जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु
बीड — उधारीवर सामान न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका किराणा दुकानदारावर दारुड्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना बीड तालुक्यातील नागझरी येथे शुक्रवारी सांयकाळी घडली . मद्यधुंद अवस्थेत आलेल्या गुंडांनी वजन करण्याचे माप फेकून दिले. तसेच कत्तीने वार करून व दगडाने मारुन दुकानदाराला गंभीर जखमी केले.
नानासाहेब लक्ष्मण शिंदे (रा. नागझरी, ता. बीड) असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या किराणा दुकानदाराचे नाव आहे. नानासाहेब शिंदे यांचे नागझरी गावात किराणा दुकान आहे. शुक्रवारी सायंकाळी ते नेहमीप्रमाणे आपल्या दुकानात असताना गावातीलच दोन तरुण दारूच्या नशेत तर्र होऊन दुकानात आले. त्यांनी नानासाहेब यांच्याकडे उधारीवर सामानाची मागणी केली. मात्र, त्यांना उधारी देण्यास नानासाहेब यांनी नकार दिला.उधारी नाकारल्याचा या मद्यपींना प्रचंड राग आला. त्यांनी दुकानातच हुज्जत घालत नानासाहेब यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. रागाच्या भरात त्यांनी दुकानातील वजन करण्याचे माप फेकून दिले आणि नानासाहेब यांची गचांडी धरून त्यांना बेदम मारहाण केली. वाद एवढ्यावरच थांबला नाही, तर या मद्यपींनी आपल्या आणखी एकास घटनास्थळी बोलावून घेतले. त्यानंतर या तिघांनी मिळून नानासाहेब यांच्यावर दगड आणि कत्तीने (धारदार शस्त्र) सपासप वार केले. या अचानक झालेल्या हल्ल्यात नानासाहेब शिंदे गंभीर जखमी झाले. रक्ताळलेल्या अवस्थेत नानासाहेब यांना उपचारासाठी बीड येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत. शनिवारी दुपारपर्यंत नेकनूर पोलिसांनी रुग्णालयात जाऊन जखमी नानासाहेब शिंदे यांचा जबाब नोंदवला नव्हता. या घटनेमुळे नागरझारी परिसरात व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अशा गावगुंडांवर पोलिसांचा वचक राहिला आहे की नाही, असा संतप्त सवाल आता सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जात आहे. आरोपींना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.




