Home Blog Page 89

प्रधानमंत्री, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत येणाऱ्या रस्त्यांसह पुलांची दुरुस्ती करणार — डॉ.क्षीरसागर

0

चौसाळा ते वाढवणा रस्त्यावर दोन पूल होणार

बीड  —  बीड व शिरूर कासार तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक रस्त्यांसह पुलांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर यांनी प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अधिकाऱ्यांसोबत बीडमध्ये गुरुवारी (दि.९) चर्चा करण्यात आली. यावेळी विभाग अंतर्गत येणाऱ्या रस्ते व पुलांच्या दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी दि.२५ सप्टेंबर रोजी अतिवृष्टीग्रस्त भागांचा पाहणी दौरा करून चौसाळा परिसरातील पुलांच्या दुरुस्तीबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आढावा घेऊन डॉ.योगेश क्षीरसागर यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता एम.एम. पाटील यांना परिपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याकडे सादर करण्यास सांगितले. या प्रस्तावात चौसाळा–पिंपळगाव घाट–वाढवणा रस्ता (इजिमा-४८) येथील दोन नवीन पुलांच्या बांधकामाचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या रस्ते व पुलांच्या तातडीच्या देखभाल आणि दुरुस्तीबाबत बैठकीत सूचना देण्यात आल्या. या बैठकीत प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता एम.एम. पाटील, उपअभियंते पी.बी. जोगदंड, एच.डी. शिंदे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत बीड विधानसभा मतदारसंघातील एनएच-५६१ ते एसएच-५९ —नवगण राजुरी ते सोनगाव रोड, एमआरएल-१३ – नाळवंडी ते ढेकणमोहा, व्हीआर-१२ —लक्ष्मीआई तांडा, एमडीआर-३१ —बीडजवळ, आहेर धानोरा ते वरवटी, भाळवणी ते बेलेश्वर, एसएच-५५ — म्हाळसजवळा, राजापूर, वाकनाथ रोड, एसएच-५६ —म्हाळसापूर ते पिंपळगाव, राक्षसभुवन, कुक्कडगाव, एसएच-५६ —लिंबागणेश, काटवटवस्ती, अंजनवती, घारगाव, एनएच-२११ —मोरगाव ते देवऱ्याचावाडा, एमएसएच-१६ —ढेकणमोहा ते कारळवाडी, निर्मळवाडी, एनएच-२११ — कर्झनी (ब) ते कर्झनी (क), एसएच-६३ — आर्वी, तरडगव्हाण ते गाजीपूर रोड, गात शिरापूर, एसएसएच-१६ —ढेकणमोहा ते आंबेसावळी, मन्यारवाडी रोड, एसएच-५५ — उमरद (क) ते नागापुर बुद्रुक, ब्रन्हानपूर रोड, एसएच-६४ —देवीबाभुळगाव रोड, एमएसएच-१६ —काळेगाव हवेली रोड, एसएच-५५ —गंगनाथवाडी रोड, एमएसएच-१६ —काठोडा ते वांगी रोड, एसएच-५६ —मुळूकवाडी ते मसेवाडी रोड, ओडीआर-५० —नरनाळे ते डोईफोडेवस्ती रोड, एसएच-५५ —इट तांडा रोड, ओडीआर-११३ —मेंगडेवाडी रोड, ओडीआर-११३ — धुमाळवाडी रोड, ओडीआर-४८ —तेलपवस्ती ते मानेवाडी रोड, एमडीआर-१९ —रुपेवाडी रोड, ओडीआर-४७ —मांडवजाळी ते भाळवणी रोड, एसएच-२६ —खंडाळा ते ढाळेवस्ती रोड, एनएच-२११ —धनगरवाडी रोड, ओडीआर-११५ —फुकेवाडी रोड, वंजारवाडी ते भगवाननगर रोड, आहेर धानोरा ते राममंदिर इंगोळे पूर्व वरवटी रोड, एमएसएच-१६ —वंजारवाडी चऱ्हाटा रोड —तांदळवाडी ते सिसरटवस्ती, एसएच-२११ —कोळवाडी, एसएच-२११ —वानगाव पाईसावस्ती, बोरखेडवस्ती ते बोरखेड–गोलांग्री, एमडीआर-२८ —शाहाबाजपूर सानपवस्ती, एनएच-२११ —आहेरवडगाव ते काटवडा रोड, खांबालिंबा पौंडूळ ते नारायणगड, केतुरा रोड, एमडीआर-२८ —गाजीपूर, एमएसएच-१६ — मैंदा, एमडीआर-२८ —वासनवाडी ते लक्ष्मीनगर, एसएच-२३२ —परभणी ते केसापुरी, एमडीआर-३२ —बोरफडी ते मोहगीरवाडी, लक्ष्मीनगर, एमडीआर-१८ —चव्हाणवाडी, एमडीआर-१८ —खुंड्रस, ओडीआर-५१ —चांदेगाव, ओडीआर-५१ — जाधववस्ती, एसएच-५५ —खांडेपारगाव, एसएच-५५ —अंधरवनपिंप्री, एमडीआर-२८ —गाजीपूर ते शिरूर (कासार) या रस्त्यांसह पुलांची दुरुस्ती केली जाणार आहे. त्यामुळे अनेक गावांचा दळणवळणाचा मार्ग सुकर होणार आहे.

देखभाल निकषामध्ये न बसणाऱ्या
रस्त्यांसाठी निधी मागणीचा प्रस्ताव

प्रलंबित कामांना गती देण्यासाठी तसेच देखभाल निकषात न बसणाऱ्या रस्त्यांसाठी शासनाकडे निधीसाठीचा प्रस्ताव देण्याच्या सूचना डॉ.योगेश क्षीरसागर यांनी दिल्या. त्याअनुषंगाने अधिकाऱ्यांनी प्रस्ताव पाठविण्याची कार्यवाही सुरू केली आहे.

शिवाजीराव दादांनी विविध क्षेत्रात भरीव काम केले —- राज्यपाल हरिभाऊ बागडे

0

गेवराईत शिवाजीराव पंडित यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

गेवराई — शिवाजीराव (दादा )पंडित यांनी शिक्षण आणि सहकार क्षेत्रासह विविध क्षेत्रात भरीव काम केले. मंत्री असताना रोजगार हमी योजना खाते त्यांनी यशस्वीपणे सांभाळत ग्रामीण भागाचा विकास केला. त्याचबरोबर ग्रामीण भागात शिक्षण संस्था उभारून आपल्या भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी त्यांनी प्रयत्न करुन घराघरात शिक्षण पोहचविले असल्याचे गौरवोद्गार राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी काढले. माजी मंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कीर्तन महोत्सवाचा समारोप ह.भ.प. महादेव महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाला. या कार्यक्रमात तालुक्यातील संत महंतांचा सत्कार करण्यात आला. शिवछत्र परिवारावर प्रेम करणारे हजारो लोक यावेळी उपस्थित होते.

गेवराई येथे शुक्रवार दिनांक १० ऑक्टोबर रोजी माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या ८८ व्या अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, माजी मंत्री शिवाजीराव (दादा) पंडित राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील, श्रीक्षेत्र नारायणगडाचे महंत ह.भ.प. शिवाजी महाराज, श्री क्षेत्र चाकरवाडी संस्थानचे महंत ह.भ.प. महादेव महाराज, माजी आमदार विलासराव खरात, अमरसिंह पंडित, आ. विजयसिंह पंडित यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. अभिष्टचिंतन सोहळ्याच्या प्रारंभी गेवराई तालुक्यातील सर्व संत महंतांचा जयसिंग पंडित, पृथ्वीराज पंडित, रणवीर पंडित यांच्यासह सोहळा समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गेवराई तालुक्यातील विविध संस्थानचे संत महंत, नागरिक आणि अभिष्टचिंतन सोहळा समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्य अभिष्टचिंतन सोहळ्या नंतर काल्याचे कीर्तन संपन्न होऊन महाप्रसाद वाटप करण्यात आला.

यावेळी बोलताना हरिभाऊ बागडे म्हणालेकी, दादांचे ८८ वर्ष वय झाले असतानाही दादा आज तीच ऊर्जा घेऊन काम करत आहेत. म्हणून शिवाजीराव (दादा ) यांची शताब्दी याच ठिकाणी साजरी व्हावी व या कार्यक्रमाला माझ्यासह राज्याचे मुख्यमंत्री व सर्व मंत्रिमंडळ हजर राहून त्यांना शुभेच्छा देतील असा विश्वास व्यक्त केला. पुढे बोलतांना बागडे म्हणाले की, शिवाजीराव (दादा) चा राजकीय परिचय म्हणजे मी गेल्या ५० ते ६० वर्षांपासून त्यांची कारकीर्द पाहत आलो आहे. दादा राजकारणात आले आणि गेवराई तालुक्याचा कायपालट केला. दादांनी ४० वर्षाच्या राजकारणात विविध विकास कामे आणून गेवराई तालुक्याचा तर विकास केलाच पण मराठवाड्याच्या विकासातही त्यांचा मोलाचा वाटा आहे. आजही दादांच्या नेतृत्वाखाली त्यांचे मुलं या तालुक्याच्या राजकारणात सक्रिय काम करत असून त्यांचा यशस्वी वारसा चालवत आहेत. सहकार क्षेत्रात दादांचे मोठे काम आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून दादांनी गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांना ऊसाचे क्षेत्र वाढवण्यासाठी खूप प्रयत्न केले. मराठवाड्यात सहकार क्षेत्रात आदराने दादांचे नाव घेतले जाते. शिक्षण क्षेत्रातही दादांचे मोठे योगदान आहे. गेवराई तालुक्यातील ग्रामीण भागात दादांनी शिक्षण संस्थाचे जाळे निर्माण करून शेतकऱ्यांची मुले साक्षर केली. शिवाजीराव दादा मंत्री आसतांना मी पण सभागृहात होतो. त्यांनी रोजगार हमी खाते यशस्वीपणे सांभाळले. या खात्यातून ग्रामीण भागातील जेवढा विकास झाला तेवढा विकास कोणत्याच खात्यातून झाला नाही. या खात्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रस्ते, पाझर तलाव झाले. अन त्याच काळात झालेल्या जलसंधारणाची कामे आज राज्यातील अनेक भागात सुपीकता दिसून येत आहे. मराठवाड्यातून वाहणाऱ्या कालव्यातही दादांचा मोठा वाटा आहे. राजकारणातील स्वच्छ चरित्र अन चांगली प्रतिमा असलेल्या नेत्याममध्ये दादांचे नाव अग्रक्रमाने येत आहे. राजकीय निवडणुकीतही दादांनी कधी कोणाचा द्वेष न करता एकोप्याने राजकारण केले. शेवटी दादांना उदंड अन निरोगी आयुष्य लाभावे आशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

दादांनी सर्व घटकांना सोबत घेऊन काम केले —- ह.भ.प. शिवाजी महाराज
यावेळी आशीर्वादपर बोलताना ह.भ.प. शिवाजी महाराज म्हणाले की, शिवाजीराव दादांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम केले. त्यांनी भक्तीचा ध्वज उभारला. त्यांना साधुसंतांचे आशिर्वाद मिळाले, त्यामुळे त्यांचे आरोग्य आणि शिवछत्र परिवार सुखात आहे. दादांनी त्यांच्या मुलांवर चांगले संस्कार केल्यामुळे ते पुढे उत्तम आणि जनकल्याणचे काम करत आहे. नगदनारायण महाराजांचा त्यांना आशिर्वाद आहे असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.

शिवाजीराव दादांचे जीवन लोकसमर्पीत आहे —–ह भ.प. महादेव महाराज
माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित कीर्तन महोत्सवाचा समारोप श्री क्षेत्र चाकरवाडी संस्थानचे महंत ह.भ.प. महादेव महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, शिवाजीराव पंडित यांनी समाजाला प्रगत करण्यासाठी काम केले. त्यांचे जीवन लोकसमर्पीत आहे. शिक्षण आणि सहकार क्षेत्रात काम करुन त्यांनी लोकांच्या जीवनात अर्थक्रांती आणली. अनेक परिवार सुखी झाले, त्यांना साधुसंत आणि गोरगरीब जनतेचे आशीर्वाद आहेत असेही ते यावेळी म्हणाले.

शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल —- अमरसिंह पंडित
यावेळी बोलताना अमरसिंह पंडित म्हणाले, राज्यपाल बागडे साहेब यांच्या शब्दाला महाराष्ट्र शासनाकडे मोठी किंमत आहे, त्यामुळे विनंती करतो की, नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने मोठी मदत केली, भरघोस पॅकेज दिले आहे‌, पण आपल्या प्रमुख कापुस या पिकाला बागायतीचा दर्जा दिला नाही. तो मिळाला तर आपल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल. मराठवाड्यात सर्वाधिक क्षेत्रावर कापसाचे उत्पादन घेतले जाते, त्यामुळे या बाबत पुढाकार घेण्याचे आवाहन अमरसिंह पंडित यांनी राज्यपाल हरिभाऊ बागडे यांना केले.

दादांचा वारसा यशस्वीपणे पुढे चालवणार– आ. विजयसिंह पंडित
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना आ. विजयसिंह पंडित म्हणाले की, दादांनी उपेक्षीत घटकाच्या विकासासाठी, दिन दलीत आणि सामान्य माणसांसाठी काम केले‌ तोच वारसा घेऊन आम्ही काम करत आहोत. गेवराई विधानसभा मतदारसंघातील जनतेने मला भरभरुन आशिर्वाद दिल्यामुळे मी विधिमंडळात दहा महिन्यांत चांगले काम करु शकलो. यापुढेही अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली विकासकामे करण्यासाठी कमी पडणार नाही असेही ते यावेळी म्हणाले.

बीड न.प निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रा.काँ. (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने बैठकीचे आयोजन

0

शहरातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आ.संदीप क्षीरसागरांनी केले आवाहन

बीड  — आगामी बीड नगर परिषद निवडणूक 2025 पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) तर्फे बीड शहरातील कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.
बीड नगर पालिकेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक आरक्षण सोडतीनंतर आ.संदीप क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक दि.11 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस भवन,बार्शी रोड,बीड येथे होणार असून या बैठकीस आमदार संदीप क्षीरसागर, माजी आमदार सय्यद सलीम, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के आणि अन्य वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत नगर परिषद निवडणुकी संदर्भातील संघटनात्मक तयारी, उमेदवार निवड प्रक्रिया, प्रचार आराखडा आणि पक्ष बळकटीकरण यावर सविस्तर चर्चा होणार आहे. बीड शहरातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांना वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) तर्फे आ.संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.

आबाऽऽबाऽऽ! एम पी डी ए तुन बाहेर येताच गुटख्याची पाळे”मुळे”बीड जिल्ह्यात रुजली? वाशीत कारवाई बीडमध्ये दिलजमाई

0

बीड — गुटखा माफिया आबा मुळे एमपीडीए सारख्या कारवाईतून बाहेर पडताच आपलं बस्तान बसविण्यासाठी धाराशिवमधून आपली मूळं बीड जिल्ह्यात पसरली असल्याचे सांगितले जाते. स्थानिक गुन्हे शाखेसह नेकनूर बीड ग्रामीण, पेठ बीड यांना मोठी बिदागी देऊन पिक अप च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर गुटखा जिल्ह्यात सप्लाय केला जात आहे.
पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांच्यामुळे गुटखा माफीयांना हातपाय पसरायला बीड जिल्ह्यात जड जात आहे. पण “घर का भेदी लंका ढाय” अन् एस पी चा आदेश करणार काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे. गुटख्यातील माफियागिरीला आळा घालण्यासाठी आबा मुळे वर एम पी डी ए अंतर्गत कारवाई देखील केली.पण यातून बाहेर पडताच आबा मुळेने गुटखा तस्करीचे केंद्र म्हणून धाराशिव जिल्ह्याचा वापर करायला सुरुवात केल्याच्या चर्चा आहेत.दरम्यान इथूनच मग आपली पाळे मूळे बीड जिल्ह्यात देखील पसरली आहेत. वाशी तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर गुटखा तस्करी करणं सोपं जात असल्यामुळे तिथून सगळी सूत्र हलवली जात आहेत. गुटखा तस्करीला कुठेही अडथळा येऊ नये यासाठी स्थानिक गुन्हे शाखेसह पेठ बीड, बीड ग्रामीण, नेकनूर,केज पोलीस ठाणे यांच्या प्रमुखांना बांधील बिदागी मोठ्या प्रमाणावर वाटप देखील केली जाते. परिणामी गुटखा तस्करीसाठी धाराशिव व बीड जिल्ह्याला जोडणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर सुरक्षित वातावरण निर्मिती केली गेली आहे. बीड जिल्ह्याच प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या मांजरा नदी किनारी महामार्ग पोलीस ढगारे आणि वाशी पोलिसांनी संयुक्त कारवाई करून 13 लाखाचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत 6 लाख 60 हजार रुपयांचा माल तसेच पिक अप देखील हाती सापडला. हा प्रतिबंधित गुटख्याचा माल बीड जिल्ह्यात सप्लाय साठी आणण्यात येत होता. बीड जिल्ह्यात गुटखा माफियाला आपली पाळमूळ खोलवर रुजवण्यात कोण सहकार्य करत आहे? सहकार्य करणारांची चौकशी पोलीस अधीक्षक करणार का? आपल्याच घरात लपून बसलेल्या बिभीषणाला पोलीस अधीक्षक आळा घालणार का? असे अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत.

मराठवाडयात 10 कोटी 78 लाख रूपयांची वीज चोरी उघड

0

10 कोटी 29 लाख रूपये दंडाची रक्कम वसूल

छ. संभाजीनगर — महावितरण छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाच्या मंडल कार्यालय अंतर्गत माहे एप्रिल 2025 ते 30 सप्टेबर 2025 या सहा महिन्यांच्या कालावधीत वीज चोरांविरूध्द धडक मोहीम राबविण्यात आली. यामध्ये 2,593 वीज मिटरची तपासणी व इतर अनियमिततेची पाहणी करण्यात आली. यात 1,186 मिटरमध्ये वीज चोरी आढळून आली. यात 11304547 युनिट वीज चोरी प्रकरणी 10 कोटी 78 लाख 87 हजार रूपयांच्या अनुमानित वीज बिल दंडाच्या रक्कमेची आकारणी करण्यात आली आहे. या प्रकरणात 10 कोटी 29 लाख 40 हजार रूपये वसूल करण्यात आले आहेत.संबंधित 191 वीजचोरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वीज चोरीची रक्कम कोटी रूपयांमध्ये पुढील प्रमाणे
वीज चोरी पथक ग्राहक वीज चोरीची रक्कम
छत्रपती संभाजीनगर शहर  280.         337.02
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण 136         137.36
जालना   157          106.55
छत्रपती संभाजीनगर
परिमंडल.   573               620.93

बीड  — 77                    21.41
धाराशिव  — 140           95.17
 लातूर —         177.              170.20
लातूर परिमंडल.    394.         286.78
नांदेड                  170.               122.94

परभणी.            49.                          88.23
नांदेड परिमंडल.    219.         211.17
मराठवाडा एकूण.   1186            1078.87

मराठवाडयातील छत्रपती संभाजीनगर शहर व ग्रामीण, जालना, परभणी, नांदेड, लातूर,धाराशिव व बीड जिल्हयात एप्रिल 2025 ते 30 सप्टेबर 2025 या कालावधीत भरारी पथक आणि दक्षता व सुरक्षा अंमलबजावणी विभागामार्फत वीज चोरांविरूध्द धडक मोहीम राबविण्यात आली. विघुत कायदा 2003 नुसार कलम 126 अंतर्गत शेजा—याकडून अनधिकृत वीज घेणे, मंजूर भारापेक्षा अधिक क्षमतेच्या भाराचा वापर करणे, मंजूर वर्गवारीतून दुस—या वर्गवारीसाठी अनधिकृत विजेचा वापर करणे याचा समावेश होतो. तसेच कलम 135 मध्ये मिटरची छेडछाड करणे, आकडा टाकून विजेचा वापर करणे, सव्हिेसवायर टॅप करणे व कलम 138 मध्ये महावितरणचे मिटर, वायरसह इतर वस्तु चोरी करणे इत्यादी बाबींचा समावेश होतो.
वीज चोरी पकडण्याची मोहीम यापुढेही चालू राहणार आहे. अनधिकृत विजेचा वापर करू नये. आगामी काळात वीज चोराच्या विरोधात मोठ्या प्रमाणात वीज चोरी शोध मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. अनधिकृतपणे विजेचा वापर करतांना आढळून आल्यास विघुत कायदयानुसार कडक कारवाई करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत. वीज ग्राहकांनी अधिकृत वीज जोडणी घेवूनच विजेचा वापर करण्याचे आवाहन महावितरणचे प्रादेशिक कार्यालयाचे सह व्यवस्थापकीय संचालक आदित्य जीवने यांनी दिले आहेत

एसटी कर्मचाऱ्यांसाठी महामंडळाचा मोठा निर्णय!

0

मुंबई — एससटी महामंडळाने आपल्या विविध मागण्यासाठी येत्या १३ ऑक्टोबरपासून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. असे असतानाच आता एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या सप्टेंबर महिन्याच्या पगारासाठी काल राज्य शासनाने ४७१.०५ कोटीचा निधी देण्यास मंजूरी दिली आहे.

त्यातच आता दिपावली सणासाठी आता सण उत्सव अग्रीम उचल देण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

एसटीच्या ८३ हजार कर्मचाऱ्यांचे सप्टेंबरचे वेतन मिळणार आहे. आता एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीचा सण तोंडावर आल्याने ऊत्सव अग्रीम उचल मिळण्याचाही मार्ग मोकळा झाला आहे. या वर्षाचा दिपावली हा सण दि.२१ ऑक्टोबर २०२५ दरम्यान साजरा करण्यात येणार आहे. एसटी महामंडळाने या संदर्भात एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार ज्या कर्मचाऱ्यांची रु. १२,५००/- उत्सव अग्रीम घेण्याची इच्छा आहे त्यांनी त्यांचे विभाग नियंत्रकांकडे अर्ज जमा करावेत. त्या अर्जाची तपासणी करुन पात्र कर्मचाऱ्यांची यादी १५ ऑक्टोबर २०२५ पर्यन्त या कार्यालयास पाठवावी असे आदेश देण्यात आले आहेत.

उत्सव अग्रीम मिळण्यासाठी कमाल मूळ वेतन मर्यादा रु.४३४७७/- इतकी ठेवण्यात आली आहे. याचा अर्थ ज्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन रु. ४३४७७/- पेक्षा जास्त आहे अशा कर्मचाऱ्यांना उत्सव अग्रीम मिळणार नाही असेही महामंडळाने स्पष्ट केले आहे. शिवाय ज्या कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती अग्रीम वाटपापासून १० महिन्यांच्या आत असेल अशा कर्मचाऱ्यांनी उत्सव अग्रीम अर्जाचा विचार करु नये असेही या पत्रकात म्हटले आहे. अग्रीम वाटपाकरीता आपल्या घटकास किती रक्कम लागणार आहे याची माहिती दि. १५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत विभागीय लेखा अधिकारी राज्य परिवहनाला कळवावी असे या पत्रकात म्हटले आहे.विभागिय कार्यालयातील इच्छुक कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज हे संबंधित शाखा प्रमुख यांच्या मार्फतच पाठवावेत. स्वतंत्रपणे अर्ज सादर करु नयेत, ते स्वीकारले जाणार नाहीत असेही पत्रकात म्हटले आहे.

कपिलधारवाडीत भूगर्भ सर्वेक्षण पथकाची पाहणी, तातडीने पुनर्वसनाचे निर्देश

0
बीड —  कपिलधारवाडी येथे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या व अतिवृष्टीमुळे जमिनीचा पृष्ठभाग खचला असून, अनेक घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत तसेच रस्त्यांवर खोल भेगा पडल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या भूस्खलनग्रस्त क्षेत्राचा आढावा घेण्यासाठी भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाचे (GSI) संचालक मेगो चासी आणि वरिष्ठ भूवैज्ञानिक संदीपकुमार शर्मा यांनी बुधवारी स्थळाची पाहणी केली. त्यांनी प्राथमिक निरीक्षण अहवाल सादर करत नमूद केले की, संबंधित भागात पाण्याचा नैसर्गिक निचरा न झाल्याने भूपृष्ठाखाली पाणी साचले आहे आणि त्यामुळे भूस्खलनाची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. काही कुटुंबांवर तत्काळ धोका असल्याने त्यांचे तात्पुरते पुनर्वसन आवश्यक असल्याचे त्यांनी सुचविले.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी प्रशासनास प्रतिबंधात्मक आणि पुनर्वसनात्मक उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय अधिकारी बैठक घेऊन परिस्थितीचा सखोल आढावा घेण्यात आला.
तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने स्थलांतरित कुटुंबांसाठी मन्मथस्वामी देवस्थान परिसरात तात्पुरती निवारा व अन्नाची व्यवस्था केली आहे. महिलांना साड्या व आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले असून, मदतकार्य व पाहणीसाठी अधिकाऱ्यांची सतत उपस्थिती आहे.प्रशासनाने नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन करत सांगितले की, “परिस्थिती नियंत्रणात असून प्रत्येक कुटुंबाच्या सुरक्षिततेची जबाबदारी प्रशासनाने घेतली आहे.

राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत होणार शिवाजीराव पंडित यांचा अभिष्टचिंतन सोहळा

0

बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे
अभिष्टचिंतन सोहळा आयोजन समितीचे आवाहन

ना. राजन पाटील यांची प्रमुख उपस्थिती

गेवराई — तालुक्याचे भाग्यविधाते माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या ८८ व्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार , दि.१० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वा. शिवनगरी, र.भ.अट्टल महाविद्यालय, गेवराई येथे भव्य अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. राजस्थानचे राज्यपाल हरीभाऊ (नाना) बागडे, श्री क्षेत्र नारायणगडाचे मठाधिपती ह.भ.प. शिवाजी महाराज, श्रीक्षेत्र चाकरवाडी संस्थानचे महंत ह.भ.प. महादेव महाराज, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष ना. राजन पाटील यांच्या शुभहस्ते शिवाजीराव पंडित यांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. त्यानंतर काल्याचे कीर्तन आणि महाप्रसादाने कीर्तन महोत्सवाचा समारोप होणार असून यावेळी हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अभिष्टचिंतन सोहळा समितीने केले आहे.

गेवराई तालुक्याचे भाग्यविधाते आणि बीड जिल्ह्याच्या राजकारणातील भिष्माचार्य म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ नेते शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या ८८ व्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार, दि.३ ऑक्टोबर पासून गेवराई शहरात श्रीमद्‌‍ भागवत कथा आणि भव्य किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. भावरत्न समाधान महाराज शर्मा यांच्या मधूर वाणीतून सुरु असलेल्या भागवत कथेमुळे गेवराईचे वातावरण भक्तिमय झाले आहे. अनेक नामांकित किर्तनकारांची सेवा सप्ताहभर सुरु आहे.

शुक्रवार दि.१० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वा. राजस्थानचे राज्यपाल हरीभाऊ (नाना) बागडे यांच्या हस्ते माजी मंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांचा अभिष्टचिंतन सोहळा समितीच्या वतीने भव्य सत्कार आयोजित करण्यात आला आहे. यावेळी श्री क्षेत्र नारायणगड संस्थानचे मठाधिपती ह.भ.प.शिवाजी महाराज, श्री क्षेत्र चाकरवाडीचे ह.भ.प. महादेव महाराज यांच्यासह साधु, संत-महंत आणि गेवराई तालुक्यातील वारकरी सांप्रदायात काम करणारे किर्तनकार, गायक, वादक यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

काल्याचे कीर्तन आणि महाप्रसादाने होणार कीर्तन महोत्सवाचा समारोप

माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात गेवराई विधानसभा मतदार संघातील सर्व साधु, संत-महंत, किर्तनकार यांचाही हृदय सत्कार अभिष्टचिंतन सोहळा समितीच्यावतीने करण्यात येणार आहे. वाढदिवसानिमित्त होणाऱ्या भव्य सत्कार समारंभानंतर ह.भ.प.शिवाजी महाराज यांचे काल्याचे किर्तन होणार असून त्यानंतर महाप्रसाद वाटप केला जाणार आहे भाविक भक्तांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहनही आयोजन समितीने केले आहे.

कार्यकर्ते एकत्र येऊन
करत आहेत दादांचे अभिष्टचिंतन

शिवाजीराव पंडित आणि शिवछत्र परिवारावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी एकत्र येवून अभिष्टचिंतन सोहळा समितीच्या माध्यमातून मागील तीन वर्षांपासून किर्तन महोत्सवाचे यशस्वी आयोजन केले आहे. र.भ.आट्टल महाविद्यालयाच्या मैदानावर उभारलेल्या शिवनगरीत गेल्या सप्ताहभर सुरु असलेल्या किर्तन महोत्सवाला भाविक भक्तांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. याप्रसंगी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अभिष्टचिंतन सोहळा समितीच्या समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

एलसीबी पथकाने घाटनांदुर मध्ये मारलेल्या छाप्यात 12 किलो गांजा जप्त

0

बीड — अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदुर येथे अण्णाभाऊ साठे चौकाजवळील घरावर स्थानिक गुन्हे शाखेने मारलेल्या छाप्यात बारा किलो गांजा जप्त करण्यात आला.
पोलिस अधीक्षक यांना मिळालेल्या गुप्त माहिती वरून घाटनांदूर (ता.अंबाजोगाई) येथे मोठ्या प्रमाणात गांजाची साठवणूक करून चोरून विक्री करत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिस अधीक्षकांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड सहायक पोलीस निरीक्षक रंगनाथ जगताप यांच्या पथकाने व अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाणे पोलिस निरिक्षक मुरलीधर खोकले यांनी संयुक्तपणे मंगळवारी (दि.7 ) रात्री निहाल रामभाऊ गंगणे याच्या घरावर छापा मारून 2 लाख 43 हजार 720 रुपये किंमतीचा 12 किलो गांजा जप्त केला असून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात स्थानिक गुन्हे शाखेचे रामचंद्र परशुराम केकान यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंजनवतीत महिलेवर चौघांचा प्राणघातक हल्ला; पाय तोडण्याचा प्रयत्न

0

बीड — शेतीच्या वादातून महिलेवर भावकीतील चार जणांनी प्राणघातक हल्ला करत तिचे पाय तोडण्याचा प्रयत्न केल्याची खळबळ जनक घटना चौसाळा जवळील अंजनवती येथे घडली आहे.
अश्विनी येडे असं मारहाण झालेल्या पीडित महिलेचं नाव आहे. तिच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघण्याची सुरू झालेली मालिका अजूनही चालूच आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नेकनुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंजनवती गावात राहणाऱ्या आश्विनी येडे या महिलेला निर्दयीपणे मारहाण करून तिचे पाय तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही मारहाण भावकीतील चार जणांनी केल्याचे उघड झाले आहे. तसेच शेतीच्या वादातून आश्विनी येडे या महिलेवर हल्ला झाला आहे. या हल्ल्यात आश्विनी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
विशेष म्हणजे आरोपीकडून याआधीही तीन महिलांवर अशाच पद्धतीने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. यापूर्वी इतर महिलेला मारहाण करतानाचा थरारक व्हिडीओ देखील समोर आला आहे. महिलांना अमानुष मारहाण करतानाचा हा व्हिडिओ तीन महिन्यापूर्वीचा असून बीड जिल्ह्यातील या घटनेने पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेकनूर पोलीस अधिक तपास करत आहेत. या प्रकरणामुळे कुटुंब मोठ्या दहशतीत असून संबंधित आरोपींवर कडक कारवाई करून आरोपींना जेरबंद करण्यात यावे अशी मागणी केली जात आहे.