चौसाळा — जिद्द चिकाटी परिश्रम याच्या जोरावर देखील ग्रामीण भागातील विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रात चमकदार कामगिरी करू शकतात हे हिंगणी बु. येथील विश्वजीत गोरे याने सिद्ध करून दाखवलं. इंग्लंडमधील किंग्ज कॉलेज लंडन येथे “मास्टर्स इन न्यूरो सायन्स”या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी त्याची निवड झाली आहे.
विश्वजीतने सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर हे यश मिळवले. आधुनिक विज्ञानातील संशोधनासाठी महत्त्वाच्या असलेल्या Neuroscience विषयात जगातील नामांकित विद्यापीठात उच्च शिक्षणाची संधी मिळणे ही त्याच्या शैक्षणिक गुणवत्तेची उल्लेखनीय कामगिरी मानली जात आहे.
विश्वजीत गोरे याच्या यशाबद्दल गोरे इंग्लिश स्कूलच्या संस्थापक व मुख्याध्यापिका अंजली गोरे, संचालक अॅड. चंद्रकांत गोरे शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही मेहनत, सातत्य आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षणाच्या संधी मिळवता येतात, हे विश्वजीतच्या यशाने अधोरेखित झाले आहे.
त्याच्या या कामगिरीमुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, संशोधन आणि जागतिक स्तरावरील करिअरच्या संधींसाठी प्रेरणा मिळणार आहे. विश्वजीतच्या पुढील शैक्षणिक आणि संशोधनाच्या वाटचालीसाठी चौसाळा परिसरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

