वाल्मीक कराडला विशेष सुविधा;तक्रारीनंतर बीड कारागृहातील 2 कर्मचारी निलंबित

बीड —  सरपंच संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणातील मोक्का आरोपी वाल्मिक कराड व त्याच्या साथीदारांना मिळणाऱ्या कथित विशेष सुविधांपासून ते कारागृहातील क्षमतेपेक्षा अधिक कैदी आणि अलीकडील गँगवॉरपर्यंत विविध कारणांमुळे चर्चेत असलेल्या बीड जिल्हा कारागृहावर वरिष्ठ पातळीवरून मोठी प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. कारागृहातील कामकाजातील अनियमिततेप्रकरणी दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून, इतर काही कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

बीड जिल्हा कारागृहात मोक्का प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांना नियमबाह्य सवलती, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, फोन कॉलची सुविधा तसेच विशेष वागणूक दिली जात असल्याच्या तक्रारी कारागृह महानिरीक्षक कार्यालयाकडे करण्यात आल्या होत्या. या तक्रारीसोबत काही पुरावेही सादर करण्यात आल्याची माहिती आहे.

या तक्रारींची दखल घेत वरिष्ठ पातळीवरून एका उच्चस्तरीय पथकाने बीड जिल्हा कारागृहाची अचानक तपासणी केली. या तपासणीनंतर तयार करण्यात आलेल्या गोपनीय अहवालाच्या आधारे संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

कर्तव्यात कसूर, नेमून दिलेल्या ठिकाणी गैरहजर राहणे आणि कामकाजात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी ढाकणे या कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. नेमून दिलेल्या कर्तव्याच्या ठिकाणी उपस्थित न राहता इतरत्र फिरणे आणि कामात निष्काळजीपणा केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येते.
तर मुंडे या कर्मचाऱ्यावर ज्युडिशियल कार्यालयातील महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण न करणे आणि कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

इतर कर्मचाऱ्यांनाही कारणे दाखवा नोटीस

दोन कर्मचाऱ्यांच्या निलंबनासोबतच कारागृहातील काही अन्य कर्मचाऱ्यांच्या कामकाजाबाबतही चौकशी सुरू करण्यात आली आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे.
कारागृह महानिरीक्षक कार्यालयाच्या पातळीवरून झालेल्या या कारवाईमुळे बीड जिल्हा कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे. अचानक तपासणी आणि त्यानंतर करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाईमुळे कारागृहातील कामकाजावर वरिष्ठ प्रशासनाचे लक्ष असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, कारागृहातील नियमबाह्य सुविधा आणि इतर अनियमिततेबाबत करण्यात आलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर पुढील चौकशीत आणखी काही बाबी समोर येतात का, याकडे लक्ष लागले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles