Home Blog Page 22

निर्णय अचानक नाही, चार महिन्यांपासून तयारी होती’; ओमराजे प्रकरणावर अंधारेंचा दावा”

0

मुंबई — धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या राजकीय भूमिकेबाबत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी रविवारी (दि. २१) जोरदार प्रतिक्रिया दिली. दिल्ली दौऱ्यानंतर सह्या देण्याच्या घडामोडींवर भाष्य करताना त्यांनी ओमराजेंनी आधी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन भूमिका स्पष्ट करायला हवी होती, असे म्हटले.


“दिल्लीला जाण्यापूर्वी मेळावा घ्यायला हवा होता. आता जाऊन आले आणि सह्या दिल्या. गेल्या चार महिन्यांपासून हा निर्णय शिजत होता,” असा दावा अंधारे यांनी केला. तसेच ओमराजे निंबाळकर यांच्यासमोर निर्माण झालेल्या परिस्थितीला त्यांनी ‘चक्रव्यूह’ संबोधत ते कसे भेदणार, असा सवाल उपस्थित केला.
ओमराजे निंबाळकर यांनी वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणात २० वर्षे न्यायासाठी लढा दिला आहे. मात्र न्यायालयाचा निकाल अपेक्षेप्रमाणे न लागल्याने त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसल्याचे अंधारे यांनी सांगितले. “त्यांच्या संघर्षाबद्दल आमच्या भावना आणि सद्भावना आहेत,” असेही त्या म्हणाल्या.

खासदारांच्या कुटुंबीयांवर विश्वास ठेवणार नाही : अंधारे

ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांच्या कन्या आणि नगरसेविका राजुल पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यावर बोलताना अंधारे यांनी सावध भूमिका घेतली.
“खासदारांची मुलं आमच्यासोबत आहेत म्हणून आम्ही भ्रमात नाही. लोकसभा अध्यक्षांसोबत झालेल्या बैठका आणि हॉटेलमधील चर्चांचे व्हिडिओ आमच्याकडे आहेत,” असा दावा त्यांनी केला.

नागेश आष्टीकर यांच्या कारणांवरही प्रश्नचिन्ह

खासदार नागेश आष्टीकर यांच्या भूमिकेवरही सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली. “मान मिळत नव्हता, असे सांगितले जाते. मग उमेदवारी कशी मिळाली?” असा सवाल त्यांनी केला.
दिल्लीत झालेल्या बैठकीत कोण-कोण सहभागी होते याची माहिती असल्याचे सांगत त्यांनी काही बैठका आणि चर्चांचा उल्लेख केला. तसेच आपल्याला धमक्या येत असल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार दिल्याचेही त्यांनी सांगितले.

ओमराजेंची मनधरणी करण्याचे ठाकरे गटाचे प्रयत्न

दरम्यान, पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील न्यायालयीन निकालानंतर ओमराजे निंबाळकर यांच्याशी संवाद साधण्यासाठी ठाकरे गटाकडून प्रयत्न सुरू आहेत.
ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील आणि वरुण सरदेसाई यांनी पुण्यात ओमराजे निंबाळकर यांची भेट घेतली होती. या भेटीत सुमारे तासभर चर्चा झाल्याची माहिती आहे.
याच काळात उद्धव ठाकरे आणि ओमराजे निंबाळकर यांच्यात फोनवरून संवाद झाल्याचेही सांगण्यात आले. “आपणच मला मोठं केले आहे. आज मी खासदार आहे ते पक्षामुळे आणि तुमच्यामुळे. कोणताही निर्णय घेतलेला नाही. कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढची भूमिका ठरवेन,” अशी भूमिका ओमराजेंनी मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सगळ्या गोष्टी माध्यमांसमोर सांगणे योग्य नाही”

वरुण सरदेसाई यांनी भेटीबाबत बोलताना सांगितले की, ओमराजे यांच्या कुटुंबाला न्यायालयीन निकालामुळे मोठा धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर काही विषयांवर चर्चा झाली.
“ज्या-ज्या गोष्टींची चर्चा झाली, त्या माध्यमांसमोर सांगणे योग्य नाही. चर्चा करायची असती तर आम्ही उघडपणे भेटलो असतो,” असे सरदेसाई म्हणाले.

उद्धव ठाकरे भावुक; पक्ष सोडणाऱ्या खासदारांवर निशाणा, मतदारांची मागितली जाहीर माफी

0

मुंबई — शिवसेनेतील सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाण्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी पक्ष सोडण्याच्या तयारीत असलेल्या खासदारांवर निशाणा साधत संबंधित मतदारसंघातील जनतेची जाहीर माफी मागितली.

“बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर आणि माझ्या आवाहनावर विश्वास ठेवून लोकांनी आम्हाला मतदान केले. पण ज्यांना जनतेने निवडून दिले, तेच आता पक्ष सोडून जात आहेत. त्यामुळे त्या मतदारसंघातील जनतेची मी माफी मागतो,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

सध्याच्या राजकीय घडामोडींवर टीका करताना ठाकरे यांनी लोकशाहीबाबतही चिंता व्यक्त केली. “लोकांचा आता लोकशाहीवरील विश्वास कमी होत चालला आहे. हे असेच सुरू राहिले तर देश अराजकतेकडे जाऊ शकतो,” असा इशारा त्यांनी दिला.

पक्षप्रमुख पदावरून होत असलेल्या आरोपांवर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, “मला पदाची हाव असती तर मी विधान परिषदेत गेलो असतो. गेली अनेक वर्षे मी पक्षप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. माझ्यावर कार्यकर्त्यांना वेळ देत नसल्याचा आरोप केला जात आहे. जर शिवसैनिकांना तसे वाटत असेल तर मी पक्षप्रमुख पद सोडायलाही तयार आहे.”

मात्र शिवसेना चुकीच्या हातात जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. “ही सोन्यासारखी शिवसेना गद्दारांच्या किंवा चोरट्यांच्या हाती द्यायची नाही. एखाद्या निष्ठावान शिवसैनिकाला पक्षप्रमुख करण्याची वेळ आली तरी मी तयार आहे. मी खचणारा नाही, तर जबाबदारी स्वीकारणारा आहे,” असे ठाकरे म्हणाले.

वाळू चोरीच्या तपासासाठी अति.पोलीस अधिक्षकांच्या नेतृत्वात एस.आय.टी. स्थापन करा – आ. विजयसिंह पंडित

0

चकलांबा पोलीस ठाण्यातील वाळूचोरीच्या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग

गेवराई — श्री क्षेत्र राक्षसभुवन (शनिचे) येथील गोदावरी नदीपात्रात झालेल्या अवैध वाळू उत्खनन शासकीय खनिज संपत्तीची अवाढव्य चोरी, डिजिटल डाटा चोरी यांसह तहसिलदार सारख्या लोकसेवकांनी पदाचा गैरवापर करून शासनाची आर्थिक फसवणुक केल्याप्रकरणी चकलांबा पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्र.१९९/२०२६ च्या तपासासाठी अति.पोलीस अधिक्षक यांच्या नेतृत्वात एस.आय.टी. स्थापन करून त्यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास देण्याची मागणी आ. विजयसिंह पंडित यांनी केली आहे. याप्रकरणी त्यांनी प्रभारी पोलीस अधिक्षक श्रीमती चेतना तिडके यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन दिले. गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेऊन सदर गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करत असून नियमित पोलीस अधिक्षक रुजू झाल्यानंतर एस.आय.टी. बाबत कार्यवाही होईल असे आश्वासन प्रभारी पोलीस अधिक्षक श्रीमती चेतना तिडके यांनी दिले.

घरकुल लाभार्थ्यांना मोफत पाच ब्रास वाळू उपलब्ध करून देण्याच्या शासनाच्या धोरणातील तरतुदीचा गैरफायदा घेऊन गेवराईचे तहसिलदार संदिप खोमणे व इतरांनी संगणमताने विनापरवाना अवैध वाळूघाट सुरु करून १०० कोटी रुपयांचे सिंडीकेट चालविल्याचा गंभीर आरोप गेवराईचे आ. विजयसिंह पंडित यांनी केला होता. त्यांनी केलेल्या तक्रारीनंतर प्रशासन खडबडून जागे झाले. श्री क्षेत्र राक्षसभुवन (शनिचे) येथील नदीपात्रात अवैध मार्गाने २५,६४२ ब्रास वाळूचे अवैध उत्खनन, चोरी करून सार्वजनिक संपत्तीचे नुकसान केल्याप्रकरणी चकलांबा, ता.गेवराई पोलीस ठाणे येथे गु.र.नं.०१९९/२०२६ नुसार दि.१६.०६.२०२६ रोजी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ६१ (२) (अ), ३०५ (इ), ३१६ (५), ३१८ (४), ३३६ (३), ३४० (२), ३ (५) माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील कलम ६६ (क), ६६ (ड), पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ मधील कलम १५, सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम १९८४ मधील कलम ३ (१) नुसार १९ व्यक्तिंच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या प्रकरणी शुक्रवार, दि.१९ जून रोजी आ. विजयसिंह पंडित यांनी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि प्रभारी पोलीस अधिक्षक श्रीमती चेतना तिडके यांची भेट घेतली. गुन्ह्याची व्याप्ती, आरोपीतांच्या यादीत चकलांबा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश यांसह तहसिलदार सारख्या पदावर काम करणाऱ्या व्यक्तिचा भविष्यात आरोपी म्हणून समावेश होण्याची शक्यता आणि गुन्ह्यात सामील असलेले माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलमे, पर्यावरण संरक्षण अधिनियमातील कलमे आदी गंभीर स्वरुपांच्या कलमांचा समावेश असल्यामुळे याचा तपास पोलीस दलातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांकडे देण्याची आवश्यकता असल्याची बाब आ. पंडित यांनी पोलीस अधिक्षक यांच्या निदर्शनास आणून दिली. गुन्ह्यामध्ये प्रथमदर्शनी जरी १७,६६,२२,०९६ रुपये किमतीच्या मालमत्तेच्या चोरीचा उल्लेख असला तरी भविष्यात तपासामध्ये या सर्व बाबी सुमारे १०० कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अति.पोलीस अधिक्षक यांच्या नेतृत्वाखाली विशेष एस.आय.टी.ची स्थापना करून या गुन्ह्याचा तपास पारदर्शकपणे करावा अशी लेखी मागणी आ. विजयसिंह पंडित यांनी यावेळी केली.

या प्रकरणातील दोषी तहसिलदार यांच्या विरुध्द चौकशी समितीने शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित केलेली असतानाही या बाबत कार्यवाही करण्यासाठी विलंब होत असल्याची बाब आ. पंडित यांनी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या निदर्शनास आणून दिली. जिल्हाधिकारी, बीड यांचेकडून आजच संदिप खोमणे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. या प्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नाही असेही आ. विजयसिंह पंडित यांनी याबाबत माहिती देताना सांगितले.

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा; तर..! २९ ऑगस्टपासून पुन्हा उपोषण

0

जालना — मराठा आरक्षणाच्या मागणीवरून आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास २९ ऑगस्ट २०२६ पासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. विशेष म्हणजे हा दिवस त्यांच्या आंदोलनाचा तिसरा वर्धापनदिन असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकार आपल्याला राजकीय ‘बळीचा बकरा’ बनवण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्यासाठीही आपण तयार असल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. यावेळी सरकारी प्रतिनिधी म्हणून प्रसाद लाड तसेच काही वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. त्यांच्या समोरच जरांगे यांनी आपल्या मागण्या आणि नाराजी मांडली.

आरक्षणाच्या निर्णयांची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप

यापूर्वी झालेल्या आंदोलनानंतर सरकारने मराठा समाजासाठी काही निर्णय घेतले होते. शासन निर्णय (GR), कुणबी प्रमाणपत्र प्रक्रियेला गती आणि आंदोलनातील मृतांच्या कुटुंबीयांना मदतीचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, हे निर्णय प्रत्यक्षात राबवताना प्रशासनाकडून अडथळे निर्माण केले जात असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला.
त्यांच्या म्हणण्यानुसार, अनेक नागरिकांना प्रमाणपत्रांसाठी अजूनही सरकारी कार्यालयांचे फेरे मारावे लागत आहेत.

जुन्या नोंदी रोखल्याचा आरोप

जरांगे पाटील यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत पश्चिम महाराष्ट्रातील कराड येथे मोठ्या प्रमाणावर ऐतिहासिक नोंदी उपलब्ध असल्याचे सांगितले. तसेच मराठवाड्यातील काही भागांतही जुन्या कागदपत्रांच्या पडताळणीला विलंब होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
या नोंदी मोडी लिपीत असल्याने पडताळणीच्या नावाखाली प्रक्रिया रखडवली जात असल्याचे त्यांनी म्हटले.

‘कुणबी नोंदी गायब केल्या जात आहेत’ असा दावा

महसूल विभागावर टीका करत जरांगे यांनी जुन्या नोंदी पोर्टलवरून गायब केल्या जात असल्याचा आरोप केला. वैध कागदपत्रांच्या आधारे हक्क मिळणाऱ्या नागरिकांवर अन्याय होऊ नये, अशी मागणी त्यांनी केली.
“ओबीसी आरक्षणात बदल करण्याची आमची भूमिका नाही; मात्र ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांचे अधिकार मिळाले पाहिजेत,” असे जरांगे यांनी स्पष्ट केले.

स्वतंत्र मराठा-कुणबी मंत्रालयाची मागणी

मराठा-कुणबी समाजाच्या प्रश्नांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याची मागणीही त्यांनी केली. तसेच प्रलंबित आदेशांची शैक्षणिक वर्षापासून तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी केली.
२९ ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्रात पुन्हा मोठे आंदोलन उभारले जाईल, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.
दरम्यान, आमदार प्रसाद लाड यांनी सरकारच्या वतीने या मागण्या मुख्यमंत्री यांच्यासमोर मांडून सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.

विवाहित महिलेचे अपहरण करून लैंगिक अत्याचार; हातपाय बांधून शेतात फेकले, गुन्हा दाखल

0

बीडगेवराई तालुक्यात एका विवाहित महिलेचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर पीडितेला रात्रभर डांबून ठेवत मारहाण केल्याचा आरोप असून, याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेवराई तालुक्यातील एका गावातील विवाहित महिला शेतात काम करत असताना आरोपींनी तिच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. महिलेचा प्रतिकार मोडून काढत तिला जबरदस्तीने घेऊन गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
यानंतर पीडितेवर अत्याचार करण्यात आल्याचा आरोप असून, या घटनेत सहभागी असलेल्या इतर आरोपींनी तिच्यासोबत मारहाण केल्याचेही सांगण्यात आले आहे. आरोपींनी महिलेला रात्रभर एका ठिकाणी ठेवून पहाटेच्या सुमारास गावाजवळील शेतात सोडून दिल्याची माहिती आहे.
महिला घरी परतली नसल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. त्यानंतर ती गंभीर अवस्थेत आढळून आली. कुटुंबीयांनी तिला तातडीने बीड जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी रुग्णालयात जाऊन पीडितेचा जबाब नोंदवला. पीडितेच्या फिर्यादीवरून अपहरण, अत्याचार आणि मारहाणीच्या कलमांनुसार पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी तपास सुरू केला असून, विशेष पथकांकडून पुढील कारवाई केली जात असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे नगरसेवक पद धोक्यात;कुणबी प्रमाणपत्र ठरले अवैध 

0

बीड — गतवर्षी पार पडलेल्या माजलगाव नगर पालिका निवडणुकीमध्ये ओबीसीसाठी आरक्षीत जागेवर मराठा कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे निवडणुक लढवून विजयी झालेल्या रेखा आंबुरे यांच्या कुणबी प्रमाणपत्रावर पराभूत उमेदवार सुमनबाई मुंडे यांनी आक्षेप घेतला होता. या प्रकरणी सुनावणी होवून जिल्हा समितीकडून कुणबी जात प्रमाणपत्र अवैध असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर हे प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश दिल्याने रेखा आंबुरे यांचे नगरसेवकपद धोक्यात आले आहे.
माजलगाव तालुक्यातील खळवट लिंबगाव येथील मुळ रहिवासी रेखा अंकुशराव आंबुरे, सासरचे नाव रेखा प्रल्हादराव सरोदे यांनी इतर मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र उपलब्ध करत इतर मागास प्रवर्गासाठी राखीव असलेल्या वार्डातून माजलगाव नगर पालिका निवडणुक लढवली. या निवडणुकीत त्यांचा विजय झाला. त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या सुमनबाई मुंडे यांनी रेखा आंबुरे यांच्या असलेले कुणबी प्रमाणपत्र अवैध असल्याची तक्रार यांनी जात पडताळणी समितीकडे केली होती. या अर्जावर आणि पुराव्यावर सखोल सुनावणी झाली. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिलेल्या निर्णयानुसार रेखा अंकुशराव आंबुरे यांच्या कुणबी जातीचा दावा नियमानुसार अमान्य करण्यात आला आहे. त्यांचे कुणबी प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश पारित करण्यात आले. सदर निर्णय जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष शरद कुलकर्णी, सदस्य उमेश सोनवणे, सदस्य सचिव श्रावस्ती मिश्राम यांच्या त्रिसदस्यीय समितीने एकमताने कुणबी प्रमाणपत्र अवैध असल्याचा निर्णय दिला. पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि माजलगावचे मुख्याधिकारी यांना अधिकृत प्रत पाठवून दिली. तक्रारदाराच्या वतीने अ‍ॅड.विकास मिसाळ यांनी काम पाहिले तर त्यांना अ‍ॅड.दीपक कुलकर्णी, अ‍ॅड.उदय दराडे यांनी सहकार्य केले. रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध असल्यामुळे त्यांचे नगरसेवकपद धोक्यात आले आहे.

शिंदे गटाच्या कार्यक्रमात खासदारांच्या प्रवेशाची शक्यता;मुंबई पोलिस सतर्क

0

मुंबई  — शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठाकरे गटातील काही खासदारांनी स्वतंत्र गट असल्याचे पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिल्याची माहिती समोर आली आहे. हे खासदार लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या घडामोडींनंतर ठाकरे गटात तीव्र नाराजी पसरली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी फुटलेल्या खासदारांवर जोरदार टीका करत त्यांचा उल्लेख ‘गद्दार’ असा केला आहे. तसेच त्यांना धडा शिकवण्याची भाषा त्यांनी केली आहे.

दरम्यान, 19 जून रोजी शिवसेनेचा 60 वा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून स्वतंत्र कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. खासदारांच्या संभाव्य प्रवेशामुळे या कार्यक्रमांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

शिवसेना शिंदे गटाचा वर्धापन दिन मुंबईतील नेस्को, गोरेगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात ठाकरे गटातील काही खासदार शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. यामध्ये संजय दिना पाटील, भाऊसाहेब वाकचौरे, संजय जाधव, नागेश आष्टीकर, संजय देशमुख आणि ओमराजे निंबाळकर या नावांची चर्चा आहे.

तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचा वर्धापन दिन षण्मुखानंद सभागृहात होणार आहे. दोन्ही कार्यक्रमांना मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

खासदारांच्या फुटीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. शिंदे गटाच्या नेस्को येथील कार्यक्रमादरम्यान ठाकरे गटाकडून निषेध आंदोलन होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

दोन्ही गटांचे आक्रमक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर पोलिस यंत्रणा लक्ष ठेवणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष शाखेचे अपर पोलिस आयुक्त डॉ. प्रविण मुंढे यांनी पोलिस अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

रस्त्यांवरील बॅनरबाजीला लगाम; नियमभंग केल्यास कारवाईचा इशारा

0
बीड — शहरातील रस्ते, चौक तसेच विद्युत खांबांवर बेकायदेशीरपणे बॅनर लावून अतिक्रमण करू नये, यासाठी जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी शहरातील बॅनर लावणार्‍या युवकांची बैठक घेऊन त्यांना आवश्यक सूचना दिल्या.
या बैठकीत शहरातील चौक, रस्ते व इलेक्ट्रिक पोलवर कोणत्याही परिस्थितीत बॅनर, फ्लेक्स किंवा जाहिरातीचे फलक लावू नयेत, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या. अशा प्रकारचे बॅनर वाहतुकीस अडथळा निर्माण करण्याबरोबरच अपघातास कारणीभूत ठरू शकतात, याकडे उपस्थितांचे लक्ष वेधण्यात आले.
तसेच, नगर परिषदेकडून आवश्यक परवानगी घेतल्याशिवाय कोणतेही बॅनर किंवा जाहिरात फलक उभारू नयेत, असे नियम समजावून सांगण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत बॅनर लावल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
शहरातील वाहतूक सुरळीत राहावी, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान टळावे आणि शहराचे सौंदर्य अबाधित राहावे, यासाठी नागरिकांनी व युवकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रभारी पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी केले.

गेवराई वाळू घोटाळा :खोमणे वर गुन्हा दाखल करण्याची व एसआयटी चौकशीची मागणी

0

गेवराई — तहसीलदार संदीप खोमणेवर १०० कोटी रुपयांच्या महसूल घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची तसेच अवैध वाळू उत्खनन प्रकरणाची एसआयटी किंवा आर्थिक गुन्हे शाखेमार्फत निष्पक्ष चौकशी करण्याची गोदावरी बचाव सर्व पक्षीय कृती समितीने केली आहे.गुरुवारी (दि.१८) जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन या सदर्भात निवेदन सादर केले असून, या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

समितीने निवेदनात गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्यावर कथित १०० कोटी रुपयांच्या महसूल घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे शासनाचा मोठ्या प्रमाणावर महसूल बुडाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
निवेदनानुसार, गेवराई तालुक्यात परवानगी नसतानाही मोठ्या प्रमाणावर वाळू उत्खनन, वाहतूक आणि साठवणूक करण्यात आली. याबाबत वारंवार तक्रारी करूनही संबंधित यंत्रणांकडून प्रभावी कारवाई झाली नाही, असा आरोप समितीने केला आहे.

तपास एसआयटी किंवा आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्याची मागणी

या प्रकरणाचा तपास चकलंबा पोलिसांकडून काढून स्वतंत्र यंत्रणेकडे देण्यात यावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. चकलंबा पोलिसांवरही समितीने आरोप केले असून, संपूर्ण प्रकरणाची एसआयटी किंवा आर्थिक गुन्हे शाखेमार्फत निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच महसूल विभाग, पोलीस प्रशासन आणि वाळू माफिया यांच्यातील कथित आर्थिक व्यवहारांची चौकशी करावी, अशी मागणी समितीने केली आहे.

विना नंबर हायवा वाहतुकीवरही प्रश्नचिन्ह

अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या विना नंबर हायवा वाहनांवर कारवाई होत नसल्याचा आरोप करत आरटीओ आणि वाहतूक विभागातील संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

अपघात आणि नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित

अवैध वाळू वाहतुकीदरम्यान झालेल्या अपघातांमुळे नागरिकांना जीव गमवावा लागल्याचा मुद्दाही समितीने उपस्थित केला आहे. त्यामुळे हे प्रकरण केवळ महसूल नुकसानीपुरते मर्यादित नसून सार्वजनिक सुरक्षेशी संबंधित गंभीर विषय असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
समितीने या प्रकरणातील दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून शासनाचा महसूल वसूल करावा, अशी मागणी केली आहे. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, महसूल मंत्री, विभागीय आयुक्त, पोलीस अधीक्षक यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवण्यात आल्या आहेत.
दरम्यान, लवकर कारवाई न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा गोदावरी बचाव सर्व पक्षीय कृती समितीने दिला आहे.

अंगणवाडीच्या आहारात मोठा बदल! मिळणार चविष्ट , पौष्टिक पदार्थासह नवीन पाककृतींचा समावेश

0

मुंबई — अंगणवाडीतील बालके, गरोदर महिला, स्तनदा माता आणि आकांक्षित जिल्ह्यांतील किशोरवयीन मुलींना देण्यात येणाऱ्या घरपोच आहारात (THR) आता पोषणमूल्यांसोबत चवीलाही महत्त्व देण्यात आले आहे. लाभार्थ्यांना अधिक रुचकर आणि पौष्टिक आहार मिळावा यासाठी नवीन पाककृतींचा समावेश करण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS) अंतर्गत देण्यात येणाऱ्या घरपोच आहाराचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः पोषण आहाराच्या गुणवत्तेची तपासणी केली.

घरपोहोच (THR) आहारात नवीन बदल

केंद्र शासनाच्या निकषानुसार सध्या लाभार्थ्यांना प्रीमिक्स स्वरूपात घरपोच आहार दिला जातो. मात्र, लाभार्थ्यांचा प्रतिसाद, क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या सूचना आणि तज्ज्ञांच्या शिफारशी लक्षात घेऊन आहाराच्या गुणवत्तेत बदल करण्यात आले आहेत.

‘एनर्जी डेन्स मूग डाळ खिचडी प्रीमिक्स’मधील घटकांच्या मिश्रणात सुधारणा करण्यात आली असून आता चव आणि दर्जा टिकवण्यासाठी मसाल्याचे पाकीट स्वतंत्रपणे उपलब्ध करून दिले जाणार आहे.

व्हेज पुलाव’ आणि ‘मल्टीग्रेन पफ’चा समावेश

नवीन बदलांमध्ये आहारात दोन नवीन पाककृतींचा समावेश करण्यात आला आहे.

व्हेज पुलाव

मल्टीग्रेन पफ

याशिवाय आरोग्यासाठी उपयुक्त असलेली ‘मल्टी मिक्स सिरियल्स अँड प्रोटीन्स’ ही पाककृती कायम ठेवण्यात आली आहे.

पोषणमूल्यांची गुणवत्ता कायम

नवीन पाककृतींमध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या प्रमाणानुसार उष्मांक, प्रथिने आणि आवश्यक सूक्ष्म पोषकतत्त्वांचा (Micronutrients) समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना चविष्ट आहारासोबत योग्य पोषण मिळणार आहे.

कुपोषण कमी करण्यासाठी सरकारचा प्रयत्न

राज्यात कुपोषण कमी करण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. मागील काही वर्षांत कुपोषणाच्या प्रमाणात घट झाल्याचा दावा करण्यात आला असून नवीन पाककृतींमुळे लाभार्थ्यांची आहाराबाबतची स्वीकार्यता वाढेल, असा विश्वास महिला व बालविकास विभागाने व्यक्त केला आहे.

आहारातील बदल करण्यापूर्वी राज्यभर सर्वेक्षण करण्यात आले होते. तसेच वैद्यकीय अधिकारी, आहारतज्ज्ञ आणि तज्ज्ञ संस्थांचे मत घेण्यात आले असल्याची माहिती डॉ. अनुपकुमार यादव यांनी दिली.