Home Blog Page 45

अतिक्रमण धारकांना तात्काळ पीटीआर वाटप करून घरकुल योजनेचा लाभ द्या – आ.विजयसिंह पंडित

0

अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत पीटीआर प्रश्नावर बैठक

बीडगेवराई शहरातील संजयनगर, इस्लामपूरा, साठेनगर, संतोष नगर, संघमित्रनगर, भिमनगर, कोरबू गल्ली, चिंतेश्वर गल्ली, अचानकनगर आदी भागांतील अतिक्रमण धारकांना विनाविलंब पीटीआर वाटप करून घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी दि.१५ मे पूर्वी अतिक्रमण धारकांना हक्काचे पीटीआर वाटप करा असे निर्देश आ. विजयसिंह पंडित यांनी दिले. माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी पीटीआर वाटपास झालेल्या विलंबाबाबत तिव्र नाराजी व्यक्त केली. निवासी अतिक्रमणे नियमित करण्याचे महायुती सरकारचे धोरण असताना प्रशासन याकामी विलंब का करत आहे ? असा सवालही आ. विजयसिंह पंडित यांनी उपस्थित केला. शासनाच्या नवीन धोरणानुसार पात्र होणाऱ्या अतिक्रमण धारकांनी पुराव्यासह नव्याने अर्ज करण्याचे आवाहन यानिमित्ताने आ. विजयसिंह पंडित यांनी केले आहे.

गेवराई नगर परिषद हद्दीतील अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण नियमाकुल करून त्यांना हक्काचा पीटीआर वाटप करण्याचा शुभारंभ राज्याचे तत्कालीन लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री स्व.अजितदादा पवार यांच्याहस्ते गेवराई येथे करण्यात आला होता. नगर परिषद निवडणुकीपूर्वी अतिशय वेगाने सुरु असलेले हे काम निवडणुकीनंतर थांबल्यामुळे अतिक्रमण धारकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. या बाबत आ. विजयसिंह पंडित यांनी मंगळवार, दि.५ मे रोजी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीला माजी आमदार अमरसिंह पंडित, उपविभागीय अधिकारी कविता जाधव, गेवराई नगर परिषदेचे मुख्याधिकारी विक्रम मांडुरके, नायब तहसिलदार संजय सोनावणे, नगररचनाकार आकाश राठोड, भुमिअभिलेखचे उपअधिक्षक जाधव, नगर परिषदेचे अभियंता रामेश्वर कर्डिले, प्रदिप पुरी, माजी नगराध्यक्ष महेश दाभाडे, नगर परिषदेतील राष्ट्रवादीचे गटनेते शेख खाजा, नगरसेवक दादासाहेब गिरी, झोपडपट्टी हक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष कडूदास कांबळे, श्रीकृष्ण मुळे, सतिष प्रधान, सदाफुले पाटील, जफर पटेल, प्रकाश गायकवाड यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

गेवराई नगर पालिका हद्दीतील संजयनगरसह इतर भागातील अतिक्रमण धारकांच्या हक्काच्या पीटीआरचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. विधानसभा निवडणुकीनंतर आ. विजयसिंह पंडित यांनी याप्रश्नी लक्ष घालून संबंधितांना हक्काचा पीटीआर देण्याची प्रक्रिया सुरु केली. त्यांच्या प्रयत्नामुळे २२२० भूखंड धारकांचे सर्व्हेक्षण पूर्ण करून त्यांना पात्र म्हणून समितीने घोषित केले. यापैकी अनेकांना भोगवटदार प्रमाणपत्रासह पीटीआरचे वाटप करण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकूलाचा लाभ संबंधितांना मिळावा यासाठी माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली आ. पंडित यांनी प्रयत्न केले. नगर परिषद निवडणुकीची आचार संहिता लागल्यामुळे याविषयीची पुढील कार्यवाही स्थगित झाली. निवडणुकीनंतर ही सर्व प्रक्रिया स्थगित झाली. अतिक्रमण धारक वारंवार या बाबत पाठपुरावा करत असल्यामुळे संबंधितांच्या मागणीवरून आ. विजयसिंह पंडित यांनी मंगळवार, दि. ५ मे रोजी या बाबतची बैठक घेऊन पुन्हा या प्रक्रियेला गती दिली आहे. दि. १५ मे रोजी गेवराई येथे राजस्व अभियान राबविण्यात येणार असून तोपर्यंत सर्व अतिक्रमण धारकांना पीटीआरचे वाटप करावेत असे निर्देश त्यांनी या बैठकीत दिले.

राज्य शासनाने दि. २५ मार्च रोजी नवीन शासन निर्णय निर्गमित करून निवासी अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय घेतला. नवीन शासन निर्णयातील निकषाप्रमाणे जे अतिक्रमण धारक पात्र होणार आहेत त्यांनी पुराव्यासह नगर परिषदेकडे अर्ज करण्याचे आवाहन आ. विजयसिंह पंडित यांनी केले. या प्रक्रियेसाठी विशेष कॅम्प आयोजित करून सर्व अर्ज निकाली काढण्यात येतील असा विश्वास प्रशासनाच्यावतीने उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांनी या बैठकीत व्यक्त केला. अनेक अतिक्रमण धारकांनी आपली नावे वगळण्यात आली असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ज्यांची नावे यापूर्वीच्या पात्रता यादीत आहेत आणि आत्ता त्यांना पीटीआर नाकारला जात असेल तर सकारण लेखी उत्तर संबंधितांना द्यावे लागेल अशी सूचना आ. पंडित यांनी यावेळी केली. आ. विजयसिंह पंडित यांनी घेतलेल्या बैठकीमुळे गेवराई शहरातील अतिक्रमण धारकांना हक्काचा पीटीआर मिळण्याची स्थगित झालेली प्रक्रिया पुन्हा एकदा सुरु झाली असून अतिक्रमण धारकांना पीटीआर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हक्काच्या पीटीआर मुळे अतिक्रमण धारकांना घरकुला योजनेचा लाभ मिळणार आहे.

धारूरजवळ पोलिसांवर हल्ला;कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

0

बीड — जिल्ह्यातील धारूर शहराजवळील घाटपाटी परिसरात पोलिसांवर झालेल्या धक्कादायक हल्ल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मध्यरात्री पेट्रोलिंग करत असताना मद्यधुंद टोळक्याने पोलिसांवर थेट जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस उपनिरीक्षक बाबासाहेब भवर हे आपल्या पथकासह नियमित गस्त घालत असताना अचानक काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर दगडफेक सुरू केली. या हल्ल्यात ते थोडक्यात बचावले असून, घटनेमुळे पोलिस यंत्रणेत खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे, या हल्ल्यात सहभागी असलेल्या आरोपींपैकी एक व्यक्ती पोलीस कर्मचारी असल्याचा आरोप केला जात आहे. “आम्हाला कोणी काही करू शकत नाही,” अशी उघड दादागिरी करत आरोपींनी पोलिसांनाच लक्ष्य केल्याने परिस्थितीचे गांभीर्य वाढले आहे.
या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत दोन आरोपींना अटक केली असून, तीन जण फरार आहेत. इतर संशयितांचा शोध सुरू आहे. धारूर पोलिस या घटनेचा अधिक तपास करत असून, आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी मोहीम राबवली जात आहे.
दरम्यान, “पोलिसच सुरक्षित नसतील तर सामान्य नागरिकांचे काय?” असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील सुरक्षा व्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

बीडमध्ये वाहन चोरी प्रकरण उघड; दोन आरोपी अटक, चोरीचा टेम्पो जप्त

0

बीडपेठ बीड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चारचाकी वाहन चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वी छडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेला अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो जप्त करण्यात आला आहे.
पेठ बीड येथील मोमीनपुरा परिसरातील रहिवासी अश्पाक अनिमोद्दीन जुलहा यांचा टेम्पो दि. १० एप्रिल २०२६ रोजी बार्शी रोड परिसरातून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता. याबाबत पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आरोपी लातूर येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर व पथकाने लातूर येथे सापळा रचून तैबाज सलीम शेख (वय २५) आणि रेहान इलाही शेख (वय १९) या दोन आरोपींना ताब्यात घेतले.
पोलीस चौकशीत आरोपींकडून चोरीस गेलेला टेम्पो जप्त करण्यात आला असून त्यांनी विवेकानंद पोलीस ठाण्यातील गुन्हा रजिस्टर नं. 207/2026 अंतर्गत पिकअप चोरी केल्याची कबुली दिली आहे.
दोन्ही आरोपींना मुद्देमालासह पेठ बीड पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत श्रीराम खटावकर, मारुती कांबळे, बाळु सानप, सोमनाथ गायकवाड, युनुस बागवान, अश्पाक सय्यद, मनोज परजणे, आश्विन सुरवसे व चालक अतुल हराळे यांनी सहभाग घेतला.

पत्नी नांदायला आली नाही ; संतापलेल्या पित्याचा दोन चिमुरड्यांना जाळण्याचा प्रयत्न

0

माजलगाव (बीड) — जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पत्नी नांदायला येत नसल्याच्या कारणावरून संतापलेल्या पित्याने स्वतःच्या दोन लहान मुलींना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना माजलगाव तालुक्यातील लहामेवाडी येथे घडली असून, वेळेवर हस्तक्षेप झाल्याने मोठा अनर्थ टळला.

काय घडले नेमके?

फिर्यादी अश्विनी महेश सोमासे (वय 33, रा. टालेवाडी) या पतीसोबत झालेल्या कौटुंबिक वादामुळे सध्या माहेरी राहत होत्या.
दि. २ मे रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजता, त्यांचे पती महेश विष्णू सोमासे हे दुचाकीवरून दोन्ही मुलींना घेऊन लहामेवाडी येथे आले.त्यांनी पत्नीला “नांदायला चल” असे सांगितले. मात्र अश्विनी यांनी गावातील प्रतिष्ठित व्यक्तींसमोर बैठक घेऊन वाद मिटवण्याचा प्रस्ताव दिला. यामुळे संतापलेल्या आरोपीने संतापाच्या भरात गंभीर पाऊल उचलले.

मुलींवर डिझेल ओतून जाळण्याचा प्रयत्न

आरोपीने धमकी देत दुचाकीवरील पिशवीतून डिझेलचा कॅन काढून आपल्या ५ वर्षांच्या मृणाल आणि ४ वर्षांच्या मृण्मय या चिमुरड्यांच्या अंगावर डिझेल ओतले. त्यानंतर काडीपेटी काढून त्यांना पेटवण्याचा प्रयत्न केला.

वेळेवर मदत – अनर्थ टळला

या प्रकारामुळे अश्विनी आणि त्यांच्या आईने आरडाओरडा केला. आवाज ऐकून नातेवाईक आसाराम चिंचोलकर तात्काळ घटनास्थळी धावून आले. त्यांनी आरोपीच्या हातातील डिझेलचा कॅन आणि काडीपेटी हिसकावून घेतली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

पोलिसांत गुन्हा दाखल

घटनेनंतर आरोपीने पत्नी व माहेरच्या लोकांना जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात आरोपी पतीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय, देशातील सर्व रेकॉर्ड मोडले

0

बारामती — महाराष्ट्रातील बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत महायुतीच्या उमेदवार व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ऐतिहासिक विजय नोंदवत देशातील सर्वाधिक मताधिक्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यांनी तब्बल २ लाख१८ हजार ९३० मतांनी विजय मिळवत आधीचा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला.
यापूर्वी सुनील कुमार शर्मा (साहिबाबाद, उत्तरप्रदेश) यांच्या नावावर २,१४,८३५ मताधिक्याचा विक्रम होता, जो आता बारामतीत मोडला गेला आहे.

 मतदान आणि मतमोजणीचा आढावा

बारामती पोटनिवडणुकीत एकूण ५८.१७% मतदान झाले.
एकूण मतदार: —  ३लाख ,८४हजार ,५७९
मतदान करणारे: २,२३,७०५
मतमोजणी सोमवारी (४ मे) सकाळी ८ वाजता बारामती MIDC येथील गोदामात सुरू झाली. पहिल्याच फेरीपासून सुनेत्रा पवार यांनी मोठी आघाडी घेतली आणि ती शेवटपर्यंत कायम ठेवली.

18व्या फेरीतच जुना विक्रम मोडला 

१८व्या फेरीतच सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांनी २०१९ मध्ये केलेला १ लाख ६५ हजार‌ २६५ मताधिक्याचा विक्रम मोडला. त्यानंतर प्रत्येक फेरीत त्यांचे मताधिक्य वाढत गेले आणि अखेर त्यांनी नवा इतिहास घडवला.

2024 निवडणुकीचा संदर्भ

२० नोव्हेंबर २०२४ रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीत बारामतीत ७१.२७% मतदान झाले होते. त्या वेळी “पवार विरुद्ध पवार” अशी थेट लढत झाली होती: यावेळी अजित पवार यांना  १ लाख ८१ हजार १३२ मते पडली होती. युगेंद्र पवार यांना  ८० हजार २३३ मते
त्यात अजित पवार १लाख ,९०९ मतांनी विजयी झाले होते.

 पोटनिवडणूक कशी लागली?

अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर ही पोटनिवडणूक लागली. निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र अपक्ष व छोट्या पक्षांमुळे निवडणूक झाली.
या निवडणुकीत एकूण २२ उमेदवार रिंगणात होते, परंतु सुनेत्रा पवार यांच्या प्रचंड लाटेमुळे सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले.

 

नसरापुर प्रकरणी आरोपीला फाशीची मागणी; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

0

बीड — पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापुर येथे साडे तीन वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा निर्घृण खून झाल्याच्या घटनेने राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबाणेशकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात, प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून ३० दिवसांत आरोपपत्र दाखल करावे व पीडित कुटुंबाला तातडीने न्याय मिळवून द्यावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. “अनेक प्रकरणांमध्ये केवळ घोषणा होतात, पण खटले वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात. या प्रकरणात तरी ठोस व तातडीची कारवाई व्हावी,” अशी भूमिका आंदोलकांनी मांडली.

आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा द्यावी, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. याचवेळी न्याय मागणीसाठी आंदोलन करणाऱ्यांवर लाठीमार करणा-या पोलिस यंत्रणेचाही निषेध करण्यात आला.आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री बीड सुनेत्राताई पवार निवेदन पाठविण्यात आले.

या आंदोलनात शेख युनुस, रामनाथ खोड,मुबीन शेख, सय्यद सादेक ,रामधन जमाले,बाजीराव ढाकणे,प्रा.डी.जी.तांदळे, डॉ.संजय तांदळे, किष्किंधा पांचाळ, मुस्ताक शेख
आदींचा सहभाग होता.

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

0

केज — शहरातील एका भागात राहत असलेली शालेय शिक्षण घेत असलेली १५ वर्ष १० महिने वयाच्या मुलीचा पंधरा दिवसापूर्वी दि. १४ एप्रिल रोजी दुपारी १:०० ते ३:०० वा. च्या दरम्यान एका नराधमाने पाठलाग करून तिला आणि तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देवून तिला त्याच्या राहते घरी बोलावुन घेतले. त्या नंतर त्याने त्या अल्पवयीन मुली सोबत बळजबरीने आणि जबरदस्तीने शारीरिक लैंगिक संबंध प्रस्थापित केले.

सदर घटने बाबत कोणाला काही सांगितल्यास मुलीच्या आई-वडील व भावाला जिवे मारण्याची धमकी दिली.तसेच मुलीच्या मोबाईलवर आरोपीने व्हिडीओ कॉल करुन त्याचे मोबाईलची स्क्रीन शेअर केली आणि त्याच्याकडे असलेल्या पेनड्राईव्ह मधील बळजबरीने लैगींक अत्याचार केलेला व्हिडीओ दाखवला. तसेच आता सांगेल तसे कर. असे म्हणुन कपडे काढ म्हणाला, परंतु तिने नकार दिला असता व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. दरम्यान या प्रकरणी २ मे रोजी पीडितेच्या तक्रारी वरून केज पोलिस ठाण्यात रेहान रियाज शेख याच्या विरुद्ध गु. र. नं. २५८/२०२६ भा. न्या. सं. ७४, ७५, ७६, ७८(१), ७९, ६४(२) (ळ), ६५(१), ३५१(२) (३) आणि पोक्सोचे कलम ४, ६, ८, १०, १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पिंक पथकाचे पोलिस उपनिरीक्षक प्रकाश शेळके हे तपास करीत आहेत. या गुन्ह्यातील आरोपी रेहान शेख यास न्यायालयासमोर हजर केले असता त्याला ६ मे पर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पाणीटंचाई, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात घेतली आ.संदिप क्षीरसागरांनी आढावा बैठक

0
उन्हाळ्याच्या काळात पाणीटंचाई भासू नये यासाठी नियोजन करण्याच्या दिल्या प्रशासनाला सुचना
बीड  —  उन्हाळ्याच्या काळात नागरिकांसमोर पाणीटंचाई सारखे संकट उभे राहू नये. त्या संदर्भात नियोजन करून तातडीने पाणीटंचाईच्या अनुषंगाने उपाययोजना कराव्यात अशा सुचना आ.संदिप क्षीरसागर यांनी प्रशासनाला केल्या आहेत. उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या आणि पीक विम्याच्या अनुषंगाने आ.संदिप क्षीरसागर यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकी दरम्यान त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना सुचना दिल्या आहेत.
                 सोमवार (दि.4) रोजी पाणी टंचाई आणि शेतकर्‍यांच्या विविध समस्या यांच्या अनुषंगाने आ.संदिप क्षीरसागर यांनी शासकीय विश्रामगृह बीड येथे पंचायत समिती, कृषी विभाग आणि इतर विभागांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत बीड मतदारसंघातील बीड व शिरूर (का.) तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये पाणी टंचाई सारखी भीषण समस्या निर्माण होऊ नये यासाठी टँकरने पाणी पुरवठा, जलस्त्रोत अधिग्रहण आणि इतर उपाययोजना करण्या संदर्भात विस्तृत चर्चा करण्यात आली. पाणी टंचाईला होऊ नये यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर नियोजन करून उपाय योजनांची अंमलबजावणी तात्काळ करावी, अशा सुचना आ.क्षीरसागर यांनी दिल्या. तसेच, पीक विमा, पी.एम.किसान योजना तसेच शेतकर्‍यांसाठी शासनाकडून राबविण्यात येणार्‍या विविध योजना आणि शेतक·यांच्या दृष्टीने त्यामध्ये असलेल्या अडचणी या बाबत देखील यावेळी आ.क्षीरसागर यांनी कृषी विभागाच्या अधिका·यांकडून आढावा घेवून आवश्यक त्या सुचना केल्या. या बैठकीस माजी आ.सय्यद सलीम, बीड पंचायत समिती,  शिरूर (का.) पंचायत समिती, कृषी विभाग येथील संबंधित अधिकारी यांची उपस्थिती होती.

आवश्यक असलेल्या गावांमध्ये टँकर मागणीसाठी प्रस्ताव सादर करा- आ.संदिप क्षीरसागर 

बीड विधानसभा मतदारसंघातील बीड व शिरूर का. तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये उन्हाळ्यातील होणा·या पाणी टंचाई साठी आवश्यक असलेल्या गावांनी ग्रामपंचायतीचा ठराव घेवून टँकर मागणीचे प्रस्ताव आपल्या पंचायत समितीकडे सादर करावेत, असे आवाहन आ.संदिप क्षीरसागर यांनी केले आहे.

पंढरपूर कॉरिडॉरला ४ हजार कोटींची मंजुरी; १ ऑगस्टपर्यंत भूसंपादन पूर्ण होणार !

0

मुंबई –जगभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर (Pandharpur) शहराच्या विकासासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत पंढरपूर कॉरिडॉर आणि शहर विकास प्रकल्पाला अंतिम मंजुरी देण्यात आली आहे.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी तब्बल ₹४,००० कोटींचे बजेट निश्चित करण्यात आले असून, पुढील ५० वर्षांच्या गरजा लक्षात घेऊन हा आराखडा तयार करण्यात आला आहे. आमदार समाधान अवताडे (Samadhan Avatade) यांनी सांगितले की, १ ऑगस्टपर्यंत भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे, ज्यामुळे विकासकामांना गती मिळणार आहे.

काय होणार बदल?

या प्रकल्पांतर्गत विठ्ठल रुक्मिणी मंदिर ( Vitthal Rukmini Temple )परिसरात भव्य कॉरिडॉर उभारण्यात येणार आहे. याशिवाय शहरातील रस्ते, वाहतूक व्यवस्था आणि इतर नागरी सुविधांचे आधुनिकीकरण केले जाणार आहे.

आषाढी एकादशीसारख्या मोठ्या उत्सवांमध्ये लाखो भाविक पंढरपूरला येतात. एआय आकडेवारीनुसार, मागील आषाढी एकादशीला सुमारे २८ लाख भाविकांनी येथे दर्शन घेतले होते. त्यामुळे भविष्यातील वाढती गर्दी लक्षात घेऊन हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे.

भाविकांना मोठा दिलासा

या विकासामुळे भाविकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागणार नाही. अधिक सुरक्षित, सुलभ आणि जलद दर्शनाची सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच गर्दी व्यवस्थापन सुधारल्याने अपघातांचा धोका देखील कमी होणार आहे.

व्यापाऱ्यांसाठी काय?

सुरुवातीला स्थानिक व्यापाऱ्यांनी विस्थापनाच्या भीतीने विरोध केला होता. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केले की, या प्रकल्पामुळे पंढरपूरमध्ये पर्यटन वाढेल आणि स्थानिक व्यापाराला मोठा फायदा होईल.

जागतिक धार्मिक पर्यटन केंद्राचा दर्जा

राज्य सरकारचा विश्वास आहे की, या प्रकल्पामुळे पंढरपूर कॉरिडॉर मुळे (Pandharpur corridor) हे शहर आंतरराष्ट्रीय स्तरावर एक प्रमुख धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित होणार आहे

पत्नी, मेहुणी, साडू ने आठ महिन्यापूर्वी केलेला खून उघडकीस

0

बीडगेवराई तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना उघडकीस आली आहे. पत्नीनेच आपल्या पतीचा बहिण व मेव्हण्याच्या मदतीने खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावत पुरावे नष्ट केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे. या घटनेचा उलगडा गेवराई पोलिसांनी तब्बल आठ महिन्यानंतर केला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

पोलीस ठाणे गेवराई हद्दीतील पांढरवाडी फाटा परिसरात ही घटना घडली. मृत उध्दव तुकाराम शिंदे (वय 50) हे पत्नी संगीता शिंदे यांच्यासह पुण्यावरून नातेवाईकांना भेटण्यासाठी आले होते.मात्र, पती-पत्नीमध्ये नेहमीप्रमाणे वाद सुरू झाला आणि 6 सप्टेंबर 2025 रोजी हा वाद विकोपाला गेला. यावेळी संतापाच्या भरात पत्नी संगीता शिंदे हिने तिची बहिण सविता वाजे आणि मेहुणे विष्णु वाजे यांच्या मदतीने उध्दव शिंदे यांचा गळा आवळून खून केला.

पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

खून केल्यानंतर आरोपी विष्णु शिंदे याने आपल्या दोन अल्पवयीन मुलांच्या मदतीने मृतदेह उसाच्या शेतात टाकला. काही दिवसांनी दुर्गंधी येऊ लागल्याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने प्रेत गोणीत भरून शहागड येथील जुन्या पुलावरून गोदावरी नदीत फेकून दिले.इतकेच नव्हे मृतदेह फेकून दिल्यानंतर दोन-तीन दिवसानंतर मृताची मोटारसायकल देखील विष्णू वाजे व त्याचा अल्पवयीन मुलगा यांनी एका नातेवाईकांच्या मदतीने जुन्या पुलावरून नदीत टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

मिसिंग’ तक्रारीतून उलगडा

या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, मुख्य आरोपी असलेल्या पत्नीनेच पुण्यातील सिंहगड पोलीस ठाणे आयुक्तालय या ठिकाणी पती हरवल्याची तक्रार दाखल केली होती.
मात्र, 2 मे 2026 रोजी मृताचा मुलगा शुभम शिंदे व सिंहगड पोलीस ठाण्यातील अंमलदार गेवराई पोलीस ठाण्यात आले. यावेळी शुभम शिंदे याने माझ्या वडिलांचे काही बरे वाईट झाले असावे अशी शंका गेवराई पोलिसांसमोर व्यक्त केली.

पोलिसांचा वेगवान तपास

पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराई पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली. सुरुवातीला आरोपींनी टाळाटाळ केली, पण पोलिसी चौकशीत अखेर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
या प्रकरणात एकूण 3 आरोपींना अटक करण्यात आली असून, मुख्य आरोपी संगीता शिंदे हिलाही पुण्यातून नरे पोलीसांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले आहे.

गुन्हा दाखल

या प्रकरणी मयताचा मुलगा शुभम उद्धव शिंदे यांच्या तक्रारीवरून गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 268/2026 अंतर्गत भा.न्या.सं. कलम 103(1), 238, 66(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनी दीपक लंके करत असून मयताची गोदावरी नदीत फेकलेली मोटार सायकल व सांगाडा मिळून आला आहे.
दरम्यान ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक, सचिन पांडकर, विभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके, यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि किशोर पवार, सपोनि.दिपक लंके, सपोनि. संतोष जंजाळ, सपोनि. अण्णासाहेब पवार, पोउपनि. प्रदीप आढाव, पोउपनि. उदगीरकर, श्रेणी. पोउपनि. सुरेश पारधी, श्रेणी. पोउपनि. इसाक शेख, राजु भिसे,कल्याण राठोड, राऊत, चंद्रसेन माळी, सुंदर राठोड, गोरक्ष डोके, धिरज खांडेकर, जितेंद्र ओव्हाळ, दिनेश ढाकणे, महादेव कदम, रेखा तुपे, रेशमा पौळे यांनी केली.