Home Blog Page 47

डोळे उघडा, बघा नीट; फसव्या रेकॉर्डचा बीडकरांना  वीट ! ९० टक्के निपटारा दाव्यावर प्रश्नचिन्ह

0

बीड —  न्यायासाठी उपोषणार्थी आणि आंदोलनकर्त्यांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वर्षभर रेलचेल सुरू असताना, दुसरीकडे ९० टक्के अर्जांचा विहित कालावधीत निपटारा झाल्याबद्दल मिळणारे पुरस्कार हे वास्तवाशी विसंगत असल्याची तीव्र प्रतिक्रिया डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी व्यक्त केली आहे. “आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय” या म्हणीचा प्रत्यय बीडकरांना येत असल्याचा आरोप त्यांनी केला.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ हा २८ एप्रिल २०१५ पासून राज्यात लागू करण्यात आला. या कायद्याचा मुख्य उद्देश म्हणजे नागरिकांना शासनाच्या विविध विभागांकडून मिळणाऱ्या सेवा पारदर्शक, जलद आणि ठरलेल्या कालमर्यादेत उपलब्ध करून देणे हा आहे. या अंतर्गत आतापर्यंत ४८६ पेक्षा अधिक सेवा अधिसूचित करण्यात आल्या आहेत.

या कायद्यानुसार अर्ज केल्यानंतर ठराविक वेळेत सेवा मिळणे हा नागरिकांचा हक्क आहे. विलंब झाल्यास किंवा सेवा नाकारल्यास प्रथम व द्वितीय अपील करण्याची तरतूद आहे. महसूल विभागातील उत्पन्न, अधिवास, वय, राष्ट्रीयत्व, जात प्रमाणपत्र, सातबारा उतारा; पोलिस विभागातील चारित्र्य प्रमाणपत्र व परवाना सेवा; अन्न व नागरी पुरवठा विभागातील रेशनकार्ड; तसेच शिक्षण विभागातील शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व शिष्यवृत्ती सेवा अशा विविध सेवांचा यात समावेश आहे.

मात्र प्रत्यक्षात नागरिकांना सेवा मिळविताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप करत, दाखविण्यात येणारे ‘रेकॉर्ड’ आणि वास्तव यामध्ये मोठी दरी असल्याचे ढवळे यांनी नमूद केले. नागरिकांच्या तक्रारींचा प्रामाणिक निपटारा करूनच प्रशासनाने पुरस्कारांचा दावा करावा, अशी मागणीही त्यांनी केल

परळीतील  तीनही ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत आ. धनंजय मुंडेंचे एकहाती वर्चस्व!

0

सिरसाळा पुन्हा ताब्यात, तर जळगव्हाण आणि मरळवाडी सहज राखली

परळी — महाराष्ट्रातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले असून परळी तालुक्यातील तीनही ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या उमेदवारांनी एकहाती विजय मिळवत तीनही ग्रामपंचायती वरती धनंजय मुंडे यांचे एकेरी वर्चस्व सिद्ध केले आहे.

या पोटनिवडणुकीत परळी तालुक्यातील सिरसाळा या मोठ्या व मानाच्या समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत शेख नसीब यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला असून विजयानंतर त्यांनी सहकाऱ्यांच्या समवेत आ. धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयात जाऊन स्व. पंडित अण्णा मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जल्लोष केला. यावेळी सिरसाळा ग्रामपंचायत नवनिर्वाचित सरपंच शेख नसीब शेख रहीम, माजी सरपंच फिरोज पठाण, ग्रामपंचायत सदस्य शेख नय्युम, शेख रफिक, अक्रम पठाण, सलमान पठाण, माजी सरपंच इम्रान पठाण, उपसरपंच सुलतान पठाण, मोहम्मद इनामदार, गुड्डू पठाण, मुस्लिम संघाचे जिल्हाध्यक्ष शिराज देशमुख, सिरसाळा सेवा सहकारी सोसायटी चेअरमन नदीम भाई, जावेद पत्रकार, अशोक गलांडे, तंटामुक्त अध्यक्ष गाव समिती सिरसाळा अयोसोद्दीन इनामदार, विद्यार्थी आघाडी बीड जिल्हा अध्यक्ष शेख राजू, इरफान बॉस, रफिक बागवान आदी उपस्थित होते.

त्याचबरोबर जळगव्हाण येथील नवनिर्वाचित सरपंच संदीप वसंतराव चव्हाण यांसह राजाभाऊ सपकाळ, सुभाष जाधव, अमोल जाधव, उद्धवराव जाधव, कैलास क्षीरसागर, प्रल्हाद पंडित, शिवाजी राठोड, लक्ष्मण चव्हाण, प्रकाश चव्हाण, रामजी चव्हाण, लक्ष्मण राठोड, विश्वनाथ आडे, उद्धव सोळंके यांसह आदी उपस्थित होते.

मरळवाडी चे मयत सरपंच बापू आंधळे यांच्या पत्नी व नवनिर्वाचित सरपंच श्रीमती दीपाली बापुराव आंधळे यांच्या सह उपसरपंच वाल्मीक आघाव, चेअरमन हनुमान आंधळे, त्र्यंबक फड, विष्णू आंधळे, बाळासाहेब फड, संतराम आंधळे, परमेश्वर फड, बापुराव फड, अश्रूबा आघाव, तुकाराम व्हावळे, शिवाजी फड यांसह पदाधिकारी आदींनी जगमित्र कार्यालयात उपस्थित राहून विजयाचा जल्लोष साजरा केला.

बीडमध्ये मोबाईल दुकान फोडून लाखोंची चोरी; सराईत गुन्हेगार ठाणेतून अटक

0

बीड — शहरातील सुभाष रोड परिसरात असलेल्या श्री साई मोबाईल शॉपी येथे 19 एप्रिल रोजी पहाटे अज्ञात चोरट्याने सेंटर लॉक व शटरचे कोंडे तोडून दुकानात प्रवेश करत विविध कंपनीचे महागडे मोबाईल फोन चोरी केल्याची घटना उघडकीस आली होती.
या प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 84/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 305 (ए), 331 (4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सीसीटीव्ही ( CCTV )आणि तांत्रिक विश्लेषणातून आरोपीचा शोध

स्थानिक गुन्हे शाखा बीड यांनी घटनास्थळावरील CCTV फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे गुप्त माहिती मिळवली. त्यानुसार हा गुन्हा कल्याण येथील सराईत गुन्हेगार रामनिवास मंजु गुप्ता (वय 37) याने केल्याचे समोर आले.

 50 पेक्षा जास्त गुन्ह्यांचा इतिहास

तपासादरम्यान आरोपीविरुद्ध महाराष्ट्र आणि गुजरातमधील विविध पोलीस ठाण्यांमध्ये 50 हून अधिक गुन्हे दाखल असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी विशेष पथक तयार करून आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले.

ठाणे, मुंबई, गोवा, गुजरातमध्ये शोधमोहीम

स्थानिक गुन्हे शाखेच्या  पथकाने ठाणे, मुंबई, गोवा आणि गुजरात येथे शोधमोहीम राबवली. अखेर आरोपी ठाणे जिल्ह्यातील दिवा पूर्व येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले.

चोरीची कबुली, इतर गुन्ह्यांचाही खुलासा

चौकशीदरम्यान आरोपीने बीडमधील साई मोबाईल शॉपी मध्ये केलेल्या चोरीची कबुली दिली असून चोरी केलेले मोबाईल फोन इतर व्यक्तीकडे दिल्याचे सांगितले. पुढील तपासात त्याने अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील जिओमार्ट डिजिटल आणि मधु वाईन, तसेच पुणे ग्रामीण जिल्ह्यातील शिरूर येथील एस.एस. मोबाईल शॉपी येथेही चोरी केल्याचे उघड झाले आहे.

 पुढील तपास सुरू

सदर गुन्ह्याचा पुढील तपास बीड शहर पोलीस करत असून आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 एलसीबी  पथकाची कामगिरी

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत आणि अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी बंटेवाड, उपनिरीक्षक सुशांत सुतळे ,पो.ह. सोमनाथ गायकवाड, मारूती कांबळे, अर्जुन यादव, बाळु सानप, मनोज परजणे, अशफाक सय्यद, विकी सुरवसे व चालक अतुळ हराळे, सिध्देश्वर मांजरे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

मस्साजोग पोटनिवडणूक : संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख पराभूत, गावकऱ्यांचा विकासाला कौल

0

बीड — मस्साजोग ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा निकाल धक्कादायक लागला असून मयत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा स्वरूपानंद देशमुख यांनी 92 मतांनी पराभव केला आहे.

जिल्ह्यातील मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत अत्यंत लक्षवेधी आणि धक्कादायक निकाल समोर आला आहे. या निवडणुकीत स्वरूपानंद देशमुख यांनी मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी आश्विनी देशमुख यांचा पराभव करत मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे.

या निवडणुकीकडे बीड सह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे रिक्त झालेल्या सरपंचपदासाठी ही पोटनिवडणूक घेण्यात आली होती. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांकडून ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र गावकऱ्यांना विश्वासात न घेतल्याचा आरोप करत स्वरूपानंद देशमुख यांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली.
प्रचारादरम्यान दोन वेगवेगळे मुद्दे समोर आले.
आश्विनी देशमुख यांनी भावनिक मुद्द्यावर, संतोष देशमुख यांचे विकासाचे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या नावावर मते मागितली तर स्वरूपानंद देशमुख यांनी गावाच्या विकासाचा मुद्दा पुढे केला अखेर गावकऱ्यांनी विकासाच्या मुद्द्याला प्राधान्य देत स्वरूपानंद देशमुख यांच्या बाजूने कौल दिला. ते तब्बल ९२ मतांनी विजयी झाले.
विशेष म्हणजे, मागील निवडणुकीत स्वरूपानंद देशमुख यांचा संतोष देशमुख यांनी केवळ ९ मतांनी पराभव केला होता. मात्र यावेळी त्यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवत राजकीय समीकरणे बदलली आहेत.

विधानपरिषदेसाठी भाजपाकडून ५ उमेदवारांची यादी जाहीर

0

मुंबई — महाराष्ट्रातील राजकीय वातावरण विधानपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीने तापले आहे.महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू असतानाच, भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने मंगळवारी पाच नावांवर शिक्कामोर्तब केले, ज्यात संघटन कौशल्याला प्राधान्य देत आगामी विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी स्पष्टपणे दिसून येत आहे. या यादीमध्ये सुनील विनायक कर्जतकर, माधवी नाईक, संजय नथ्थूजी भेंडे, विवेक बिपिनदादा कोल्हे आणि प्रमोद शांताराम जठार यांना संधी देण्यात आली आहे.

​या निवडीमध्ये भाजपाने घराणेशाहीला बाजूला सारून पक्षाच्या मूळ विचारधारेसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना बळ दिल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. विशेषतः विवेक कोल्हे यांच्या रूपाने नगर जिल्ह्यातील तरुणाईला साद घालण्याचा, तर प्रमोद जठार यांच्या माध्यमातून कोकणात शिवसेनेच्या वर्चस्वाला आव्हान देण्याचा पक्षाचा स्पष्ट इरादा दिसत आहे. सुनील कर्जतकर आणि संजय भेंडे यांसारख्या पडद्यामागील रणनीतीकारांना थेट सभागृहात पाठवून भाजपाने शिस्तबद्ध कार्यकर्त्यांना मोठा संदेश दिला आहे. तसेच माधवी नाईक यांच्या उमेदवारीतून महिला नेतृत्वाला संधी देत पक्षाने सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे.

​महायुतीमधील जागावाटपाचा पेच अद्याप पूर्णपणे सुटलेला नसताना, भाजपाने दिल्लीतून आपल्या हक्काच्या पाच उमेदवारांची घोषणा करून मित्रपक्षांनाही आपली ताकद दाखवून दिली आहे. राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांच्या स्वाक्षरीने निघालेल्या या पत्रकाने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली असून, अनेक प्रस्थापितांची पत्ता कट झाल्याने पक्षांतर्गत चर्चांना उधाण आले आहे. ही यादी जाहीर झाल्यानंतर आता विरोधकांकडून कोणती चाल खेळली जाते आणि महायुतीतील जागांचे अंतिम समीकरण कसे जुळते, यावर राज्याचे राजकीय भवितव्य अवलंबून राहणार आहे.

महाराष्ट्रात टीबीचा स्फोट? ११ हजार गावांमध्ये धोक्याची घंटा

0

मुंबई — महाराष्ट्रात वाढत्या तापमानासोबतच क्षयरोग (टीबी) पुन्हा एकदा गंभीर संकट बनताना दिसत आहे. केंद्र सरकारच्या १०० दिवसांच्या विशेष टीबी निर्मूलन मोहिमेत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. राज्यातील तब्बल ११,०९१ गावे ‘हाय रिस्क’ श्रेणीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
विशेष म्हणजे, मोहिमेच्या अवघ्या पहिल्या ३५ दिवसांतच ६,१११ नवीन टीबी रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. नांदेड मधील ४०४,अहिल्यानगर मधील ४०१, बीड मधील ३४४ तर छत्रपती संभाजी नगर मधील ३३९ गावांचा यामध्ये समावेश आहे.

एआय (AI) तंत्रज्ञानाने शोधली ‘हाय रिस्क’ गावे

केंद्र सरकारने २०२५ पर्यंत भारत टीबीमुक्त करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या मोहिमेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स ( Artificial Intelligence (AI)) आधारित  व्हीएमटीबी टूल्स (VMTB Tool’) चा वापर करून गावे ओळखण्यात आली.
गावे निवडताना कुपोषणाचे प्रमाण,लसीकरण स्थिती,भौगोलिक परिस्थिती,तंबाखू व जीवनशैली सवयी या निकषांचा वापर करण्यात आला.
यामध्ये यवतमाळ (५३९ गावे) आणि अमरावती (५०४ गावे) हे जिल्हे सर्वाधिक धोक्यात असल्याचे दिसून आले.

राज्यभर मोठी तपासणी मोहीम

आरोग्य विभागाने आता राज्यभरात दीड कोटी नागरिकांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. १४ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाची तपासणी, कुपोषण व मधुमेह असलेल्या भागांवर विशेष लक्ष, तंबाखू सेवन जास्त असलेल्या गावांमध्ये फोकस करण्यात येणार आहे.

हाय रिस्क’ जिल्ह्यांची यादी सर्वाधिक धोक्यातील जिल्हे

यवतमाळ – ५३९ गावे
अमरावती – ५०४
नाशिक – ४८८
रायगड – ४८८
नागपूर – ४८२
पुणे – ४७९
इतर प्रमुख जिल्हे:
चंद्रपूर – ४६७
सातारा – ४४२
गडचिरोली – ४३३
नांदेड – ४०४
अहिल्यानगर – ४०१
बीड – ३४४
छ. संभाजीनगर – ३३९
आणखी जिल्हे:
सोलापूर – २९१
जालना – २४२
लातूर – २३८
परभणी – २१२
सांगली – १८४
धुळे – १७१

का वाढतोय टीबीचा धोका?

तज्ज्ञांच्या मते पुढील कारणांमुळे टीबीचा प्रसार वाढतोय कुपोषण आणि कमजोर रोगप्रतिकारक शक्ती,मधुमेह व इतर दीर्घकालीन आजार,तंबाखू व धूम्रपान,गर्दीची राहणीमान व्यवस्था यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रात टीबीचा वाढता धोका लक्षात घेता लवकर निदान आणि उपचार हीच सर्वात मोठी गरज आहे. प्रशासनाने सुरू केलेली मोहीम महत्त्वाची असली तरी नागरिकांनीही वेळेवर तपासणी करून सहकार्य करणे अत्यावश्यक आहे.

लॉकअपमध्ये आरोपीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांवर मारहाणीचे आरोप, चौकशीची मागणी

0

बीड — केज पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत अटक केलेल्या तरुणाचा जिल्हा रुग्णालयातील लॉकअपमध्ये संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात येत आहेत.
मृत तरुणाचे नाव आशिष अशोक धिवार (वय २७, रा. काळेगाव घाट, ता. केज) असे आहे. पोक्सो प्रकरणात अटक केल्यानंतर सुरुवातीला त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयीन कोठडी मिळाल्याने त्याची रवानगी बीड जिल्हा कारागृहात करण्यात आली होती.

दरम्यान, काल सोमवारी सायंकाळी त्याची प्रकृती अचानक खालावल्याने त्याला जिल्हा रुग्णालयातील लॉकअप वॉर्डात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रात्री उशिरा त्याचे नातेवाईकही भेटून गेले होते. मात्र आज सकाळी सुमारे ८.१५ वाजता त्याचा लॉकअपमध्येच मृत्यू झाला, अशी माहिती समोर आली आहे.

 नातेवाईकांचा आरोप: पोलिसांकडून अमानुष मारहाण

या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांसह विविध संघटनांचे पदाधिकारी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले.डीपीआयचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदणे यांनी संताप व्यक्त करत गंभीर आरोप केले आहेत.दरम्यान पोलीस कोठडीत आशिषला अमानुष मारहाण करण्यात आली.घरातून पोलीस ठाण्यात आणतानाही मारहाण केली गेली
उपचारादरम्यान योग्य वैद्यकीय सेवा मिळाली नाही असा आरोप मृताच्या कुटुंबीयांकडून करण्यात येत असल्याचे चांदणे यांनी सांगितले.

रुग्णालय प्रशासनावरही प्रश्नचिन्ह

अजिंक्य चांदणे यांनी शल्यचिकित्सक डॉ. सतिशकुमार सोळंके यांची भेट घेऊन लेखी निवेदन दिले. त्यांनी लॉकअपमध्ये योग्य उपचार मिळाले का?,डॉक्टर व नर्स यांचे वर्तन संशयास्पद का होते?लॉकअप परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद का होते?
या सर्व बाबींची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

जोपर्यंत या प्रकरणातील दोषींवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी ठाम भूमिका नातेवाईक व संघटनांनी घेतली आहे. त्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण बनली असून, प्रशासनावर दबाव वाढला आहे.

बालविवाहावर पोलिसांची मोठी ॲक्शन! एका दिवसात दोन ठिकाणी कारवाई, 3 गुन्हे दाखल

0

बीड — जिल्ह्यात बालविवाहाच्या घटनांवर पोलिसांनी मोठी कारवाई करत एका दिवसात दोन ठिकाणी छापे टाकून बालविवाह थांबवला असून, एकूण तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष (AHTU) च्या पथकाने ही धडक कारवाई केली.

 दहीफळ येथे १५ वर्षीय मुलीचा बालविवाह रोखला

२६ एप्रिल रोजी सकाळी पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांना गुप्त माहिती मिळाली की, दहीफळ (ता. जि. बीड) येथे १५ वर्षीय मुलीचा बालविवाह होणार आहे. पोलिसांना माहिती मिळाली त्यानुसार AHTU पथकाने घटनास्थळी पोहोचून सापळा रचला. महिला पोलिसांनी वेषांतर करून मुलीला ताब्यात घेतले, तर पुरुष पोलिसांनी नवरदेवाला पकडले.
चौकशीत मुलीने सांगितले की, तिचा विवाह इरफान बेग अन्सार बेग (वय २४, रा. माळपुरी) याच्याशी झाला आहे.
या प्रकरणात मुलगी, तिचे आई-वडील,नवरदेव व त्याचे आई-वडील,इतर नातेवाईक
यांना ताब्यात घेण्यात आले.

 १० आरोपींवर गुन्हा दाखल

बालविवाह प्रतिबंधक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ अंतर्गत १० आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबरोबरच १५ ते २० वऱ्हाडी मंडळींचाही आरोपीमध्ये समावेश करण्यात आला आहे.पीडित मुलीला संरक्षणासाठी बालकल्याण समिती, बीड समोर हजर करण्याचे आदेश देण्यात आले.

जोला (ता. केज) येथे दुसरी कारवाई

केज तालुक्यातील जोला  येथेही  बालविवाहाची माहिती मिळाल्यानंतर आज दुपारी कारवाई करण्यात आली.मुलगी व तिच्या पालकांना यावेळी ताब्यात घेतले नवरदेव श्रीकांत जाधव व त्याच्या कुटुंबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोनगाव येथील आधीची कारवाई

१८ एप्रिल २०२६ रोजी सोनगाव (ता. जि. बीड) येथे १५ वर्षीय मुलीचा बालविवाह उघड झाला आहे. या बालविवाहात सामील झालेल्या संबंधित सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चार महिन्यांत ७ गुन्हे

AHTU बीड पथकाने एका आठवड्यात ३ गुन्हे दाखल केले तर मागील ४ महिन्यांत एकूण ७ बालविवाह प्रकरणे उघडकीस आणण्यात यश मिळवले‌
दरम्यान ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत,अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर
PSI पल्लवी जाधव तसेच AHTU पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

जनतेसाठी आवाहन

पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की:  बालविवाह हा कायद्याने गुन्हा आहे
अशी माहिती मिळाल्यास त्वरित पोलिसांना कळवावे

आ.संदिप क्षीरसागरांनी घेतला विविध विभागांचा आढावा

0

मतदारसंघातील महत्वाचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या केल्या संबंधितांना सुचना

बीड —  बीड विधानसभा मतदारसंघातील विविध महत्वाच्या प्रश्नांच्या अनुषंगाने आ.संदिप क्षीरसागर यांनी वेगवेळ्या शासकीय विभागांची सोमवारी (दि.27) रोजी आढावा बैठका घेतल्या. यामध्ये संबंधित विभागांशी निगडीत असलेले नागरिक, शेतकरी यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सुचना संबंधित अधिका·यांना केल्या.
सोमवार (दि.27) रोजी शासकीय विश्रामगृह बीड येथे बीड पंचायत समिती, शिरूर कासार पंचायत समिती, जलसंधारण विभाग, जलसंपदा विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या विभागांचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न, शेतक·यांचे प्रश्न, विकास कामांचा आढावा या बाबत चर्चा करण्यात आली. यावेळी आ.संदिप क्षीरसागर, माजी आ.सय्यद सलीम यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी आणि सामान्य नागरिक उपस्थित होते.

पुल कम बंधा·याच्या कामासाठी महामार्ग प्राधिकरण, जलसंपदा, जलसंधारण विभागांची संयुक्त बैठक

बीड शहरातील बार्शी नाका येथे सुरू असलेल्या पुल कम बंधारा कामाच्या अनुषंगाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जलसंपदा विभाग आणि जलसंधारण विभाग या तीन विभागांची संयुक्त बैठक झाली. पुढिल येत्या काळात पाणी टंचाई होऊ नये यासाठी लवकरात लवकर पुल कम बंधा·याचे काम पुर्ण होऊन पाणी अडविण्या बाबतच्या नियोजना संदर्भात यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. येत्या पावसाळ्यातच या ठिकाणी पाणी अडवून बीड शहर आणि परिसरातील गावांची पाणी पातळी वाढविण्याच्या अनुषंगाने ही बैठक महत्वपुर्ण ठरली आहे.

महावितरणचा मोठा निर्णय! आता वीजपुरवठा सकाळी 7 ते 11 राहणार बंद

0

मुंबई — उन्हाच्या तीव्र तडाख्यात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी महावितरण (MSEDCL) कडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता वीज यंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीची पूर्वनियोजित कामे फक्त सकाळी 7 ते 11 वाजेदरम्यानच करण्यात येणार असून, या वेळेतच वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे.

 आधी काय स्थिती होती?

यापूर्वी देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी सकाळी 10 ते दुपारी 2 किंवा 4 वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद ठेवला जात होता. त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन कामांवर मोठा परिणाम होत होता आणि गैरसोयीच्या तक्रारी वाढल्या होत्या.

🌞 उन्हाळा व पावसाळ्याची तयारी

उन्हाळ्यात विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. तसेच पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी महावितरणकडून आधीच देखभाल-दुरुस्तीची कामे केली जातात. ही कामे साधारणतः मे महिन्याच्या अखेरीस पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले जाते.

असे आहेत नवीन निर्देश 

महावितरण मुख्यालयाकडून क्षेत्रीय कार्यालयांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत: देखभाल व दुरुस्तीची कामे फक्त सकाळी 7 ते 11 या वेळेत करावीत नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी वेळेत बदल. ग्राहकांना SMS द्वारे पूर्वसूचना देणे बंधनकारक, प्रसारमाध्यमांद्वारे माहिती देणे, शक्य असल्यास पर्यायी वीजपुरवठा उपलब्ध करून देणे.

असा होणार फायदा

दुपारच्या उकाड्यात वीज खंडित होणार नाही,दैनंदिन कामांमध्ये अडथळा कमी,नियोजित वीजपुरवठा बंदची आधीच माहिती मिळणार