Home Blog Page 90

आरक्षण 50 टक्क्यात; बीड जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका कधी? आयोगाच्या निर्णयाकडे लक्ष

बीड — जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत 50 टक्के आरक्षणाच्या मर्यादांच पालन ज्या ठिकाणी झाल आहे. त्या ठिकाणी निवडणुका घेण्यास न्यायालयाने आयोगाला परवानगी दिली आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात निवडणूकीचे पडघम वाजणार असल्याचं सांगितलं जात आहे.निवडणुक विभागाने आयोगाला आरक्षणा बाबतचा अहवालही पाठविल्याने निर्णयाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
जवळपास चार वर्षांपासून जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर प्रशासक राज आहे. सुरुवातीला कोविड संसर्गाची लाट, नंतर आरक्षणाचा मुद्दा, प्रभाग रचना आदी मुद्द्यांमुळे सातत्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडत गेल्या.मार्च 2026 पूर्वी निवडणुका पूर्ण करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले.त्यानंतर प्रभाग रचना, आरक्षण या तांत्रिक प्रक्रियाही पूर्ण झाल्या. ज्या जिल्हा परिषद व पंचायत समितींमध्ये आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा अधिक असेल तेथे निवडणूक घेता येणार नसल्याची स्थिती आता निर्माण आहे. बीड जि.प. व पं. स.मध्ये आरक्षणाची कुठलीही मर्यादा ओलांडलेली नसल्याने बीडच्या निवडणुका निर्धारित वेळेत होण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषदेची पूर्वीची सदस्यसंख्या 60 आणि पंचायत समिती सदस्यांची संख्या 120 होती. यात एका गटाची आणि दोन गणांची वाढ होऊन आता जिल्हा परिषद सदस्यसंख्या 61 व पंचायत समिती सदस्यांची संख्या 122 झाली आहे. जिल्हा परिषदेच्या गटांपैकी अनुसूचित जाती (आठ), अनुसूचित जमाती (एक) आणि नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 16 गट आरक्षित आहेत. म्हणजे आरक्षित गटांची संख्या 25 (41.98 टक्के) इतकी आहे. म्हणजेच आरक्षण मर्यादा 50 टक्क्यांच्या आतच आहे.
नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या आरक्षणाची मर्यादा 27 टक्के देण्यात आलेली आहे. या बाबतीतही जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे आरक्षण मर्यादेतच असल्याचे जिल्हा निवडणूक विभागाने आयोगाला पाठविलेल्या अहवालात दिसत आहे.

जिल्ह्यातील आरक्षणाची स्थिती
( सदस्य संख्या.       आरक्षण टक्केवारी)
जिल्हा परिषद – 61- 41.98
गेवराई पंचायत समिती-18 – 38.88
माजलगाव पंचायत समिती : 12 – 41.66
वडवणी पंचायत समिती- 4 – 50
बीड पंचायत समिती – 16 – 37.50
शिरूर कासार पंचायत समिती – 8 – 37.50
पाटोदा पंचायत समिती -6 – 33.33
आष्टी पंचायत समिती- 14 –35.71
केज पंचायत समिती- 14 -42.85
धारूर पंचायत समिती – 6 –33.33
परळी पंचायत समिती -12 41.66
अंबाजोगाई पंचायत समिती — 12 — 41.66

गोदाकाठच्या 32 गावांच्या पुर्नवसनाची आ. विजयसिंह पंडितांची लक्षवेधी

मंत्री मकरंद जाधव यांनी दिले बैठकीचे आश्वासन

गेवराई —  गेवराई विधानसभा मतदार संघाचे आ. विजयसिंह पंडित यांनी नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात गेवराई विधानसभा मतदार संघातील गोदावरी काठच्या ३२ पूरग्रस्त गावांचे पुर्नवसन करण्याची मागणी लक्षवेधीद्वारे मांडली. लक्षवेधीला उत्तर देताना मदत व पुर्नवसन मंत्री ना. मकरंद जाधव पाटील यांनी अधिवेशन संपल्यानंतर या बाबत मुंबईमध्ये बैठक घेऊन पुर्नवसनाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

गेवराई विधानसभा मतदार संघाचे आमदार विजयसिंह पंडित यांनी गेवराई तालुक्यातून जाणाऱ्या गोदावरी नदीकाठावरील ३२ पुरग्रस्त गावांच्या पुर्नवसनाचा प्रश्न लक्षवेधीद्वारे मांडला. यावेळी बोलताना आ. पंडित म्हणाले की, नाशिक तसेच जायकवाडी धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत सोडावा लागत असून यामुळे गेवराई विधानसभा मतदार संघातील पाथरवाला, गुंतेगाव, सुरळेगाव, पांचाळेश्वर, राक्षसभूवन (शनिचे), गुळज यांच्यासह एकूण ३२ गावांना दरवर्षी पुराचा गंभीर धोका निर्माण होतो. सन २००६ मध्ये जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आल्याने गोदावरी नदीस महापूर आला आणि गेवराई तालुक्यातील गोदाकाठच्या ३२ गावांमधील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होवून घरांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले. अनेक नागरीकांना स्थलांतर करावे लागले. त्या अनुषंगाने तत्कालीन सरकारने सदर ३२ गावांचा पुर्नवसन करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आज १९ वर्षे उलटूनही पुर्नवसनाचा प्रश्न कायम प्रलंबित आहे. यावर्षी २०२५ मध्येही जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग झाल्याने संबंधित गावांत पुन्हा एकदा पुर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे नागरीकांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण पसरले होते. अशावेळी आम्ही त्यांना धिर दिला, अशा या गंभीर परिस्थितीत प्रशासनाकडून वेळेवर सक्षम उपाययोजना करणे आवश्यक असून त्याअनुषंगाने जिवीत व वित्तहानी टाळण्यासाठी गेवराई तालुक्यातील ३२ गावांचे पुर्नवसन करण्याची मागणी आ. विजयसिंह पंडित यांनी यावेळी केली.

आ. विजयसिंह पंडित यांनी मांडलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना मदत व पुर्नवसन मंत्री  मकरंद जाधव पाटील म्हणाले की, हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर मुंबई येथे या बाबत सविस्तर बैठक घेण्यात येईल. बैठकीला आ. विजयसिंह पंडित यांच्यासह मराठवाड्यातील आमदारांना निमंत्रित करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. गेवराई विधानसभा मतदार संघातील गोदाकाठच्या पुरग्रस्त ३२ गावांच्या पुर्नवसनाचा प्रश्न आ. विजयसिंह पंडित यांनी हिवाळी अधिवेशनात मांडल्यामुळे गोदाकाठावरील गावातील शेतकरी आणि नागरीकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

साडेसहा लाख शेतकरी अजूनही सरकारच्या कर्जमाफी पासून वंचित; सरकारची कबुली

मुंबई — ज्यातील शेतकऱ्यांसाठी  जाहीर करण्यात आलेली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आली आहे. विधानसभेत राज्य सरकारने मान्य केले की 2017 पासून पात्र ठरलेल्या सुमारे 6.56 लाख शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही.

योजनेच्या अंमलबजावणीसाठी लागणारा निधी आणि सरकारकडून उपलब्ध केलेली तरतूद यामध्ये मोठे अंतर असल्यामुळे प्रक्रिया पुढे सरकू शकलेली नाही. याचा परिणाम म्हणून अनेक शेतकरी वर्षानुवर्षे कर्जमुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.

उच्च न्यायालयाने पात्र शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ग्रामीण भागात नाराजीचा सूर  अधिक तीव्र झाला आहे.

विधानसभेतील कबुलीनंतर शेतकरी संघटना आणि विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली असून, कर्जमाफीसारख्या महत्त्वाच्या योजनांबाबत शासनाची गंभीरता किती, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शेतकऱ्यांची ही आठ वर्षांची प्रतिक्षा संपणार कधी, यावर अद्यापही साशंकता कायम आहे.

मुख्यमंत्री सहायता निधीत एक अब्ज, पण शेतकऱ्यांवर केवळ 75 हजार खर्च

नागपूर – अतिवृष्टी,गारपीट आणि पिकांवरील किडीने हैराण झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना सरकारकडून तातडीच्या मदतीची अपेक्षा असताना, मुख्यमंत्री सहायता निधीत तब्बल एक अब्जाहून अधिक रक्कम जमा असूनही शेतकऱ्यांवरील खर्च मात्र अत्यल्प असल्याच धक्कादायक वास्तव माहिती अधिकारातून उघड झाले आहे.
वैभव कोकट यांनी दाखल केलेल्या आरटीआय अर्जाला प्राप्त झालेल्या उत्तरातून ही विसंगती समोर आली. कोकट यांनी 4 नोव्हेंबर 2025 रोजी संबंधित विभागाकडे माहिती अर्ज केला होता.

कोकट यांना मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर 2025 महिन्यात मुख्यमंत्री सहायता निधीत तब्बल 1,065796331 रुपये (एक अब्ज सहा कोटी सत्तावन्न लाख शहाण्णव हजार तीनशे एकतीस रुपये) इतकी मोठी रक्कम जमा झाली. नैसर्गिक आपत्तींमध्ये अडकलेल्या नागरिकांना मदत करण्याच्या उद्देशाने नागरिक, सामाजिक संस्था आणि उद्योगसमूहांकडून या निधीत मोठ्या प्रमाणावर देणग्या येतात. मात्र या महाकाय निधीपैकी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांवर केवळ 7500 रुपये (पंचाहत्तर हजार) इतकाच खर्च करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाने दिलेल्या उत्तरानुसार, पूरग्रस्त व इतर आपत्तीग्रस्तांकडून येणाऱ्या अर्जांची छाननी करून मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार मदत वितरित केली जाते. ऑक्टोबर महिन्यात नियमित प्राप्त अर्जांच्या आधारे शेतकऱ्यांना एकूण 75 हजारांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली. परंतु जमा झालेल्या रकमेच्या तुलनेत मदत अत्यल्प असल्याने निधीचा वापर, मदतीचे नियोजन आणि प्रशासनाची कार्यपद्धती या सर्वांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

आरटीआय उत्तर समाधानकारक न वाटल्यास अर्जदाराला 30 दिवसांच्या आत प्रथम अपिल दाखल करण्याचा अधिकार आहे. त्यासाठी देवानंद धनावडे, प्र. सहायक संचालक (निधी व लेखा) तथा प्रथम अपिलीय प्राधिकारी, मुख्यमंत्री सहायता निधी, मंत्रालय, मुंबई-32 यांच्याकडे अपिल करता येईल, अशी माहिती मनिषा सावंत, लेखा अधिकारी तथा जनमाहिती अधिकारी यांनी दिली.

या तपशील समोर आल्यामुळे मुख्यमंत्री सहायता निधीच्या पारदर्शकतेबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगण्याची शक्यता आहे. निधीत अब्जावधी रुपये जमा होत असतानाही प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणारी मदत इतकी कमी का, निधीचा उपयोग कोणत्या निकषांवर होतो, आणि शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीत वाढ का होत नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

बीड परभणी लातूर सह 14 जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढणार

पुणे — पुढील दोन दिवसांत राज्यातील नागरिकांना तीव्र थंडीचा सामना करावा लागणार आहे. उत्तरेकडून वेगाने थंड वारे वाहत असल्याने राज्याच्या अनेक भागांमध्ये तापमान सरासरी सामान्य तापमानापेक्षा कमी नोंदवले जाईल.

हवामान विभागाने पुढील 48 तासांत थंडीत वाढ होण्याचा अंदाज वर्तवला असून, खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील 14 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे.

या जिल्ह्यांवर थंडीचा  होणार परिणाम

राज्यातील मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील एकूण 14 जिल्ह्यांमध्ये थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांमध्ये नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

मराठवाडा — जालना, परभणी, बीड, नांदेड आणि लातूर.
विदर्भ — गोंदिया आणि नागपूर.
उत्तर महाराष्ट्र —नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहमदनगर.
पश्चिम महाराष्ट्र — पुणे आणि सोलापूर

सरासरी तापमानात घट होणारं असल्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी अस आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी बाहेर आल्यास राज्य बंद; मनोज जरांगेंचा इशारा

बीड — सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला एक वर्ष पूर्ण होत असून यातील आरोपी लवकरच सुटून येणार असल्याचं सांगितलं जात आहे. असं जर झालं तर त्याच दिवशी बीड जिल्हा बंद करण्यात येईल त्यानंतर राज्यही बंद करण्यात येईल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. त्यांनी आज मसाजोग मध्ये संतोष देशमुख कुटुंबीयांची त्यांनी भेट घेतली.
जरांगे पाटील यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी एक वर्षाच्या आत आरोपींना फाशी दिली जाईल असे आश्वासन दिले होते, मात्र आता या तपासात विलंब होत असून प्रकरण मुद्दाम लांबवले जात असल्याची शंका निर्माण होत आहे.
त्यांनी स्पष्ट केले की संतोष देशमुख यांच्या लहान मुलांना आज वडील दिसत नाहीत, त्यामुळे आरोपींना कठोर शिक्षा होईपर्यंत समाधान मिळणार नाही. काही लोकांना “आरोपी सुटणार आहे” अशा अफवा पसरवण्यास सांगितले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. यावेळी त्यांनी परळीकर असा उल्लेख केला.
जरांगे पाटील यांनी इशारा दिला की, ज्या दिवशी या प्रकरणातील आरोपीला मुक्त केले जाईल, त्या दिवशी जिल्हा बंद करण्यात येईल आणि त्यानंतर राज्यही बंद करण्याची वेळ येईल. जरांगेंनी सरकारला प्रश्न केला की, काहीजण अशा प्रकारे वातावरण निर्मिती करतात आणि सरकारला अडचणीत टाकण्याचे वक्तव्य का करतात, हे शोधण्याची गरज आहे.
“आरोपी सुटणार नाही, हे सत्य आहे,” असे ते म्हणाले. तसेच, हा सगळा प्रकार काही व्यक्तींनी आखून आणल्याचा त्यांनी दावा केला आहे.
जरांगे पाटील म्हणाले की, तपास सुरुवातीला वेगाने सुरू होता कारण त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द महत्त्वाचा होता आणि नागरिक शांत राहिले होते. आता त्यात गती मंदावली असल्याचे दिसत आहे असंही त्यांनी सांगितले आहे.

त्यांनी यावेळी क्रूर कृत्य करणारे आरोपी बाहेर फिरत आहेत आणि कृष्णा आंधळे अद्याप सापडत नसल्याची खंतही व्यक्त केली. “हत्या करताना आंधळे व्हिडिओ कॉलवर होता, तो पकडला तर मोठा उलगडा होईल,” असे त्यांनी नमूद केले.
विधानसभेच्या अधिवेशनातही या प्रकरणाचा उल्लेख झाल्याचे सांगत त्यांनी सरकारने या केसचा निकाल चार ते पाच महिन्यांत निघावा अशी मागणी केली.अशा लोकांना संरक्षण दिले तर आम्हाला अजित पवारांचा राग येणारच. चुकीच्या व्यक्तीला जवळ करण्याचे पाप करू नका,” अशी टीका त्यांनी केली.

पत्नी विहिरीत पडली, वाचवण्यासाठी गेलेल्या पतीसह पत्नीचाही बुडून मृत्यू

केज — विहिरीतून पाणी काढत असताना पाय घसरून पडलेल्या पत्नीला वाचवण्यासाठी विहिरीत उडी मारलेल्या पतीसह पत्नीचाही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वाघे बाभूळगाव शिवरात शुक्रवारी घडली
वाघेबाभुळगाव शेजारी पवारवाडी गावचे शेतकरी भास्कर विनायक पवार, त्यांची पत्नी अल्का पवार आणि मुलगा ऋषिकेश हे तिघेही त्यांच्या शेतात खुरपणी करत होते. शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास अल्का पवार या पिण्यासाठी विहिरीतून पाणी काढत होत्या. अचानक त्यांचा पाय घसरला आणि त्या विहिरीत पडल्या. पत्नीला बुडताना पाहून पती भास्कर पवार यांनी क्षणाचाही विलंब न करता, पत्नीला वाचवण्यासाठी विहिरीत उडी घेतली. ‘मी तुझ्याशिवाय नाही’ याच अविर्भावाने त्यांनी पत्नीला वाचवण्याचा जीवतोड प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने आणि बचावासाठी योग्य आधार न मिळाल्याने, अल्का पवार आणि भास्कर पवार या दोघा पती-पत्नीचाही विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच दोघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले आणि नांदूरघाट येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. सुग्रीव शंकर पवार यांच्या खबरेवरून केज पोलिसात या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

नगरपालिकेचा कर्मचारी हजाराची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

बीड — गुंठेवारीची सत्यप्रत देण्यासाठी एक हजार रुपयाची लाच स्वीकारताना  नगरपालिकेच्या अभिलेखे विभागाचा कर्मचारी आशिष मस्के याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
तक्रारदाराने एक महिन्यापूर्वी प्लॉट विक्रीसाठी अर्ज केला होता. त्यासाठी प्लॉटच्या गुंठेवारीची सत्यप्रत पाहिजे होती.यासाठी असणारी फीस रीतसर पद्धतीने नगर पालिकेत भरली. मात्र अभिलेखे विभागात कार्यरत असलेल्या आशिष मस्केने तक्रारदाराकडे एक हजार रुपयांची लाच मागितली. लाच देण्याची तयारी नसल्यामुळे तक्रारदारांनी एसीबीकडे तक्रार केली.एसीबीच्या पथकाने मंगळवारी दुपारी नगर पालिकेच्या आवारातच सापळा लावला. आशिष मस्के याने पैसे स्वीकारताच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक सोपान चिट्टमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली. याप्रकरणी आशिष मस्के विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

फलटण:मृत महिला डॉक्टरचं बदनेकडून शारीरिक शोषण, हातावरील अक्षरही तिचेच; फडणवीसांची माहिती

नागपूर — डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी
प्रशांत बनकर आणि निलंबित पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदणे यांनी फसवणूक केली आणि तिचे अनेकवेळा शोषण केलं असं सध्या त्यांच्या हॉटस्अप चॅट आणि इतर पुराव्यातून आढळले आहे, याची महिला आयपीएस अधिकाऱ्यामार्फत चौकशी सुरु आहे. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात दिली.
नागपूर इथं सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात साताऱ्यातील फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्येचा मुद्दा सभागृहात गाजला. विरोधकांकडून या मुद्द्यावरून प्रश्न उपस्थित झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी सविस्तर माहिती दिली.
फलटणमधील डॉक्टर तरुणीने आत्महत्या केल्यानंतर आपण तपासासाठी एसआयटी नियुक्त केली. यासंदर्भात न्यायालयीन चौकशीही सुरू असून फॉरेन्सिक रिपोर्टनुसार, महिला डॉक्टरने हातावर जे लिहिलं आहे ते तिचंच हस्ताक्षर असल्याचं निष्पन्न झालं आहे,” असं फडणवीस यांनी सांगितलं आहे.

फलटणमध्ये डॉक्टर तरुणीने हातावर सुसाईड नोट लिहीत जीवन संपवल्यानंतर राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणात भाजपचे माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यावरही गंभीर आरोप झाले होते. त्यामुळे या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अधिवेशनादरम्यान या घटनेच्या तपासाबाबत माहिती दिली आहे. “या प्रकरणात पोलीस अधिकारी बदने याने डॉक्टर तरुणीची फसवणूक केली आणि तिचे शारीरिक शोषण केलं. लग्नाचं आमिष दाखवून नंतर त्याने वेगळी भूमिका घेतली,” असं तपासात समोर आल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

या प्रकरणाच्या तपासविषयी माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, “आत्महत्येमागे बदनेने केलेली फसवणूक आणि त्या परिस्थितीचा फायदा घेत दुसऱ्या आरोपीनेही फसवणूक केली. या दोघांची नावे लिहून तिने आत्महत्या केली. फॉरेन्सिक अहवालानुसार, गळफास लावून आत्महत्या झाली असून, हातावरचे अक्षर महिलेचेच आहे. तपास अजून संपलेला नाही आणि चार्जशीट लवकरच दाखल होईल. समांतरपणे अनेक गोष्टींची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्तींची नेमणूक केली आहे. महिला IPS अधिकाऱ्याच्या माध्यमातून तपास सुरू आहे,” असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, “डिजिटल आणि तांत्रिक पुरावेही पोलिसांच्या ताब्यात आहेत. व्हॉट्सॲप चॅट मिळाले आहेत. शेवटच्या दिवशी महिला डॉक्टर हॉटेलमध्ये आल्या, रूममध्ये गेल्या याचे सर्व सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे आहेत. कोण आले, कोण गेले याचीही माहिती आहे. नवीन कायद्यानुसार फॉरेन्सिक पुरावे गोळा केले आहेत. काही गोष्टींची पडताळणी केली जात आहे. ६० दिवसांत चार्जशीट दाखल केली जाते, तीदेखील अंतिम टप्प्यात आहे. आरोपींव्यतिरिक्त अजून कोणी या प्रकरणात सहभागी आहे का, याची माहिती मिळवण्यासाठी न्यायालयीन चौकशी सुरू आहे,” अशी माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

डोंगर पिंपळात हिंस्त्र श्वापदाने पाडला सात शेळ्यांचा फडशा

अंबाजोगाई –तालुक्यातील डोंगर पिंपळा शिवारात एका अज्ञात आणि हिंस्त्र श्वापदाने मोठा हाहाकार माजवल्याचे आढळून आले आहे. रविवारी रात्री या श्वापदाने एका शेतकऱ्याच्या गोठ्यात घुसून तब्बल सात शेळ्यांना ठार केले.
या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्याचे १ लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले असून या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत पसरली आहे.

डोंगर पिंपळा येथील शेतकरी बळीराम बाबुराव केंद्रे हे आपल्या शेतात जोडधंदा म्हणून त्यांनी शेळीपालन सुरू केले होते. या शेळीपालनासाठी शेतातच त्यांनी शेड उभारले आहे. केंद्रे यांच्याकडे सहा मोठ्या शेळ्या आणि एक लहान पिल्लू असे एकूण सात शेळ्यांचे पशुधन होते.रविवार, दि. ७ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १० वाजता त्यांनी शेळ्यांना चारापाणी करून ते झोपण्यासाठी गेले. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात हिंस्त्र श्वापदाने त्यांच्या शेडवर हल्ला केला. या हिंस्त्र श्वापदाने गोठ्याच्या संरक्षणासाठी लावलेल्या सहा फूट उंचीच्या जाळीवरून सहज उडी मारून आत प्रवेश केला. आत शिरताच त्याने सातही शेळ्यांना ठार मारून त्यांचा फडशा पाडला. सोमवारी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर बळीराम केंद्रे यांना धक्का बसला. या घटनेमध्ये त्यांचे सुमारे १ लाखांहून अधिक रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाने घटनास्थळी पोचून पंचनामा केला. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रतन तळेकर आणि डॉ. अभिषेक अबुज यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृत शेळ्यांचे शवविच्छेदन केले. या घटनेमुळे शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने तातडीने या हिंस्त्र श्वापदाचा शोध घेऊन बंदोबस्त करावा, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्याला त्वरित आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी डोंगर पिंपळा येथील ग्रामस्थांनी केली आहे.