Home क्राईम हॉटेलमध्ये वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; पीडितेची सुटका, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

हॉटेलमध्ये वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; पीडितेची सुटका, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

0
6
बीड —  दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोदावरी तांडा, लोणगाव परिसरात हॉटेलमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष (AHTU) बीडच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली असून, तीन आरोपींविरुद्ध दिंद्रुड पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 28 सप्टेंबर 2026 रोजी AHTU बीडच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक जनाबाई सांगळे यांना गुप्त बातमीदारामार्फत गोदावरी तांडा, लोणगाव येथील हॉटेल जुगाडमध्ये महिलांना बोलावून वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली. माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक अनंत्रे आणि AHTUच्या पथकाला कारवाईचे आदेश देण्यात आले.

यानंतर पोलिसांनी दोन पंच आणि डमी ग्राहकाच्या मदतीने सापळा रचला. डमी ग्राहकाने हॉटेलमध्ये जाऊन खात्री केली असता, तेथील महिलेने वेश्याव्यवसायासाठी होकार देत १ हजार रुपयांची मागणी केली. ही रक्कम बाजूला असलेल्या पुरुष एजंटकडे देण्यास सांगण्यात आले.
डमी ग्राहकाने ठरल्याप्रमाणे पैसे दिल्यानंतर पोलिसांना इशारा केला. त्यानंतर पथकाने छापा टाकून पैसे स्वीकारणाऱ्या पुरुषाला ताब्यात घेतले. त्याने आपले नाव संतोष तुकाराम चव्हाण (वय 36, रा. गोदावरी तांडा, लोणगाव, ता. माजलगाव, जि. बीड) असे सांगितले. त्याच्याकडून डमी ग्राहकाने दिलेल्या 500 रुपयांच्या दोन नोटा जप्त करण्यात आल्या.
कारवाईदरम्यान तेथे असलेल्या कोमल संतोष पवार (चव्हाण) हिचीही चौकशी करण्यात आली. तिच्याकडून 500 रुपयांच्या 11 नोटा, अशी एकूण 5 हजार 500 रुपयांची रोकड मिळून आली. ही रक्कम पंचांसमक्ष जप्त करण्यात आली.
दरम्यान, डमी ग्राहकासोबत खोलीत आढळलेल्या पीडित महिलेची पोलिसांनी विश्वासात घेऊन चौकशी केली. प्राथमिक चौकशीत तिने आपण बीड येथील रहिवासी असल्याचे सांगितले. संतोष चव्हाण आणि कोमल हे ग्राहकांकडून पैसे घेऊन त्यातील काही रक्कम तिला देत असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. खोलीची झडती घेतली असता 10 न वापरलेले निरोध आढळून आले.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी आर्थिक फायद्यासाठी पीडित महिलेला बोलावून घेतले आणि स्वतःच्या ताब्यातील जागेचा वापर करून तिच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला. या प्रकरणी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदा 1956 मधील कलम 3, 4, 5 आणि 6 अंतर्गत दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेची सुटका करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई चेतना तिडके, अपर पोलीस अधीक्षक बीड समीर शेख आणि उपविभागीय पोलीस अधिकारी माजलगाव अशोक अनंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
AHTUच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक जनाबाई सांगळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक उषा चौरे, पोलीस हवालदार अशोक शिंदे, प्रदीप येवले, गणपती बुचाले तसेच पोलीस शिपाई भाऊसाहेब कारले यांच्या पथकाने ही कारवाई केली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here