Home जिल्हा बीड शहरातील वाढती वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आ.संदीप क्षीरसागरांनी केली रिंग रोडची मागणी

बीड शहरातील वाढती वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आ.संदीप क्षीरसागरांनी केली रिंग रोडची मागणी

0
12

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींची भेट; डीपीआर तयार करण्याचे दिले निर्देश

बीड — बीड शहरात वाढणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि भविष्यातील विकासाचा विस्तार लक्षात घेता, शहराच्या पश्चिम भागाला जोडणाऱ्या नवीन बाह्यवळण (रिंग रोड) बायपास रस्त्याची मागणी आ.संदीप क्षीरसागर‌ यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. मंगळवारी (दि.११) रोजी आ.संदीप क्षीरसागर यांनी या संदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन दिले. या मागणीची तातडीने दखल घेत केंद्रीय मंत्री गडकरी यांनी संबंधित यंत्रणेला या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.आ.क्षीरसागर यांनी मागणी केलेला रिंग रोड बाह्यवळण रस्ता शहराच्या पश्चिम भागाला जोडणारा असून, तो नामलगाव फाटा (NH-52) ते म्हसोबा फाटा (NH 361F) ते पाली (NH-52) असा असणार आहे.
सध्या बीड शहरात अवजड आणि बाहेरील वाहनांमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. यामुळे नागरिकांना दैनंदिन प्रवासात नाहक त्रास सहन करावा लागत असून अपघातांचा धोकाही वाढला आहे. हा बायपास रस्ता पूर्ण झाल्यास शहरातील मुख्य रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण लक्षणीयरीत्या कमी होईल. तसेच बीडच्या आर्थिक विकासाला गती मिळणार आहे. बीड शहराचा वाढता विस्तार आणि नागरिकांची होणारी गैरसोय पाहता हा बायपास होणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे केवळ प्रवास सुरक्षित आणि सुलभ होणार नाही, तर बीड शहराच्या आणि परिसराच्या आर्थिक गतिविधींना मोठी चालना मिळणार असल्याचे आ.क्षीरसागर म्हटले आहे. या महत्त्वपूर्ण रस्त्याच्या कामाला लवकरात लवकर मंजुरी देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी त्यांनी या भेटीदरम्यान केली आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रस्तावाचे गांभीर्य ओळखून सकारात्मक प्रतिसाद दिला असून, प्रशासनाला तातडीने पुढील पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. बीडच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा करत राहू आणि शहराच्या विकासाच्या वाटचालीत कोणतीही कमतरता राहू देणार नाही, असा विश्वास आ. संदीप क्षीरसागर यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here