Home राज्य देवस्थान इनाम कायद्याविरोधात बीडमध्ये वारकरी दिंडी; कायदा रद्द करण्याची जोरदार मागणी

देवस्थान इनाम कायद्याविरोधात बीडमध्ये वारकरी दिंडी; कायदा रद्द करण्याची जोरदार मागणी

0
9

बीड — महाराष्ट्र सरकारच्या “महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम २०२६” या प्रस्तावित कायद्याविरोधात आज बीड शहरात सकल वारकरी समाज व मंदिर संरक्षण समितीच्या वतीने वारकरी, भाविक, श्रद्धाळू आणि हिंदू धर्मप्रेमींनी जोरदार आंदोलन छेडले. हिंदू धर्मातील पुरातन मंदिरे, देवस्थान, मठ, गड आणि संस्थानांच्या जमिनी संपुष्टात आणण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप करत हा प्रस्तावित कायदा तात्काळ रद्द करावा, या प्रमुख मागणीसाठी मंगळवारी (दि.२६) छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी भव्य वारकरी दिंडी काढण्यात आली. जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.

देवस्थान इनाम जमिनी या केवळ मालमत्ता नसून त्या धार्मिक, सामाजिक व ऐतिहासिक व्यवस्थेचा आधारस्तंभ असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. देवस्थाने ही केवळ पूजा-अर्चेची ठिकाणे नसून धर्मप्रसार, संस्कृती संवर्धन, समाजजागृती आणि सामाजिक एकात्मतेची केंद्रे आहेत. प्रस्तावित अधिनियमामुळे देवस्थानांच्या मालमत्तेवर अतिक्रमण, अनाधिकृत हस्तांतरण आणि व्यापारीकरण वाढण्याची शक्यता असून भविष्यात प्रभावशाली पुढारी व धनदांडग्यांच्या ताब्यात या जमिनी जाण्याचा धोका असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात निघालेल्या दिंडीने शहराचे वातावरण भक्तिमय झाले होते. आंदोलनकर्त्यांनी “देवस्थान जमीन वाचवा”, “हिंदू धर्मावरील अन्याय बंद करा” अशा घोषणा देत शासनाचा निषेध नोंदविला.

महंतांची लक्षणीय उपस्थिती

या वारकरी दिंडीत महंत ह.भ.प. लक्ष्मण महाराज मेंगडे (बंकट स्वामी संस्थान, नेकनूर आळंदी पंढरपुरी), महंत ह.भ.प. संभाजी महाराज (उत्तराधिकारी, श्रीक्षेत्र नारायणगड), महंत ह.भ.प. तुकाराम महाराज भारती (बेलेश्वर संस्थान, बेलगाव), रामायणाचार्य ह.भ.प. नाना महाराज कदम, ह.भ.प. सुरेश महाराज जाधव, ह.भ.प. त्रिंबक महाराज मातकर, ह.भ.प. रामेश्वर महाराज जाधव, ह.भ.प. श्रीकृष्ण महाराज उबाळे, ह.भ.प. गोकुळ महाराज उबाळे आदी महंतांची लक्षणीय उपस्थिती होती.

तसेच या दिंडीत पांडुरंग महाराज शिंदे, लोखंडे महाराज, ओमतात्या खवतड, सिताराम महाराज, गजानन जोशी, मुकुंदराव खडकीकर, रविंद्र कुलकर्णी, शरद कुलकर्णी, प्रणव राखे, स्वामी महाराज हातळे, श्रीकृष्ण खोसे, महेश मुळीक, जनार्दन महाराज ढेरे, विष्णु घोलप, सुंदर नांगरे, रामहरी घोडके, लग्न महाराज गाडे, अक्षय महाराज मस्के, शरद घोलप, सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे, रामनाथ खोड, शेख युनुस, बाजीराव ढाकणे, राजेंद्र आमटे, संजय शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने वारकरी, हिंदूप्रेमी, श्रद्धाळू आणि भाविक सहभागी झाले होते.

यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात “महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम २०२६” हा प्रस्तावित कायदा तात्काळ मागे घ्यावा, पुरातन मंदिरे, देवस्थान, मठ, गड आणि संस्थानांच्या जमिनींचे संरक्षण करावे, देवस्थान जमिनींचे डिजिटल अभिलेखीकरण करण्यात यावे, तसेच इनामी आणि देवस्थान जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात आली.

तसेच देवस्थानांच्या पारदर्शक व्यवस्थापनासाठी आणि उत्पन्नवाढीसाठी स्वतंत्र धोरण राबवावे, देवस्थान जमिनींसंदर्भात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी भाविक, विश्वस्त आणि पुजारी यांची सुनावणी घ्यावी, अशाही मागण्या आंदोलनकर्त्यांनी शासनाकडे केल्या

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here