मुलांसमोरच पतीने पत्नीला पेटवले; बीडमध्ये खळबळ

बीड — तालुक्यातील पिंपळनेर येथे चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, हा संतापजनक प्रकार त्यांच्या निष्पाप मुलांच्या डोळ्यांसमोर घडला. आईला वाचवण्यासाठी मुलांनी ‘पप्पा, मम्मीला मारू नका’ अशी विनवणी केली; मात्र आरोपी पतीने मुलांच्या आक्रोशाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे.

या घटनेत अनुष्का शिरसाट या गंभीररित्या भाजल्या असून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मिलिंद शिरसाट याच्याविरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चारित्र्याच्या संशयातून पत्नीला त्रास?

मिळालेल्या माहितीनुसार, अनुष्का शिरसाट या अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे पती मिलिंद शिरसाट हे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत त्यांना वारंवार त्रास देत असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, अनुष्का यांना अंगणवाडीतून मिळणारा पगारही पतीकडून जबरदस्तीने स्वतःच्या बँक खात्यात जमा करून घेतला जात असल्याचा आरोप आहे.

घटनेच्या दिवशीही दोघांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर गंभीर हिंसक प्रकारात झाले. आरोपानुसार, संतापलेल्या मिलिंदने घरात ठेवलेले पेट्रोल पत्नीच्या अंगावर ओतले आणि तिला पेटवून दिले.

‘पप्पा, मम्मीला मारू नका…’

आईच्या अंगावर पेट्रोल ओतल्याचे पाहून मुलांनी वडिलांना थांबवण्याचा प्रयत्न केला. ‘पप्पा, मम्मीला मारू नका,’ अशी आर्त विनवणी करत मुलांनी मध्यस्थी केली. मात्र त्यानंतरही अनुष्का यांना पेटवून दिल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली आहे.

घाटीत उपचार; कठोर शिक्षेची मागणी

घटनेत गंभीर भाजलेल्या अनुष्का यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

पोलिसांनी रुग्णालयात अनुष्का यांचा जबाब नोंदवला. या जबाबात त्यांनी आरोपी पतीविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. ‘या नराधमाला कठोर शिक्षा करा आणि जन्मठेप द्या,’ अशी मागणी त्यांनी केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, या घटनेनंतर पिंपळनेर परिसरात संताप व्यक्त होत असून आरोपीविरोधात कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पिंपळनेर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles