माजलगाव — माजलगाव शहराजवळ असलेल्या फुले पिंपळगाव येथील सिंदफणा पब्लिक स्कूलच्या वसतिगृहातून दहावीच्या वर्गात शिकणारे तीन विद्यार्थी रात्रीच्या जेवणानंतर बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. रात्रीच्या हजेरीवेळी तिघेही विद्यार्थी आपल्या खोलीत आढळून न आल्याने वसतिगृह व्यवस्थापन आणि पालकांची चिंता वाढली. या तिघांचा शोध घेण्यासाठी पोलिसांसह शाळा व्यवस्थापनाकडून प्रयत्न सुरू आहेत.
फुले पिंपळगाव येथील आमदार प्रकाश सोळंके हे अध्यक्ष असलेल्या सिंदफणा पब्लिक स्कूलच्या हॉस्टेलमध्ये ही घटना घडली. रात्री विद्यार्थ्यांचे जेवण झाल्यानंतर नियमित हजेरी घेण्यात आली. यावेळी दहावीतील तीन विद्यार्थी उपस्थित नसल्याचे समोर आले. त्यानंतर वसतिगृह परिसर, मैदान आणि आजूबाजूच्या भागात शोध घेण्यात आला; मात्र विद्यार्थ्यांचा ठावठिकाणा लागला नाही.
शाळेचे प्राचार्य शेख अन्वर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता विद्यार्थ्यांची नावे तेजस चव्हाण, दिनेश चव्हाण आणि अभिजीत राठोड अशी आहेत. तिघेही दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहेत. यापैकी विद्यार्थी पाथरी (जि. परभणी), नित्रुड (ता. माजलगाव, जि. बीड) आणि आष्टी (जि. बीड) परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे.
विद्यार्थी बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच संबंधित पालकांनी शाळेत धाव घेतली. मुलांचा शोध तातडीने घेण्याची मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.
हॉस्टेलच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न
तीन विद्यार्थी वसतिगृहातून नेमके कसे बाहेर पडले, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. ते मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर गेले की अन्य मार्गाचा वापर केला, याचा तपास सुरू आहे. घटनेच्या वेळी सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत होते का, सुरक्षारक्षकाची ड्युटी होती का आणि प्रवेश-निर्गमनाची नोंद झाली होती का, याचीही चौकशी केली जात आहे.
दरम्यान, या प्रकरणी माजलगाव पोलीस ठाण्यात बेपत्ता विद्यार्थ्यांची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांकडून वसतिगृह व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांची चौकशी केली जात असून, सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे.
दहावीच्या वर्गातील तीन विद्यार्थी एकाच वेळी बेपत्ता झाल्याने पालकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध शक्यता तपासल्या जात असून, तिघांचा लवकरात लवकर शोध लागण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


