बीड — शहरातील सुभाष रोड परिसरात असलेल्या श्री साई मोबाईल शॉपी येथे 19 एप्रिल रोजी पहाटे अज्ञात चोरट्याने सेंटर लॉक व शटरचे कोंडे तोडून दुकानात प्रवेश करत विविध कंपनीचे महागडे मोबाईल फोन चोरी केल्याची घटना उघडकीस आली होती.
या प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 84/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 305 (ए), 331 (4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सीसीटीव्ही ( CCTV )आणि तांत्रिक विश्लेषणातून आरोपीचा शोध
स्थानिक गुन्हे शाखा बीड यांनी घटनास्थळावरील CCTV फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे गुप्त माहिती मिळवली. त्यानुसार हा गुन्हा कल्याण येथील सराईत गुन्हेगार रामनिवास मंजु गुप्ता (वय 37) याने केल्याचे समोर आले.

50 पेक्षा जास्त गुन्ह्यांचा इतिहास
तपासादरम्यान आरोपीविरुद्ध महाराष्ट्र आणि गुजरातमधील विविध पोलीस ठाण्यांमध्ये 50 हून अधिक गुन्हे दाखल असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी विशेष पथक तयार करून आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले.
ठाणे, मुंबई, गोवा, गुजरातमध्ये शोधमोहीम
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ठाणे, मुंबई, गोवा आणि गुजरात येथे शोधमोहीम राबवली. अखेर आरोपी ठाणे जिल्ह्यातील दिवा पूर्व येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले.
चोरीची कबुली, इतर गुन्ह्यांचाही खुलासा
चौकशीदरम्यान आरोपीने बीडमधील साई मोबाईल शॉपी मध्ये केलेल्या चोरीची कबुली दिली असून चोरी केलेले मोबाईल फोन इतर व्यक्तीकडे दिल्याचे सांगितले. पुढील तपासात त्याने अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील जिओमार्ट डिजिटल आणि मधु वाईन, तसेच पुणे ग्रामीण जिल्ह्यातील शिरूर येथील एस.एस. मोबाईल शॉपी येथेही चोरी केल्याचे उघड झाले आहे.
पुढील तपास सुरू
सदर गुन्ह्याचा पुढील तपास बीड शहर पोलीस करत असून आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
एलसीबी पथकाची कामगिरी
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत आणि अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी बंटेवाड, उपनिरीक्षक सुशांत सुतळे ,पो.ह. सोमनाथ गायकवाड, मारूती कांबळे, अर्जुन यादव, बाळु सानप, मनोज परजणे, अशफाक सय्यद, विकी सुरवसे व चालक अतुळ हराळे, सिध्देश्वर मांजरे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.




