अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत पीटीआर प्रश्नावर बैठक
बीड — गेवराई शहरातील संजयनगर, इस्लामपूरा, साठेनगर, संतोष नगर, संघमित्रनगर, भिमनगर, कोरबू गल्ली, चिंतेश्वर गल्ली, अचानकनगर आदी भागांतील अतिक्रमण धारकांना विनाविलंब पीटीआर वाटप करून घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी दि.१५ मे पूर्वी अतिक्रमण धारकांना हक्काचे पीटीआर वाटप करा असे निर्देश आ. विजयसिंह पंडित यांनी दिले. माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी पीटीआर वाटपास झालेल्या विलंबाबाबत तिव्र नाराजी व्यक्त केली. निवासी अतिक्रमणे नियमित करण्याचे महायुती सरकारचे धोरण असताना प्रशासन याकामी विलंब का करत आहे ? असा सवालही आ. विजयसिंह पंडित यांनी उपस्थित केला. शासनाच्या नवीन धोरणानुसार पात्र होणाऱ्या अतिक्रमण धारकांनी पुराव्यासह नव्याने अर्ज करण्याचे आवाहन यानिमित्ताने आ. विजयसिंह पंडित यांनी केले आहे.
गेवराई नगर परिषद हद्दीतील अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण नियमाकुल करून त्यांना हक्काचा पीटीआर वाटप करण्याचा शुभारंभ राज्याचे तत्कालीन लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री स्व.अजितदादा पवार यांच्याहस्ते गेवराई येथे करण्यात आला होता. नगर परिषद निवडणुकीपूर्वी अतिशय वेगाने सुरु असलेले हे काम निवडणुकीनंतर थांबल्यामुळे अतिक्रमण धारकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. या बाबत आ. विजयसिंह पंडित यांनी मंगळवार, दि.५ मे रोजी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीला माजी आमदार अमरसिंह पंडित, उपविभागीय अधिकारी कविता जाधव, गेवराई नगर परिषदेचे मुख्याधिकारी विक्रम मांडुरके, नायब तहसिलदार संजय सोनावणे, नगररचनाकार आकाश राठोड, भुमिअभिलेखचे उपअधिक्षक जाधव, नगर परिषदेचे अभियंता रामेश्वर कर्डिले, प्रदिप पुरी, माजी नगराध्यक्ष महेश दाभाडे, नगर परिषदेतील राष्ट्रवादीचे गटनेते शेख खाजा, नगरसेवक दादासाहेब गिरी, झोपडपट्टी हक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष कडूदास कांबळे, श्रीकृष्ण मुळे, सतिष प्रधान, सदाफुले पाटील, जफर पटेल, प्रकाश गायकवाड यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
गेवराई नगर पालिका हद्दीतील संजयनगरसह इतर भागातील अतिक्रमण धारकांच्या हक्काच्या पीटीआरचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. विधानसभा निवडणुकीनंतर आ. विजयसिंह पंडित यांनी याप्रश्नी लक्ष घालून संबंधितांना हक्काचा पीटीआर देण्याची प्रक्रिया सुरु केली. त्यांच्या प्रयत्नामुळे २२२० भूखंड धारकांचे सर्व्हेक्षण पूर्ण करून त्यांना पात्र म्हणून समितीने घोषित केले. यापैकी अनेकांना भोगवटदार प्रमाणपत्रासह पीटीआरचे वाटप करण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकूलाचा लाभ संबंधितांना मिळावा यासाठी माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली आ. पंडित यांनी प्रयत्न केले. नगर परिषद निवडणुकीची आचार संहिता लागल्यामुळे याविषयीची पुढील कार्यवाही स्थगित झाली. निवडणुकीनंतर ही सर्व प्रक्रिया स्थगित झाली. अतिक्रमण धारक वारंवार या बाबत पाठपुरावा करत असल्यामुळे संबंधितांच्या मागणीवरून आ. विजयसिंह पंडित यांनी मंगळवार, दि. ५ मे रोजी या बाबतची बैठक घेऊन पुन्हा या प्रक्रियेला गती दिली आहे. दि. १५ मे रोजी गेवराई येथे राजस्व अभियान राबविण्यात येणार असून तोपर्यंत सर्व अतिक्रमण धारकांना पीटीआरचे वाटप करावेत असे निर्देश त्यांनी या बैठकीत दिले.
राज्य शासनाने दि. २५ मार्च रोजी नवीन शासन निर्णय निर्गमित करून निवासी अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय घेतला. नवीन शासन निर्णयातील निकषाप्रमाणे जे अतिक्रमण धारक पात्र होणार आहेत त्यांनी पुराव्यासह नगर परिषदेकडे अर्ज करण्याचे आवाहन आ. विजयसिंह पंडित यांनी केले. या प्रक्रियेसाठी विशेष कॅम्प आयोजित करून सर्व अर्ज निकाली काढण्यात येतील असा विश्वास प्रशासनाच्यावतीने उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांनी या बैठकीत व्यक्त केला. अनेक अतिक्रमण धारकांनी आपली नावे वगळण्यात आली असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ज्यांची नावे यापूर्वीच्या पात्रता यादीत आहेत आणि आत्ता त्यांना पीटीआर नाकारला जात असेल तर सकारण लेखी उत्तर संबंधितांना द्यावे लागेल अशी सूचना आ. पंडित यांनी यावेळी केली. आ. विजयसिंह पंडित यांनी घेतलेल्या बैठकीमुळे गेवराई शहरातील अतिक्रमण धारकांना हक्काचा पीटीआर मिळण्याची स्थगित झालेली प्रक्रिया पुन्हा एकदा सुरु झाली असून अतिक्रमण धारकांना पीटीआर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हक्काच्या पीटीआर मुळे अतिक्रमण धारकांना घरकुला योजनेचा लाभ मिळणार आहे.




