बीड — बसस्थानकातून घरी जाण्यासाठी रिक्षात बसलेल्या ७५ वर्षीय वृद्धाच्या हातातील सोन्याची अंगठी बळजबरीने काढून घेणाऱ्या रिक्षाचालकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. जिशान रहीम शेख (वय २६, रा. रोशनपुरा, बालेपीर, बीड) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा आणि पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा एकूण ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यात वाढणाऱ्या चोरी व घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासोबतच प्रलंबित गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून विविध पथके कार्यरत केली आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकांकडून गुन्ह्यांचा तपास सुरू आहे.
रिक्षाचालकाने वृद्धाला घराऐवजी दुसऱ्याच ठिकाणी नेले
७ सप्टेंबर २०२६ रोजी ७५ वर्षीय सिताराम सोपानराव आघाव हे बीड बसस्थानकावरून धानोरा रोड परिसरातील आपल्या घरी जाण्यासाठी रिक्षात बसले होते. रिक्षाचालकाने त्यांना घरी न नेता जालना रोडवरील साठे चौक परिसरातील सागर हॉटेलसमोरील रस्त्याच्या बाजूला रिक्षा नेली.
यानंतर त्यांच्या हातातील पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी बळजबरीने काढून घेण्यात आली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २७९/२०२६, कलम ३०४ भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुप्त माहितीवरून पाली उड्डाणपुलाखाली सापळा
गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत संशयित आरोपीबाबत माहिती मिळाली. जिशान शेख हा धुळे-सोलापूर महामार्गावरील पाली येथील उड्डाणपुलाखाली रिक्षाजवळ उभा असल्याची माहिती पथकाला मिळाली.
माहितीची खात्री करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून जिशान शेख याला ताब्यात घेतले. चौकशीनंतर त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा आणि चोरीची पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी जप्त करण्यात आली. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ९० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि बीडचे अतिरीक्त पदभार उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ, पोलीस उपनिरीक्षक खटावकर तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अर्जुन यादव, गोविंद भताने, अश्पाक सय्यद, मनोज परजणे, बबन सलगर, सचिन आंधळे, विकी सुरवसे, नितीन वडमारे आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे रवी आघाव, दिलीप राठोड, बाळू रहाडे यांनी ही कारवाई केली.




