बीड — जिल्ह्यात बालविवाहाच्या घटनांवर पोलिसांनी मोठी कारवाई करत एका दिवसात दोन ठिकाणी छापे टाकून बालविवाह थांबवला असून, एकूण तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष (AHTU) च्या पथकाने ही धडक कारवाई केली.
दहीफळ येथे १५ वर्षीय मुलीचा बालविवाह रोखला
२६ एप्रिल रोजी सकाळी पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांना गुप्त माहिती मिळाली की, दहीफळ (ता. जि. बीड) येथे १५ वर्षीय मुलीचा बालविवाह होणार आहे. पोलिसांना माहिती मिळाली त्यानुसार AHTU पथकाने घटनास्थळी पोहोचून सापळा रचला. महिला पोलिसांनी वेषांतर करून मुलीला ताब्यात घेतले, तर पुरुष पोलिसांनी नवरदेवाला पकडले.
चौकशीत मुलीने सांगितले की, तिचा विवाह इरफान बेग अन्सार बेग (वय २४, रा. माळपुरी) याच्याशी झाला आहे.
या प्रकरणात मुलगी, तिचे आई-वडील,नवरदेव व त्याचे आई-वडील,इतर नातेवाईक
यांना ताब्यात घेण्यात आले.

१० आरोपींवर गुन्हा दाखल
बालविवाह प्रतिबंधक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ अंतर्गत १० आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबरोबरच १५ ते २० वऱ्हाडी मंडळींचाही आरोपीमध्ये समावेश करण्यात आला आहे.पीडित मुलीला संरक्षणासाठी बालकल्याण समिती, बीड समोर हजर करण्याचे आदेश देण्यात आले.
जोला (ता. केज) येथे दुसरी कारवाई
केज तालुक्यातील जोला येथेही बालविवाहाची माहिती मिळाल्यानंतर आज दुपारी कारवाई करण्यात आली.मुलगी व तिच्या पालकांना यावेळी ताब्यात घेतले नवरदेव श्रीकांत जाधव व त्याच्या कुटुंबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोनगाव येथील आधीची कारवाई
१८ एप्रिल २०२६ रोजी सोनगाव (ता. जि. बीड) येथे १५ वर्षीय मुलीचा बालविवाह उघड झाला आहे. या बालविवाहात सामील झालेल्या संबंधित सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चार महिन्यांत ७ गुन्हे
AHTU बीड पथकाने एका आठवड्यात ३ गुन्हे दाखल केले तर मागील ४ महिन्यांत एकूण ७ बालविवाह प्रकरणे उघडकीस आणण्यात यश मिळवले
दरम्यान ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत,अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर
PSI पल्लवी जाधव तसेच AHTU पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.
जनतेसाठी आवाहन
पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की: बालविवाह हा कायद्याने गुन्हा आहे
अशी माहिती मिळाल्यास त्वरित पोलिसांना कळवावे

