Home Blog Page 88

विहिरीच्या पाण्यावरून दोन सख्ख्या भावांमध्ये रक्तरंजित राडा

केज — विहिरीच्या पाण्यावरून दोन सख्ख्या भावांमध्ये रक्तरंजीत राडा झाला.कुऱ्हाड, कत्ती, काठ्यांचा वापर मारहाणी साठी केल्यामुळे काही जण जखमी झाले. ही घटना केज तालुक्यातील येवता या ठिकाणी घडली याप्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.‌
केज तालुक्यातील येवता येथील मल्हारी लक्ष्मण सक्राते 53 वर्ष यांच्या फिर्यादीनुसार, बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ते शेतात असताना त्यांचा सख्खा भाऊ अशोक सक्राते आणि त्याच्या मुलांनी तेथे येऊन वाद घातला. “विहीर आमची आहे, मोटार चालू करू नकोस,” असे म्हणत त्यांनी शिवीगाळ केली. “आपण बारीने पाणी घेऊ” असे मल्हारी यांनी सुचवले असता, रागाच्या भरात अशोकने कुऱ्हाडीने मल्हारी यांच्या डोक्यात वार करून त्यांना गंभीर जखमी केले. या प्रकरणी अशोक सक्राते, प्रणव, समाधान आणि शिवकन्या या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे, दुसऱ्या गटाचे प्रणव अशोक सक्राते यांनीही फिर्याद दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ते विहिरीवर मोटार चालू करण्यास गेले असता त्यांचे चुलते मल्हारी सक्राते, दीपक, प्रवीण आणि शारदा सक्राते यांनी त्यांना अडवले. यावेळी झालेल्या वादात चुलते मल्हारी सक्राते यांनी धारदार कत्तीने प्रणवच्या हातावर वार करून त्याला जखमी केले, तर इतरांनी दगडाने मारहाण केली. या तक्रारीवरून मल्हारी सक्राते यांच्यासह
चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

कोकाटेच्या घोटाळ्यातल्या “माणिक”ला उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

मुंबई — सदनिकेच्या घोटाळा प्रकरणी माणिकराव कोकाटेंना प्रथम वर्ग न्यायालयाने दोन वर्षांचा तुरुंगवास आणि 50 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली होती.त्याची ही शिक्षा नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाकडून सुद्धा कायम ठेवण्यात आली. ज्यानंतर कोकाटेंनी बुधवारीच 17 डिसेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत शिक्षेच्या स्थगितीसाठी याचिका दाखल केली. या याचिकेवर आज दि.19 डिसेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर कोकाटेला जामीन मंजूर करण्यात केला आहे.
बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिकेचा लाभ घेण्याच्या प्रकरणात माजी मंत्री आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटेंच्या दोन वर्षांच्या शिक्षेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली नसली तरी एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर झाला आहे. त्यामुळे रुग्णालयात असलेल्या कोकाटेंना सध्या तरी दिलासा मिळाला आहे. त्यांना या क्षणाला कोणतीही अटक होणार नाही. पण, कोकाटेंच्या आमदारकीचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा, असेही कोर्टाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ज्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष कोकाटेंच्या आमदारकीबाबत नेमका काय निर्णय घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कमी उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री कोट्यातून सदनिका घेताना स्वतःच्या नावावर कुठेही सदनिका नसल्याचे प्रतिज्ञापत्र व आवश्यक माहिती सादर करावी लागते, असे असताना मंत्री कोकाटे व त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी 1995 ते 1997 या कालावधीत खोटी कागदपत्रे सादर करून नाशिक शहरात मुख्यमंत्री कोट्यातून दोन सदनिका प्राप्त केल्या. त्या वेळी त्यांनी आपले उत्पन्न कमी असल्याचे आणि स्वतःकडे अन्य कोणतेही घर नसल्याची माहिती शासनाला दिली होती. या आधारे त्यांना शासनामार्फत सदनिका मंजूर करण्यात आल्या. मात्र सदनिका मिळवण्यासाठी कागदपत्रांमध्ये फेरफार करून शासनाची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप कोकाटे यांच्यावर करण्यात आला. 1995 साली माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी यासंदर्भात तक्रार दिली होती. त्यानुसार कोकाटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयात हा खटला सुरु होता. तीन वर्षांनी न्यायालयाने निकाल देत कोकाटे बंधूंना शिक्षा सुनावली. माजी मंत्री दिघोळे यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या आधारे नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 1997 पासून हे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. दिघोळे यांची कन्या अंजली दिघोळे यांनी हे प्रकरण लावून धरलं. अखेर न्यायालयाने माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे या दोघांना दोषी ठरवत प्रत्येकी दोन वर्षांची कारावासाची शिक्षा आणि 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. याच प्रकरणात आता कोकाटेंना एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे.

तुपानंतर “पतंजलीच” लाल तिखटही खराब; सापडली घातक कीटकनाशके — केंद्र सरकार

नवी दिल्ली — योगगुरु रामदेव बाबा यांच्या “पतंजली फूडस्” उत्पादनावर वारंवार प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. पतंजलीचा तूप वादात सापडल्यानंतर आता लाल मिरची पावडर मध्ये देखील कीटकनाशकांचे प्रमाण दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आढळून आल्याची माहिती केंद्र सरकारने लोकसभेत दिली.
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी विचारलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, 2024 -25 या वर्षात मसाल्यांच्या गुणवत्तेसाठी राबवलेल्या विशेष मोहिमेदरम्यान पतंजलीच्या उत्तराखंडमधील उत्पादन युनिटमधून लाल मिरची पावडरचे नमुने घेण्यात आले होते. या नमुन्यांच्या तपासणीत कीटक नाशकांचे अवशेष निर्धारित मॅक्सिमम रेसिड्यू लिमिटपेक्षा जास्त आढळले आहेत.या धक्कादायक निष्कर्षानंतर संबंधित प्राधिकरणाने तातडीने रिकॉल आदेश जारी केले आहेत. त्यानुसार, पतंजली फूड्सने बाधित उत्पादने बाजारातून परत घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान, अमुल ब्रँडच्या कोणत्याही उत्पादनात अशा प्रकारची त्रुटी आढळली नसल्याचेही मंत्र्यांनी स्पष्ट केले. पतंजलीच्या गुणवत्तेवर वारंवार प्रश्नचिन्ह
पतंजलीची उत्पादने वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या काही महिन्यांतही अशा घटना घडल्या आहेत. याच महिन्याच्या सुरुवातीला पतंजलीचे तूप क्वालिटी टेस्टमध्ये फेल झाले होते, ज्याबद्दल उत्तराखंडमधील न्यायालयाने कंपनीला 1.40. लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. मे 2024 मध्ये सोन पापडीच्या निकृष्ट गुणवत्तेमुळे पतंजलीच्या एका असिस्टंट मॅनेजरसह तिघांना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.
औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायद्याचे वारंवार उल्लंघन केल्यामुळे उत्तराखंड सरकारने पतंजलीच्या 14 उत्पादनांचे परवाने निलंबित केले होते. यामध्ये मधुग्रिट, लिपिडोम आणि स्वसारी सारख्या प्रसिद्ध औषधांचा समावेश होता.
खाद्यपदार्थांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र आणि राज्य सरकारे मिळून एफएसएसएआयच्या माध्यमातून वर्षभर तपासणी मोहिमा राबवतात. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई केली जाते, असे प्रतापराव जाधव यांनी स्पष्ट केले. दरम्यान, गेल्या काही काळापासून एमडीएच आणि एव्हरेस्ट नंतर आता पतंजलीचेही मसाले वादात सापडल्याने भारतीय मसाल्यांच्या गुणवत्तेबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावरही चर्चा सुरू झाली आहे.

बहिणी सोबत ऊस तोडीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

केज — मोठ्या बहिणी सोबत ऊस तोडणी साठी आलेल्या बारा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील एका गावातून उघडकीस आली आहे.याप्रकरणी युसूफवडगाव पोलिस ठाण्यात पोक्सोसह अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला असून आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
अत्याचार पीडित बालिकेचे कुटुंब अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आहे. तिचे वडील कर्नाटकात ऊस तोडणीसाठी गेले आहेत, तर आईची मानसिक स्थिती ठीक नाही.ती नातेवाइकांकडे असते. अशा भीषण परिस्थितीत 6 वीच्या वर्गात शिकणारी ही पीडित बालिका आपल्या ऊसतोड मजूर बहिणीसोबत केज भागात आली होती. तिची मोठी बहीण आणि दाजी धारूर तालुक्यातील एका मुकादमाकडून उचल घेऊन केजमधील एका गावात ऊसतोडणीसाठी आले होते. सोमवारी रात्री सर्व मजूर शेतात उसाचे ट्रॅक्टर भरण्यासाठी गेले होते.यावेळी आरोपी लक्ष्मण ऊर्फ सागर निवृत्ती वाघमारे वय 34 वर्ष, रा. सोमनाथ बोरगाव, ता. अंबाजोगाई हा देखील तिथेच होता. दरम्यान सहा वर्षांची बालिका नैसर्गिक विधीसाठी जात असताना, नराधम लक्ष्मणने तिचे तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केला. पीडितेने घडलेला सर्व प्रकार आपल्या बहिणीला सांगितला. ही घटना माहिती होताच पोलिसांत धाव घेण्यात आली. गुन्हा दाखल होताच आरोपी पळून गेला होता. मात्र, युसूफवडगाव पोलिसांनी आरोपीला कळंब बसस्थानकावरून पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पकडले. बुधवारी संध्याकाळी पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विरोधात पाॅक्सोसह इतर कलमांखाली गुन्हा नोंद केला आहे.

गेवराईतून भर दिवसा अपहरण झालेली मुलगी अखेर सापडली;आरोपी मात्र फरार

गेवराई — शहरातील पंचायत समिती जवळील चौकातून अपहरण केलेल्या मुलीला सोडवण्यासाठी पथक तयार करण्यात आली होती. दरम्यान पोलिसांनी अपहरण नाट्यात पाठलाग करून परभणी शहरातून मुलीला सुखरूप ताब्यात घेण्यात यश मिळाले. मात्र आरोपी पोलिसांच्या हाती लागले नसून तीन जनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील पंचायत समिती जवळ असलेल्या चौकातून महाविद्यालयात शिक्षण घेत असलेली मुलगी घराकडे पायी जात होती यावेळी अचानक एक चार चाकी गाडी तिच्याजवळ आली आणि फिल्मी स्टाईलने त्या मुलीला गाडीत टाकून पळवून नेले. मुलीने विरोध करत सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला पण तीला दोघांनी मारहाण करुन जबरदस्तीने वाहनात घातले ही घटना गुरूवारी दुपारी 12 वाजता दिवसाढवळ्या घडल्याने खळबळ उडाली होती. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. सदरील वाहन हे शास्त्री चौकातून महामार्गाने शहागडच्या दिशेने गेले होते.या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी संबंधित गाडीचा पाठलाग करून शोध सुरू केला होता.तर सर्वत्रच हा संदेश पोहोचवला होता. यामुळे तपासाला वेग आला. पोलीस सर्वत्र तपास करीत असताना अपह्रृत मुलगी परभणी शहरात सुखरुप असल्याची माहिती मिळाली आणि सुटकेचा निःश्वास सोडून गेवराई पोलीस परभणीच्या दिशेने गेले. या ठिकाणी अपहरण झालेल्या मुलीला ताब्यात घेतले आहे. काही तासात गेवराई पोलिसांनी मुलाचा शोध घेऊन ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला पण आरोपी काही हाती लागले नाही. याप्रकरणी अपहरण करणाऱ्या तिन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेवराई पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जंजाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कोटकर, दीपक लंके, पोलीस उपनिरीक्षक निशिगंधा खुळे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश पारधी, पोलीस कॉन्स्टेबल आरेफ बागवान यांनी व परभणी पोलिसांनी केली आहे.

माणिकराव कोकाटे यांना नाशिक सत्र न्यायालयाचे अटकेचे आदेश

माणिकराव कोकाटे याचा राजीनामा

मुंबई — नाशिक सत्र न्यायालयानं अटकेचं फर्मान काढल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलेल्या मंत्री माणिकराव कोकाटेंच्या पदरी निराशा पडली आहे. अटकेला स्थगिती मिळावी यासाठी कोकाटे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.पण न्यायालयानं तातडीनं सुनावणी घेण्यास नकार दिला. या प्रकरणी पुढील सुनावणी शुक्रवारी होईल. त्यामुळे कोकाटे यांच्या अटकेची शक्यता वाढली आहे. जिल्हा सत्र न्यायालयाच्या निकालाची पत्र विधिमंडळाला मिळाल्यावर कोकाटे यांची आमदारकी रद्द करण्यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल. दरम्यान माणिकराव कोकाटे यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिल्याच वृत्त मिळत आहे ‌

शासकीय कोट्यात येणाऱ्या सदनिका गैरव्यवहार प्रकरणात मंत्री माणिकराव कोकाटे यांना २ वर्षांचा तुरुंगवास आणि १० हजार दंडाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. प्रथम वर्ग न्यायालयानं कोकाटे यांना ठोठावलेली शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयानं कायम ठेवली आहे. न्यायालयानं कोकाटे यांच्या अटकेचे आदेश काढलेले आहेत. दुसरीकडे कोकाटे यांची आमदारकी रद्द होण्याच्या दृष्टीनं हालचाली सुरु झाल्या आहेत. कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. कोकाटे सध्या मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत.

कोकाटे आजारी असल्यानं, त्यांच्यावर उपचार सुरु असल्यानं या प्रकरणी सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी विनंती कोकाटे यांच्या वकिलांकडून न्यायालयाला करण्यात आली होती. पण कायद्यापुढे सगळे समान आहेत, असं न्यायालयानं कोकाटे यांच्या वकिलांना सुनावलं. त्यामुळे कोकाटे यांना दिलासा मिळाला नाही. अटक टाळण्यासाठी कोकाटे यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. पण उच्च न्यायालयानं तातडीची सुनावणी घेण्यास नकार दिला. त्यामुळे कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

लोकप्रतिनिधी कायद्यानुसार, एखाद्याला २ किंवा त्याहून अधिक वर्षांची शिक्षा झाल्यास त्याचं पद रद्द होतं. त्यामुळे कोकाटे यांची आमदारकी रद्द होणं निश्चित मानलं जात आहे. न्यायालयाच्या निकालाची पत्र प्राप्त झाल्यावर विधिमंडळ यासंदर्भात निर्णय घेईल. अद्याप तरी विधिमंडळाला न्यायालयाच्या निकालाची पत्र मिळालेली नाही. माणिकराव त्यांच्या विधानांमुळे सातत्यानं वादात राहिले आहेत. सुरुवातीला त्यांच्याकडे कृषिमंत्रिपद देण्यात आलं होतं. पण त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे सरकारवर अनेकदा नामुष्की ओढवली. अखेर त्यांच्याकडून कृषी मंत्रिपद काढून घेण्यात आलं. त्याऐवजी क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली.

धनंजय मुंडे पुन्हा मंत्री होणार? मुंडेंनी घेतली अमित शहांची भेट

बीड — राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे कॅबिनेट मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अटकेचा निर्णय न्यायालयाने कायम ठेवल्याने त्यांचे मंत्रिपद जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हे सगळं सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचेच माजी मंत्री आणि आ.धनंजय मुंडे यांनी तात्काळ दिल्ली दौरा करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.ही भेट आणि भेटीचं टायमिंगबाबत सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. कोकाटे यांनी मंत्रिपद गमावल्यास त्याजागी आपली वर्णी लागावी यासाठी धनंजय मुंडेंनी अमित शाहांची भेट तर घेतली नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्त्ये प्रकरणानंतर धनंजय मुंडेंचा तडकाफडकी राजीनामा घेण्यात आला होता. सध्या धनंजय मुंडेंकडे कोणतंही मंत्रिपद नाही.आता अचानक कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात आलेलं असताना त्या जागी धनंजय मुंडेंची वर्णी लागणार का? अशी जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान माणिकराव कोकाटे हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे वरिष्ठ नेते असून, सध्या महायुती सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत. सुरुवातीला त्यांच्याकडे कृषी खातं होतं. मात्र, विधानसभेत मोबाइलवर रमी खेळत असल्याच्या वादातून त्यांना कृषी खातं गमवावं लागलं होतं. त्यानंतर त्यांना क्रीडा खातं देण्यात आलं होतं. दुसरीकडे त्यांच्यावर नाशिक जिल्ह्यातील सदनिका फसवणूक प्रकरणी कोर्टाने शिक्षा कायम ठेवली. त्यामुळे आता त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.नुकत्याच झालेल्या सुनावणीत न्यायालयाने अटकेचा निर्णय कायम ठेवला, ज्यामुळे कोकाटे यांचे मंत्रिपद धोक्यात आले आहे. राज्यघटनेनुसार, एखाद्या मंत्र्याला गंभीर गुन्ह्यात अटक झाल्यास त्याचे मंत्रिपद रद्द होतं. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांना कारवाई करावी लागते.
कोकाटे यांनी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल करण्याची तयारी सुरू केली असली तरी सध्या त्यांच्यावर दबाव वाढला आहे. पक्षांतर्गत सूत्रांनी सांगितले की, कोकाटे हे अजित पवार गटातील महत्त्वाचे नेते असून, त्यांच्या मंत्रिपदावरून पक्षाला धक्का बसू शकतो, अशी चर्चा आहे.
कोकाटेंची शिक्षा न्यायालयाने कायम ठेवलेली असताना त्याचवेळी धनंजय मुंडे यांनी दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतली. ही भेट कोकाटे प्रकरणाच्या नंतर लगेच झाल्याने कोकाटे यांचे मंत्रिपद गेले तर मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे यांनी साधलेल्या टायमिंगवर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांचा एल्गार;बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा

बीड — महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या एकतर्फी , अन्यायकारक निलंबन कारवाई , विभागातील प्रलंबित आर्थिक व सेवाविषयक मागण्या , तसेच नैसर्गिक आपत्ती व निवडणूक काळातील अतिरक्त कामकाज असूनही संरक्षण न मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर
महाराष्ट्र राज्य महसूल अधिकारी व कर्मचारी समन्वय महासंघ , जिल्हा शाखा बीड यांच्या वतीने शुक्रवार 19 डिसेंबर पासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे . जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना आज निवेदन देण्यात आले .
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत शासनाकडे आपली भूमिका ठामपणे मांडली . महसूल विभाग हा राज्य प्रशासनाचा कणा असून सामान्य जनतेशी थेट संपर्क असलेला विभाग आहे . मात्र अलिकडच्या काळात केवळ महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना च जबाबदार धरून निलंबन , फौजदारी कारवाई व चौकशीचे सत्र सुरू असल्याने विभागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे , अशी तीव्र भावना व्यक्त करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 नुसार बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन , वाहतूक व चोरी रोखण्याची जबाबदारी केवळ महसूल विभागाची नसून पोलीस व परिवहन विभागाचीही संयुक्त जबाबदारी आहे . मात्र प्रत्यक्षात कारवाई होताना सर्व दोष महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांवर टाकले जात आहेत . परिणामी न्यायालयीन निर्देश , नैसर्गिक न्यायाची तत्त्वे व प्रशासकीय नियम डावलून एकतर्फी निलंबने केली जात असल्याचा आरोप महासंघाने केला आहे. महासंघाने शासना समोर प्रमुख मागण्या मांडल्या आहेत . त्यामध्ये 12 व 13 डिसेंबर 2025 रोजी जाहीर करण्यात आलेल्या निलंबन आदेशांचा पुनर्विचार व रद्दबातल निर्णय , चौकशी पूर्ण होईपर्यंत पूर्ववत पदस्थापना , महसूल विभागातील नायब तहसीलदार , मंडळ अधिकारी , तलाठी , महसूल सहाय्यक यांच्या वेतनश्रेणी व ग्रेड पे सुधारणे , राज्यातील महसूल सेवक संवर्गाच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांना तातडीने मंजुरी देणे , तसेच निवडणूक व आपत्ती काळातील कामकाजासाठी संरक्षणात्मक धोरण राबविणे यांचा समावेश आहे

.कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता

महासंघाने स्पष्ट केले आहे की , मागण्या मान्य न झाल्यास 19 डिसेंबर 2025 पासून संपूर्ण महाराष्ट्रात महसूल विभागाचा बेमुदत कामबंद आंदोलनात सहभाग राहील . त्यामुळे जमीन नोंदणी , फेरफार , सातबारा , दाखले , आपत्ती मदत , पिक पाहणी आदी कामकाज ठप्प होण्याची शक्यता असून त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील , असा इशारा देण्यात आला आहे. महसूल अधिकारी व कर्मचारी यांनी संघर्ष नको तर संवाद हवा अशी भूमिका घेत शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून तातडीने तोडगा काढावा , अन्यथा आंदोलन अपरिहार्य असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे . शासनाने वेळीच सकारात्मक निर्णय घेतल्यास जनतेचे हित आणि प्रशासनाची विश्वासार्हता अबाधित राहील , अशी अपेक्षाही महासंघाने व्यक्त केली आहे . निवेदन देताना अप्पर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक , उपजिल्हाधिकारी मनोज घोडे , कविता जाधव , शिवकुमार स्वामी , प्रभोदय मुळे , शैलेश सूर्यवंशी , तहसीलदार चंद्रकांत शेळके , डी सी मेंडके , नरेंद्र कुलकर्णी , विनोद रणनवरे , विलास तरंगे , राकेश गिड्डे नायब तहसीलदार प्रशांत जाधवर व विविध संघटनेचे पदाधिकारी यात महादेव चौरे , पुरुषोत्तम आंधळे , अरविंद राऊत आदी उपस्थित होते.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात उच्च न्यायालयाने वाल्मीक कराडचा जामीन फेटाळला

छ.संभाजीनगर — संपूर्ण बीड जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या संतोष देशमुख खून खटल्यातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याला मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने मोठा धक्का देत जामीन अर्ज फेटाळून लावला, त्याला तुर्त दिलासा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. न्यायमूर्ती सुशील घोडेस्वार यांनी बुधवारी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
या प्रकरणातील सुनावणी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होती. शुक्रवारी ज्येष्ठ विधिज्ञ शिरीष गुप्ते यांनी कराडच्या वतीने तब्बल सहा तास प्रदीर्घ युक्तिवाद केला होता. त्यांनी पोलिसांच्या तपासावर आणि अटकेच्या कायदेशीर प्रक्रियेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र, मंगळवारी मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे आणि फिर्यादीचे वकील ॲड. नितीन गवारे यांनी सरकारची बाजू भक्कमपणे मांडली. त्यांनी पुराव्यांच्या आधारे आरोपीचे सर्व दावे खोडून काढले आणि ‘मकोका’ अंतर्गत झालेली कारवाई योग्य असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. बुधवारी झालेल्या सुनावणीत कराडच्या वकिलांनी 19 डिसेंबर रोजी होणाऱ्या दोष निश्चितीला स्थगिती देण्याची विनंती बीडच्या विशेष न्यायालयाला करावी, अशी मागणी केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने हे प्रकरण जामीन देण्या योग्य नसल्याचे निरीक्षण नोंदवले. न्यायालयाने कराडच्या वकिलांना विचारले की, “तुम्ही जामीन अर्ज मागे घेता की आम्ही आदेश पारित करू?” वकिलांनी आदेश देण्याची विनंती केल्यानंतर, न्यायालयाने वाल्मीक कराडचा जामीन अर्ज फेटाळला. या निकालानंतर आता बीडच्या विशेष न्यायालयात 19 डिसेंबर रोजी या प्रकरणातील दोष निश्चितीची प्रक्रिया पार पडणार असून, वाल्मीक कराडचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे.

गादीचा वाद पेटला! सासुरा मठात दोन महाराजांची एकमेकांना रट्टारट्टी; पोलिसांत तक्रारी

केज — तालुक्यातील प्रसिद्ध श्रीसंत एकनाथ महाराज संस्थान, सासुरा येथे गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला वाद आता वाढला आहे. मठाधिपती आणि त्यांच्याच माजी उत्तराधिकारी यांच्यातील संबंध इतके बिघडले आहेत की, दोघांनीही एकमेकांना रट्टे तर दिलेच पण पोलीसात धाव घेत परस्परांवर गंभीर मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे.
या प्रकरणात दोन्ही महाराजांनी एकमेकांविरुद्ध परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या असून, ‘मठाची गादी’ आणि ‘उत्तराधिकार’ यावरून हा वाद टोकाला पोहोचल्याची माहिती मिळत आहे.

केशव महाराजांचा आरोप : ‘गाडी फोडली, मारहाण केली!’

ह.भ.प. केशव महाराज गित्ते रा. नंदागौळ, परळी यांनी 15 डिसेंबर रोजी पोलिसांत तक्रार दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, काही महिन्यांपूर्वी त्यांना मठाधिपती ह.भ.प. रतन महाराज यांनी स्वतः उत्तराधिकारी म्हणून सासुरा येथे आणले होते. मात्र, नंतर त्यांना अचानक मठातून हाकलून देण्यात आले.केशव महाराज यांनी तक्रारीत म्हटले आहे की, आपल्याला का हाकलून दिले? याचा जाब विचारण्यासाठी केशव महाराज 14 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजता आपल्या गाडी क्र. एम एच- 44/एस- 4528 सासुरा येथे गेले होते. यावेळी त्यांना लक्ष्मण उगले आणि त्यांच्या साथीदारांनी अडवले. केशव महाराज यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली, शिवीगाळ झाली आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. लक्ष्मण उगले याने त्यांच्या गाडीच्या पुढील काचेवर दगड मारून ती फोडली. ह.भ.प. रतन महाराज, सुशन रामराव भोसले आणि लक्ष्मण उगले यांच्यापासून आपल्या जीविताला धोका असल्याचं तक्रार एक म्हटलं आहे

अंमली पदार्थांचे सेवन करून अपहरणाचा प्रयत्न मठाधिपती रतन महाराज

संत एकनाथ महाराज संस्थानचे मठाधिपती ह.भ.प. रतन महाराज यांनीही पलटवार करत पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे की, केशव महाराज गित्ते यांना उत्तराधिकारी म्हणून आणले होते, पण ते अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याने त्यांना मठातून हाकलून देण्यात आले.मठाधिपती रतन महाराजांनी तक्रारीत म्हटले आहे की, 14 डिसेंबर रोजी रात्री 9.30 वाजता केशव महाराज गित्ते आणि त्यांचा चुलत भाऊ कृष्णा गित्ते हे दोघे अंमली पदार्थांचे सेवन करून आश्रमात आले. त्यांनी रतन महाराज यांना ‘का हाकलून लावले?’ असे विचारून शिवीगाळ केली, मारहाण केली आणि ओढत आणले, तसेच गाडीत नेऊन अपहरण करण्याचा आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केला. रतन महाराज यांना मारहाण होत असताना किसनाबाई डोईफोडे यांनी आरडाओरडा केल्यामुळे बाळासाहेब उगले, बप्पा पाळवदे, दिगंबर उगले आणि सुहास उगले यांच्यासह इतर लोक जमा झाले. लोक जमा होताच केशव महाराज गित्ते पळून गेले. केशव महाराज गित्ते आणि कृष्णा गित्ते यांच्यापासून त्यांच्यासह इतर भक्तांच्या जीविताला धोका असल्याचं म्हटलं आहे
दरम्यान केज पोलीस ठाण्यात दोन्ही महाराजांनी दाखल केलेल्या तक्रारींवरून परस्परविरोधी अदखलपात्र स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक सोनवणे करत आहेत.