शेतात हंडा सापडल्याची थाप ;बनावट सोन्याची नाणी विकून 5 लाखांची फसवणूक

बीड — जिल्ह्यातील चकलांम्बा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतात सोन्याचा हंडा सापडल्याचे आमिष दाखवत खासगी वाहनचालकाची तब्बल 5 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. बनावट सोन्याची नाणी विकून आरोपीने पैसे उकळल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून फरार आरोपीचा शोध सुरू केला आहे.
फिर्यादी राजकुमार बापूराव कांबळे (वय 45) हे खासगी वाहनचालक असून, त्यांची 1 जानेवारी 2026 रोजी पुण्यात मिलिंद अर्जुन निकाळजे याच्याशी ओळख झाली होती. काही दिवसांनंतर आरोपीने कांबळे यांना फोन करून आपल्या शेतात सोन्याचा हंडा सापडल्याचा दावा केला.
विश्वास निर्माण करण्यासाठी आरोपीने 16 एप्रिल रोजी कांबळे यांना बीड जिल्ह्यातील मालेगाव येथे बोलावून एक सोन्याचे नाणे नमुना म्हणून दिले. संबंधित नाणे सराफाकडून तपासल्यानंतर ते खरे असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे कांबळे यांचा आरोपीवर पूर्ण विश्वास बसला.
यानंतर 19 मे 2026 रोजी कांबळे यांनी आरोपीला 5 लाख रुपये रोख देऊन 1,000 सोन्याची नाणी असल्याची पिशवी घेतली. मात्र उदगीर येथे सराफाकडून तपासणी केली असता, सर्व नाणी बनावट असल्याचे समोर आले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
फसवणूक उघड झाल्यानंतर कांबळे यांनी आरोपीकडे पैसे परत मागण्यासाठी त्याच्या गावी अनेकदा चकरा मारल्या. मात्र आरोपी मिलिंद निकाळजे हा फरार झाला. अखेर कांबळे यांनी चकलांम्बा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी नागरिकांना अशा प्रकारच्या सोन्याचा खजिना, सोन्याची नाणी किंवा पुरातन वस्तू स्वस्तात मिळण्याच्या आमिषांना बळी पडू नये तसेच कोणताही व्यवहार करण्यापूर्वी संबंधित वस्तूंची आणि व्यक्तीची खातरजमा करण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles