Home Blog Page 87

गोदावरी पात्रात पोलिसांचा छापा; चार ट्रॅक्टर सह 14 लाखाचा माल जप्त

बीडगोदावरी पात्रात म्हाळस पिंपळगाव येथे अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी मारलेल्या छाप्यात चार ट्रॅक्टर सह 14 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा केला जात आहे. म्हाळस पिंपळगांव येथे वाळू उपसा केला जात असल्याची माहिती गेवराई पोलिसांना मिळाली. गेवराई पोलिसांनी या ठिकाणी छापा मारताच चार ते पाच ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टरला पाठीमागील बाजूस केन्या लावून अवैध वाळू उपसा केला जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांची गाडी येत असल्याचे पाहताच तीन ट्रॅक्टर चालक यावेळी फरार झाले.तर आकाश भास्कर भिताडे वय 23 वर्षे, रा. गंगावाडी, ता. गेवराई जि. बीड या ट्रॅक्टर चालकास पकडण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी मारलेल्या या छाप्यात स्वराज कंपनीच्या चार ट्रॅक्टर केन्यासह असा 14 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. दरम्यान ही कारवाई पोलीस अधीक्षक नवीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उप विभागीय पोलीस अधीकारी अनिल कटके पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शना खाली सपोनि, सतीष कोटकर, पोउपनि प्रदीप आढाव, ग्रेडपोउपनि श्रीमंत उबाळे, जितेंद्र ओव्हाळ, गोरक्ष डोके यांनी केली.याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि प्रदिप सांळुके हे करीत आहेत.

ईव्हीएम मशीनवरील नावाच्या क्रमवारीत बदल; जि प निवडणुकीत अंमलबजावणी

मुंबई — राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने उमेदवारांच्या नावांच्या क्रमाबाबत नवीन नियमावली जाहीर केली आहे. नव्या गॅझेटनुसार, ईव्हीएम मशीनवर आता उमेदवारांची नावे त्यांच्या पक्षाच्या दर्जाप्रमाणे लावली जाणार आहेत. याची अंमलबजावणी येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकी मध्ये करण्यात येणार आहे.
या गॅझेटनुसार राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांच्या उमेदवारांना प्राधान्य मिळणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय पक्षाच्या नावाला प्रथम प्राधान्य मिळणार आहे. त्या खाली राज्यस्तरीय पक्षाच्या उमेदवाराचे नाव असणार आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत याची अंमलबजावणी केली जाणार आहे.यापूर्वी ईव्हीएमवर उमेदवारांची नावे त्यांच्या आडनावाच्या अद्याक्षराप्रमाणे लावली जात असत. यामुळे अनेकदा राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांची नावे खाली जात असत. आता नवीन निर्णयानुसार, सर्वात वर राष्ट्रीय पक्षांचे उमेदवार, त्यानंतर राज्यस्तरीय प्रादेशिक पक्षांचे उमेदवार आणि शेवटी अपक्ष उमेदवारांची नावे असतील. मतदारांना आपला उमेदवार शोधणे सोपे जावे, हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे.त्यामुळे ईव्हीएमवर पहिल्यांदा राष्ट्रीय पक्षांची नावे येणार आहेत. एक पेक्षा जास्त राष्ट्रीय पक्ष असल्यास त्यांच्या त्यांच्या उमेदवाराच्या आडनावा नुसार त्यांनी ईव्हीएमवर एक, दोन, तीन असा क्रमांक मिळणार आहे. त्यानंतर प्रादेशिक पक्षांना स्थान देण्यात येणार आहे. सर्वात शेवटी अपक्षांचे नाव असेल. त्यामुळे पुर्वी राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांचे नाव खाली जात होते. ते आता जाणार नाही. पहिल्या तीन मध्ये नक्की दिसणार आहे.

सर्वोच्च दिलासा: माणिकराव कोकाटेची आमदारकी वाचली

मुंबई — सदनिका घोटाळा प्रकरणात दोषी ठरलेल्या राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटेला सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. मुंबई हायकोर्टाच्या अंतरिम आदेशाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यामुळे कोकाटे यांची आमदारकी वाचली आहे.
सर्वोच्च न्यायालयाची नाताळ सुट्टी सुरू झाली असताना सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील विशेष खंडपीठासमोर आज तातडीच्या प्रकरणांवर सुनावणी होत आहे. त्यात कोकाटे यांच्या अर्जावरही होणारी सुनावणी झाली.
या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की ‘आमदार म्हणून अपात्र ठरणार नाहीत, एवढ्यापुरतेच आम्ही हायकोर्टाच्या आदेशाला तूर्तास स्थगिती देत आहोत. पण माणिकराव कोकाटे यांना कोणत्याही लाभाचे पद धारण करता येणार नाही’, असं सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशात स्पष्ट केलं आहे.
कोकाटे यांच्या अर्जावर प्रतिवादींना नोटीस जारी करून सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी तहकूब केली. ज्यांच्या तक्रारीवरून उपजिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांत एफआयआर नोंदवला, त्यांच्या वकिलांनी हस्तक्षेप करून कोकाटे यांना दिलासा मिळू नये, असा प्रयत्न केला. मात्र, ‘प्रथमदर्शनी कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयात मूलभूत चूक दिसत आहे. सविस्तर सुनावणीत सर्व बाबींचा कायदेशीर विचार केला जाईल’, असं स्पष्ट करून सरन्यायाधीश सूर्यकांत व न्यायमूर्ती जॉयमल्या बागची यांच्या खंडपीठाने कोकाटे यांना दिलासा दिला आहे.
नाशिक शहरातील उच्चभ्रू परिसरात माणिकराव कोकाटे यांनी 30 वर्षांपूर्वी कमी उत्पन्न दाखवत अल्प उत्पन्न गटातून सदनिका मिळवली होती. स्वत:सह भाऊ विजय कोकाटे, पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धने या चार जणांनी कॅनडा कॉर्नर भागात निर्माण व्ह्यू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठीच्या सदनिका प्राप्त केल्या होत्या. या प्रकरणी फेब्रुवारी 2025 मध्ये माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयानं दोषी ठरवलं होतं. यावर माणिकराव कोकाटे यांनी नाशिक सत्र न्यायालयात अपिल केलं होतं. सत्र न्यायालयानं शिक्षा कायम ठेवली. माणिकराव कोकाटे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर आज सर्वोच्च न्यायालय मणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे.

येणारा काळ लोकविश्वास आणि लोक विकासाचा – अमरसिंह पंडित

भीमकन्येच्या नेतृत्वात नव्या राजकारणाची घडी बसली

बीड — येणारा काळ लोकांनी व्यक्त केलेल्या विश्वासाचा आणि आम्ही दिलेले आश्वासन पूर्तीचा असणार आहे. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अजितदादा पवार या कडक शिस्तीच्या नेतृत्वात बीडचा कायापालट आपणाला करायचा आहे, यासाठी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी सज्ज रहावे अशा सूचना नवनिर्वाचितांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी दिल्या. भिमकन्येच्या नेतृत्वात नव्या राजकारणाची घडी यानिमित्ताने बसली असून येणाऱ्या काळात बीड तालुक्यात नव्या दमाच्या नेतृत्वांना संधी देण्याची भुमिका पक्ष घेत असल्याचे सुतोवाच अमरसिंह पंडित यांनी यावेळी व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षाच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रीमती प्रेमलता ताई पारवे आणि २१ नगरसेवकांचा सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. पक्षाच्यावतीने शिवछत्र येथे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न झाला.

बीड नगर परिषद निवडणुकीतील नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रीमती प्रेमलता ताई पारवे यांच्यासह २१ नगरसेवकांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या उपस्थित संपन्न झाला. यावेळी आ. विजयसिंह पंडित, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव आखाडे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिलदादा जगताप, सचिन मुळूक, शिवसंग्रामचे तालुकाध्यक्ष सुहास पाटील, माजी नगराध्यक्ष दिलीपराव गोरे, राजेंद्र राऊत, बळीराम गवते यांच्यासह नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रीमती प्रेमलता ताई पारवे, नवनिर्वाचित नगरसेवक फारुक पटेल, शेख निजाम, शेख मुजीब यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना अमरसिंह पंडित पुढे म्हणाले की, बीड शहरातील आजवरच्या राज्यकर्त्यांच्या अकार्यक्षम व्यवस्थेचा लोकांना विट आला होता, जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अजितदादा पवार यांनी बीड जिल्ह्याचा कायापालट करू हा विश्वास लोकांना दिला होता या विश्वासावरच बीड शहरातील नागरीकांनी या नव्या दमाच्या लोकांना निवडून दिले आहे. पिण्याचे पाणी, रस्ते आणि स्वच्छता या मुलभूत सुखसूविधा यापुढील काळात कमी पडू दिल्या जाणार नाहीत. निवडून आलेल्या नगरसेवकांच्या प्रभागात ज्या पध्दतीचे विकास कामे होतील त्याच पध्दतीची विकास कामे पराभूत नगरसेवकांच्या प्रभागातही केले जातील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

याप्रसंगी बोलताना अनिलदादा जगताप म्हणाले की, लोकांनी विश्वासाने आपल्याला निवडून दिलेले आहे. यापुढील काळात चांगल्या पध्दतीचे काम करून वचने पूर्ण करू असेही ते यावेळी म्हणाले. नियोजनबध्द प्रचार यंत्रणा राबविल्यामुळे आपल्याला हे घवघवीत यश मिळालेले आहे. अहंकारी व्यक्तिमत्वाला आपण त्यांची जागा दाखवून दिली असून बारामतीच्या धरतीवर बीड जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी आपण सर्व मिळून काम करू असे राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव आखाडे म्हणाले. आपल्या प्रास्ताविकपर भाषणात राष्ट्रवादीचे माध्यम प्रमुख भागवत तावरे म्हणाले की, बीड नगर परिषद निवडणुकीचा निकाल ही नव्या राजकारणाची नांदी आहे, शिवछत्र परिवाराच्या नेतृत्वावर लोकांनी टाकलेला विश्वास आपल्याला सार्थ करायचा आहे असेही ते यावेळी म्हणाले.

सामान्य लोकांच्या मतांचा आदर करत मुलभूत सुविधा आणि सुरक्षा देणार — आ.विजयसिंह पंडित

बीड नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाच्या महायुतीला बीडकरांनी आश्वासक आणि अपेक्षित प्रतिसाद दिला आहे. हा विजय पालकमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या विकासाभिमुख कारभार आणि राष्ट्रवादी आणि मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आहे. बीडकरांनी विकासाच्या भुमिकेवर विश्वास ठेऊन युतीला दिलेला हा जनाधार आहे. प्रचाराच्या दरम्यान सामान्य लोकांनी नागरी सुविधा संदर्भात विविध मागण्या केल्या. त्यावर आम्ही येणाऱ्या काळात काम करणार असून सामान्य लोकांच्या मतांचा आदर करत मुलभूत सुविधा आणि सुरक्षा आम्ही देऊ. मागील काळात लोकांना वेठीस धरण्याचे काम प्रस्थापितांकडून केले जात होते. नगर परिषदेच्या सत्तेच्या माध्यमातून लोकांची अडवणुक केली जात होती. त्याला आता पूर्णविराम मिळाला असून येणाऱ्या काळात लोकांची कसलीही अडवणुक यापुढे होणार नाही असा विश्वास आ. विजयसिंह पंडित यांनी व्यक्त केला. नगर परिषद निवडणुकीच्या विजयानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रीमती प्रेमलता ताई पारवे यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिलदादा जगताप, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव आखाडे, शिवसंग्रामचे तालुकाध्यक्ष सुहास पाटील, माजी नगराध्यक्ष दिलीपराव गोरे, राजेंद्र राऊत, बळीराम गवते यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

जवळगाव खून प्रकरणाचं गुढ उकललं; ज्याने सांभाळलं त्यानेच मारून टाकलं

बीड — अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव शिवारातील गायरान जमिनीत सापडलेल्या अनोळखी प्रेताचे गूढ उकलण्यात स्थानिक गुन्हे शाखेला दोन दिवसात यश आले.कौटुंबिक वाद आणि मृताच्या त्रासाला कंटाळून त्याच्याच वडिलांच्या सख्ख्या साडूने भाडोत्री मारेकऱ्यांच्या मदतीने हा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे.या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
बर्दापूर पोलीस ठाण्यांतर्गत जवळगाव शिवारात 18 डिसेंबर रोजी अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता या व्यक्तीचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचे पोस्टमार्टम रिपोर्ट वरून समोर आले. त्यानंतर अज्ञात लोकाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे फिरवली. एलसीबीने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मृत व्यक्तीची ओळख स्वप्निल ऊर्फ चिंगू अशोक ओव्हाळ वय 30 वर्ष,रा.रेणापूर, जि. लातूर अशी पटवली. तपासादरम्यान पोलिसांना संशय आल्याने त्यांनी स्वप्निलचा नातेवाईक गोरोबा मधुकर डावरे याला ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केली असता, खुनाचे धक्कादायक कारण समोर आले.स्वप्निल हा गोरोबा डावरे याच्या साडूचा मुलगा होता. साडू आणि साळपिण्याचे निधन झाल्यामुळे गोरोबाच स्वप्निलचा पालक म्हणून सांभाळ करत होता. स्वप्निलचे लग्नही गोरोबानेच लावून दिले होते. मात्र, स्वप्निलला दारूचे व्यसन होते. तो दारू पिऊन पत्नीला आणि गोरोबाला सतत त्रास द्यायचा. एकदा तर त्याने गोरोबाच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार केला होता.याच रागातून गोरोबाने स्वप्निलचा काटा काढण्याचे ठरवले.गोरोबाने लातूर आणि नांदेड येथील तीन साथीदारांच्या मदतीने स्वप्निलला रेणापूरहून जवळगाव येथे आणले. तिथे त्याला बेदम मारहाण करून गळा आवळून त्याची हत्या केली आणि मृतदेह शेतात फेकून दिला. या प्रकरणात पोलिसांनी गोरोबा मधुकर डावरे वय 45 वर्ष, रा. जवळगाव, ता. अंबाजोगाई, संतोष लिंबाजी मांदळे वय 34 वर्ष, रा. लातूर, किशोर गोरोबा सोनवणे वय 29 वर्ष, रा. लातूर, अमोल विनायक चव्हाण वय 26 वर्ष, रा. नांदेड या आरोपींना अटक केली आहे. दरम्यान ही कारवाई पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलिस अधीक्षक चेतना तिडके, पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांचे मार्गदर्शना खाली स पो नि ज्ञानेश्वर कांबळे, पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, पोलीस हवालदार मारुती कांबळे, रामचंद्र केकान, विष्णू सानप, गोविंद भताने पोलीस अंमलदार सचिन आंढळे, विकी सुरवसे, चालक अतुल हराळे यांनी केली.

परळीच्या माती, माणसांची बदनामी करणाऱ्यांना जनतेने उत्तर दिले – धनंजय मुंडे

नगराध्यक्ष पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी १५,६६४ मतांच्या लीडने विजयी

३५ पैकी २५ जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी, ६ अपक्ष, तर तुतारी गटास केवळ दोन जागा

परळी — नगर परिषदेच्या निवडणुकीत धनंजय मुंडे व पंकजाताई मुंडे या बहीण भावांनी मिळून महायुतीच्या माध्यमातून पुन्हा एकदा एकहाती विजय मिळवत, नगरपरिषदेसह मतदारसंघात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. महायुतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी या तब्बल 15 हजार 664 मतांनी विजयी झाल्या आहेत.

दरम्यान परळीतील 35 पैकी 25 जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आले असून सहा जागांवरती महायुतीतील बंडखोर असलेले सहा उमेदवार अपक्ष निवडून आले असून, या सहापैकी पाच उमेदवारांनी महायुतीच्या पॅनलला निकाला दिवशीच पाठिंबा दिला आहे; तर उर्वरित एक उमेदवार ही लवकरच पाठिंबा देणार असल्याचे कळते.

दुसरीकडे तुतारी गटाला केवळ दोन जागांवर विजय प्राप्त करता आला असून, पॅनल प्रमुख दीपक देशमुख यांचा वार्ड क्रमांक सहा मध्ये दारून पराभव झाला आहे.

दरम्यान धनंजय मुंडे यांनी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या यश:श्री निवासस्थानी जाऊन पंकजाताईंना शुभेच्छा देत विजयी जल्लोष साजरा केला.

परळीच्या जनतेने आम्हाला वेळोवेळी आशीर्वाद दिले, मात्र मागील काही दिवसांमध्ये परळीच्या मातीची आणि इथल्या माणसांची जी बदनामी राजकीय द्वेषातून केली जात होती, त्याला आज परळीच्या जनतेने मतांमधून उत्तर दिले असल्याचे वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केले आहे. तर पंकजाताई मुंडे यांनी देखील महाराष्ट्रातील क्वचितच घडलेला संपूर्ण महायुतीचा हा परळी येथील प्रयोग यशस्वी ठरला असून आगामी निवडणुकांमध्ये देखील परळी मतदारसंघात महायुती म्हणूनच आम्ही सामोरे जाऊ असे सूतोवाच करत सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.

खा. बजरंग सोनवणे यांचा परळीतील दीर्घ मुक्काम वाया

परळीत मुंडे बहीण भावाला टक्कर देऊन पराभव करून दाखवतो म्हणणारे तुतारी गटाचे सर्वच नेते तोंडघशी

परळी व्यतिरिक्त धनंजय मुंडे यांनी लक्ष घातलेल्या गंगाखेड नगर परिषद निवडणुकीत देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तथा मुंडेंच्या भगिनी सौ. उर्मिलाताई मधुसूदन केंद्रे विजयी

दीपक देशमुख यांचा प्रभाग क्रमांक ६ मधून ७०० पेक्षा अधिक मतांनी दारून पराभव

बीडमधील क्षीरसागरांची एकाधिकारशाही संपली; राष्ट्रवादीच्या प्रेमलता पारवे विजयी

बीड — नगरपालिकेच्या निवडणूक रणसंग्रामातून बीडकरांनी परिवर्तन घडवत क्षीरसागरांची एकाधिकारशाही संपवली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रेमलता पारवे 3 हजार 779 मतांनी नगराध्यक्षपदी निवडून आल्या आहेत. माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या हातातून गेवराई निसटली असली तरी बीडमध्ये धक्कादायक कामगिरी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये नगरपालिका निवडणुकीत आपलाच वर चष्मा असावा, नगरपालिका आपलीच मक्तेदारी असं समजून डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे तरी न प निवडणुकीत रंगत चढली गेली. संपलेल्या भाजपला संजीवनी मिळाल्यामुळे नगरसेवक पदाच्या 14 जागा मिळवता आल्या. त्यानंतर माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बीडमध्ये बळ देण्याचं काम केलं. परिवर्तनासाठी स्वतःची यंत्रणा कामाला लावली. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रेमलता पारवे यांनी सोशल इंजिनिअरिंग चा वापर करत नगराध्यक्षपदाच्या विजयाची माळ पदरात पाडून घेतली. त्यांना 35 हजार 812 मत पडली. मतमोजणीच्या जवळपास दहाव्या फेरीपर्यंत भाजपने चुरशीची लढत दिली. निकालाच्या शेवटच्या क्षणापर्यंत विजय कोणाचा होईल हे सांगणं अवघड झाल्यामुळे लोकसभेची पुनरावृत्ती बीडमध्ये पाहायला मिळाली.आ. संदीप क्षीरसागर यांनी निवडणुकीत शहर पिंजून काढलं असलं तरी यंत्रणा काही प्रमाणात कमी पडली. अति आत्मविश्वास पराभवाला कारणीभूत ठरला. एकंदरच बीडचा राजकीय इतिहास पाहिला तर क्षीरसागर घराण्याची विशेषतः डॉक्टर भारत भूषण क्षीरसागर यांच्या घराची एकाधिकारशाही नगरपालिकेमध्ये निर्माण झाली होती. ही एकाधिकारशाही मोडीत काढण्याचं काम या निवडणुकीत झालं. त्यांनीही जनतेला गृहीत धरून स्वर्गीय केशरबाई क्षीरसागर यांच्या सर्व धर्म समभावाच्या शिकवणीला तिलांजली दिली. त्यामुळे हक्काचा मतदार देखील दुरावला गेला. त्यामुळे परिवर्तन सहज शक्य झालं. 35 वर्षापासून सुरू असलेली मक्तेदारी मतदारांनी मोडीत काढल्याचं चित्र पाहायला मिळालं. भाजप उमेदवार डॉ. ज्योती घुमरे यांना 35 हजार 33 मत पडली तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या स्मिता वाघमारे यांना 25 हजार 440 मत पडली.
या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार — 18 ,भाजप — 14 राष्ट्रवादी शरद पवार – 11 शिवसेना ठाकरे गट – 01, शिवसेना शिंदे गट – 03,एमआयएम – 02 ,काँग्रेस – 01 असे नगरसेवक पदाचे उमेदवार निवडून आले आहेत

लिंबागणेश वाणीवस्तीवर बिबट्याचा हल्ल्यात  शेळी ठार, परिसरात भीतीचे वातावरण

लिंबागणेश.— तालुक्यातील लिंबागणेश येथील वाणीवस्ती परिसरात मध्यरात्री बिबट्याने घुसखोरी करत बाबुराव वाणी यांच्या गोठ्यातील एका शेळीवर हल्ला करून तिला ठार केल्याची घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण वाणीवस्ती तसेच आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

घटनेचा सविस्तर तपशील असा की, वाणीवस्ती येथील बाबुराव वाणी यांचे एकत्रित कुटुंब असून घरासमोर असलेल्या गोठ्यात गायी, म्हशी आणि शेळ्या बांधलेल्या होत्या. मध्यरात्री सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास गोठ्यात जनावरांची धडपड सुरू झाल्याने बाबुराव वाणी यांना जाग आली. त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता काही जनावर पळताना दिसले.

बॅटरीच्या प्रकाशात पाहणी करत असताना एका शेळीचा नरडा तोडलेला असून मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेले दिसले. याचवेळी बॅटरीच्या प्रकाशात समोरच बिबट्या उभा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. प्रकाश पडताच बिबट्या तात्काळ पळून गेला.

या घटनेनंतर वाणीवस्ती व परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याचा वावर असल्याच्या भीतीने अनेक ग्रामस्थांनी रात्र जागून काढली. लहान मुले, महिला व वृद्ध नागरिकांमध्ये विशेषतः भीती असून नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले आहे.

याबाबत प्रतिक्रिया देताना अयोध्या वाणी म्हणाल्या,“आम्ही शेतात राहतो. आमच्या अंगणात लहान मुले खेळत असतात. कुटुंबातील पुरुष कामानिमित्त बाहेर जातात. रात्री बिबट्याने शेळी ठार केल्यामुळे आम्हाला मोठी भीती वाटत आहे. वनविभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा.”

दरम्यान, वनविभागाने पिंजरे लावून तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी केली आहे. गेल्या आठवड्यात लिंबागणेश परिसरात बिबट्या आढळून आल्यामुळे डॉ. ढवळे यांच्या मागणीनुसार वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांसोबत बैठक घेऊन जनजागृती केली होती.

परिसरात ड्रोनद्वारे शोध मोहीम राबवावी, पिंजरे लावावेत, तसेच गस्त वाढवावी. नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये यासाठी वनविभागाने तातडीने योग्य ती कार्यवाही करून सुरक्षिततेची हमी द्यावी

डॉ . गणेश ढवळे लिंबागणेशकर 

सामाजिक कार्यकर्ते

भरधाव वाहनाच्या धडकेत तरुण पोलिस अंमलदाराचा अंत

आष्टी — अहिल्यानगर पोलीस दलात सेवा बजावणाऱ्या आष्टी तालुक्यातील चिंचाळ्यातील पोलीस अंमलदार सुदाम राजकुमार पोकळे वय 29 वर्ष यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला.                                 कर्जत तालुक्यातील राशीन येथे गुरुवारी रात्री गस्तीवर असताना ही दुर्दैवी घटना घडली.सुदाम पोकळे हे कर्जत पोलीस ठाण्यांतर्गत राशीन पोलीस चौकी येथे कार्यरत होते. गुरुवारी रात्री ते नेहमीप्रमाणे आपल्या सहकाऱ्यांसह गस्तीवर (पेट्रोलिंग) असताना, एका भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, सुदाम पोकळे यांचा जागीच मृत्यू झाला. कर्तव्य बजावत असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातल्याने पोलीस दलासह सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.सुदाम पोकळे यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या मूळ गावी चिंचाळा ता.आष्टी येथे शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी आणि मुलगा असा मोठा परिवार आहे.

विहिरीच्या पाण्यावरून दोन सख्ख्या भावांमध्ये रक्तरंजित राडा

केज — विहिरीच्या पाण्यावरून दोन सख्ख्या भावांमध्ये रक्तरंजीत राडा झाला.कुऱ्हाड, कत्ती, काठ्यांचा वापर मारहाणी साठी केल्यामुळे काही जण जखमी झाले. ही घटना केज तालुक्यातील येवता या ठिकाणी घडली याप्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.‌
केज तालुक्यातील येवता येथील मल्हारी लक्ष्मण सक्राते 53 वर्ष यांच्या फिर्यादीनुसार, बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ते शेतात असताना त्यांचा सख्खा भाऊ अशोक सक्राते आणि त्याच्या मुलांनी तेथे येऊन वाद घातला. “विहीर आमची आहे, मोटार चालू करू नकोस,” असे म्हणत त्यांनी शिवीगाळ केली. “आपण बारीने पाणी घेऊ” असे मल्हारी यांनी सुचवले असता, रागाच्या भरात अशोकने कुऱ्हाडीने मल्हारी यांच्या डोक्यात वार करून त्यांना गंभीर जखमी केले. या प्रकरणी अशोक सक्राते, प्रणव, समाधान आणि शिवकन्या या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे, दुसऱ्या गटाचे प्रणव अशोक सक्राते यांनीही फिर्याद दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ते विहिरीवर मोटार चालू करण्यास गेले असता त्यांचे चुलते मल्हारी सक्राते, दीपक, प्रवीण आणि शारदा सक्राते यांनी त्यांना अडवले. यावेळी झालेल्या वादात चुलते मल्हारी सक्राते यांनी धारदार कत्तीने प्रणवच्या हातावर वार करून त्याला जखमी केले, तर इतरांनी दगडाने मारहाण केली. या तक्रारीवरून मल्हारी सक्राते यांच्यासह
चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.