तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी शपथ घेताच 200 युनिट मोफत वीज, महिला सुरक्षा आणि अंमली पदार्थविरोधी विशेष पथकाच्या निर्णयांवर स्वाक्षरी केली. DMK सरकारवर 10 लाख कोटींच्या कर्जाचा आरोप करत श्वेतपत्रिका जाहीर करण्याची घोषणा.
तामिळनाडूच्या राजकारणात मोठा बदल घडवत तमिळगा वेत्री कळघम (TVK) चे प्रमुख सी.जोसेफ विजय (C. Joseph Vijay) यांनी शनिवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी मोठे निर्णय घेत राज्याच्या प्रशासनाला वेग दिला आहे. सुपरस्टार ते मुख्यमंत्री असा प्रवास करणाऱ्या विजय यांनी शपथविधीनंतर थेट सचिवालय गाठत जनतेला दिलेल्या आश्वासनांच्या अंमलबजावणीला सुरुवात केली.
200 युनिट मोफत वीज देण्याचा निर्णय
मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर विजय यांनी घरगुती ग्राहकांना 200 युनिट मोफत वीज देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. विधानसभा निवडणुकीत दिलेल्या प्रमुख आश्वासनांपैकी हा एक महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. याशिवाय महिलांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष सुरक्षा पथके स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले.
राज्यात वाढत्या अंमली पदार्थांच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्वतंत्र विशेष पथक उभारण्याचाही निर्णय सरकारने घेतला आहे. पहिल्याच दिवशी घेतलेल्या या निर्णयांमुळे विजय सरकार जनहिताच्या मुद्द्यांवर आक्रमकपणे काम करत असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
डीएमके (DMK) सरकारवर 10 लाख कोटींच्या कर्जाचा आरोप
मुख्यमंत्री विजय यांनी शपथविधीनंतर लगेचच माजी सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) सरकारवर गंभीर आर्थिक आरोप केले. 2021 ते 2026 या कालावधीतील राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर लवकरच श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
“मागील सरकारने राज्यावर तब्बल 10 लाख कोटी रुपयांचे कर्ज टाकले आहे. राज्याची खरी आर्थिक स्थिती जनतेसमोर आणली जाईल,” असे विजय यांनी स्पष्ट केले. पारदर्शक प्रशासन देण्याचा पुनरुच्चार करत त्यांनी निवडणूक जाहीरनाम्यातील प्रत्येक आश्वासन पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
सत्तेचे एकच केंद्र असेल’
राज्यातील राजकीय समीकरणे आणि अल्पमताच्या चर्चांदरम्यान विजय यांनी प्रशासनात कोणतेही दुहेरी सत्ताकेंद्र नसल्याचे स्पष्ट केले. “सरकारमध्ये निर्णय घेणारे एकच नेतृत्व असेल आणि त्याची जबाबदारी मी स्वतः स्वीकारेल,” असे ते म्हणाले.
विधानसभेत अनेक छोट्या पक्षांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन झाल्याने राज्याच्या स्थिरतेबाबत प्रश्न उपस्थित होत होते. मात्र शिक्षण, आरोग्य, अन्नपुरवठा आणि महिला सुरक्षा या चार क्षेत्रांना सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचे विजय यांनी सांगितले.
विरोधकांनाही सोबत घेण्याचा प्रयत्न
मुख्यमंत्री म्हणून केलेल्या पहिल्याच भाषणात विजय यांनी संयमी आणि समन्वयाची भूमिका घेतली. “ज्यांनी माझ्यावर टीका केली, अपमान केला तेही माझेच लोक आहेत,” असे भावनिक वक्तव्य करत त्यांनी विरोधकांनाही विकासाच्या प्रवासात सहभागी होण्याचे आवाहन केले.
त्यांच्या या भूमिकेमुळे तामिळनाडूच्या राजकारणातील कटुता कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जनतेने दिलेल्या संधीचा पूर्ण उपयोग करून सर्व आश्वासने पूर्ण करण्यासाठी सरकार काम करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

