Home Blog Page 44

बीड, सोलापूरसह अनेक जिल्ह्यांत वादळी पावसाचा इशारा, हवामान विभागाचा यलो अलर्ट

0

महाराष्ट्रात पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा; बीड, सोलापूर, लातूरसह अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी. उष्णतेच्या लाटेनंतर हवामानात मोठा बदल, IMD चा महत्त्वाचा अंदाज.

मुंबई — भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) राज्यातील अनेक भागांसाठी पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा दिला आहे. कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सध्या कोकण पट्ट्यात उष्ण आणि दमट हवामानामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वाढलेला उकाडा, तीव्र उन्हाचा चटका आणि बदलते वातावरण यामुळे पूर्वमोसमी पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामान कायम राहणार आहे.

दरम्यान, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी, प्रवासी आणि नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे प्रशासनाने म्हटले आहे.

राज्यातील तापमान ४२ अंशांच्या पुढे

बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील अनेक भागांत उष्णतेची लाट कायम होती. वर्धा, अमरावती, गडचिरोली, अकोला, वाशीम, ब्रह्मपुरी आणि चंद्रपूर येथे तापमानाचा पारा ४२ अंशांच्या पुढे गेला. तर सोलापूर, परभणी आणि यवतमाळ येथे तापमान ४१ अंशांहून अधिक नोंदवले गेले.

दुसरीकडे, महाबळेश्वर येथे राज्यातील सर्वात कमी १५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार शनिवारनंतर राज्यातील हवामान पुन्हा कोरडे होण्याची शक्यता आहे.

नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

पुढील दोन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावे, उघड्यावर जाणे टाळावे तसेच हवामान विभागाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

बीड भूसंपादन घोटाळा: तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक पोलिसांच्या ताब्यात

0

बीड जिल्ह्यातील भूसंपादन मोबदला घोटाळा प्रकरणात तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना लातूर येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. 154 बनावट मोबदला आदेश प्रकरणात तपासाला वेग.

बीड — बीड जिल्ह्यातील बहुचर्चित भूसंपादन मावेजा घोटाळा प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना बीड पोलिसांनी लातूर येथून ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना लातूर न्यायालयात हजर केल्यानंतर पुढील चौकशीसाठी बीडकडे आणले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्यांना ताब्यात घेऊन रवाना होणार असल्याची माहिती मिळताच महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.


बीड जिल्ह्यातील कथित भूसंपादन मोबदला घोटाळ्यात तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांचे नाव, पदनाम आणि स्वाक्षरीचा वापर करून तब्बल 154 भूसंपादन प्रकरणांमध्ये बनावट मोबदला आदेश तयार करण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणी भूसंपादन उपजिल्हाधिकारी सतीश धुमाळ यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 10 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यात सहाय्यक महसूल अधिकारी संजय हांगे, अविनाश चव्हाण, शेख अजहर शेख बाबू, त्रिंबक पिंगळे, पांडुरंग पाटील, श्री. राऊत तसेच अॅड. एस. एम. नन्नवरे, अॅड. नरवडकर, अॅड. पिसूरे आणि अॅड. प्रवीण राख यांचा समावेश आहे. यापैकी संजय हांगे, त्रिंबक पिंगळे आणि शेख अजहर शेख बाबू या तिघांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. उर्वरित सात आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
या प्रकरणाचा तपास सुरुवातीला पोलीस उपाधीक्षक पूजा पवार यांच्याकडे होता. मात्र त्या रजेवर गेल्यानंतर तपासाची जबाबदारी एम. व्यंकटराम यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. तपासादरम्यान आता तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनाही ताब्यात घेण्यात आल्याने या घोटाळ्याचा तपास अधिक वेगाने होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भूसंपादन मावेजा घोटाळा प्रकरणात प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नाव समोर आल्याने जिल्हाभरात चर्चेला उधाण आले असून आगामी काळात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

घाटनांदुरात कुलरमध्ये पाणी भरताना विजेचा धक्का; 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू

0

अंबाजोगाई – तालुक्यातील घाटनांदूर येथे मंगळवारी सकाळी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर कुलरमध्ये पाणी भरत असताना विजेचा तीव्र धक्का लागून नजीर खदीर सय्यद या २६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना सकाळी साडेआठच्या सुमारास घडली असून यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा कर्ता पुरुष अचानक गेल्याने सय्यद कुटुंबाचा आधार कायमचा हिरावला गेला आहे. नजीर हा नेहमीप्रमाणे सकाळी कामावर जाण्याच्या तयारीत असताना घरातील लोखंडी कुलरमध्ये पाणी टाकत होता. यावेळी अचानक कुलरमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने त्याला विजेचा जोरदार धक्का बसला आणि तो कोसळला. पत्नी आणि वडिलांनी तातडीने वीजपुरवठा बंद करून त्याला उपचारासाठी स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. दुर्दैवाने तिथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. नजीरच्या पश्चात पत्नी, अवघ्या आठ महिन्यांची मुलगी आणि वृद्ध आई-वडील असा परिवार आहे. घरातील एकमेव कमवता आधार गेल्याने या कुटुंबावर उपजीविकेचे मोठे संकट उभे राहिले आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून विद्युत उपकरणे वापरताना नागरिकांनी विशेषतः कुलरमध्ये पाणी भरताना वीजपुरवठा बंद ठेवण्याची काळजी घ्यावी असे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.

पाटोदा न.पं.सदस्य अपात्रता प्रकरणात निकालासाठी जिल्हाधिकाऱ्यांना ४ आठवड्यांची मुदत

0

 औरंगाबाद खंडपीठाचे आदेश 

 पाटोदा  — बीड जिल्हाधिकाऱ्यांकडे गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाटोदा नगर पंचायत सदस्य अपात्रता प्रकरणाचा निकाल पुढील चार आठवड्यांत जाहीर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. शिवभूषण लक्ष्मणराव जाधव आणि शेख मोबीन शेख हमीद यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हे निर्देश दिले.
ॲड. नरसिंह जाधव यांच्यामार्फत याचिकाकर्ते शिवभूषण लक्ष्मणराव जाधव, शेख मोबीन शेख हमीद यांनी बीड जिल्हाधिकाऱ्यांकडे (प्रतिवादी क्र. २) दाखल केलेल्या अपात्रता अर्ज क्रमांक १६७/२०२४ आणि अपात्रता अर्ज क्रमांक १६८/२०२४ वर तातडीने निकाल देण्याची मागणी याचिकेद्वारे केली होती. हा निकाल लवकरात लवकर, शक्यतो दोन आठवड्यांच्या आत लागावा अशी विनंती याचिकाकर्त्यांच्या वतीने करण्यात आली होती.
या प्रकरणावर न्यायमूर्ती श्रीमती विभा कंकणवाडी आणि न्यायमूर्ती अजित बी. कडेठाणकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान सरकारी वकिलांनी सूचनांनुसार माहिती दिली की, सदर अर्जावरील निकाल पुढील चार आठवड्यांत घोषित केला जाईल.
न्यायालयाने हे विधान हमीपत्र म्हणून स्वीकारले आणि जिल्हाधिकाऱ्यांना चार आठवड्यांच्या आत निकाल देण्याचे निर्देश देऊन ही रिट याचिका निकाली काढली.
या प्रकरणात याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. नरसिंह जाधव यांनी काम पाहिले, तर शासनाच्या वतीने एजीपी मिस नेहा बी. कांबळे यांनी बाजू मांडली.

 राजकीय दबाव ; उच्च न्यायालयाचे आदेश असतानाही प्रकरण दोन वर्षांपासून प्रलंबित

पाटोदा नगर पंचायतचे दोन सदस्य (१. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बीड- सय्यद अब्दुल्ला २. माजी नगराध्यक्ष पाटोदा- बळी पोटे) या दोघांचे नगरसेवक अपात्रता प्रकरण बीड जिल्हाधिकाऱ्यांकडे गेल्या दोन वर्षांपासून निकालासाठी प्रलंबित असून या प्रकरणात याचिकाकर्ते हे यापूर्वी देखील उच्च न्यायालयात गेले होते. कुठलाही निकाल राखीव ठेवण्यात आला तर निर्णय जाहीर लवकरात लवकर करणे अपेक्षित असते नसता सदरील निर्णयावर शंका निर्माण होऊ शकते,असे मा सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे असे असतानाही केवळ राजकीय दबाव असल्याने हे प्रकरण निकालासाठी लाल फीतीत अडकवून ठेवण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडून सुरू असल्याचे दिसून येत आहेअसी चर्चा नागरिक करत आहेत
दरम्यान जिल्हा प्रशासन राजकीय दबावाखाली अपात्रतेचे प्रकरणे २ वर्ष लावत असेल व हलगर्जीपणा करत असेल तर सर्व सामान्य जनतेला जिल्हा प्रशासनाकडून काय न्याय मिळणार आहे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

MPSC मार्फत 1700 तलाठी पदांची भरती ; खासगी कंपन्यांना रामराम

0

मुंबई — राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या तरुणांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. महसूल विभागातील तलाठी पदांची भरती आता पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून ही भरती प्रक्रिया आता थेट महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत राबवली जाणार आहे.

 गैरप्रकारांना आळा बसणार

यापूर्वी तलाठी परीक्षा खासगी कंपन्यांकडून घेतली जात होती. त्यामुळे परीक्षेत गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत होत्या. अनेक वर्षांपासून ही परीक्षा एमपीएससीमार्फत घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून आणि विविध संघटनांकडून केली जात होती. अखेर शासनाने यावर सकारात्मक निर्णय घेतला आहे.

 १७०० पदांची मोठी भरती

राज्यातील सुमारे १७०० तलाठी पदांची भरती एमपीएससीमार्फत होणार असून यासाठी सर्व विभागीय आयुक्तांकडून जिल्हानिहाय रिक्त पदांचा तपशील मागवण्यात आला आहे. प्रत्येक विभागाने ८ मे २०२६ पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 आरक्षण व आकृतीबंध तपासणी

ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे तातडीने भरण्यात येणार आहेत ‌बिंदू नामावली (Reservation Roster) मागासवर्गीय कक्षाकडून तपासली जाणार आहेत पेसा (PESA) व बिगर पेसा क्षेत्रांसाठी स्वतंत्र मागणीपत्र तयार करण्यात येणार आहे

 लवकरच जाहिरात

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अहवाल सादर झाल्यानंतर महसूल विभागाकडून अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आतापासूनच तयारीला वेग देणे आवश्यक आहे.

बीड : राष्ट्रीय महामार्गावरील “भेगा” मिटेना अन् प्रशासनाची “टीर ” बडवण्याची हौस फिटेना

0

बीड — जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाला जागोजागी मोठ्या भेगा पडलेल्या असुन या भेगांमध्ये दुचाकी वाहने अडकुन झालेल्या अपघातांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असुन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर अनेकांना अपंगत्व आले आहे. सामाजिक कार्यकर्त्यांकडून दर्जेदार दुरूस्तीसाठी वांरवार निवेदने,आंदोलनाद्वारे पाठपुरावा करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एमएससीआरडी आणि जिल्हा प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नसतानाच बीड जिल्हा प्रशासन मात्र जिल्हा रस्ते सुरक्षा समितीच्या नावाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या बैठकीत जिल्ह्यातील रस्ते अपघातातील मृत्युंच्या प्रमाणात ३३ टक्क्यांची लक्षणीय घट झाली असुन या प्रभावी कामगिरीमुळे महाराष्ट्र राज्यात बीड जिल्हा रस्ते सुरक्षेच्या बाबतीत दुसरा क्रमांक पटकावला असल्याची माहिती देत स्वत:ची टीर बडवुन घेताना दिसत असल्याची संतप्त प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबाणेशकर यांनी दिली आहे.


बीड जिल्ह्यातुन जाणारे खामगाव ते पंढरपूर, अहमदपूर ते अहिल्यानगर, पैठण ते पंढरपुर आदी राष्ट्रीय महामार्गांवर मोठमोठ्या भेगा पडलेल्या असुन भेगांमध्ये दुचाकीचे चाक अडकुन मागील ४ वर्षात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी काटेरी बाभळी आल्याने वाहनधारकांना अडथळा येत आहे तर काही ठिकाणी दुभाजकाच्या आजुबाजुला मोठ्या प्रमाणात माती साचल्याने वाहने घसरून पडण्याच्या घटना घडलेल्या आहेत. सामाजिक कार्यकर्ते यांनी लेखी तक्रारी केल्यानंतर दर्जेदार सिमेंट ब्लॉक कट करून दुरुस्ती करण्याऐवजी डांबरीकरण करून रस्त्याच्य भेगा थातुरमातुर बुजवण्यात येत असुन जिल्हा प्रशासनाचे याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याचे बोलले जाते.

रस्ते सुरक्षा समितीच्या अध्यक्ष आणि सचिवांच्या आदेशाला कंत्राटदारांकडून केराची टोपली

रस्ते सुरक्षासारख्या गंभीर विषयावर आयोजित केलेल्या बैठकीला व्हिडिओ कान्फरन्सद्वारे उपस्थित न राहिलेल्या सदस्यांबाबत जिल्हाधिका-यांनी तिव्र नाराजी व्यक्त करून कामात हलगर्जीपणा करणा-या संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असली तर रस्ते सुरक्षा समितीचे अध्यक्ष आणि सचिव यांच्या आदेशाला कंत्राटदारांकडून सुद्धा केराची टोपली दाखवली जाते. बीड तालुक्यातील अहमदपूर ते अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी मार्गावर लिंबागणेश येथील भालचंद्र विद्यालयासमोरील अपघात प्रवणक्षेत्राची दि.२६ जुन २०२५ रोजी अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि रस्ता सुरक्षा समितीचे सचिव कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग रविंद्र तोंडे यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली होती.या अनुषंगाने दि.६ नोव्हेंबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने गतिरोधक बसविण्याबाबत लेखी आदेश काढले होते. ६ महिने उलटुनही अद्याप गतिरोधक बसविण्यात आले नसुन कंत्राटदाराने या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचे दिसून येत आहे त्यामुळे एकंदरीतच जिल्हा प्रशासनाचे अधिकारी आणि कंत्राटदार दोघांवरही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे.

अंबडमध्ये अवैध वाळू उपशावर मोठी कारवाई; गेवराईच्या१५ वाळू माफियांवर गुन्हा दाखल

0

वडीगोद्री/अंबड (जालना) अंबड तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून ‘केणी’ आणि दोरखंडांच्या साहाय्याने अवैध वाळू उपसा करणाऱ्या गेवराई तालुक्यातील १५ प्रमुख वाळू माफियांवर गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशासनाच्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
प्रशासकीय तपासात असे उघड झाले की, नदीपात्रात पाणी असल्याचा फायदा घेत बीड जिल्ह्याच्या हद्दीतून लांब अंतरावर दोरखंड टाकून अंबडच्या हद्दीतील वाळू ओढून नेली जात होती. महसूल पथक नदीत पोहोचू शकणार नाही, या अंदाजावर तस्करांकडून मोठ्या प्रमाणावर वाळू चोरी सुरू होती.


१८ ते २२ एप्रिल दरम्यान प्रशासनाने वारंवार धाडी टाकून केण्यांचे दोरखंड कापून नष्ट केले होते. मात्र, तरीही तस्करांनी जेसीबी, पोकलेन आणि हायवा यंत्रसामग्रीच्या मदतीने शासकीय मालमत्तेची लूट सुरूच ठेवली. त्यामुळे प्रशासनाने अखेर कठोर पावले उचलत गुन्हे दाखल केले.
तहसीलदार विजय चव्हाण यांच्या सूचनेनुसार तलाठी पथकाने गोपनीय माहिती गोळा करून आरोपींची ओळख पटवली.

गुन्हा दाखल आरोपी (मुख्य)

माळस पिंपळगाव (ता. गेवराई)  हरी रघुनाथ सुखदेव, अंकुश पवार, वैभव डाके, शिवाजी पंडित डाके, रमेश सुखदेव, राजेंद्र बाबुराव डाके, किरण डाके, अशोक सुखदेव, रवी टेकाळे, पवन पठाडे, अजय पठाडे, प्रवीण राऊत
सावळेश्वर (ता. गेवराई), बंटी उदे, मुकेश कुटे
भांबेरी (ता. अंबड): शाहरुख अनवर शेख
तसेच राक्षसभुवन व सुरळेगाव येथील इतर साथीदारांचा समावेश
ही कारवाई जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ आणि उपविभागीय दंडाधिकारी उमाकांत पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

 प्रशासनाचा इशारा

“पर्यावरणाचा ऱ्हास आणि शासकीय मालमत्तेची संघटित चोरी करणाऱ्यांना कोणताही थारा दिला जाणार नाही. गुन्हे दाखल केल्यानंतरही तस्करी सुरू राहिली, तर आणखी कठोर कारवाई केली जाईल. आमची पथके २४ तास पाळत ठेवून आहेत,” असा इशारा तहसीलदार विजय चव्हाण यांनी दिला आहे.

पळवून नेलेल्या दोन अल्पवयीन चुलत बहिणींची सुखरूप सुटका; आरोपी उत्तर प्रदेशातून अटक

0

बीड — जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील उमापूर येथून दोन अल्पवयीन सख्या चुलत बहिणींना 5 एप्रिल 2026 रोजी पळवून नेल्याची घटना घडली होती. या घटनेने जिल्ह्यात खळबळ माजली होती. या प्रकरणी चकलांबा पोलिस ठाण्यात कलम 137(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.


या गंभीर प्रकरणाचा तपास करताना आरोपी विजय महादेव कव्हळे (रा. पळशी, ता. मुदखेड, जि. नांदेड) ह.मू. उमापूर ता. गेवराई याने मुलींना अज्ञात कारणासाठी पळवून नेल्याचे समोर आले. पोलिसांसमोर आरोपीसह मुलींचा शोध घेणे हे मोठे आव्हान होते.

 तांत्रिक तपासाने दिला मोठा धागा

तपासादरम्यान आरोपी पूर्वी भिवंडी (जि. ठाणे) येथे काम करत असल्याची माहिती मिळाली. परंतु तेथे शोध घेतला असता आरोपी व मुली सापडल्या नाहीत. त्यानंतर तांत्रिक विश्लेषणाद्वारे मुली बिहार-उत्तर प्रदेश सीमाभागात असल्याचे स्पष्ट झाले.

 उत्तर प्रदेशात धाडसी कारवाई

पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार चकलांबा पोलिसांचे विशेष पथक उत्तर प्रदेशात रवाना झाले. बलीया जिल्ह्यातील शिवपुर दियार येथे शोध घेतल्यानंतर आरोपी सिकंदरपुर येथे असल्याची माहिती मिळाली. दरम्यान स्थानिक पोलिसांच्या मदतीने केलेल्या संयुक्त कारवाईत
आरोपी विजय कव्हळे याला अटक करण्यात आली. यावेळी दोन्ही अल्पवयीन मुलींची सुखरूप सुटका करण्यात आली.
महत्त्वाची बाब म्हणजे आरोपी मुलींना पुढील काही दिवसांत छत्तीसगड येथे घेऊन जाण्याच्या तयारीत होता. मात्र त्याआधीच पोलिसांनी मोठी कारवाई करत हा कट उधळून लावला.

४ दिवसांच्या सलग प्रवासानंतर यश

चकलांबा पोलिसांच्या पथकाने सलग चार दिवस प्रवास करून ही मोहीम यशस्वी केली. दरम्यान ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत,
अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर
उपविभागीय पोलीस अधिकारी‌अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली  सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगळे, कल्याण पवार, हनुमान इंगोले आणि टेक्निकल अॅनालिसिस सेलचे शेखर औटे व विकी सुरवसे यांनी ही कारवाई पार पाडली.

नसरापूर प्रकरण: बलात्कार आरोपींना आता पॅरोल नाही!

0

मुंबई — पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे चिमुकलीवर झालेल्या अत्यंत संतापजनक अत्याचार आणि हत्या प्रकरणानंतर राज्यभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी भीमराव कांबळे याच्यावर यापूर्वीही दोन लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल होते. तरीही तो पॅरोलवर बाहेर आल्यानेच त्याला पुन्हा गुन्हा करण्याचे धाडस मिळाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा आणि कठोर निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींना यापुढे पॅरोल न देण्याचा कायदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 कायद्यात मोठा बदल होणार

राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार, अशा प्रकरणांतील 80 ते 90 टक्के आरोपी पॅरोलवर सुटल्यावर पुन्हा त्याच प्रकारचे गुन्हे करतात. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे.

2014 ते 2019 या काळातही अशा प्रकारचा कायदा लागू करण्यात आला होता, मात्र नंतर न्यायालयाने तो रद्द केला. आता पुन्हा कठोर कायदा आणण्यासाठी विधी व न्याय विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत.

 खासदार सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्री भेट

नसरापूर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘सह्याद्री’ येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की मुख्यमंत्री स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेवणार आहेत .आरोपीला कठोर शिक्षा मिळेपर्यंत पाठपुरावा केला जाईल महिला सुरक्षेसाठी आणखी कठोर कायद्यांची गरज आहे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात प्रस्तावित शक्ती कायदा पुन्हा लागू करण्याची मागणीही केली.

नसरापूर अत्याचार प्रकरणी बीडमध्ये निदर्शने

0

बीड — पुणे जिल्ह्यातील नरसापूर येथे घडलेली अल्पवयीन मुलीवरील अत्यंत निंदनीय आणि संतापजनक लैंगिक अत्याचाराची घटना संपूर्ण समाजाला हादरवून टाकणारी आहे. अशा विकृत मानसिकतेच्या नराधमांना समाजात मुळीच स्थान नाही.

या घटनेच्या निषेधार्थ आज बीड शहरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वपक्षीय नेते मोठ्या संख्येने एकत्र येऊन काढलेला मोर्चा हा केवळ निषेध नसून, न्यायासाठीचा ठाम आवाज आहे. हा जनआक्रोश शासनापर्यंत पोहोचला पाहिजे आणि यावर तात्काळ कठोर कारवाई झाली पाहिजे.

अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर फक्त निषेध पुरेसा नाही, तर आरोपीला जलदगती न्यायालयात खटला चालवून फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, अशी जनतेची ठाम मागणी आहे.

आज वेळ आली आहे ती केवळ बोलण्याची नाही, तर ठोस कृतीची. समाजातील प्रत्येक घटकाने पुढे येत अशा गुन्ह्यांविरोधात एकजुटीने लढा दिला पाहिजे.