Home Blog Page 91

शालार्थ आयडी घोटाळ्याची व्याप्ती वाढली; एसआयटी ला चार महिन्याची मुदत वाढ

मुंबईशालार्थ आयडी घोटाळा राज्यभर गाजत असून अनेक अपात्र शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नियमबाह्य पद्धतीने समाविष्ट केले. त्यांना वेतनही देण्यात आले. या प्रकरणाची वाढत असलेली व्याप्ती पाहता
शासनाने विशेष चौकशी पथकाला आणखी 4 महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.

राज्य सरकारला मागील काही महिन्यांत नागपूर, नाशिक, जळगाव, बीड, लातूर, मुंबईसह इतर अनेक ठिकाणी अपात्र किंवा अस्तित्वात नसलेल्या व्यक्तींना ‘शालार्थ’ प्रणालीतून वेतन मिळत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत शासनाने पूर्वीच विशेष तपास पथकाची म्हणजे एसआयटीची स्थापना केली होती. एसआयटीत प्रमुख म्हणून पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, तर सदस्य म्हणून पोलिस महानिरीक्षक मनोज शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीचे सदस्य सचिव हारुण आतार असून ते शिक्षण आयुक्तालयाच्या प्रशासन व नियोजन विभागातून कार्यरत आहेत. या समितीचा मूळ कार्यकाल ७ नोव्हेंबर २०२५ रोजी पूर्ण झाला आहे; मात्र प्रकरणातील दस्तऐवजांची संख्या, विविध जिल्ह्यांतील चौकशी, शाळा व्यवस्थापनांचे निवेदन, तसेच अपात्र कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या व वेतन व्यवहारांची सविस्तर तपासणी यासाठी अधिक वेळ आवश्यक असल्याचे पथक प्रमुखांनी शासनाला कळवले होते. या पार्श्वभूमीवर शासनाने चौकशी पथकाच्या मुदतीत ८ नोव्हेंबर २०२५ ते ८ मार्च २०२६ पर्यंत चार महिन्यांची वाढ दिल्याचे उपसचिव मो.बा. ताशिलदार यांनी कळवले आहे.विभागीय आयुक्तांनी पत्रात म्हटले, ‘घोटाळ्याचा विस्तार मोठा असून प्राथमिक चौकशीत अनेक नवे धागेदोरे समोर येत आहेत. तपास जलद व प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त कालावधी अपरिहार्य आहे.’ त्यामुळे पुढील टप्प्यात तपास पथक जिल्हानिहाय तपासणी अहवाल, शाळा नोंदींची पडताळणी, संशयित अधिकाऱ्यांची चौकशी, तसेच वेतन व्यवहारांमधील आर्थिक अनियमिततेचे विश्लेषण करणार आहे.
राज्यातील शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर खळबळ उडवणाऱ्या ‘शालार्थ’ घोटाळ्यात काही ठिकाणी ‘अदृश्य’ कर्मचारी तयार करून त्यांचे लाखो रुपयांचे वेतन काढल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक शाळांमधील कर्मचारी मनुष्यबळ, सेवा पुस्तिका आणि नियुक्ती प्रक्रियेच्या डिजिटल व मॅन्युअल दस्तऐवजामधील विसंगती तपासात उघड होत आहे. तपासाचा अंतिम अहवाल सादर झाल्यानंतर जबाबदार अधिकारी, शाळा व्यवस्थापन प्रतिनिधी तसेच गैरव्यवहारात सामील व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

आफ्रिकेतलं सोयाबीन लवकरच मुंबईत; केंद्राने भाव वाढीचे दाखवलेले गाजर फुसका बार ठरले!

मुंबई — अतिवृष्टीने गेलेलं सोयाबीन पीक त्यानंतर रासायनिक खताचे वाढलेले दर यामुळे बळीराजा आधीच संकटात अडकला आहे त्यात आणखी भर पडून नवसंकट उभा राहिला आहे. दक्षिण आफ्रिकेतून मराठवाड्यात सोयाबीन आयात केली जाणार आहे. एक लाख टन सोयाबीनचे सौदा पूर्ण झाला असल्याने सोयाबीनच्या दर हमीभाव गाठणार नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
लोकसभा निवडणुकीत सोयाबीनला चांगला दर देण्यात येईल अस आश्वासन देण्यात आलं होतं. नाफेडची खरेदी देखील कासव गतीने सध्या सुरू आहे. त्यातच आफ्रिकेतून सोयाबीन आयात करण्यात येत आहे.
परिणामी प्रतिक्विंटल ४८७० रुपयांनी आयात माल मिळेल, असा दावा व्यापारी करत आहेत. त्यामुळे या हंगामात बाजारपेठेत सोयाबीनला जाहीर करण्यात आलेला पाच हजार ३२८ रुपये हमीभाव मिळणे अवघड झाले आहे.
सोयाबीन प्रक्रिया उद्योग मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे उद्योगाला कच्चामाल कमी पडणार नाही यासाठी लातूरच्या बाजारपेठेत पहिला आयात सौदा पूर्ण केल्याची माहिती व्यापारी देत आहेत.या वर्षी आयात केलेले सोयाबीन मुंबई बंदरात लवकरच पोहोचेल. तसे एक लाख टनाचे सौदे पूर्ण झाले आहेत. सध्या प्रतिटन दर चार हजार ६५० रुपये एवढा असेल. यात बंदरातील माल साठवणूक शुल्क आकारणी प्रतिटन २२० रुपये आहे. मराठवाड्यातील लातूर, धाराशिव जिल्ह्यात २० हून अधिक सोयाबीन प्रक्रिया उद्योग सुरू आहेत. सोयाबीन तेलाचे व्यापारी ‘हमीभाव मिळेल अशी स्थिती सध्या नसल्याचं सांगू लागले आहेत.
गेल्या वर्षी केंद्र सरकारने खरेदी केलेले ४.६६ लाख टन सोयाबीन शिल्लक असले, तरी ते पुरेसे नाही. जर सोयाबीन आयात केले नाही, तर बाजारपेठेतील दर उंचावतील. मात्र, तुर्त तरी तशी स्थिती दिसत नाही.जर आयात झाली नाही, तर भावात तेजी येऊ शकते. मात्र, सध्या सोयाबीनचे सौदे सुरू आहेत. असे करू नये म्हणून वाणिज्य मंत्रालयाला वारंवार निवेदने दिली आहेत. बाजारातील सध्याचे चित्र पाहता सोयाबीनचा दर वाढण्याची शक्यता कमी आहे. मात्र, कमी भावात जर प्रक्रिया करण्यासाठी सोयाबीन मिळत असेल तर व्यापारी तेच खरेदी करतील असं सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष नरेश गोयंका यांनी म्हटले आहे.
दरम्यान मध्य प्रदेशात ‘भावांतर योजना’ लागू असल्याने तेथील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना फारसा फरक पडत नाही. मात्र, महाराष्ट्राला याचा मोठा फटका बसू शकतो, असेही व्यापारी सांगतात. कुक्कुटपालक सोयाबीन पेंडीच्या भावासाठी केंद्र सरकारच्या प्रतिनिधीस भेटत आहेत. शेतकऱ्यांच्या बाजूने लढणारे नेते आयात-निर्यातीच्या धोरणात हस्तक्षेप करत नसल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी भरडला जात आहे. याबरोबरच केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे स्वप्न देखील चुनावी जुमलाच ठरले.

वाटमारी करणारी टोळी एलसीबीने तीन दिवसात जेरबंद केली

बीड — डोळ्यात मिरचीची पूड टाकून सायंकाळच्या सुमारास तरुणाची अंगठी व चैन लुटल्याची घटना परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी घडली होती.स्थानिक गुन्हे शाखेने याचा तपास करीत फक्त तीनच दिवसांत या टोळीला गजाआड केले आहे. या कारवाईत चोरीला गेलेला मुद्देमाल ही पोलिसांनी हस्तगत केला आहे.
धारावती तांड्याकडे निघणाऱ्या कालरात्री मंदिराजवळ एका तरुणाला चार जणांनी पाठलाग करून अडविले. यावेळी त्याच्या डोळ्यात चटणी टाकून त्याच्याकडे सोन्याची अंगठी आणि लॉकेट लंपास केले. यात परळीच्या ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने सुरु
केला. पोलीस उपनिरीक्षक सुशांत सूतळे व त्यांच्या टीमला या गुन्हयाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पंकज तुकाराम उगलमुगले वय 25 वर्ष, रा. पांगरी, ता. परळी, वैभव राम बिडगर वय 20 वर्ष, रा. दाऊतपूर, ता. परळी, शामसुंदर बाळासाहेब फड रा. मरळवाडी, ता. परळी आदित्य सुरेश उपाडे वय 20 वर्ष, रा. सिद्धार्थ नगर, परळी याना ताब्यात घेऊन चौकशी केली असता या चौघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांच्या या कारवाईत चोरीला गेलेली चैन, अंगठी, मोटार सायकल, स्कुटी व कोयता असा एकूण 1 लाख 58 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई पोलीस अधिक्षक नवनीत कांवत, अप्पर पोलीस अधिक्षक चेतना तिडके, पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, पोलीस हवालदार मारुती कांबळे, रामचंद्र केकाण, विष्णू सानप, गोविंद भताने, सचिन आंधळे, अतुल हराळे यांच्या टीमने केली.

शाळा बंद’ आंदोलन; लाखभर शिक्षकांवर सरकारची कारवाई ठरली!

मुंबई — राज्यातील अनुदानित शाळांमधील शिक्षकांनी 5 डिसेंबरला राज्यव्यापी पुकारलेल्या शाळा बंद आंदोलनात सहभागी झालेल्या प्राथमिकच्या 21,477 आणि माध्यमिक शाळेतील 2539 शाळेतील एकूण 96 हजार 800 शिक्षक शिक्षकांवर शालेय शिक्षण विभागाकडून एक दिवसाची वेतन कापण्याची कारवाई केली जाणार आहे. ही कारवाई शालेय शिक्षण विभागाच्या शिक्षण निरीक्षक आणि शिक्षणाधिकारी कार्यालय स्तरावरून केली जाणार आहे.

शालेय शिक्षण विभागाने काढलेला 15 मार्च 2024 चा सरकारचा निर्णय रद्द करावा आणि शिक्षकांसाठी टीईटी अनिवार्यता केली जाऊ नये या प्रमुख मागणीसाठी राज्यातील विविध शिक्षक, मुख्याध्यापक आधी संघटनांकडून 5 डिसेंबर रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन करण्यात आले.यामध्ये पुणे, नाशिक, कोल्हापूर आदी विभागाचा अपवाद वगळता राज्यातील अर्ध्याहून अधिक शाळांनी या बंदमध्ये सहभाग नोंदवला नाही. त्यामुळे विविध संघटनांमधील मतभेद समोर आले तर दुसरीकडे संस्थाचालकांनीच या आंदोलनाकडे पाठ फिरवल्यामुळे राज्यभरात अनुदानितच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळा मोठ्या प्रमाणात सुरू राहिल्याचे चित्रही विभागाच्या अहवालात दिसून आले आहे.
राज्यभरात 5 डिसेंबर रोजी पुकारलेल्या शाळा बंद आंदोलनात किती शिक्षक सहभागी झाले आणि किती शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या, या संदर्भातील अहवाल तयार केला असून यात माध्यमिकच्या 26,490 शाळांपैकी केवळ 2,539 शाळा बंद राहिल्या, तर या शाळांमध्ये कार्यरत असलेले 2 लाख २४ हजार 366 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी केवळ 13, 216 शिक्षकांनी शाळा बंद मध्ये सहभाग घेतल्याने राज्यातील माध्यमिकच्या शाळा प्रचंड मोठ्या प्रमाणात सुरू होत्या, असे चित्र विभागाच्या अहवालातून दिसून आले आहे.
शाळा बंदचा सर्वाधिक फटका प्राथमिकला

शाळा बंदचा सर्वात मोठा प्रभाव प्राथमिकच्या अनुदानित शाळांमध्ये दिसून आला. राज्यात असलेल्या 57 हजार 13 शाळांपैकी 21 हजार 477 शाळा पूर्णपणे बंद राहिल्या. तर उर्वरित तब्बल 35 हजार 536 शाळा सुरू होत्या. शाळा बंद असलेल्या शाळातील 83 हजार 584 शिक्षक आपल्या शाळांवर गैरहजर राहून शाळा बंद आंदोलनात सहभागी झाले होते.
प्राथमिक शाळांमधील शिक्षकांमध्ये सर्वाधिक 2925 शिक्षक नाशिक जिल्ह्यात, तर त्या खालोखाल पुणे जिल्ह्यात 2348 इतके गैरहजर राहिले. त्यानंतर धाराशिव जिल्ह्यात आचारसंहितेमुळे आंदोलन स्थगित करण्यात आले होते. त्यामुळे या जिल्ह्याला शाळा बंदचा कोणताही फटका पडला नाही. तर त्यासोबतच यवतमाळ बुलढाणा, नागपूर, मुंबई, ठाणे, भिवंडी, मीरा-भाईंदर आणि उल्हासनगर या परिसरामध्ये प्राथमिकच्या सर्व शाळा सुरू होत्या.
माध्यमिकच्या सर्वाधिक शाळा कोल्हापूर विभागात 848 शाळा बंद राहिल्या. यामध्ये एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात 469 शाळा बंद होत्या, तर सर्वात कमी शाळा सिंधुदुर्ग जिल्ह्यात सहा आणि कोल्हापूर जिल्ह्यात एकही शाळा बंद नव्हती सर्व शाळा सुरळीत सुरू होत्या. राज्यातील बृहन्मुंबई पश्चिम, ठाणे, पालघर, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, रत्नागिरी धाराशिव,
अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात एकूण सर्वच माध्यमिक शाळा सुरू होत्या. या जिल्ह्यांमध्ये शाळा बंदचा कोणताही प्रभाव दिसून आला नाही.

डोळ्यात चटणी टाकून तरुणाचे 2लाख 20 हजार रुपयांच्या अंगठ्या चैन लुटले

परळी — धारावती तांडा रोडवर जिम करून येणाऱ्या तरुणाच्या गाडीला धडक देऊन चाकूचा धाक दाखवून डोळ्यात चटणी टाकून २ लाख २० हजार रुपयाचे साहित्य लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ४ जणां विरुद्ध परळी ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल कारण्यात आला. चोरट्यांकडून झालेल्या या चोरीच्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
धारावती तांडा येथील यशवंत प्रेमदास पवार हे 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 7.30 वाजता हे व्यायाम करून परळीवरून धारावती तांड्याकडे मोटारसायकलवरून जात असताना, काळरात्री देवी मंदिर रोडवर चव्हाण यांच्या बंद धाब्यासमोर दोन मोटारसायकलवरून आलेल्या चार आरोपींनी त्यांचा पाठलाग करत अचानक धडक दिली. तोंडाला मास्क लावून त्यापैकी एकाने तात्काळ चाकू दाखवून धमकावले, तर दुसऱ्याने त्यांच्या डोळ्यात चटणी टाकून त्यांना धरून ठेवले. त्यानंतर त्यांना धरून ठेवले आणि क्षणात त्यांच्या गळ्यातील साडेतीन तोळ्यांची सोन्याची चैन आणि एक तोळ्याच्या दोन अंगठ्या हिसकावून चोरटे फरार झाले. साडेतीन तोळ्यांची सोन्याची चैन – ₹1,40,000 दोन सोन्याच्या अंगठ्या – ₹80,000 असे एकूण ₹2,20,000 रुपयेचे किमतीचे साहित्य लुटून घेऊन पसार झाले.
यशवंत प्रेमदास पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चार अनोळखी आरोपींवर BNS 2023 कलम 309(ब), 281, 126(2), 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परळी ग्रामीण पोलीस निरीक्षक मजहर सय्यद हे तपास करीत आहेत. परळी ग्रामीण पोलीस निरीक्षक मजहर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून आरोपींचा तपासासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.

मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेत मराठवाडयाने गाठला उच्चांक

छ. संभाजीनगर — ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेत महाराष्ट्राने विश्वविक्रम केला आहे. महावितरणने एकाच महिन्यात 45 हजार 911 सौर कृषिपंप लावण्याचा जागतिक उच्चांक गाठला आहे.यामध्ये मराठवाडयात 26,721 सौर कृषिपंप बसवून नविन उच्चांक केला आहे.राज्याच्या एकूण आकडेवारीच्या 60 टक्के वाटा हा छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालया अंतर्गत येणा—या छत्रपती संभाजीनगर, लातूर व नांदेड परिमंडलातील आठ जिल्हयांचा आहे.या विक्रमाची गिनिज बुकमध्ये यशस्वी नोंद झाली आहे. मुख्यमंत्री .देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज गिनीज बुकतर्फे विश्वविक्रम प्रमाणपत्र प्रदान सोहळा आज पार पाडला.

शेतकऱ्यांना केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर पॅनल्स आणि कृषिपंप असा संपूर्ण संच देण्याच्या ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ या योजनेत महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे.त्यात विशेषता:हा छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालय अंतर्गत एका महिन्यात 26,721 सौर कृषिपंप बसवून विश्वविक्रमात आघाडी घेवून मोलाचा वाटा उचलला आहे.यासाठी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक.लोकेश चंद्र (भाप्रसे) व सहव्यवस्थापकीय संचालक आदित्य जीवने (भाप्रसे) यांनी क्षेत्रिय कार्यालयातील अभियंते व सौर कृषिपंप बसविणारे व्हेन्डर यांच्याशी समन्वय ठेवून सतत पाठपुरावा करून आवश्यक त्या सूचना केला. शेतक—यांनी सौर कृषिपंप मागणी केल्यानंतर कर्मचा—यांनी सौर कृषिपंप बसविण्यासाठी तात्काळ स्थळ पाहणी करून सौर कृषिपंप बसवितांना येणा—या अडचणी सोडविण्याबाबत सूचना केल्या. त्यामुळे मराठवाडयाने ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेत नवीन उच्चांक गाठला आहे. सौर कृषिपंप बसवितांना अडचणी आल्यास महावितरणच्या जवळच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक आदित्य जीवने (भाप्रसे) यांनी केले आहे.

सौर कृषिपंप बसविण्यात आलेली आकडेवारी पुढील प्रमाणे

जिल्हा                    सौर कृषिपंप

छत्रपती संभाजीनगर.                3102
जालना.                                   6958
छ. संभाजीनगर परिमंडल           10060

नांदेड                                         975
परभणी.                                      3182
हिंगोली.                                      2100
नांदेड परिमंडल.                         6257
लातूर                                          900
बीड                                           7467
धाराशिव.                                   2037
लातूर परिमंडल                        10404
मराठवाडा                                26721

राज्यात मागास समजल्या जाणाऱ्या बीड जिल्ह्याने राज्यात पहिला नंबर पटकावला आहे. राज्यात सर्वाधिक ७४६७ सौर कृषी पंप बसवून आघाडी घेऊन १ क्रमांक पटकावला आहे. मागास भागाची ओळख पुसून जिल्हाच नाव गिनीज बुकमध्ये आघाडीचा जिल्हा असं सिद्ध करून दाखवले आहे.

सरकारी सुरक्षेवर विश्वास नाही; स्ट्रॉंग रूमची राखण मी देखील करणार — न.प उमेदवाराच्या पतीची मागणी

परळी — नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार संध्या देशमुख यांचे पती दीपक देशमुख यांनी सरकारच्या सुरक्षा यंत्रणेवर भरवसा नसून, ईव्हीएम मशिन ठेवलेल्या स्ट्राँग रूमजवळ झोपण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी केली. दीपक देशमुख यांच्या या मागणीपुढं बीड प्रशासन आवाक झालं आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नगरपालिका निवडणुकांची मतमोजणी एकाच दिवशी 21 डिसेंबरला होणार आहे. त्यामुळे काल झालेल्या नगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीला तब्बल 16 दिवस जाणार आहेत. तोपर्यंत ईव्हीएममधील  मत सुरक्षित राहतील का या विचारानं उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.

परळी नगरपालिकेची निवडणूक चांगलीच गाजली. मतदान झालेल्या ईव्हीएम मशिन आता कडक बंदोबस्तामध्ये स्ट्राँग रूममध्ये ठेवल्या गेल्या आहेत. यासाठी बीड प्रशासनाने तगडा पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. परंतु या सुरक्षा यंत्रणेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवाराच्या पतीने दीपक देशमुख यांना भरवसा नाही. लोकांनी आम्हाला केलेली मत सुरक्षित ठेवण्याची आमची देखील जबाबदारी आहे. त्यामुळे मला स्ट्राँग रूमजवळ झोपण्याची परवानगी मिळावी. तशी त्यांनी बीड प्रशासनाकडे देखील मागणी केली आहे.दीपक देशमुख म्हणाले, “आम्हाला इथं अंथरून-पांघरून घेऊन येत, राहण्याची मुभा द्यावी. तशी आमची व्यवस्था देखील करावी. कारण आमचं भविष्य या स्ट्राँग रूममध्ये आहे. स्ट्राँग रूममधील आमचा कोणावरही भरोसा नाही.” स्ट्राँग रूमकडे जाण्या-येण्याची आमची व्यवस्था होत नाही. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांना मी पत्र देणार, असेही दीपक देशमुख यांनी म्हटले.आमची इथंच व्यवस्था करा, 24 तासाची. उमेदवारांसह मी या स्ट्राँग रूमच्या परिसरात थांबणार आहे. मी सकाळी झोपेतून उठून स्ट्राँग रूमकडे आलो आहे. यासाठी निवडणूक आयोगाकडे मागणी करणार आहे. मला इथं कशी व्यवस्था करायची, हे त्यांनी सांगावं मी माझं अंथरूण-पांघरूण घेऊन इथं येऊन बसेल. मला इथेच थांबायचं आहे आणि या स्ट्राँग रूमचं रक्षण करायचा आहे. जाण्या येण्यामुळे दमछाक होत आहे. दुसरीकडे माझे पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. त्यांच्यासाठी वीस तारखेला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यांचा प्रचारही मला करायचा असल्याचं दीपक देशमुख यांनी सांगितला आहे.

200 वर्षांनंतर दंडकर्म पारायण पूर्ण करणारा 19 वर्षांचा अहिल्यानगरचा देवव्रत महेश रेखे कोण? ही परीक्षा कठीण का मानली जाते?

अहिल्यानगर — काशीच्या पवित्र मातीत गेल्या दोन महिन्यांपासून एक ऐतिहासिक आध्यात्मिक साधना सुरू होती. शुक्ल यजुर्वेदाच्या माध्यंदिनी शाखेतील सुमारे 2000 मंत्रांचे अत्यंत कठीण ‘दंडक्रम पारायण’ 19 वर्षांच्या वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे याने पूर्ण केले आहे.जवळपास 200 वर्षांनंतर दंडक्रम पारायण पुन्हा भारतात पार पडले असून या यशामुळे तरुण देवव्रत देशभरात चर्चेत आला आहे.
पारायण पूर्ण होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवव्रतचे अभिनंदन करत म्हटले “देवव्रत रेखेंनी केलेली ही साधना पुढील पिढ्या लक्षात ठेवतील. 2000 मंत्रांचा दंडक्रम इतक्या अचूकतेने 50 दिवसांत संपवणे हा असाधारण पराक्रम आहे.” काशीमध्ये हा अनोखा उपक्रम झाला याचा विशेष उल्लेख पीएम मोदींनी केला आहे.

देवव्रत रेखे कोण आहे?

मूळ गाव : अहिल्यानगर

वडील : वेदब्रह्मश्री महेश चंद्रकांत रेखे

वैदिक शिक्षण : सांगवेद विद्यालय, वाराणसी

रोजची साधना : 4 तास दंडक्रमाचा अभ्यास

मित्र आणि गुरूजनांच्या मते देवव्रतची स्मरणशक्ती, एकाग्रता आणि शिस्त विलक्षण आहे.

दंडक्रम पारायण म्हणजे काय?

दंडक्रम हा वैदिक पाठाचा सर्वात अवघड प्रकार मानला जातो.

मंत्र उलट-सुलट दोन्ही प्रकारे म्हणावे लागतात

स्वर, लय, उच्चार यांची अत्यंत बारकाईने जुळवाजुळव करावी लागते

पूर्ण पारायणात एक कोटीपेक्षा जास्त शब्दांचा उच्चार करावा लागतो

यासाठी स्मरणशक्ती, शारीरिक-मानसिक नियंत्रण आवश्यक आहे

विद्वानांच्या मते, वेदपठणाच्या एकूण 8 पद्धतींपैकी हा सर्वात कठीण प्रकार आहे.

इतिहासात फक्त दोन वेळा हा पराक्रम झाला आहे

पहिल्यांदा – 200 वर्षांपूर्वी नाशिकमध्ये, वेदमूर्ती नारायण शास्त्री देव यांनी

दुसऱ्यांदा – आता काशीमध्ये, देवव्रत रेखे यांनी (2 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2025)

त्यांना ₹1,01,116 देऊन सन्मानित करण्यात आले.

दंडक्रमला ‘कठीण परीक्षा’ का म्हणतात?

दीर्घ साधना आवश्यक

मंत्र पाठात एकही चुक चालत नाही

उलट-सरळ पाठांतर

श्वसन, स्वर आणि स्मरणशक्तीचा ताळमेळ

रोजच्या साधनेत शिस्त

यामुळेच दंडक्रमाला वैदिक परंपरेचा ‘मुकुटमणी’ असेही संबोधले जाते.

माजी आमदार अमरसिंह पंडितांच्या हत्येचा कट;पंडितांचे पीए अमृत डावकरांच्या आरोपाने खळबळ

बीड — राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या हत्येचा कट होता. आपण उभे असताना अचानक येत टोळक्याने आपल्याला गंभीर मारहाण केली. आपलाही खून झाला असता मात्र चालक मध्ये आल्याने आपण बचावलो असल्याचा आरोप अमरसिंह पंडित यांचे स्वीय सहाय्यक अमृत डावकर यांनी केल्याने खळबळ माजली आहे.

गेवराईत नगरपालिका निवडणुकीच्या दरम्यान मंगळवारी पवार व पंडित गटांत वाद अचानक उफाळला.यानंतर एका टोळक्याने पंडितांच्या कृष्णाई बंगल्यावर चालून येत या ठिकाणी असलेल्या अमृत डावकर यांना बेल्ट, लाथा आणि दांडक्याने मारहाण केली. यामध्ये डावकर यांच्या डाव्या डोळ्याला इजा झाली असून त्यांच्या हातावर आणि पाठीवर मारहाणीच्या जखमांचे व्रण आहेत. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात सध्या उपचार सुरु आहेत.आपल्याला मारहाण करणारे माजी आमदारांचे भाऊ इतर पाच सहा जणांसह पोचले. आलेले सर्वजण अमरसिंह पंडित यांच्या खुनाचा कट रचूनच आले होते. माजी आमदारांचे बंधू खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगून आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबतचे लोकही गुंड प्रवृत्तीचे होते.त्यांनी आपले वाहन बाहेर उभा असलेल्या वाहनावर आदळले. हा आवाज ऐकून मी कार्यालया बाहेर आल्यानंतर अमरसिंह पंडित यांना संपवून टाकायचं असे घोळक्यातील लोक म्हणत होते. अमरसिंह पंडित येथे नाहीत नेमकं काय घडलं असं शांततेत त्यांना विचारलं मात्र अमरसिंह पंडित इथे नाहीत म्हणून मला संपवून टाकू, असेही हल्लेखोर म्हणत होते असा आरोप अमृत डावकर यांनी केला.
तत्कालीन शिवसेना तालुका प्रमुखाच्या खुन प्रकरणात न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलेला व्यक्ती आणि शिक्षा भोगलेला व्यक्ती कारागृहाच्या बाहेर आला तरी त्याचे वर्तन कसे असेल? असे डावकर म्हणाले. आपल्याला बचाव करण्याची संधीही दिली नाही. आपलाही खून झाला असता मात्र, मला मारहाण होत असताना चालक मध्ये आल्याने आपण सुदैवाने बचावलो असल्याचं अमृत डावकर यांनी वृत्तवाहिन्यांना सांगितलं. या आरोपानंतर बीड जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

खगोल प्रेमींसाठी खास पर्वणी; चार डिसेंबरला दिसणार “सुपरमून”

मुंबई — आकाशात एक दुर्मिळ आणि मोहक खगोलीय घटना पाहायला मिळणार आहे. पहिल्यांदाच दत्तजयंती आणि मार्गशीर्ष पौर्णिमा या दिवशी म्हणजेच गुरुवार, ४ डिसेंबर रोजी ‘सुपरमून’ दिसणार आहे. इतकेच नाही तर चंद्र नेहमीपेक्षा जास्त मोठा, तेजस्वी रूपात आकाशात चमकणार आहे.पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी याबाबत माहिती दिली.

चंद्र पृथ्वीपासून सुमारे ३ लाख ८४ हजार किलोमीटर अंतरावर असतो. मात्र या मार्गशीर्ष पौर्णिमेला चंद्राची पृथ्वीपासूनची जवळीक कमी होऊन ते अंतर केवळ ३ लाख ५६ हजार ९६२ किलोमीटर राहणार आहे. चंद्र पृथ्वीच्या एवढा जवळ आल्यानं तो आकाशात नेहमीपेक्षा तब्बल १४ टक्के मोठा दिसणार आहे. एवढंच नाही तर या जवळकीचा परिणाम त्याच्या चमकदारपणावरही होणार असून चंद्राचा प्रकाश जवळपास ३० टक्क्यांनी वाढून तो जास्त तेजस्वी आणि मनमोहक दिसण्याची शक्यता आहे.या विलक्षण दृश्याचा आनंद संपूर्ण भारतभरातील नागरिकांना घेता येणार आहे. चंद्र सायंकाळी ५.१८ वाजता पूर्व दिशेला उगवेल आणि त्यानंतर रात्रभर आकाशात त्याचे दिमाखदार रूप पाहायला मिळणार आहे. पुढच्या दिवशी सकाळी ७.१४ वाजता पश्चिमेकडे मावळेपर्यंत त्याचे दर्शन घेता येईल. जवळपास १४ तासांहून अधिक काळ आकाशात हा चमकदार पूर्ण चंद्र झळाळत राहणार आहे.

असा तेजस्वी आणि मोठा चंद्र दिसण्याचा हा योग दुर्मिळ असतो. पुढील सुपरमून भारतातून २४ डिसेंबर २०२६ रोजी पाहायला मिळेल, असेही सोमण यांनी सांगितले. त्यामुळे खगोलप्रेमींसाठी आणि आकाशनिरिक्षणाची आवड असणाऱ्यांसाठी उद्याची रात्र अतिशय खास पर्वणी ठरणार आहे.