाही बीडमध्ये होणारी गर्दी कला क्षेत्रासाठी मोठी बाब आहे. पंकजाताईंच्या वाढदिवसानिमित्त बीडच्या
कला क्षेत्राला पाठबळ मिळत आहे, असे प्रतिपादन भाजपचे युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी केले.

पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त बीड येथील सौ. के. एस. के. महाविद्यालयाच्या प्रांगणात रविवारी (दि.२६) ‘नादवेध’ संगीत महोत्सव, ताल साधना म्युझिक सर्कलचे उदघाटन आणि कलावंतांना पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ.क्षीरसागर हे बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालनाट्य परिषदेच्या अध्यक्षा, प्राचार्य दिपाताई क्षीरसागर ह्या होत्या. प्रमुख अतिथी म्हणून डॉ.क्षीरसागर यांच्यासह ह.भ.प.अमृत महाराज जोशी, प.पु.विशाल महाराज रामदासी, पंडित अरविंदकुमार आझाद गुरुजी, संपादक संतोष मानुरकर, कृष्णा साळुंके आदींची उपस्थिती होती. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष अशोक लोढा, मंडळ प्रमुख मनोज पाटील, भरतअण्णा लोळगे, सतीश सुलाखे, एकनाथ महाराज पुजारी, सुदर्शन धुतेकर, के. सी. चव्हाण, डॉ. वासुदेव निलंगेकर, वासुदेव काळजे, प्रियंका देशमाने, सुरंजन जायभाये, नरहरी दळे, अभिषेक काकडे, कृष्णा शिंदे, नगरसेवक नितीन साखरे, आदित्य माने, शुभम धूत, गणेश लांडे, डॉ.लक्ष्मण जाधव, सुंदर चव्हाण, अजय सवई, शांतिनाथ डोरले, सुभाष क्षीरसागर, अनिल चांदणे, सुलभा पाटील, अरुण बोंगाणे, प्रा.शिवानंद क्षीरसागर, विठ्ठल गुजर, डॉ.रमेश शिंदे, शुभम कातांगळे, राजू माहुवाले, विश्वास आखाडे, शरद बडगे, संग्राम बांगर, सुशील जाधव, अमोल वडतिले आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन डॉ.योगेश क्षीरसागर, नगरसेविका डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांच्यासह सौ. के.एस.के. विद्यालयाच्या पुढाकारातून करण्यात आले होते. प्रास्ताविक तबला वादक प्रकाश मानुरकर यांनी केले. सूत्रसंचलन दिपक बिल्पे यांनी केले. आभार प्रा.संजय पाटील देवळाणकर यांनी मानले. यावेळी भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते, संगीतप्रेमी, विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कलावंतांचा सन्मान; उत्कृष्ट सादरीकरण

मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे उध्दवशास्त्री घाडगे, डॉ.शुभम कुलकर्णी, प्रा.चिन्मय पुजारी, प्रा.कृष्णा रामदासी, अनुराधाताई चिंचोलकर यांचा सन्मान करण्यात आला. संगीत महोत्सवात पंडित अरविंदकुमार आझाद गुरुजी यांनी सादर केलेल्या तबला सोलोने रसिकांची दाद मिळवली, तर कृष्णा साळुंके यांच्या पखवाज सोलोने कार्यक्रमाची रंगत अधिक खुलवली. तसेच, नृत्य क्षेत्रातील गार्गी कुलकर्णी यांचे विशेष कौतुक करण्यात आले.

क्षीरसागर कुटुंबियांनी कला क्षेत्राचा वारसा जोपासला-अमृत महाराज जोशी

ह.भ.प. अमृत महाराज जोशी म्हणाले, डॉ.योगेश क्षीरसागर हे स्वतः गायक, तबला वादक आहेत. त्यांच्या आजी स्व.केशरकाकू क्षीरसागर ह्या नाटकात सक्रिय असायच्या, तर दुसऱ्या आजी स्व.सुहासिनी ईर्लेकर ह्या कलावंत होत्या. आजींसोबतच आई डॉ.दिपाताई यांच्याकडून कला, साहित्याचा वारसा डॉ.योगेश यांना मिळाला. क्षीरसागर कुटुंबियांनी कला क्षेत्राचा वारसा जोपला, असे आवर्जून नमूद केले. पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्ताने हा अनोखा उपक्रम राबविला जातोय. त्यांना दीर्घायुष्य लाभावे, अशा शब्दात शुभेच्छा दिल्या.

विशाल महाराज रामदासी, डॉ.दिपाताई क्षीरसागरांकडून उपक्रमास शुभेच्छा

प्रमुख अतिथी विशाल महाराज रामदासी म्हणाले, बीडच्या कला-संगीत क्षेत्राला चालना मिळत आहे. नव्या उपक्रमातून कलावंत घडतील. तर उदघाटक डॉ.दिपाताई क्षीरसागर यांनी पंकजाताई मुंडे यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले. संगीत क्षेत्राचे शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली, ही माझी स्वप्नपूर्ती आहे, असेही त्या म्हणाल्या.

ताल साधना म्युझिक सर्कल’मध्ये १ ऑगस्टपासून मोफत प्रवेश सुरू

के.एस.के. महाविद्यालयांतर्गत सुरू होत असलेल्या ‘ताल साधना म्युझिक सर्कल, बीड’ येथे संगीत व नृत्य प्रशिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. मार्गदर्शक म्हणून नामदेव साळुंके (शास्त्रीय गायन), पल्लवी कीर्तीकर (कथ्थक नृत्य), प्रकाश मानुरकर (तबला वादन) आणि अभिषेक लोळगे (पखवाज वादन) हे कार्यरत राहणार आहेत. १ ऑगस्टपासून वर्गांना प्रारंभ होणार असून, प्रवेश मर्यादित असल्याने इच्छुक विद्यार्थी व पालकांनी त्वरित प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

शिक्षक भरती घोटाळ्याचे “मूळे” नामांकित लोकांमध्ये घुसणार? एस आय टी ला मुदत वाढ

0

बीड — बीडमध्ये उघडकीस आलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याचे धागेदोरे आता राज्यभर गाजत असलेल्या बोगस शिक्षक भरती प्रकरणाशी जोडले जात असल्याने शिक्षण विभागातील गैरव्यवहाराची व्याप्ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. भ्रष्टाचाराची पाळे “मूळे” “चंद्र”कलेप्रमाणे वाढत गेली.अपात्र शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना नियमबाह्य पद्धतीने शालार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट करून शासनाच्या तिजोरीवर आर्थिक भार टाकल्याच्या प्रकरणाची चौकशी आता आणखी दोन महिने सुरू राहणार आहे. राज्य शासनाने विशेष चौकशी पथकाला (SIT) ७ ऑगस्ट २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. राज्यात उघडकीस आलेल्या या घोटाळ्यात पात्र शिक्षकांच्या हक्कावार गदा आली. म्हणून पोलिसांनी याप्रकरणी मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल केले आहेत.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने २४ जुलै २०२६ रोजी शासन निर्णय जारी करून ही मुदतवाढ दिली. त्यामुळे बीडसह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये समोर आलेल्या बोगस शिक्षक भरती, बनावट कागदपत्रे आणि शालार्थ प्रणालीतील नियमबाह्य नोंदींच्या तपासाला आता निर्णायक वळण मिळण्याची शक्यता आहे.

बीडमधील शालार्थ घोटाळ्याने उघडले शिक्षण विभागाचे वास्तव

बीड जिल्ह्यातील शालार्थ आयडी घोटाळा समोर आल्यानंतर शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी, संस्थाचालक आणि मध्यस्थांच्या कथित संगनमताचा मुद्दा ऐरणीवर आला. पात्रता आणि नियमांची पूर्तता नसतानाही काही शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नावे शालार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट करून त्यांना शासनाच्या वेतन प्रणालीचा लाभ मिळवून दिल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.”भा”रतीय शिक्षण प्रसारक संस्था मधून

या प्रक्रियेत बनावट कागदपत्रे, नियमबाह्य मान्यता, खोटी अथवा संशयास्पद कागदपत्रे आणि प्रशासकीय स्तरावरील गैरप्रकार यांचा वापर झाला का, याचा तपास महत्त्वाचा ठरत आहे. बीडमधील प्रकरणामुळे शालार्थ प्रणालीमध्ये एखाद्या कर्मचाऱ्याचे नाव समाविष्ट करण्याच्या प्रक्रियेत नेमके कोणते अधिकारी आणि कोणत्या पातळीवर जबाबदार आहेत, या चौकशीतून कुणाकूणाच्यात  “मुळे” घुसणार कोणाची फाटणार? याकडे लक्ष लागले आहे.

शिक्षणाधिकारी ते उपसंचालक कार्यालयापर्यंत तपासाची व्याप्ती

शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात केवळ संबंधित शिक्षक किंवा शिक्षण संस्थांपुरतीच चौकशी मर्यादित नसून, संपूर्ण प्रशासकीय प्रक्रियेची तपासणी होण्याची शक्यता आहे. शिक्षणाधिकारी कार्यालयापासून शिक्षण उपसंचालक कार्यालयापर्यंत झालेल्या प्रक्रियेत कोणाची भूमिका होती, कागदपत्रांची छाननी कशी झाली आणि नियमबाह्य नोंदींना मंजुरी कशी मिळाली, याची उत्तरे तपासातून शोधली जात आहेत.

यामुळे शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी, संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि कथित मध्यस्थांचे नेटवर्क तपास यंत्रणेच्या रडारवर येण्याची शक्यता आहे. बीडमधील घोटाळ्याच्या तपासातून समोर येणारे धागेदोरे राज्यातील इतर जिल्ह्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

१६० कोटींपेक्षा अधिक आर्थिक नुकसानाचा दावा

या संपूर्ण गैरप्रकारामुळे शासनाच्या तिजोरीवर मोठा आर्थिक भार पडल्याचा दावा करण्यात येत आहे. शासनाची १६० कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याचे प्रकरणाशी संबंधित दावे आहेत. नियमबाह्य पद्धतीने नियुक्ती अथवा शालार्थ प्रणालीमध्ये नोंद झालेल्या कर्मचाऱ्यांना वेतन मिळाल्यास त्याचा थेट परिणाम पात्र शिक्षकांच्या संधीवर आणि शासनाच्या आर्थिक व्यवस्थेवर होतो.

त्यामुळे हा केवळ बोगस भरतीचा विषय नसून शिक्षण विभागाच्या प्रशासकीय यंत्रणेतील संभाव्य संगनमत आणि शासनाच्या निधीच्या गैरवापराचा गंभीर प्रश्न म्हणून या प्रकरणाकडे पाहिले जात आहे.

पुलकुंडवार यांच्याच नेतृत्वाखाली तपास सुरू राहणार

या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष चौकशी पथकाचे प्रमुख डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची नुकतीच ग्रामविकास विभागाच्या सचिवपदी नियुक्ती झाली. त्यामुळे त्यांच्या बदलीनंतर SITचे नेतृत्व कोण करणार, याबाबत शिक्षण आयुक्तांनी शासनाकडे मार्गदर्शन मागितले होते.

मात्र, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने अंतिम अहवाल सादर होईपर्यंत डॉ. पुलकुंडवार यांची SIT प्रमुखपदावरील नियुक्ती कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रशासकीय बदली झाली असली तरी बीडसह राज्यातील शालार्थ आणि शिक्षक भरती घोटाळ्याच्या तपासाची धुरा त्यांच्या नेतृत्वाखालीच राहणार आहे.

बडे मासे अडकणार?

बीडमधील शालार्थ आयडी घोटाळ्यापासून सुरू झालेला तपास आता राज्यातील शिक्षक भरती आणि शालार्थ प्रणालीतील कथित गैरव्यवहाराच्या व्यापक चौकशीशी जोडला जात आहे. त्यामुळे तपास जसजसा पुढे जाईल, तसतसे अधिकारी, कर्मचारी, संस्थाचालक आणि मध्यस्थांमधील कथित साखळीतील आणखी नावे समोर येणार का, या घोटाळ्यात प्रथित यश डॉक्टर, वकील अशा नामवंत हस्ती अडकणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विशेष चौकशी पथकाला यापूर्वी ७ जून २०२६ पर्यंत अंतिम अहवाल सादर करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने तपास पूर्ण करण्यासाठी शासनाने आता ७ ऑगस्ट २०२६ पर्यंत दोन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.

या मुदतवाढीमुळे बीडमधील शालार्थ आयडी घोटाळ्यासह राज्यातील बोगस शिक्षक भरती प्रकरणाच्या तपासाला आणखी वेळ मिळाला आहे. त्यामुळे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात SITचा अहवाल कोणते धक्कादायक खुलासे करतो आणि या प्रकरणात नेमकी कोणावर जबाबदारी निश्चित होते, याकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

बीडमधील शालार्थ आयडी घोटाळ्याने उपस्थित केलेले प्रश्न आता राज्यव्यापी तपासाच्या केंद्रस्थानी आले असून, या चौकशीत शिक्षण विभागातील कथित गैरव्यवहाराची संपूर्ण साखळी उघड होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

नीट (NEET) निकालानंतर  परळीतील विद्यार्थी बेपत्ता; कुटुंबीयांकडून पोलिसांत तक्रार

0

परळी (जि. बीड) —  नीट (NEET) परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील परळी शहरातील एक विद्यार्थी अचानक घरातून निघून गेल्याची घटना समोर आली आहे. आदित्य राठोड असे बेपत्ता विद्यार्थ्याचे नाव असून, त्याचा गेल्या काही दिवसांपासून शोध सुरू आहे. या घटनेमुळे राठोड कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

आदित्यने नुकतीच नीट परीक्षा दिली होती. वैद्यकीय शिक्षणासाठी महत्त्वाची असलेल्या या परीक्षेत त्याला अपेक्षेप्रमाणे गुण मिळाले नसल्याने तो काही दिवसांपासून तणावात असल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. निकाल जाहीर झाल्यानंतर तो कोणालाही काहीही न सांगता घराबाहेर पडला. त्यानंतर त्याच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.

आदित्य घरी परतला नसल्याने कुटुंबीयांनी नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या मदतीने त्याचा शोध घेतला. संभाव्य ठिकाणी चौकशी करूनही त्याचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर त्याचे वडील भगवान राठोड यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.

तक्रारीची नोंद घेतल्यानंतर परळी शहर पोलिसांनी आदित्यचा शोध सुरू केला आहे. पोलिसांकडून विविध ठिकाणी माहिती घेण्यात येत असून, कुटुंबीय आणि नातेवाईकही त्याचा शोध घेत आहेत.

दरम्यान, परीक्षेतील अपेक्षित यश न मिळाल्याने विद्यार्थ्यांवर निर्माण होणारा मानसिक ताण हा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र, या प्रकरणात आदित्यचा नेमका ठावठिकाणा अद्याप स्पष्ट झालेला नसून, पोलिसांकडून त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

शेळ्या चोरी करणारी टोळी जेरबंद; बीड स्थानिक गून्हे शाखेची मोठी कारवाई

0

वडवणी, धारूर, नेकनूर आणि तलवाडा परिसरातील सहा गुन्ह्यांची उकल; स्विफ्ट कारसह ४ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त

बीड —  जिल्ह्यातील विविध भागांत शेळ्यांची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखा, बीडला यश आले आहे. शेळी चोरीच्या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिघांना स्विफ्ट कारसह ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी वडवणी, धारूर, नेकनूर आणि तलवाडा परिसरात दिवस-रात्र शेळ्या चोरी केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या कारवाईत वाहन आणि रोख रक्कम असा एकूण ४ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वडवणी पोलीस ठाण्यात गु.र.नं. १३९/२०२६, भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये शेळी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांच्याकडून सुरू होता. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोपींचा शोध घेत होते.
दरम्यान, २५ जुलै २०२६ रोजी पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने यांच्या पथकाला पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोपींचा शोध घेत असताना गोपनीय माहिती मिळाली. सुभाष किसन विटकर, रा. गांधीनगर, बीड याने शेळी चोरीचा गुन्हा केला असून तो खंडेश्वरी देवी मंदिरासमोरील मैदानावर आपल्या मित्रांसह थांबला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
माहिती मिळताच पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन सुभाष किसन विटकर, बेग रफीक बेग रशीद, रा. बलभीम चौक, बीड आणि इमरान चाँद शेख, रा. तेलगाव नाका, बीड या तिघांना त्यांच्या ताब्यातील स्विफ्ट कारसह ताब्यात घेतले.
पोलिसांनी तिघांकडे शेळी चोरीबाबत चौकशी केली असता, सुभाष विटकर याने आपल्या दोन साथीदारांसह स्विफ्ट कारचा वापर करून वडवणी, धारूर, नेकनूर आणि तलवाडा परिसरात दिवस तसेच रात्रीच्या वेळी शेळ्या चोरी केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सहा गुन्ह्यांची कबुली

आरोपींनी दिलेल्या कबुलीनुसार, या टोळीने विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत शेळी चोरीचे एकूण सहा गुन्हे केल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये वडवणी पोलीस ठाण्यात तीन, नेकनूर पोलीस ठाण्यात एक, तलवाडा पोलीस ठाण्यात एक आणि धारूर पोलीस ठाण्यात एक अशा सहा गुन्ह्यांचा समावेश आहे.
या गुन्ह्यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे—
वडवणी पोलीस ठाणे — गु.र.नं. १३९/२०२६, कलम ३०३(२) भा.न्या.सं.
वडवणी पोलीस ठाणे — गु.र.नं. १३४/२०२६, कलम ३०३(२) भा.न्या.सं.
वडवणी पोलीस ठाणे — गु.र.नं. ३२/२०२६, कलम ३०३(२) भा.न्या.सं.
नेकनूर पोलीस ठाणे — गु.र.नं. ९९/२०२६, कलम ३०३(२) भा.न्या.सं.
तलवाडा पोलीस ठाणे — गु.र.नं. २९३/२०२६, कलम ३०३(२) भा.न्या.सं.
धारूर पोलीस ठाणे — गु.र.नं. १५६/२०२६, कलम ३०३(२) भा.न्या.सं.
अशाप्रकारे आरोपींच्या चौकशीतून वडवणी, धारूर, नेकनूर आणि तलवाडा परिसरातील सहा शेळी चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

४ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त

या कारवाईदरम्यान तिन्ही आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले वाहन आणि रोख रक्कम असा एकूण ४ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. तिन्ही आरोपींना जप्त केलेल्या मुद्देमालासह पुढील तपास आणि कायदेशीर कारवाईसाठी वडवणी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या टोळीने आणखी काही ठिकाणी शेळ्यांची चोरी केली आहे का, तसेच या गुन्ह्यांमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबतचा तपास संबंधित पोलीस करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक  नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक, अंबाजोगाई श्रीमती चेतना तिडके आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक . व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, पोलीस हवालदार बप्पासाहेब घोडके, दिलीप गित्ते, दीपक खांडेकर, जफर पठाण, अर्जुन यादव आणि चालक गणेश मराडे यांनी सहभाग घेतला.

योजना पूर्ण करून शहरवासीयांना शुद्ध व नियमित पाणीपुरवठा करा – मुख्यमंत्री फडणवीस

0

छत्रपती संभाजी नगर पाणीपुरवठा योजना आढावा बैठक

मुंबई —  छत्रपती संभाजीनगर वासियांना पुरेपूर पाण्याचा पुरवठा करण्यासाठी जायकवाडी प्रकल्पातून पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. या योजनेचे काम गतीने पूर्ण करून शहरवासीयांना शुद्ध व नियमित पाणीपुरवठा करावा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी याबाबत आयोजित बैठकीत दिले.
बैठकीस सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, खासदार संदिपान भुमरे, आमदार सतीश चव्हाण, माजी खासदार डॉ. भागवत कराड उपस्थित होते तर दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे इमाव बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी बैठकीत सहभाग घेतला.
कंत्राटदाराने व संबंधित यंत्रणांनी पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी टप्पे पाडण्याच्या सूचना देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, योजनेची अर्धवट झालेली कामे कंत्राटदाराकरवी तातडीने पूर्ण करून घ्यावीत. पाण्याच्या टाकीची बांधकामे पूर्ण करण्यात यावीत. शहरातील वितरण प्रणालीचे कामही पूर्णत्वास न्यावे. अर्धवट कामांमुळे शहरवासीयांना पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करता येत नाही. या योजनेच्या कामासाठी संबंधित विभागाने स्थळ पाहणी करून सद्यस्थितीबाबत कंत्राटदारासोबत स्वतंत्र बैठक घ्यावी.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कुठल्याही परिस्थितीत योजनेचे काम विहित कालावधीत पूर्ण करावे. शेवटच्या शहरवासीयाला नियमित व शुद्ध पाण्याचा पुरवठा करणे हे शासनाचे कर्तव्य आहे. त्यानुसार महापालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व पाणीपुरवठा विभागाने समन्वयाने काम करून योजना पूर्णत्वास न्यावी. शहरातील नळ जोडण्या देण्याचे प्रमाण वाढवावे. कंत्राटदाराच्या कामाचे मूल्यांकन करून वेळोवेळी कामाचा आढावा घ्यावा. संबंधित कंत्राटदाराकडून पाणीपुरवठा वितरण प्रणालीचे ‘हायड्रोलिक टेस्टिंग’ पूर्ण करावे.
कंत्राटदाराने योजनेचे विहित कालावधीत काम पूर्ण करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. योजनेच्या कामाचे नियोजित टप्पेनिहाय आराखडा बनवून याबाबत पुढील बैठकीत सादरीकरण करावे, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. जुन्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीच्या रेस्टोरेशनचे कार्य महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने करावे. रिस्टोरेशनचे कार्य गतीने पूर्ण करून खोदलेले रस्ते आणि खड्ड्यांची दुरुस्ती करावी. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये शहरात कुठेही खड्ड्यांमुळे अपघात होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
बैठकीत पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव पराग जैन यांनी सादरीकरण केले. बैठकीस संभाजीनगरचे महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समिती अध्यक्ष अनिल मकरिये, अपर मुख्य सचिव (नगर विकास) के. गोविंदराज, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव नायक, महापालिका आयुक्त अमोल येडगे, छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण महानगर आयुक्त जी. श्रीकांत आदी उपस्थित होते. तसेच दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे छत्रपती संभाजी नगर जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी बैठकीत सहभाग घेतला
थोडक्यात पाणीपुरवठा योजना …
छत्रपती संभाजी नगर शहराच्या २०५२ मध्ये असणाऱ्या लोकसंख्येला ६०४ एमएलडी (मिलियन लिटर पर डे) एवढा पाणीपुरवठा गृहीत धरून जायकवाडी प्रकल्पावरून पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. पाणी वितरणासाठी शहरात ५९ पाण्याच्या टाक्या बांधण्यात येणार त्यापैकी २९ पाण्याच्या टाक्या पूर्ण झाल्या आहेत. शहरात १९११ किलोमीटर पाणी पुरवठा वितरण प्रणालीपैकी १२९१ किलोमीटर पाईपलाईनचे काम पूर्ण करण्यात आले आहे. तसेच ४६ हजार ५०० नळ जोडण्या देण्यात आल्या आहेत.

शेतात फवारणी करत असलेल्या वकिलावर प्राणघातक हल्ला

0

बीड — मारहाण ,खून यासारख्या घटनांनी कायदा सुव्यवस्थेची इभ्रत रोज वेशीला टांगली जात आहे. अशाच आणखी एका घटनेने खळबळ माजली आहे.गेवराई तालुक्यातील सावरगाव येथे जमिनीच्या जुन्या वादाने पुन्हा एकदा हिंसक वळण घेतले असून,न्यायालयीन प्रक्रियेनंतर ताब्यात आलेल्या शेतजमिनीत काम करत असलेल्या एका वकिलावर दोन भावांनी काठ्यांनी बेदम मारहाण करत प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात संबंधित वकिलाचा पाय फ्रॅक्चर झाला असून डोके, पाठ, छाती आणि खांद्यावर गंभीर दुखापत झाली आहे. विशेष म्हणजे संपूर्ण मारहाणीचा व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रीत झाल्याच फिर्यादीत म्हटले आहे.
गेवराई पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार, विकास छत्रभूज मिसाळ (वय 43, व्यवसाय- वकील, रा. सावरगाव) हे गेल्या वीस वर्षांपासून बीड जिल्हा न्यायालयात वकिली व्यवसाय करतात. त्यांच्या कुटुंबाची सावरगाव येथे इंग्रजी माध्यमाची शाळा असून त्यांच्या पत्नी मुख्याध्यापिका आहेत. फिर्यादीनुसार, त्यांच्या आई सागराबाई यांना न्यायालयाच्या आदेशानुसार सावरगाव शिवारातील गट क्रमांक 319 मधील 23 गुंठे जमीन ताब्यात मिळाल्यानंतर ते त्या जमिनीची शेती करत आहेत.

फवारणी सुरू असतानाच हल्ला

11 जुलै रोजी सकाळी सुमारे आठ वाजता विकास मिसाळ हे दीपक अंगद जाधव यांच्यासह शेतात भेंडी पिकावर औषध फवारणी करण्यासाठी शेतात गेले. फवारणी सुरू असताना पांडुरंग कान्होबा मिसाळ व त्याचा भाऊ भागवत कान्होबा मिसाळ हे हातात लाकडी काठ्या घेऊन तेथे पोहोचले. संबंधित जमीन आपण खरेदी केली आहे असं म्हणत वाद घालण्यास सुरुवात केली. काही वेळातच हा वाद थेट हल्ल्यात बदलला.
फिर्यादीनुसार, पांडुरंग मिसाळ यांनी लाकडी काठीने विकास मिसाळ यांच्या उजव्या गुडघ्यावर जोरदार प्रहार केला. यामूळे त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला. त्यानंतर भागवत मिसाळ यांनी काठीने पाय, पाठ, छाती, खांदा, डोके आणि कानाजवळ वारंवार मारहाण करून गंभीर जखमी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

जमिनीवर पाडून पुन्हा मारहाण

मारहाणीतून बचाव करण्यासाठी विकास मिसाळ यांनी एका आरोपीच्या हातातील काठी हिसकावून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र पांडुरंग मिसाळ याने त्यांना जमिनीवर पाडून दाबून धरले. त्यानंतर भागवत मिसाळ याने पुन्हा त्यांच्या पायावर काठीने मारुन गंभीर जखमी केले. यावेळी “या जमिनीत पुन्हा दिसलास तर कायमचा काटा काढू,” अशी धमकीही दिली.

मारहाणीचा व्हिडिओ; साक्षीदारालाही मारहाण

या संपूर्ण घटनेचे चित्रीकरण विकास मिसाळ यांच्यासोबत असलेले दीपक अंगद जाधव यांनी मोबाईलमध्ये केले. मात्र व्हिडिओ काढत असल्याचे लक्षात येताच आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करून चापटाबुक्क्यांनी मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली.
याशिवाय विकास मिसाळ यांच्या खिशातील सुमारे 60 हजार रुपये किमतीचा व्हिवो कंपनीचा मोबाईल फोडण्यात आला.

गुन्हा दाखल; तपास सुरू

या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पांडुरंग कान्होबा मिसाळ व भागवत कान्होबा मिसाळ, दोघेही रा. सावरगाव, ता. गेवराई यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) मधील कलम 115(2), 118(1), 118(2), 3(5), 324(4), 351(2), 351(3) आणि 352 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

बीड : स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत जातेगावात 7.75 लाखांचा गुटखा जप्त

0

गेवराई (बीड) —  बीड स्थानिक गुन्हे शाखेने अवैध धंद्यांविरोधात आणखी एक मोठी कारवाई करत गेवराई तालुक्यातील जातेगाव येथून ₹7 लाख 75 हजार 540 किमतीचा महाराष्ट्रात प्रतिबंधित विविध कंपन्यांचा गुटखा जप्त केला आहे. हा गुटखा शेतातील ऊसाच्या पिकामध्ये असलेल्या जनावरांच्या गोठ्यामध्ये विक्रीच्या उद्देशाने लपवून ठेवण्यात आला होता.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 12 जुलै 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक शेखर औटे, पोलीस हवालदार अंकुश वरपे , पोलीस हवालदार गोविंद राख , पोलीस अंमलदार बबन सलगर  आणि चालक पोलीस हवालदार नितीन वडमारे  हे उपविभाग गेवराई हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते.

यावेळी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मौजे जातेगाव (ता. गेवराई, जि. बीड) येथील एका इसमाने आपल्या शेतातील ऊसाच्या पिकामध्ये असलेल्या जनावरांच्या गोठ्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला विविध कंपन्यांचा गुटखा विक्रीसाठी साठवून ठेवला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या आदेशानुसार पथकाने तात्काळ छापा टाकला. छाप्यामध्ये जातेगाव शिवारातील ‘मळा’ येथील शेतातील ऊसाच्या पिकामध्ये असलेल्या जनावरांच्या गोठ्यामधून विविध कंपन्यांचा ₹7,75,540 किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला.

या प्रकरणी अमोल महादेवराव धोंडरे (वय 30, रा. जातेगाव, ता. गेवराई, जि. बीड) याच्या ताब्यातून मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्याविरुद्ध तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 218/2026 नोंद करण्यात आला आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 123, 274 आणि 275 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेखर औटे, पोलीस हवालदार अंकुश वरपे, पोलीस हवालदार गोविंद राख, पोलीस अंमलदार बबन सलगर आणि चालक पोलीस हवालदार नितीन वडमारे यांनी यशस्वीपणे पार पाडली.

लोकसंख्या वाढ ही भारतापुढील गंभीर समस्या — प्रा. डॉ. विलास भिल्लारे

0

चौसाळा — जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून लोकांमध्ये लोकसंख्या वाढीच्या संदर्भात जागरूकता निर्माण करण्याची आपल्याला संधी आहे असे प्रतिपादन चौसाळा महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. विलास भिलारे यांनी व्यक्त केले. कला व विज्ञान महाविद्यालय चौसाळा येथे भूगोल विभागाच्या वतीने जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना डॉक्टर भिलारे म्हणाले की लोकसंख्या वाढ ही विकसनशील राष्ट्रांमधील फार मोठी समस्या आहे. त्याबद्दल आपण सर्वांनी मिळून जनजागृती करणे आवश्यक आहे. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित खाकरे उपस्थित होते. भूगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुधाकर वनवे यांनी जागतिक लोकसंख्या दिनाचे महत्त्व प्रास्ताविकात विशद केले . अध्यक्षीय भाषण करताना प्राचार्य डॉ. पंडित खाकरे म्हणाले की कुटुंब नियोजनाचे महत्त्व,लैंगिक समानता, गरीब मातांचे आरोग्य, आणि मानवाधिकार यासारख्या विविध लोकसंख्याविषयक समस्या बद्दल जागृती निर्माण करण्यासाठीच हा दिवस साजरा केला जातो. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. देशमुख सर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. चव्हाण सर यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते.

बीड पोलिसांचा ‘डीपआय ‘ प्रकल्प चर्चेत; तक्रारीपासून आरोपपत्रापर्यंत तपास होणार वेगवान !

0

बीड — महाराष्ट्र पोलीस दलाच्या तपास प्रक्रियेला अधिक वेगवान, अचूक आणि तंत्रज्ञानाधारित बनवण्यासाठी बीड पोलीस दलाने विकसित केलेल्या ‘डीपआय एआय’ (DeepEye AI) या प्रणालीची राज्यस्तरीय संकल्पना पडताळणी (Proof of Concept – PoC) यशस्वीरीत्या पार पडली. बीड शहर पोलीस ठाण्यात झालेल्या या सादरीकरणात तज्ज्ञ समितीने प्रकल्पाच्या तांत्रिक आणि तपासविषयक क्षमतेची पाहणी केली.
या प्रणालीद्वारे प्रथम माहिती अहवाल (First Information Report – FIR) तयार करण्यासाठी लागणारा वेळ ३ ते ४ तासांवरून अवघ्या ३ ते ४ मिनिटांपर्यंत कमी होत असल्याचे प्रात्यक्षिकात दाखवण्यात आले. तक्रार नोंदविण्यापासून तपास, पुरावे, आरोपपत्र आणि न्यायालयीन खटल्याच्या प्रगतीवर देखरेख ठेवण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया एकाच डिजिटल व्यासपीठावर (Digital Platform) उपलब्ध करून देण्यात आली आहे.
यामध्ये आवाजाचे मजकुरात रूपांतर (Speech-to-Text), दूरध्वनीवरील तक्रार, ई-मेल (Email), कागदपत्रांचे वाचन (OCR), सीसीटीव्ही चित्रफितीचे विश्लेषण (CCTV Footage Analysis), चेहरा ओळख (Face Recognition), वाहन ओळख (Vehicle Identification), कॉल तपशील विश्लेषण (CDR Analysis) आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (Artificial Intelligence – AI) मदतीने तपासाची दिशा सुचविण्याची सुविधा देण्यात आली आहे.
तसेच २०१७ पासूनचे सर्व एफआयआर (FIR) आणि ८०० हून अधिक आरोपपत्रे (Charge Sheets) प्रणालीच्या ज्ञानसंचात (Knowledge Base) समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे पूर्वीच्या प्रकरणांचा संदर्भ घेऊन तपास अधिक प्रभावी करण्यास मदत होणार आहे.
तज्ज्ञ समितीने डीपआय एआय (DeepEye AI) प्रकल्पाच्या तांत्रिक क्षमता, डेटा सुरक्षा, कायदेशीर सुसंगती आणि प्रत्यक्ष तपासातील उपयुक्ततेबाबत समाधान व्यक्त केले. हा प्रकल्प भविष्यात महाराष्ट्रासह देशातील इतर पोलीस दलांसाठीही आदर्श ठरू शकतो, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.