बीड — अन्न व औषध प्रशासनाची (FDA) धुरा आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांच्याकडे आल्यानंतर राज्यभरात कारवाईचा वेग वाढला असून, बीड जिल्ह्यात एफडीए ( FDA) ने मोठी धडक कारवाई केली आहे. केज तालुक्यातील उमरी फाटा येथील प्रसिद्ध ‘विशाल डेअरी’वर रात्रीच्या वेळी अचानक छापा टाकत तब्बल ६ लाख ६८ हजार रुपयांचा भेसळयुक्त आणि असुरक्षित अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईमुळे जिल्ह्यातील दूध व मिठाई व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
गुप्त माहितीनंतर FDA पथकाची कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, विशाल डेअरीमध्ये अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन होत असल्याची माहिती FDA प्रशासनाला मिळाली होती. त्यानंतर पथकाने अचानक डेअरीवर धाड टाकली. तपासणीदरम्यान डेअरी परिसरात अस्वच्छता, कीटकांचा प्रादुर्भाव तसेच अन्न साठवणुकीतील त्रुटी आढळून आल्या.
याशिवाय खरेदी-विक्रीच्या नोंदी आणि बिलांमध्येही गंभीर अनियमितता आढळल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने डेअरीचा अन्न परवाना तात्काळ निलंबित केला आहे.
बनावट पेढा तयार करून विक्रीचा संशय
FDAच्या तपासात आणखी गंभीर बाब समोर आली आहे. डेअरीमध्ये मोठ्या प्रमाणावर निकृष्ट दर्जाचा आणि आरोग्यास अपायकारक पेढा तयार केला जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
हा पेढा बीड जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यांमधील काही प्रसिद्ध देवस्थानांमध्ये प्रसाद म्हणून विक्रीसाठी पाठवला जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
FDAचा इशारा; दोषींवर कठोर कारवाई होणार
अन्न पदार्थांमध्ये भेसळ करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या कारवाईनंतर जिल्ह्यातील इतर दूध डेअरी आणि मिठाई विक्रेत्यांमध्येही तपासणीची धास्ती निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे, या ‘विशाल डेअरी’वर आधीही प्रशासनाने कारवाई केली होती. मात्र, तरीही नियमांना केराची टोपली दाखवून ही डेअरी राजरोसपणे सुरूच होती. अखेर अन्न सुरक्षा कायद्याचे वारंवार उल्लंघन केल्यामुळे एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली ही अत्यंत कडक कारवाई करण्यात आली.




