बीड — पुणे जिल्ह्यातील नरसापूर येथे घडलेली अल्पवयीन मुलीवरील अत्यंत निंदनीय आणि संतापजनक लैंगिक अत्याचाराची घटना संपूर्ण समाजाला हादरवून टाकणारी आहे. अशा विकृत मानसिकतेच्या नराधमांना समाजात मुळीच स्थान नाही.
या घटनेच्या निषेधार्थ आज बीड शहरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वपक्षीय नेते मोठ्या संख्येने एकत्र येऊन काढलेला मोर्चा हा केवळ निषेध नसून, न्यायासाठीचा ठाम आवाज आहे. हा जनआक्रोश शासनापर्यंत पोहोचला पाहिजे आणि यावर तात्काळ कठोर कारवाई झाली पाहिजे.
अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर फक्त निषेध पुरेसा नाही, तर आरोपीला जलदगती न्यायालयात खटला चालवून फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, अशी जनतेची ठाम मागणी आहे.
आज वेळ आली आहे ती केवळ बोलण्याची नाही, तर ठोस कृतीची. समाजातील प्रत्येक घटकाने पुढे येत अशा गुन्ह्यांविरोधात एकजुटीने लढा दिला पाहिजे.




