जालना — मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत निर्णायक लढ्याची घोषणा केली आहे. ३० मेपासून तळपत्या उन्हात आमरण उपोषण सुरू करणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. या उपोषणादरम्यान ते अन्न, पाणी घेणार नसून पायात चप्पलही घालणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारला मागण्या पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ दिला असून आता आरपार लढण्याची वेळ आल्याचे सांगत जरांगे पाटील यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. गेल्या तीन वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असताना सरकार केवळ चर्चेच्या नावाखाली वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

जरांगे पाटील म्हणाले, “आता मागे हटण्याचा प्रश्नच नाही. मराठा समाजातील तरुणांचे भविष्य अंधारात गेले आहे. जर या आंदोलनादरम्यान उष्माघाताने माझा मृत्यू झाला, तर त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संपूर्ण राज्य सरकार जबाबदार असेल.”
उपोषणस्थळी मराठा समाजाने येऊ नये
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला भावनिक आवाहन करत उपोषणस्थळी गर्दी करू नये, असे सांगितले. उपोषणासाठी फक्त पत्रकारांना बसण्यासाठी छोटा मंडप उभारण्यात येणार असून स्वतः मात्र ते उघड्या उन्हातच बसणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“देशात आजवर कुठेही न झालेल्या स्वरूपाचे हे आंदोलन असेल. सरकार मराठा समाजाला संभ्रमात ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आता कठोर भूमिका घेण्याशिवाय पर्याय उरलेला नाही,” असे ते म्हणाले.
सरकारवर गंभीर आरोप
पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सातारा गॅझेट, मराठा-कुणबी नोंदी आणि आरक्षणासंदर्भातील प्रलंबित निर्णयांवर सरकारवर जोरदार टीका केली. एका महिन्यात माहिती देण्याचे आश्वासन देऊनही दहा महिने उलटले तरी कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला.
तसेच आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे अद्याप मागे घेण्यात आले नाहीत, मराठा आणि कुणबी समाज एकच असल्याचे सरकार सांगते; मात्र त्यासंदर्भातील एकत्रित शासन निर्णय (GR) काढला जात नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
१९६७ पासून मराठा समाजावर अन्याय”
मराठा समाजावर १९६७ पासून सातत्याने अन्याय होत असल्याचा आरोप करत जरांगे पाटील यांनी सरकारला जाब विचारला. आरक्षणासाठी मोर्चे, आंदोलने, न्यायालयीन लढाया आणि विविध मार्गांनी संघर्ष करूनही समाजाला अपेक्षित न्याय मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले.
“मराठा समाज फक्त मतांसाठीच हवा आहे का? समाजाचे झालेले नुकसान कोण भरून काढणार?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
आंदोलन अधिक तीव्र होण्याचा इशारा
कायद्याच्या चौकटीत राहून आंदोलन करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करत जरांगे पाटील यांनी सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. अन्यथा मराठा आरक्षण आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत असून ३० मेपासून सुरू होणाऱ्या या आमरण उपोषणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

