Home Blog Page 21

नेकनूर : अप्पर तहसील कार्यालयाच्या स्थापनेची प्रक्रिया वेगाने; प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध

0

नेकनूर — बीड तालुक्यातील नेकनूर येथे नवीन अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले असून, उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी कार्यालय, बीड यांनी याबाबतची प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नेकनूरच्या प्रशासकीय मागणीला आता प्रत्यक्ष स्वरूप मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

महसूल व वन विभाग, मंत्रालय मुंबई यांच्या आदेशानुसार बीड तालुक्यात नेकनूर येथे नवीन अप्पर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या कार्यालयाच्या मुख्यालय व अधिकार क्षेत्राबाबतची जाहीर सूचना प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया सुरू असताना विधान परिषद निवडणुकीमुळे लागू झालेल्या आचारसंहितेमुळे ती स्थगित ठेवण्यात आली होती. आता आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर ही प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांनी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप अधिसूचनेनुसार महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ मधील तरतुदींनुसार नेकनूर येथे अप्पर तहसीलदार कार्यालय कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यानुसार अप्पर तहसीलदार, नेकनूर यांना संबंधित क्षेत्रातील महसुली अधिकार व कर्तव्ये प्रदान करण्यात येणार आहेत.

कार्यालयाचे मुख्यालय नेकनूरमध्ये

प्रारूप अधिसूचनेनुसार अप्पर तहसीलदार कार्यालयाचे मुख्यालय मौजे नेकनूर येथील शासकीय अध्यापक विद्यालय परिसरात प्रस्तावित करण्यात आले आहे. या मध्ये चार मंडळांचा समावेश नवीन अप्पर तहसील कार्यालयाच्या अधिकार क्षेत्रात खालील चार महसूल मंडळांचा समावेश करण्यात आला आहे नेकनूर,येळंबघाट, मांजरसुंबा,चौसाळा, लिंबागणेश या मंडळांतील सर्व सज्जे तसेच गाव, वाड्या, तांडे आणि वस्त्या यांचा समावेश अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात राहणार आहे.

ग्रामस्थांमध्ये समाधान

नेकनूर हे बीड तालुक्यातील सर्वात मोठ्या गावांपैकी एक असून मोठी बाजारपेठ, शैक्षणिक व प्रशासकीय केंद्र म्हणून ओळखले जाते. अप्पर तहसील कार्यालय सुरू झाल्यास परिसरातील हजारो नागरिकांना महसूलविषयक कामांसाठी बीडला वारंवार जावे लागणार नाही. त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांची मोठी बचत होणार आहे.

कार्यान्वयनाची प्रतीक्षा

प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध झाल्याने आता अंतिम अधिसूचना व कार्यालयाच्या प्रत्यक्ष कार्यान्वयनाकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. शासनाने लवकरात लवकर आवश्यक कर्मचारी, पायाभूत सुविधा व प्रशासकीय यंत्रणा उपलब्ध करून देऊन नेकनूर येथील अप्पर तहसील कार्यालय सुरू करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

नेकनूर येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याबाबत शासनाने प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध केल्यामुळे नेकनूर व परिसरातील जनतेच्या अनेक वर्षांच्या मागणीला मूर्त स्वरूप मिळण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. बीड तालुक्यातील सर्वात मोठे गाव, मोठी व्यापारी बाजारपेठ आणि ३० ते ३५ हजार लोकसंख्या असलेल्या नेकनूरसह परिसरातील ६० ते ७० गावांतील नागरिकांना महसूलविषयक कामांसाठी बीड येथे जावे लागते. त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांचा मोठा अपव्यय होतो.
अप्पर तहसील कार्यालय कार्यान्वित झाल्यास उत्पन्न दाखले, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखले, फेरफार, जमिनीशी संबंधित विविध महसुली कामे तसेच शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे प्रशासन अधिक लोकाभिमुख होईल आणि ग्रामीण भागातील नागरिकांना जलद व प्रभावी सेवा उपलब्ध होतील. प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध झाल्यामुळे नेकनूरच्या प्रशासकीय विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल पडले असून आता शासनाने सर्व आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करून कार्यालय प्रत्यक्ष सुरू करावे, अशी परिसरातील जनतेची अपेक्षा आहे. अप्पर तहसील कार्यालय सुरू झाल्यास नेकनूरच्या विकासाला नवी गती मिळेल आणि परिसरातील लाखो नागरिकांचे प्रशासकीय प्रश्न स्थानिक पातळीवर सुटण्यास मदत होईल.”
              – अशोक शिंदे
पत्रकार तथा ग्रामपंचायत सदस्य, नेकनूर

राज्यात १२ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या;  सरकारकडून फेरबदलांचा धडाका कायम

0

मुंबई —  विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने पोलीस दलात पुन्हा एकदा मोठे फेरबदल केले आहेत. गृह विभागाने मंगळवारी (दि.२३) राज्यातील १२ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.
काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने ५२ आयपीएस अधिकारी आणि ४४ राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आल्याने प्रशासकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
या बदल्यांमध्ये सर्वात महत्त्वाची नियुक्ती म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांची नागपूर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर नागपूरचे विद्यमान पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अपर पोलीस महासंचालकपदी बदली करण्यात आली आहे.
महायुती सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा वेग वाढला असून आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये सातत्याने फेरबदल सुरू आहेत. नव्या आदेशांमुळे पोलीस प्रशासनात मोठी खांदेपालट पाहायला मिळत आहे.

महत्त्वाच्या बदल्या :

प्रशांत मोहिते — पोलीस उप आयुक्त, छत्रपती संभाजीनगर शहर → पोलीस उप आयुक्त, डायल ११२, नवी मुंबई
निलभ रोहन — पोलीस अधीक्षक, हिंगोली → पोलीस अधीक्षक, नांदेड
अभिनाश कुमार — पोलीस अधीक्षक, नांदेड → पोलीस उप आयुक्त, पुणे शहर
श्रेणिक लोढा — अपर पोलीस अधीक्षक, खामगाव → पोलीस अधीक्षक, हिंगोली
रुपाली अंबुरे — पोलीस उप आयुक्त, डायल ११२, नवी मुंबई → पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ
शशिकांत सातव — पोलीस उप आयुक्त, नागपूर → पोलीस उप आयुक्त, छत्रपती संभाजीनगर
रमेश धुमाळ — पोलीस उप आयुक्त, अमरावती → पोलीस उप आयुक्त, नागपूर
पीयुष जगताप — समादेशक, एसआरपीएफ गट क्र.१७ चंद्रपूर → अपर पोलीस अधीक्षक, खामगाव
नारायण शिरगांवकर — समादेशक, एसआरपीएफ गट क्र.१३ गडचिरोली → समादेशक, एसआरपीएफ गट क्र.१९ कुसळगाव, अहिल्यानगर
प्रांजली सोनावणे — पोलीस अधीक्षक, गुप्तवार्ता विभाग, अमरावती → पोलीस उप आयुक्त, अमरावती शहर

विलास घुलें प्रकरणाचा सखोल तपास करून कार्यवाहीचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

0

मुंबई —  बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात तीन दिवसांपूर्वी घडलेल्या विलास घुले हत्या प्रकरणी आज माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत कै. विलास घुले यांच्या हत्या प्रकरणी सखोल तपास करून हत्या प्रकरणातील सर्व दोषींना तअटक करून शिक्षा व्हावी, याबाबत लेखी स्वरूपात निवेदन दिले.

आपल्या पत्रात धनंजय मुंडे या संपूर्ण प्रकरणात वस्तुनिष्ठ व सर्व बाजूंनी तपास केला जावा व पीडितांना न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणातील दोषींना शासन कठोर शिक्षा करेल, असे आश्वासन दिले आहे.

सदर हत्या प्रकरणाने संपूर्ण बीड जिल्हा ढवळून निघाला असून, धनंजय मुंडे यांनी आज सकाळी विधानसभेत या प्रकरणी आवाज उठवला होता. त्यानंतर पोलिस यंत्रणा अधिक जोमाने तपासात सक्रिय झाली असून आतापर्यंत या प्रकरणात नऊ पैकी सहा आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. अजूनही हजारो लोक केज पोलिस ठाण्यात ठिय्या मांडून बसले असून न्यायासाठी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

दरम्यान आ. धनंजय मुंडे यांनी या प्रकरणात सर्व बारकावे तपासून सर्व दोषींवर कठोर कारवाई करावी व पीडित कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा, अशी भूमिका घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.

एसपींना कर्तव्याची जाणं नाही अन् आंदोलनाशिवाय न्याय नाही? ; घुले हत्या प्रकरण जैसे थे च!

0

सर्वसामान्यांच्या न्यायाचं काय?

बीड / केज — टाकळी येथील हॉटेल चालक विलास घुले हे वाद सोडवायला गेल्यानंतर त्यांचा खून झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. घटनेला चार दिवसाचा कालावधी उलटला असला जनता रस्त्यावर उतरली असली विधानसभेत लोकप्रतिनिधींना आवाज उठवावा लागला.

आयजींना छ. संभाजीनगर मधून बीडमध्ये डेरे दाखल व्हावे लागले त्या वेळेला पोलीस अधीक्षकांना जाग आली अन् आंदोलकांना सामोरे जाण्याची उपरती आली. कुटुंबीयांनी मृतदेह पोलीस ठाण्यात आणून ठेवला मात्र तीन तासाहून अधिक काळ आंदोलकांना ठाण्याबाहेर ठेवून केज पोलीस ठाण्यात चर्चेचं गुऱ्हाळ कोणासोबत गाळत बसलेत असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. दरम्यान बीडमध्ये आंदोलनाशिवाय न्यायच मिळत नाही असं चित्र सध्यातरी निर्माण झालेला आहे.


गेल्या एक ते दीड वर्षांमध्ये बीडच्या कायदा सुव्यवस्थेची लक्तरं वेशीवर टांगण्याचं काम होत असल्याचं पाहायला मिळतं. जिल्ह्यात झालेल्या खून प्रकरण असोत की अपहरणासारखे गंभीर गुन्ह्यांमध्ये न्यायासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात अथवा पोलीस ठाण्यात दुःख बाजूला सारून आंदोलन करण्याची वेळ आणली जात असल्याचं प्रत्येक घटना मधून उघड होत आहे. जनतेमधून एसपींच्या कारभारावर प्रश्नचिन्ह जोपर्यंत निर्माण केले जात नाही तोपर्यंत गुन्हाच दाखल होत नाही ही नव्याने कावतांनी त्यांनी सुरू केलेली परंपरा अजूनही कायम असल्याने केज सह बीडमध्ये आंदोलक आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे त्याला कारणही तसंच घडलं आहे.केजच्या टाकळी येथील हॉटेलचालक विलास घुले या तरुण व्यावसायिकाचा निर्घृण खून झाला. या विषयाला गंभीर वळण मिळाले. शनिवारी हत्येची घटना घडल्यानंतर मंगळवारी, २३ जून २०२६ रोजी केज शहरात नवा संघर्ष पाहायला मिळाला.
संतप्त नातेवाईक आणि टाकळीच्या गावकऱ्यांनी विलास घुले यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यास नकार देत मृतदेह केज पोलीस ठाण्यात आणून ठेवला. या घटनेनंतर प्रचंड खळबळ उडाली.आंदोलनकर्त्यांनी आज दिवसभर प्रचंड घोषणाबाजी करत रस्ते अडवून धरले बंद पाळण्यात आला. शहरासह जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले.विलास घुलेच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी आणि गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार समोर यावा एवढीच न्याय अपेक्षा ठेवत आंदोलनाचा मार्ग स्वीकारला हजारोंच्या संख्येने सकाळपासून आंदोलक रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले.सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश क्षीरसागर यांनी अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात थांबून विलास घुले याच्या पार्थिवाची उत्तरीय तपासणी करून घेतली आणि दुपारी साडेबारा वाजता मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. मात्र, नातेवाईकांनी हा मृतदेह गावाकडे न नेता, दुपारी ठीक ३ वाजता केज पोलीस ठाण्याच्या प्रांगणात आणून ठेवला आणि तिथेच ठिय्या मांडला.या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत एकूण 9 आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यापैकी 6 आरोपींना अटक केली असली मात्र,आंदोलक व घुले कुटुंबातील मारेकऱ्यांचा मुख्य कट ज्या उमेश मानेवर हल्ला करण्याचा होता, त्याची दुसरी स्वतंत्र फिर्याद पोलिसांनी नोंदवून घ्यावी या संपूर्ण कटाच्या मागे केजचे स्थानिक खासदार बजरंग सोनवणे यांचे सुपुत्र सौरव सोनवणे यांचा हात असल्याचा आरोप करत, त्याला मुख्य आरोपी बनवून त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करावा. गुन्ह्यातील सर्व 9 आरोपींना त्वरित अटक करावी आणि स्थानिक पोलिसांऐवजी ‘एसआयटी’ (SIT) नियुक्त करून या प्रकरणाचा तपास सीआयडी किंवा विशेष पथकामार्फत करावा.अशी मागणी केली जात आहे. पोलीस खात्यातील आयपीएस अधिकाऱ्यांची शिष्टाई देखील गेल्या चार दिवसापासून फेल गेल्याच चित्र आंदोलकांच्या आक्रमक पावित्र्यामुळे निर्माण झालं.

न्यायासाठी विधानसभेत आवाज उठला

दरम्यान विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, नमिता मुंदडा यांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली.

आयजीनां यावे लागले बीडमध्ये

छ.संभाजीनगरचे आयजी विलास घुले हत्या प्रकरण विधानसभेत गाजल्यानंतर  आय जी वीरेंद्र मिश्रा बीडला आले. तरीही पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी एसी केबिन न सोडता “जे होईल ते पाहून घेऊ” अशी भूमिका घेतल्याने आय जी स्वतः केज कडे रवाना झाले. त्यावेळी एस पी मात्र खडबडून जागे झाले. आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी आयजींना ओव्हरटेक करत नेकनुर हून पुढे निघून गेले. त्यानंतर आयजी बीडमध्ये वापस आले.

चर्चेच गु-हाळ चालूच?

एस पी नवनीत कांवत केज पोलीस ठाण्यात गेल्यानंतर आंदोलकांना त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर काढले. आंदोलकांनी तिथेही ठिय्या दिला. याच दरम्यान लक्ष्मण हाके देखील आंदोलनामध्ये सहभागी झाले. आंदोलक बाहेर असताना पोलीस अधीक्षक गेल्या तीन साडेतीन तासापासून चर्चेच गुऱ्हाळ गाळत बसले आहेत. अजूनही या प्रकरणात तोडगा निघाला नाही. दरम्यान सगळे आंदोलक बाहेर असताना एस पी कोणा सोबत चर्चेच गु-हाळ गाळत बसले आहेत हे त्यांनाच ठाऊक असल्याचं संतप्त आंदोलक चर्चा करताना दिसत आहेत.

एस पीं ची भूमिका बघू करू ची च !

गेल्या चार दिवसापासून विलास घुले हत्या प्रकरण गाजत असताना शनिवारी बीडमध्ये आलेले एस पी बघू करू च्या च भूमिकेत असल्याचा पाहायला मिळालं. मी सोमवारी अधीक्षक पदाचा कारभार घेतला असं त्यांनी सांगितलं असलं तरी दोन दिवस होत आले तरी कुठली तर भूमिका त्यांनी घेतली नाही. आंदोलकांना शांत करण्याची व प्रकरण थंड करण्याची जबाबदारी चेतना तिडके व एम वेंकटरम यांच्यावर सोपवून एस पी नी बघ्याची भूमिका घेतली. आज मंगळवारी सकाळी देखील आंदोलकांनी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून आंदोलन केले.तरी त्या आंदोलकांना सामोरे जाण्याची भूमिका पोलीस अधीक्षकांनी घेतलीच नाही.

विलास घुले च्या भावाचं स्टेटमेंट घेणार नंतर भूमिका ठरवणार?

दिवंगत विलास घुले यांचे बंधू रमेश घुले यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेत एसपींनी चर्चा सुरू केली आहे. त्याचा स्टेटमेंट घेऊन खासदार पुत्राचा या हत्या प्रकरणात सहभाग आहे का? हे पाहून कारवाई करणार असल्याची भूमिका कांवत यांनी घेतली आहे. याला देखील एक तासाहून अधिक कालावधी उलटला आहे.
दरम्यान या प्रकरणात काय कारवाई होते. पोलीस अधीक्षक काय भूमिका घेतात? घुले कुटुंबियांना न्याय मिळेल का? यासारखे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

पोलिस प्रशासनाला योग्य दिशेने तपास करण्याचे निर्देश द्या ; मुंडेंची गृहमंत्र्यांना साद

0

विलास घुलेच्या न्यायासाठी धनंजय मुंडेंचा विधानसभेत पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन

चौथ्या दिवशी मृतदेह कुटुंबियांनी स्वीकारला नाही, हे अतिशय गंभीर – धनंजय मुंडे

मुंबई  — वीस जूनच्या रात्री केज तालुक्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेत हत्येचा कट रचून हल्ला एकावर केला मात्र सोडवण्यासाठी आलेल्या विलास घुले याच्यावर वार करून हत्या करण्यात आली. हे संपूर्ण प्रकरण पूर्वनियोजित कट असून याचा खरा सूत्रधार कोण, याचा शोध घेऊन विलास घुले याला न्याय मिळावा यासाठी केजमध्ये हजारो लोक घुले कुटुंबियांच्या सोबत रस्त्यावर उतरले आहेत, त्यामुळे पोलिस प्रशासनाने या प्रकरणात आरोपींची सर्व पाळे – मुळे खोदून काढत खरा सूत्रधार कोण आहे, याचा तपास करावा, अशी मागणी माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी आज विधानसभेत पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून केली आहे.्विलास घुले या निष्पाप तरुणाला विनाकारण आपले प्राण गमवावे लागले, याचा तीव्र निषेध करत कुटुंबीय व हजारो नागरिक रस्त्यावर उतरले असून, हत्येच्या आज चौथ्या दिवशी सुद्धा मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करण्यास घुले कुटुंबियांनी नकार दिला आहे. दुसरीकडे हजारो नागरिक रस्त्यावर उतरले असुन केजमध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आला असून, पोलिस ठाणे व अन्य ठिकाणी रस्ता रोको आंदोलन सुरू आहे.

दरम्यान हे प्रकरण अत्यंत गंभीर असून, या प्रकरणी कट रचून एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला तर दुसऱ्या व्यक्तीची हत्या असा दुहेरी गुन्हा घडलेला असून, पोलिस प्रशासनाने सर्व बाजूंनी वस्तुनिष्ठ तपास करून मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन सर्व आरोपींना अटक करावी, याबाबत केज पोलिसांना निर्देश दिले जावेत, अशी मागणी केली. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी धनंजय मुंडे यांच्या मागणीची तात्काळ दखल घेऊन योग्य कार्यवाहीचे निर्देश गृह विभागाला दिले आहेत.

एलसीबी ची मोठी कारवाई; रात्रीच्या वेळी दुचाकी स्वारांना लुटणारे चौघे जेरबंद

0

बीड —  धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर समनापूर शिवारातील छत्रपती संभाजी महाराज चौक परिसरात दुचाकीस्वाराला अडवून लुटमार करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला आहे. पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याकडून लुटीची 23 हजार रुपयांची रोकड आणि गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी जप्त केल्या आहेत.
16 जून 2026 रोजी रात्री सुमारे 2.30 वाजण्याच्या सुमारास राधेशाम नंदलाल पारीख (वय 42, रा. विप्रनगर, पेठबीड) हे दुचाकीवरून पाली येथून बीडकडे येत होते. यावेळी समनापूर शिवारातील राष्ट्रीय महामार्गावर चार अनोळखी इसमांनी त्यांना अडवून चापटांनी मारहाण केली आणि त्यांच्या खिशातील 23 हजार रुपये रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली होती.
या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 222/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 309(6) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.


या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि श्रीराम खटावकर व त्यांच्या पथकाने सुरू केला होता. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्यात आली.पोलीस अंमलदार अशफाक सय्यद यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार या लुटीमागे आवेजखान परवेजखान व त्याचे साथीदार असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पथकाने बार्शीनाका परिसरातून चौघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये —
आवेजखान परवेजखान (वय 25, रा. हिना पेट्रोल पंपामागे, बार्शीनाका, बीड),अनिकेत ऊर्फ चिक्या विश्वास डोंगरे (वय 23, रा. प्रकाश आंबेडकर नगर, बार्शीनाका, बीड),अविनाश शैलेंद्र ससाणे (वय 22, रा. पंचशीलनगर, बीड)
विवेकानंद दिलीप गलांडे (वय 26, रा. पंचशीलनगर, बीड) यांचा समावेश आहे.
स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींकडून 23 हजार रुपयांची रोकड आणि गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकली जप्त केल्या आहेत. आरोपींना मुद्देमालासह बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास सपोनि श्री. सोनवळे हे करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोउपनि श्रीराम खटावकर तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अशोक दुबाले, सोमनाथ गायकवाड, बाळू सानप, अर्जुन यादव, राहुल शिंदे, अशफाक सय्यद, मनोज परजणे, अश्वीन सुरवसे, व  नितीन वडमारे यांनी केली आहे.

बीडमध्ये शाळांच्या वेळेत बदल; 23 जूनपासून सकाळच्या सत्रात भरणार

0

बीड — जिल्ह्यात वाढलेल्या तापमानामुळे आणि उष्माघाताचा धोका लक्षात घेता जिल्हा परिषद शिक्षण विभागाने प्राथमिक शाळांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आता जिल्हा परिषदेच्या शाळा 23 जून 2026 पासून पुढील आदेश येईपर्यंत सकाळच्या सत्रात भरवण्यात येणार आहेत.
जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक) यांनी याबाबत आदेश काढून सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार शाळेची वेळ सकाळी 8 वाजेपासून दुपारी 12.30 वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.


बीड जिल्ह्यात यंदा पावसाला झालेला विलंब, तसेच ‘अल निनो’च्या प्रभावामुळे वातावरणातील बदल अधिक तीव्र झाले आहेत. परिणामी तापमानात वाढ झाली असून विद्यार्थ्यांना उष्णतेमुळे त्रास होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उष्माघात, निर्जलीकरण आणि उष्णतेशी संबंधित आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
या संदर्भात जिल्हाधिकारी तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेतर सेना आणि प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांकडूनही शाळांच्या वेळेत बदल करण्याबाबत जिल्हा परिषदेकडे निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, पुढील आदेश येईपर्यंत जिल्ह्यातील संबंधित शाळांनी सकाळच्या वेळेतच नियमित कामकाज सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

अवैध वाळू उपसा :आवाज उठवणाऱ्या सरपंचावर हल्ला; आरोपींच्या अटकेसाठी गेवराईत रास्ता रोको

0

गेवराई (बीड) —  अवैध वाळू उपशाविरोधात सातत्याने आवाज उठवणाऱ्या नागझरी येथील सरपंच नारायण शिंदे यांच्यावर वाळू माफियांनी घरात घुसून हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर आरोपींना अद्याप अटक न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाचा निषेध केला.
सरपंच नारायण शिंदे हे मागील काही महिन्यांपासून गोदावरी नदीपात्रातून सुरू असलेल्या कथित अवैध वाळू उपशाविरोधात प्रशासनाकडे तक्रारी करत होते. याच कारणातून हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.


हल्लेखोरांनी घरात घुसून शिंदे यांना धमकी दिल्याची माहिती समोर आली असून, घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही उपलब्ध झाल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणात तातडीने कारवाई करून आरोपींना अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
नागझरी सरपंच नारायण शिंदे व त्यांच्या कुटुंबीयांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवार (दि.२२) रोजी सकाळी १० वाजता बीड-जालना मार्गावरील राक्षसभुवन फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात नागझरीसह खामगाव, आगरनांदर, सावळेश्वर, म्हाळस पिंपळगाव, गंगावाडी आणि राक्षसभुवन परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. आंदोलकांनी “दोषींना तात्काळ अटक करा”, “सरपंच कुटुंबाला संरक्षण द्या”, “वाळू माफियांचा बंदोबस्त करा” अशा घोषणा देत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.
दरम्यान, पोलिसांनी आरोपींवर कठोर कारवाई करून त्वरित अटक करावी आणि सरपंच कुटुंबाला सुरक्षा द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

विषारी हातभट्टी दारूने तरुणाचा मृत्यू; नातेवाईक आक्रमक, पोलिस ठाण्यासमोर ठिय्या

0

परळी (बीड) —  पुण्यात विषारी हातभट्टी दारूमुळे झालेल्या मृत्यूंची घटना ताजी असतानाच बीड जिल्ह्यातही अशीच घटना समोर आली आहे. परळी शहरातील साठेनगर भागात हातभट्टीची विषारी दारू प्यायल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.


मृत तरुणाच्या नातेवाईकांनी परळी शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली. दारूबंदी करा, अन्यथा मृतदेह पोलिस ठाण्यात आणून ठेवू, असा आक्रमक इशारा नातेवाईकांनी दिला.
नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, साठेनगर परिसरात अवैध हातभट्टी दारू विक्री सुरू असल्याची माहिती यापूर्वी अनेक वेळा पोलिसांना देण्यात आली होती. तसेच दारूबंदी करण्यासाठी नागरिकांनी निवेदने आणि आंदोलनेही केली होती. मात्र, यावर प्रभावी कारवाई झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला.
तरुणाच्या मृत्यूनंतर संतप्त नागरिकांनी दारू विक्रेत्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पुणे येथील विषारी दारू प्रकरणात ज्या प्रकारे कारवाई करण्यात आली, त्याच धर्तीवर परळीतील प्रकरणातही कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणात पोलिस प्रशासनाकडून काय कारवाई केली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुळुकवाडीत मध्यरात्री धाडसी चोरी; ३ तोळे सोने अन् ५० हजारांची रोकड लंपास

0

 साडेचार लाखांचा ऐवज लंपास

लिंबागणेश — बीड तालुक्यातील मुळुकवाडी येथे मध्यरात्री चोरट्यांनी घर फोडून सुमारे साडेचार लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे.

मुळुकवाडी येथील संदिप अंबादास ढास हे गाय आजारी असल्याने रात्री शेतात मुक्कामी होते. दरम्यान मध्यरात्री सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास द्वारकाबाई ढास यांना शेजारील खोलीत आवाज आल्याने जाग आली. त्यांनी घराच्या गच्चीवर झोपलेल्या प्रतिक्षा ढास यांना याची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी फोनवरून शेतात असलेल्या संदिप ढास यांना चोरीची माहिती दिली.

संदिप ढास यांनी तातडीने घरी येऊन पाहणी केली असता घरातील दोन्ही कपाटे फोडलेल्या अवस्थेत आढळून आली. कपडे अस्ताव्यस्त पडलेले होते तसेच सोन्याचे दागिने ठेवण्याच्या डब्या उघड्यावर पडलेल्या दिसून आल्या. घरातील ३ तोळे सोने आणि खत खरेदीसाठी ठेवलेली ५० हजार रुपयांची रोकड असा एकूण सुमारे साडेचार लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे त्यांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच नेकनुर पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी मंगेश साळवे व लिंबागणेश पोलीस स्टेशनचे राठोड यांना फोटो व व्हिडिओ पाठवून घटनेची माहिती दिली. याप्रकरणी नेकनूर पोलिस घटनास्थळी भेट देऊन कारवाई करणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान नेकनूर पोलीस ठाणे हद्द चंद्रकांत गोसावी यांच्या कार्यकाळात चोरट्यांसाठी नंदनवन झाले होते. नेकनूर चे प्रभारी पोलीस अधिकारी मंगेश साळवे चोरट्यांना आळा घालण्यात कितपत यशस्वी होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात असून

चोरट्यांचा शोध घेऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.