शेतकऱ्यांची “साई “च्या नावे नॅचरल लूट; पाचात पडून “गवतात” लोळायचं अन शेतकऱ्याचा “बळी” देऊन “राम” घालवायचा नवा धंदा?

बीड — कारखानदारीच्या धंद्यामध्ये आदर्श निर्माण करणाऱ्या स्व. अजित पवारांच्या पक्षाच्या एका नेत्याने नावाप्रमाणेच शेतकऱ्यांचा “बळी” देऊन त्याच्यातला “राम” घालवून श्रद्धेचा बाजार मांडला आहे. “पाचात पडून गवतात लोळायचं”अन् शेतकऱ्यांच्या हिताच्या गप्पा मारत साई मंदिराच्या देणगीच्या नावाखाली पाच पाच हजार रुपयाला लुटण्याचा नवा धंदा सुरू केला आहे.“बा”ने सोडलेल्या या “पूं“(गी)ने संचालक मंडळाची “दाभाडे” शिवली गेली आहेत.या विरोधात हिरापूरच्या साईप्रसाद नॅचरल शुगर प्रायव्हेट लिमिटेड विरोधात शेतकऱ्यांनी दंड थोपटले आहेत.


एकीकडे राष्ट्रवादाच्या गप्पा मारत शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचा आव आणायचा.त्यांच्याच नावाखाली नेते म्हणून मिरवत तुंबडी भरायची कारखाने उभे करून त्यांचाच “बळी” घेत त्यांच्यातला “राम“घालवण्यासाठी वेगवेगळे फंडे आजमावयाचे हे बीड जिल्ह्याला नवे नाही. शेतकरी हिताच्या नावाखाली हिरापूर येथे साईप्रसाद नॅचरल शुगर प्रायव्हेट लिमिटेड ने 2025 – 26 मध्ये एक लाख 90 हजार टन ऊस गाळप केला. कारखान्याने शेतकऱ्यांना 2600 रुपये प्रति टन भाव देऊन शेतकरी अक्षरशः लुटला. शासनाने 10.25 टक्के साखर उताऱ्यावर 3650 रुपये एफ आर पी ठरवली आहे. 9.5 इतका जरी साखर उतारा कमी धरला तरी 3383 रुपये भाव देणे अपेक्षित होतं. पण बीड जिल्ह्याच्या दुर्दैवाने हे कोणत्याच कारखान्याच्या बाबतीत केलं जात नाही. काट्यात केलेले पाप तर वेगळाच विषय तो तर शेतकऱ्यांनी हाताळलाच नाही. “ऊस कारखान्याला जातोय ना”एवढाच मतलब शेतकऱ्यांनी ठेवला. शेतकऱ्यांच्या या शोषणाची नुसती चर्चा सुरू आहे. पण खरा प्रश्न नव्याने निर्माण झाला आहे.

कारखान्याने श्रद्धेचा बाजार मांडला

साई “चा प्रसाद कारखान्याच्या संचालकांना पावला त्यातून कारखाना उभारला गेला. पण आता याच साई च्या मंदिर उभारणीच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या शोषणाचा नवा फंडा संचालक मंडळाने शोधून काढला. 200 हून अधिक ऊस वाहतूकदारांची पाच हजार रुपये याप्रमाणे देणगीच्या नावाखाली बेकायदेशीर वसुली केली गेली. विशेष म्हणजे कारखाना ही देवाच्या नावावर ज्या वित्त संस्थेतून हा व्यवहार केला गेला तो देखील गणेश मल्टीस्टेट को.आॅप सोसायटी यातूनच देणगीच्या पावत्या हवाली करण्यात आल्या. सगळा काळाबाजार करायचा तो देवाच्या नावावर अन् इकडे पुरोगामी असल्याचा डंका वाजवायचा हे दूटप्पी धोरण अवलंबिले जात आहे. बीड जिल्हा संत भूमी असल्यामुळे देवधर्माला मानणारा आहे. मागितलीच तर कोट्यावधी रुपयाची देणगी तो संस्थानांना देणारा आहे. शेतकरी गरीब असला तरी देवाच्या नावावर देणगी देण्याची दानत ठेवणारा आहे. पण इथे प्रश्न संचालक मंडळाने परस्पर केलेल्या शोषणाचा आहे.

कारखान्याच्या “बा” च्या “पूं ” गी ने संचालक मंडळाची दाभाडे शिवली

अबऽ ब ऽऽ”बा” कारखान्याच्या संचालकांनी देणगीची सोडलेली “पुं” गी सध्या समाज माध्यमावर चांगलीच वाजू लागली आहे. ऊस वाहतूकदारांनी अनेक वेळेला सामंजस्याची भूमिका घेत कारखाना प्रशासनाला पाच हजार रुपयाची केलेली कपात करू नये ती वापस द्यावी यासाठी विनंत्या केल्या पण शेतकऱ्याचा “बळी” देत त्याच्यातला “राम” घालवायचाच मग नव्या “पुं“गीच्या आवाजात वाहतूकदारांचा आक्रोश त्यांच्यापर्यंत कसा पोहोचणार?
शेतकरी क्रांती मोर्चा चे कुलदीप करपे यांनी या विरोधात आवाज उठवायला सुरुवात केली आहे. या संदर्भात लवकरच साखर आयुक्त पुणे, जिल्हाधिकारी बीड, प्रादेशिक साखर सहसंचालक, सहाय्यक धर्मादाय आयुक्त, न्यास नोंदणी कार्यालय येथे तक्रार करणारा असल्याचं शेतकरी नेते कुलदीप करपे यांनी “सह्याद्री माझा”शी बोलताना सांगितला आहे. शेतकऱ्यांनी साईप्रसाद कारखाने विरोधात दंड थोपटले असले तरी “महेशा” यासारखे ध्यानस्थ बसलेल्यांची “दाभाडे” मात्र सध्या तरी शिवली गेलेली आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles