Home Blog Page 46

नसरापूर अत्याचार प्रकरणाचा तपास 6 अधिकाऱ्यांची एसआयटी टीम करणार

0

पुणे — जिल्ह्यातील नसरापूर येथे 1 मे रोजी घडलेल्या अत्यंत संतापजनक घटनेने संपूर्ण राज्य हादरलं आहे. एका 65 वर्षीय व्यक्तीने चार वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर राज्यभर संतापाची लाट उसळली असून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास सहा अधिकाऱ्यांची एस आय टी टी करणार आहे

एसआयटी  SIT मार्फत तपास सुरू

या गंभीर प्रकरणाचा तपास आता स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम (SIT) मार्फत केला जाणार आहे. राज्य सरकारने सहा अधिकाऱ्यांची टीम तयार केली असून त्यात दोन महिला अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. पुणे ग्रामीण पोलिसांतील वरिष्ठ अधिकारी या तपासात सहभागी झाले आहेत.

नेमकं काय घडलं?

1 मे रोजी दुपारी, घरासमोर खेळणाऱ्या चिमुकलीला आरोपीने “वासरू दाखवतो” असं सांगून गोठ्यात नेलं. तिथे तिच्यावर अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या केली. त्यानंतर मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवण्यात आला.
चिमुकली बराच वेळ दिसली नाही म्हणून शोधाशोध सुरू झाली आणि शेवटी गोठ्यात तिचा मृतदेह आढळला. सीसीटीव्ही फुटेजमधून आरोपी मुलीला घेऊन जाताना स्पष्ट दिसल्याने गुन्हा उघडकीस आला.

ग्रामस्थांचा संताप, रस्तारोको

या घटनेनंतर नसरापूरमध्ये प्रचंड संताप उसळला. संतप्त नागरिकांनी पुण्यातील नवले पूल परिसरात रस्तारोको आंदोलन केलं. आरोपीला पकडून ग्रामस्थांनी त्याला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलं.

कोर्टातही आरोपीचे धक्कादायक वर्तन

आरोपीला कोर्टात हजर केल्यावर त्याने “ही किरकोळ मारामारीची केस आहे” असा दावा केला, ज्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. न्यायालयाने आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पूर्वीही दोन गुन्हे, पुराव्याअभावी सुटका

हा आरोपी यापूर्वीही दोन वेळा अशाच गंभीर गुन्ह्यांमध्ये संशयित होता, मात्र पुरावे न मिळाल्यामुळे तो निर्दोष सुटला होता. त्यामुळे या वेळेस कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी अधिक तीव्र झाली आहे.

पीडित कुटुंबाची भूमिका

पीडित मुलीवर शनिवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या वडिलांनी स्पष्ट भूमिका घेत, “मुलीला न्याय मिळेपर्यंत कोणत्याही नेत्यांनी भेटायला येऊ नये,” असं सांगितलं. “राजकारणासाठी फोटो काढण्यापेक्षा न्याय महत्त्वाचा,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

बीड हादरलं! ३ वर्षांच्या नातीवर आजोबाचा अत्याचार; आरोपी अटकेत

0

बीड — महाराष्ट्रातील महिलांवरील आणि लहान मुलींवरील अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस गंभीर होत चालल्या आहेत. पुण्यातील नसरापूर येथील घटनेनंतर आता केज तालुक्यात एक अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे.
केज तालुक्यात ५० वर्षीय आजोबाने स्वतःच्याच ३ वर्षांच्या चिमुकल्या नातीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीची आई आपल्या ३ वर्षांच्या मुलीसह माहेरी आली होती. १६ ते २५ एप्रिल या कालावधीत संधी साधून आरोपी आजोबाने या चिमुकलीवर दोन-तीन वेळा अत्याचार केला.
घटनेनंतर मुलीला त्रास जाणवू लागल्याने तिने आईला हा प्रकार सांगितला. ही बाब समजताच आई हादरली आणि तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली.

पोलिसांची कारवाई

युसुफवडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवला. आरोपीविरुद्ध पॉक्सो ऍक्ट POCSO कायद्याच्या कलम ४ आणि ६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘पिंक पथका’चे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके यांच्या पथकाने आरोपीला तात्काळ अटक केली आहे. सध्या आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार असून पुढील तपास सुरू आहे.

वाढत्या घटनांमुळे चिंता

भोर, चाकण आणि आता बीड येथे घडलेल्या सलग घटनांमुळे राज्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांकडून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.

एलपीजी सिलेंडर महाग! 1 मेपासून ₹993 ने दरवाढ; हॉटेलमध्ये जेवणही होणार महागणार

0

नवी दिल्ली — देशभरात 1 मे 2026 पासून कमर्शियल एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी 19 किलोच्या कमर्शियल सिलेंडरच्या दरात थेट ₹993 रुपयांची वाढ केली आहे.

या वाढीनंतर कमर्शियल सिलेंडरची किंमत आता सुमारे ₹3071 वर पोहोचली आहे. एप्रिल महिन्यात हीच किंमत ₹2078 होती.

का वाढले एलपीजीचे दर?

इराण-अमेरिका तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे एलपीजीच्या किमतींवर मोठा परिणाम झाला आहे.

तसेच काही राज्यांतील निवडणुका संपल्यानंतर ही दरवाढ करण्यात आल्याची चर्चा देखील सुरू आहे.

 घरगुती ग्राहकांना दिलासा

सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देत घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाही. त्यामुळे घरगुती वापरासाठी सध्या तरी दर स्थिर ठेवण्यात आले आहेत.

 हॉटेल आणि व्यवसायांवर मोठा परिणाम

कमर्शियल सिलेंडर महाग झाल्यामुळे हॉटेल चालकांचा खर्च वाढणार आहे त्यामुळे खाद्य पदार्थांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे काही ठिकाणी हॉटेल बंद करण्याचे निर्णय घेतला गेला याचा थेट फटका ग्राहकांना बसणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हॉटेलमधील जेवण महाग होऊन ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

केज तालुक्यात दुर्दैवी घटना: विहिरीत बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू, सांगवी शिवार हादरले

0

केज (बीड) — तालुक्यातील सांगवी शिवारात गुरुवारी एक हृदयद्रावक घटना घडली. विहिरीत बुडून १४ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पिंपळगाव (ता. केज) येथील विराज विशाल शिंगारे (वय १४) हा आपल्या मित्रांसोबत पोहायला शिकण्यासाठी सांगवी शिवारातील बाळासाहेब केदार यांच्या शेतातील विहिरीवर गेला होता. पोहण्यासाठी त्याने कमरेला थर्माकोल बांधून विहिरीत उडी मारली. मात्र, थर्माकोल तुटल्याने तो सुमारे ३५ फूट खोल पाण्यात बुडाला.


घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे, सहाय्यक फौजदार पी. टी. चव्हाण, कर्मचारी शंभू दराडे व होमगार्ड सुरज भैरट यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला स्थानिक पातळीवर शोधमोहीम राबवण्यात आली, मात्र यश न आल्याने बाहेरील बचाव पथकाची मदत घेण्यात आली.
पैठण येथील बचाव पथकाने घटनास्थळी पोहोचून सखोल शोधमोहीम राबवली आणि सायंकाळी सुमारे ६.३० वाजता मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला असून पुढील तपास सुरू आहे.

सेवानिवृत्त शिक्षक दिलीप बोराडे यांचा चौसाळ्यात सत्कार; 35 वर्षांच्या सेवेला सलाम

0

बीड — तालुक्यातील चौसाळा येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील ज्येष्ठ शिक्षक दिलीप बोराडे गुरुवारी (दि.३०) सेवानिवृत्त झाले. त्यांच्या दीर्घ आणि उल्लेखनीय सेवेनिमित्त शाळेच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला मुख्याध्यापक, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि प. माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका पद्मजा हम्पे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते प्रेमचंद (बाबूशेठ) लोढा तसेच जिल्हा परिषद सदस्य आणि भाजपा बीड शहर अध्यक्ष अशोक लोढा उपस्थित होते.
यावेळी बोलताना बाबूशेठ लोढा म्हणाले की, “शिक्षक हा समाजाचा शिल्पकार असतो. दिलीप बोराडे यांनी 30-35 वर्षे विद्यार्थ्यांना ज्ञानदान करून अनेक यशस्वी विद्यार्थी घडवले आहेत.”
त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी तळमळीने केलेल्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य व सुखसमृद्धीच्या शुभेच्छा दिल्या.


अध्यक्षीय भाषणात पद्मजा हम्पे यांनी बोराडे यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी हिंगणी (बु.) ग्रामस्थांच्या वतीने बबनदास वैष्णव, सुरज वैष्णव, शमशाद सय्यद,अ‍ॅड. चंद्रकांत गोरे अंकुश नाईकवाडे, मिलिंद कुलकर्णी, शहाजी सुरवसे आणि बाबासाहेब बोराडे आदींच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

प्रतीक्षा संपली! बारावीचा निकाल “या” दिवशी

0

मुंबई — राज्यातील 12 वी बोर्ड परीक्षेचा (HSC Results) निकाल शनिवार 2 मे रोजी सकाळी 11 वाजता महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाकडून जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर, विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजता ऑनलाईन वेबसाटईवर पाहाता येणार आहे
काही दिवसांपूर्वी सीबीएसई बोर्डाचा निकाल जाहीर झाला होता. त्यानंतर, राज्यातील 12 बोर्ड परिक्षेच्या निकालाच्या तारखेकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षेचा निकाल शनिवार, दिनांक 2 मे 2026 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. सदर निकाल अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. विद्यार्थ्यांनी आपला आसन क्रमांक व इतर आवश्यक तपशीलांच्या आधारे निकाल पाहता येईल. यासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी शनिवार, 2 मे रोजी सकाळी 11 वाजता राज्य मंडळाच्या कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. बारावीचा निकाल शनिवारी जाहीर होणार असून सकाळी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद होणार आहे. त्यामध्ये, राज्याचा निकाल, कोणत्या विभागात किती निकाला आणि एकूण विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने निकाला जाहीर होईल. त्यानंतर, दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकाल पाहता येणार आहे. mahahsscboard.in या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येणार आहे.

अहमदपूर – अहिल्यानगर महामार्गाचा विकास भेगाळला; कंत्राटदाराचे डांबरी ठिगळ प्रवाशांना मरण जवळ

0

बीड — बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या अहमदपूर–अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी (NH-548D) ची अवस्था अत्यंत खराब झाली असून रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या भगळी,खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. सुमारे १७० किमी लांबीचा आणि ८७८ कोटी खर्चाचा हा महामार्गावर प्रवाशांना मरण स्वस्त झाले आहे.अशी प्रतिक्रिया वाहनचालकांकडून व्यक्त होत आहे.


विशेषतः मांजरसुंभा ते पाटोदा या दरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भेगा, तडे आणि खोल खड्डे निर्माण झाले आहेत. दुचाकीस्वारांचे चाक खड्ड्यांमध्ये अडकून अपघात होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

केवळ मलमपट्टी; कायमस्वरूपी उपाय नाही

संबंधित कंत्राटदार एचसीपीएल (HCPL) कडून केवळ डांबर टाकून खड्डे बुजवण्याचे तात्पुरते काम केले जात आहे. मात्र ही दुरुस्ती टिकाऊ नसून काही दिवसांतच रस्ता पुन्हा खराब होत असल्याचे दिसून येत आहे.

अपूर्ण कामामुळे नागरिक त्रस्त

दरम्यान, मांजरसुंभा ते अंबेजोगाई दरम्यान एचपीएम (HPM) कंपनीकडील कामही रखडलेले आहे. दुभाजक, पथदिवे, दिशादर्शक फलक आणि नाले यांची कामे अपूर्ण असल्याने स्थानिक नागरिक, व्यापारी आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

प्रशासन निष्क्रिय

वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने ठोस कारवाई न केल्यामुळे ठेकेदारांचा बेजबाबदारपणा वाढल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

कायमस्वरूपी उपायांची मागणी

सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून सिमेंट ब्लॉक कट पद्धतीने रस्त्यांची दुरुस्ती करावी
अपूर्ण काम तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश
देण्याची मागणी केली आहे

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या! 21 अधिकाऱ्यांचे तात्काळ बदली आदेश

0

मुंबई —  राज्य सरकारने एप्रिल महिन्याच्या शेवटच्या दिवशी मोठा प्रशासकीय निर्णय घेत 21 आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या निर्णयामुळे पोलीस प्रशासनात मोठे फेरबदल झाले असून अनेक महत्त्वाच्या पदांवर नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून अलीकडच्या काळात पोलीस विभागात सातत्याने बदल्या होत असल्याचे दिसत आहे. यामध्ये पोलीस अधीक्षक (SP), उप आयुक्त (DCP) तसेच अपर पोलीस महासंचालक (ADG) स्तरावरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

 बदली झालेल्या प्रमुख अधिकाऱ्यांची यादी

🏀 जय के. बन्सल → सायबर सुरक्षा, महाराष्ट्र
🏀 ससगुरी विशाल आनंद → धुळे
🏀 बाळासाहेब पाटील → DCP, मुंबई
🏀 सोमनाथ घागे → पोलीस महासंचालक कार्यालय
🏀 रविंद्रसिंह परदेशी → राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई
🏀 संदीप घुगे → DCP, मुंबई
🏀 श्रवण दत्त → ADG विशेष कृती (स्टाफ ऑफिसर)
🏀 मुम्मका सुदर्शन → अहिल्यानगर
🏀 बोडोंपत स्वामी → नाशिक ग्रामीण
🏀 अनुज तारे → अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, पुणे
🏀 अनुराग जैन → DCP, मुंबई
🏀.  अश्विनी सानप → नंदुरबार
🏀. तेगबीर संधू → जालना
🏀. राजकुमार शिंदे → लोहमार्ग, पुणे
🏀. निखिल खाटमोडे → वाशिम
🏀 आयुष नोपानी → चंद्रपूर
🏀 पंकज कुमावत → परभणी
🕳️. नितीन कदम → अमरावती ग्रामीण
🕳️. सूरज गुंजाळ → मालेगाव
🏀.  गजानन राजमाने → DCP, मुंबई
🕳️.  दत्ता तोटेवाड → अमरावती

 तात्काळ पदभार घेण्याचे आदेश

सरकारने सर्व अधिकाऱ्यांना तात्काळ नव्या पदावर रुजू होण्याच्या सूचना दिल्या आहेत. या बदल्यांमुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.

खत तुटवड्यावर मोठा निर्णय! अ‍ॅग्रीस्टॅक नंबर शिवाय खत मिळणार नाही; 20 मे अंतिम मुदत

0

मुंबई — युद्धजन्य परिस्थितीमुळे देशभरात खतांचा तुटवडा निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या कृषी विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. खतांची अवाजवी खरेदी रोखण्यासाठी आता खतांचे रेशनिंग करण्यात येणार असून, त्यासाठी अ‍ॅग्रीस्टॅक योजनेतील शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID) बंधनकारक करण्यात आला आहे.
राज्यात सध्या सुमारे ३० लाख शेतकऱ्यांकडे अजूनही ओळख क्रमांक नाही, त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी टप्प्याटप्याने केली जाणार आहे. कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी स्पष्ट केले की, 20 मे 2026 पूर्वी सर्व शेतकऱ्यांनी ओळख क्रमांक काढणे आवश्यक आहे.

 काय आहे नवीन नियम?

खत खरेदीसाठी अ‍ॅग्रीस्टॅक Farmer ID आवश्यक करण्यात आला आहे.पिकांची नोंद (Crop Registration) बंधनकारक करण्यात येऊन लागवड क्षेत्रानुसारच खतांचे वितरण करण्यात येणार असल्याने अवाजवी खत  खरेदीवर नियंत्रण येणार आहे.

युद्धजन्य परिस्थितीमुळे केंद्र सरकारला दुप्पट दराने खत खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे पुरवठा साखळीवर ताण येत असून, शेतकऱ्यांना खतांचा तुटवडा जाणवत आहे.

 सरकारची कारवाई

खत विक्रीवर नियंत्रणासाठी फिरती पथके सक्रिय करण्यात आली आहेत. परिणामी
अनेक खत विक्रेत्यांवर कारवाई झाली आहे.
काही शेतकरी जास्त प्रमाणात खत खरेदी करत असल्याचे तपासणीतून उघड झाले आहे.त्यामुळे या दोन्ही बाबींवर नियंत्रण ठेवण्यासाठी कृषी विभागाने खतांचे रेशनिंग करण्याचे ठरविले आहे.

अ‍ॅग्रीस्टॅक योजना काय आहे?

अ‍ॅग्रीस्टॅक योजना 14 नोव्हेंबर 2024 पासून राज्यात लागू झाली असून, प्रत्येक शेतकऱ्याला एक युनिक ओळख क्रमांक (Farmer ID) दिला जातो. याच्या माध्यमातून शेती, पिके आणि अनुदान व्यवस्थापन अधिक पारदर्शक होणार आहे.
कृषी विभागाने सुरू केलेल्या रेशनिंग मुळे ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी (Farmer ID )नाही त्यांनी 20 मेपूर्वी नोंदणी करणे अत्यावश्यक आहे अन्यथा भविष्यात खत खरेदीत अडचणी येऊ शकतात

एस पी साहेब..! बीडचे नावलौकिक वाढवावे, न्यायासाठी पालकमंत्र्यांच्या गाडीवर नासके टमाटे फेकू द्यावे ?

0

बीड — महाराष्ट्र त्यातल्या त्यात बीड  “दीन” किती झालेला आहे हे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पालकमंत्र्यांना दाखवलेच पाहिजे.बीडचा नावलौकिक स्वतःला कर्तव्यदक्ष म्हणवून घेणाऱ्या एस पीं  च्या यंत्रणेने  वाढवायचा नाही तर मग उपयोग काय? एस पी साहेब..!अडीच महिन्यापासून चौसाळा शेजारील गावातील 14 वर्षाची मुलगी फूस लावून पळवली गुन्हा नोंद झाला. तुमच्या शिलेदारांनी आरोपी पाठीशी घातला हतबल झालेल्या मुलीच्या पालकाला मुलगी मिळावी न्याय मिळावा यासाठी पालकमंत्र्यांच्या गाडीवर नासके टमाटे फेकण्याचा इशारा द्यावा लागला. बीडची कायदा सुव्यवस्था किती दीन अन् लाचार झाली आहे खरंच ही अभिमानाची गोष्ट ठरणार आहे?

महाराष्ट्राची उपमुख्यमंत्री तथा बीडची पालकमंत्री महिलाच आहे. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण देखील होणार आहे. महाराष्ट्र स्थापनेला 67 वर्ष पूर्ण होत आहेत. त्याचा हा कौतुकाचा सोहळा आहे. अशा स्थितीत कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र किती “दीन” दुबळा करून ठेवला आहे. याच प्रात्यक्षिकही एक मे रोजी दाखवण्याचा मानस पोलीस यंत्रणेने ठेवल्याचं पाहायला मिळत आहे.

चौसाळा शहराजवळील एका गावातील 14 वर्षाची अल्पवयीन मुलगी सुरज पंजाब झोडगे याने पळवून नेली. याप्रकरणी 9 फेब्रुवारी 2026 रोजी एफ आय आर क्र. 0054/26 नुसार गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात दोन अडीच महिन्याचा कालावधी उलटला असला तरी संबंधित मुलगी पोलिसांना सापडली नाही. शेवटी हतबल झालेल्या मुलीच्या पालकांनी एक मे रोजी आंदोलनाचा इशारा दिला. इशारा देऊनही काहीच फरक पडला नाही. फरक कसा पडेल ? या प्रकरणात नेकनूर पोलीस ठाण्याचे फौजदार चंद्रकांत गोसावी आणि जमादार सचिन मुरूमकर यांनी आरोपी सुरज झोडगे च्या नातेवाईकांकडून पैसे खाऊन पाठीशी घातल्याचा आरोप पीडित कुटुंबाने निवेदनात केला आहे. कमीत कमी महिला पालकमंत्री असताना महाराष्ट्र दिनासारखा आनंदोत्सवाचा सोहळा असताना न्याय मिळेल अशी भाबडी आशा पालकांना आहे. पण सध्याची नेकनुर पोलिसांची भूमिका “खलरक्षणाय सद् निग्रहणाय”असताना कारवाई होणार कशी शेवटी “मेहुणी बायको मिंधा संसार” ही म्हण उगाच प्रचलित झाली नाही. पालकांनी पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात चंद्रकांत गोसावी मुरूमकर यांना निलंबित करण्यात यावे अशी  मागणी देखील केली आहे. मात्र पोलीस अधीक्षकांच्या लाडक्या कर्मचाऱ्यावर कारवाई होणार कशी असा प्रश्न देखील जनतेतून विचारला जात आहे.

काहीही असो निवेदन देऊनही पोलीस यंत्रणेला घाम फुटला नाही. पीडित कुटुंबाला न्याय मिळाला नाही. महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहूर्तावर तेही नवनियुक्त झालेल्या उपमुख्यमंत्र्यांच्या तथा बीडच्या पालकमंत्र्यांच्या गाडीवर नासके टमाटे फेकूच द्यायचे बीडचा नावलौकिक करायचाच असा चंग नेकनूरच्या  पोलीस यंत्रणेने बांधल्याचे चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे.