Home Blog Page 23

केजमधील उमरी फाटा येथे एफडीएची कारवाई! ‘विशाल डेअरी’वर छापा; ६.६८ लाखांचा भेसळयुक्त मुद्देमाल जप्त

0

बीड — अन्न व औषध प्रशासनाची (FDA) धुरा आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांच्याकडे आल्यानंतर राज्यभरात कारवाईचा वेग वाढला असून, बीड जिल्ह्यात एफडीए ( FDA) ने मोठी धडक कारवाई केली आहे. केज तालुक्यातील उमरी फाटा येथील प्रसिद्ध ‘विशाल डेअरी’वर रात्रीच्या वेळी अचानक छापा टाकत तब्बल ६ लाख ६८ हजार रुपयांचा भेसळयुक्त आणि असुरक्षित अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईमुळे जिल्ह्यातील दूध व मिठाई व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

गुप्त माहितीनंतर FDA पथकाची कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, विशाल डेअरीमध्ये अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन होत असल्याची माहिती FDA प्रशासनाला मिळाली होती. त्यानंतर पथकाने अचानक डेअरीवर धाड टाकली. तपासणीदरम्यान डेअरी परिसरात अस्वच्छता, कीटकांचा प्रादुर्भाव तसेच अन्न साठवणुकीतील त्रुटी आढळून आल्या.
याशिवाय खरेदी-विक्रीच्या नोंदी आणि बिलांमध्येही गंभीर अनियमितता आढळल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने डेअरीचा अन्न परवाना तात्काळ निलंबित केला आहे.

बनावट पेढा तयार करून विक्रीचा संशय

FDAच्या तपासात आणखी गंभीर बाब समोर आली आहे. डेअरीमध्ये मोठ्या प्रमाणावर निकृष्ट दर्जाचा आणि आरोग्यास अपायकारक पेढा तयार केला जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
हा पेढा बीड जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यांमधील काही प्रसिद्ध देवस्थानांमध्ये प्रसाद म्हणून विक्रीसाठी पाठवला जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

FDAचा इशारा; दोषींवर कठोर कारवाई होणार

अन्न पदार्थांमध्ये भेसळ करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या कारवाईनंतर जिल्ह्यातील इतर दूध डेअरी आणि मिठाई विक्रेत्यांमध्येही तपासणीची धास्ती निर्माण झाली आहे.

विशेष म्हणजे, या ‘विशाल डेअरी’वर आधीही प्रशासनाने कारवाई केली होती. मात्र, तरीही नियमांना केराची टोपली दाखवून ही डेअरी राजरोसपणे सुरूच होती. अखेर अन्न सुरक्षा कायद्याचे वारंवार उल्लंघन केल्यामुळे एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली ही अत्यंत कडक कारवाई करण्यात आली.

राजकारणात मोठा भूकंप? ठाकरे गटातील खासदारांबाबत ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा; उद्याच्या बैठकीकडे लक्ष

0

मुंबई — महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेले ‘ऑपरेशन टायगर’ आता प्रत्यक्षात येत असल्याचा दावा सूत्रांकडून केला जात आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटातील सहा खासदारांचा स्वतंत्र गट तयार करून तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत विलीन करण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. मात्र या राजकीय घडामोडींना सध्या काही अडथळे निर्माण झाल्याचेही सांगितले जात आहे.

ठाकरे गटाचा व्हीप; उद्या ठरणार खासदारांचे भवितव्य

या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपल्या खासदारांना व्हीप बजावला आहे. संसदीय दलाची तातडीची बैठक उद्या सकाळी ११ वाजता बोलावण्यात आली आहे. बैठकीला अनुपस्थित राहणाऱ्या खासदारांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पक्षाकडून देण्यात आल्याचे समजते.

ठाकरे गटाने संभाव्य फुटीच्या पार्श्वभूमीवर कायदेशीर सल्लाही घेतल्याची माहिती आहे. फुटीर खासदारांविरोधात पक्ष कोणती भूमिका घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

संजय दिना पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेकडे लक्ष

सूत्रांच्या माहितीनुसार, खासदार संजय दिना पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेमुळे या घडामोडींना वेगळे वळण मिळाल्याची चर्चा आहे. दोन्ही खासदारांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.

ओमराजे निंबाळकर यांनी आपण सध्या पुण्यात असून २० तारखेच्या निकालानंतर भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले आहे. मुलाची तब्येत ठीक नसल्याने आपण पुण्यात थांबल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजपशी संवादाची चर्चा

दरम्यान, काही खासदारांच्या भवितव्याबाबत भाजप नेत्यांशी संवाद सुरू असल्याचा दावा शिवसेना नेत्यांकडून करण्यात येत आहे. मतदारसंघातील आगामी राजकीय समीकरणांचा विचार करून काही नेते निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

मात्र या सर्व घडामोडींमध्ये उद्याची संसदीय दलाची बैठक निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. ठाकरे गटातील किती खासदार बैठकीला उपस्थित राहतात आणि त्यानंतर पक्ष कोणती कारवाई करतो, यावर महाराष्ट्राच्या राजकारणातील पुढील दिशा ठरणार आहे.

बीड नगरपालिकेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली 

0

बीड  — बीड नगरपालिकेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांच्या बदलीचे आदेश शासनाने बुधवारी जारी केले. शहरात सध्या सुरू असलेल्या अतिक्रमण हटाओ मोहिमेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या अचानक बदलीची बीड शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.
शैलेश फडसे यांनी बीड नगरपालिकेचे मुख्याधिकारी म्हणून पदभार स्वीकारला तेव्हा नगरपालिकेतील लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपलेला होता. त्यामुळे काही काळ नगरपालिकेचा संपूर्ण कारभार प्रशासनाच्या माध्यमातून चालत होता. या काळात मुख्याधिकाऱ्यांच्या विविध निर्णयांवर अनेकदा आक्षेप घेतले गेले होते.
मुख्याधिकारी आणि कर्मचारी यांच्यातील समन्वयाचा अभाव देखील चर्चेचा विषय ठरला होता. त्यानंतर नगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर सौ. प्रेमलता पारवे नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या. नव्या पदाधिकाऱ्यांसमोर प्रशासन समजून घेणे आणि शहरातील कामांना गती देणे हे मोठे आव्हान होते.
नगरपालिकेने स्वच्छता, पाणीपुरवठा आणि इतर नागरी सुविधांच्या कामांना वेग दिल्यानंतर शहरातील अतिक्रमण हटाओ मोहीम हाती घेण्यात आली. नाल्यांची सफाई आणि शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणारे अतिक्रमण हटविणे गरजेचे असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र, या मोहिमेच्या अंमलबजावणीच्या पद्धतीवरून काही नागरिकांनी आणि व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली होती.
याच पार्श्वभूमीवर बुधवारी शासनाने मुख्याधिकारी शैलेश फडसे यांच्या बदलीचे आदेश काढले. फडसे यांची बीड नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदावरून सहआयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे बदली करण्यात आली आहे.
अतिक्रमण मोहिमेच्या काळातच झालेल्या या बदलीमुळे बीडच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत.

अवैध वाळू उपसा प्रकरणी तहसिलदार खोमणे वर  कारवाई का नाही ? हा प्रश्न तडीस लावणार – आ.विजयसिंह पंडित

0

 जिल्हाधिकारी कार्यालयाने केलेल्या कारवाईत बडे मासे वगळल्याचा केला आरोप

बीड — घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करण्याच्या नावाखाली गोदावरी नदीपात्रात लाखो ब्रास वाळूचे अवैध उत्खनन होत असून या अवैध वाळू उपशाची एसआयटी कडून चौकशी करावी अशी मागणी आपण केली होती, त्यानंतर जिल्हा प्रशासनाने थातूरमातूर कारवाई केली. गेवराई तहसिलदारांच्या नेतृत्वात गोदावरी नदीपात्रात सुमारे १०० कोटी रुपयांचे वाळू उपसा सिंडीकेट चालवणारे मुख्य आरोपी या प्रकरणातून बाजूला सारून इतर लोकांवर जिल्हा प्रशासनाने कार्यवाही केली असून आपण हे प्रकरण तडीस जाईपर्यंत लावून धरणार आहोत. येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात आपण हा प्रश्न उपस्थित करणार असून वेळ पडली तर न्यायालयात दाद मागू अशी प्रतिक्रिया आ. विजयसिंह पंडित यांनी पत्रकारांशी बोलताना दिली

श्री क्षेत्र राक्षसभुवन (शनिचे) येथून घरकुल बांधकामाच्या नावावर गोदावरी नदीपात्रातून सुरु असलेल्या अवैध वाळू उपसा प्रकरणी आ. विजयसिंह पंडित पुढे म्हणाले की, या प्रकरणात सुमारे १०० कोटी रुपयांचे तहसिलदारांच्या नेतृत्वात महसुल व पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांचे वाळू माफियांसह सिंडीकेट कार्यान्वित असल्याचे सिद्ध होताच जिल्हा प्रशासनाने कारवाई केली मात्र या कारवाईतून सिंडिकेट चालवणारे मुख्य आरोपी दूर ठेवण्यात आल्याचा आरोप आ. विजयसिंह पंडित यांनी यावेळी केला.

अवैध वाळू उपसा करणाऱ्या तहसील आणि त्यांच्या कंपनीच्या विरोधात आपण ही मोहीम यापुढेही चालवणार असून हा प्रश्न तडीस जाईपर्यंत आपण याची पाठ सोडणार नसल्याचे सांगून येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात आपण हा प्रश्न उपस्थित करणार असून वेळ पडली तर न्यायालयात दाद मागणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

बीडमध्ये बंद घरं फोडणारा चोरटा अटकेत; दोन घरफोडीचे गुन्हे उघड

0

बीड — बंद घराचे कुलूप तोडून सोने व रोख रक्कम चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. कलीम अलीम शेख (वय 32, रा. दहीफळ, ता. जि. बीड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून बीड शहरातील दोन घरफोडीचे गुन्हे उघड झाले आहेत.


प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी दिनांक 9 जून 2026 रोजी कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराचा कडी-कोंडा तोडून घरात प्रवेश केला. कपाटात ठेवलेले सोने व रोख रक्कम असा मुद्देमाल चोरी करून नेला होता. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 155/2026 अन्वये कलम 331(3)(4) बी.एन.एस. प्रमाणे अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेनंतर शिवाजीनगर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन समांतर तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदरील घरफोडी कलीम अलीम शेख याने केल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले होते. मात्र आरोपी फरार होता.
दरम्यान, दिनांक 15 जून 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की, कलीम शेख हा बीड येथील नाळवंडी नाका परिसरात कोणाची तरी वाट पाहत थांबलेला आहे. माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान आरोपीने शिवाजीनगर येथील घरफोडीची कबुली दिली. तसेच बीड शहरातील हिना नगर भागात देखील एका बंद घरात चोरी केल्याची माहिती दिली. पोलीस अभिलेख तपासल्यानंतर बीड शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 126/2026 कलम 331(3) बी.एन.एस. प्रमाणे दाखल असलेला गुन्हाही त्यानेच केल्याचे समोर आले.
आरोपीकडून उघड झालेले गुन्हे :
शिवाजीनगर पोलीस ठाणे — गु.र.नं. 155/2026 कलम 331(3)(4) बी.एन.एस.
बीड शहर पोलीस ठाणे — गु.र.नं. 126/2026 कलम 331(3) बी.एन.एस.
पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व नगदी मुद्देमाल जप्त केला असून आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत.
ही कारवाई प्रभारी पोलीस अधीक्षक  चेतना तिडके, अपर पोलीस अधीक्षक  समीर शेख आणि स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख  शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, पोलीस हवालदार राहुल शिंदे, गोविंद राख, पोलीस अंमलदार आश्पाक सय्यद, मनोज परजणे व चालक नितीनजी वडमारे यांनी केली.

पत्रकार उत्तम हजारे यांचा 28 जून रोजी परळीत सन्मान

0

विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन

बीड —  पत्रकारितेत विविध वृत्तपत्रांच्या माध्यमातून सामाजिक विषयावर आवाज उठवणारे बीड येथील ज्येष्ठ पत्रकार उत्तम हजारे यांचा दि.२८ जून रोजी परळी येथे विशेष सन्मान करण्यात येणार आहे .
रविवार दि.२८ जून रोजी सकाळी ११ वाजता परळी वैद्यनाथ येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. दैनिक वृत्तरत्न सम्राटचे संपादक कुणाल कांबळे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन होईल तर प्रा. प्रदीप रोडे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. पत्रकार उत्तम हजारे यांनी पत्रकारितेच्या तीस-पस्तीस वर्षात विविध वृत्तपत्राच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नावर निर्भीड लिखाण केले. बहुजन, कष्टकरी, आदिवासी , महिला, कामगार, विद्यार्थी, दलित अत्याचार आदी प्रश्नावर सातत्याने आवाज उठवुन, आंबेडकरी व बहुजन- ओबीसी आणि धम्म चळवळ गतिमान करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पत्रकारितेत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ज्येष्ठ पत्रकार उत्तम हजारे यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास प्रसिद्ध साहित्यीक अजयकुमार गंडले, नगरसेवक अनंत इंगळे, संतोष रोडे, विचारवंत प्रा. डॉ. दयानंद झिंझुर्डे, विनोद कांबळे, मुप्टा प्राथमीकचे जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब आदोडे, विकास रोडे, दै.संघर्ष नेताचे संपादक मोहन व्हावळे, पत्रकार भारत साकसमुद्रे आदींची उपस्थिती राहणार आहे.

प्रा. प्रदीप रोडे यांचा गौरव

परळीचे भूमीपुत्र असलेले प्रा. प्रदीप रोडे यांनी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. परळीतील नवनिर्वाचित नगरसेवक, डीजे मुक्त जयंती साजरी करणारे पदाधिकारी यांचाही यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. परळी येथे होणाऱ्या या कार्यक्रमास समाजबांधवांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कार्यक्रमाचे मुख्य आयोजक पत्रकार रानबा गायकवाड, विलास ताटे, विकास वाघमारे, चंद्रमणी वाघमारे आदींनी केले आहे .

51 हजाराची थैली देणार

दैनिक सम्राटचे संपादक कुणाल बबन कांबळे यांना परळीतील समाज बांधवाच्या वतीने 51 हजार रुपयांची थैली या कार्यक्रमात अर्पण करण्यात येणार आहे.

ऊसतोड मजूर पुरवठ्याच्या नावाखाली १३.४८ लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा दाखल

0

केज — ऊसतोड मजूर पुरवठा करण्याच्या बहाण्याने ट्रॅक्टर मालकाची तब्बल १३ लाख ४८ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी कल्याण बापूराव मुंडे (रा.ताडसोन्ना, ता.बीड) याच्या विरोधात युसूफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

होळ (ता.केज) येथील भीमराव उत्तमराव घुगे हे ट्रॅक्टर वाहतूक व्यवसाय करतात. सन २०२४-२०२५ च्या ऊसतोड हंगामासाठी त्यांनी कर्नाटकातील बालाजी शुगर फॅक्टरी येथे ऊस वाहतुकीचा करार केला होता. त्यासाठी ऊसतोड मजूर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ताडसोन्ना (ता.बीड) येथील कल्याण बापूराव मुंडे याच्याशी १५ मे २०२४ रोजी बैठक झाली. या बैठकीत १६ कोयते (३२ ऊसतोड मजूर) पुरविण्यासाठी १६ लाख रुपयांचा व्यवहार ठरला होता. त्यानुसार घुगे यांनी सुरुवातीला दीड लाख रुपये रोख दिले. त्यानंतर विविध टप्प्यांत ऑनलाइन व रोख स्वरूपात एकूण १५ लाख रुपये मुंडे याला अदा केले. मात्र, करारानुसार १६ कोयत्यांऐवजी केवळ ६ कोयते (१२ मजूर) पुरविण्यात आले. हे मजूरही काही दिवसांत काम सोडून निघून गेले. उर्वरित मजूर पुरविण्याबाबत वारंवार विचारणा करूनही आरोपीने टाळाटाळ केली. अखेर जानेवारी २०२५ मध्ये पैसे परत देण्याचे आश्वासन देऊनही त्याने रक्कम परत केली नाही किंवा मजूरही उपलब्ध करून दिले नाहीत. या व्यवहारात पुरविण्यात आलेल्या मजुरांकडून सुमारे १ लाख ५२ हजार रुपयांचे काम झाले असून, उर्वरित १३ लाख ४८ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी भीमराव घुगे यांच्या फिर्यादीवरून कल्याण बापूराव मुंडे याच्याविरुद्ध आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा युसूफवडगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पो.हे.कॉ.अमजद सय्यद हे करीत आहेत.

वाळू चोरी सिंडिकेटला धक्का! 19 जणांवर गुन्हे दाखल; बडे मासे कुठपर्यंत वाचवणार ?

0

गेवराई — गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी वाळू चोरीचे सिंडिकेट चालवले जात असल्याची तक्रार केली होती. दरम्यान गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन रेती घाटातील अवैध रेती उत्खनन आणि वाहतूक प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या सिंडिकेट प्रकरणातला बडा मासा तहसीलदार खोमणे याच्या विरोधात मात्र अद्याप कुठलीच कारवाई झाली नाही. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गठीत चौकशी समितीच्या अहवालानंतर तहसील कार्यालयातील शासकीय कर्मचारी, खाजगी व्यक्ती आणि इतर संबंधित अशा एकूण 19 जणांविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी नायब तहसीलदार (महसूल-2) संजय दत्तात्रय सोनवणे यांनी फिर्याद दिली आहे. गुन्हा क्रमांक 199/2026 असून आरोपींवर बी.एन.एस.च्या विविध कलमांसह माहिती तंत्रज्ञान कायदा, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 आणि लोकसंपत्ती नुकसान निवारण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये तहसील कार्यालयातील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) गोविंद ढाकणे, किरण दांडगे, खाजगी संगणक चालक विश्वजीत शेंबडे पाटील, महसूल सेवक(कोतवाल) शुभम गायकवाड या चार  महसूल कर्मचाऱ्यांसह खाजगी  15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झालेल्या खाजगी व्यक्तींची नावे 

1) गोविंद दिलीप मगर (रा. धुमेगाव)
2) योगेश दिलीप मगर (रा. धुमेगाव)
3)अशोक चौकार
4) मुकेश उद्धव बोराडे (गंगावाडी)
5) दादासाहेब रमेश माळी (बेलगाव)
6) यासिन तांबोळी (रा. हिरापूर)
7) अमोल अप्पासाहेब लाखे (एरंडगाव)
8) शीतल शिवाजी धोंडरे (जातेगाव)
9) भागवत राधाकिसन जाधव (बेलगूडवाडी)
10) कल्याण पवार (उमापूर)
11) के. एम. पवार
12) सोहेल सौदागर (उमापूर)
13) शाहरुख मुसा पठाण (गढी)
14) अजय चाळक
15) बाबासाहेब तुकाराम आंधळे (भायाळा) यांचा समावेश आहे.

चौकशी समितीच्या अहवालानुसार राक्षसभुवन रेती घाटातून ऑगस्ट 2025 पासून अवैध रेती उत्खनन व वाहतूक केल्याचा आरोप आहे. तसेच शासकीय खनिज संपत्तीची चोरी, बेकायदेशीर उत्खनन, डिजिटल डेटामध्ये फेरफार करून फसवणूक, गोदावरी नदीपात्राचे पर्यावरणीय नुकसान आणि शासकीय यंत्रणेची दिशाभूल केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
या प्रकरणात बी.एन.एस. कलम 61(2)(अ), 305(ई), 316(5), 318(4), 336(3), 340(2), 3(5) तसेच आय.टी. ॲक्ट कलम 66(c), 66(d), पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 कलम 15 आणि पी.डी.पी.पी. ॲक्ट कलम 3(1) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
गुन्हा 16 जून 2026 रोजी रात्री आठ वाजता दाखल करण्यात आला असून पुढील तपास गेवराई पोलीस करत आहेत.

बडे मासे अजून बाहेरच;आ.पंडीत अधिवेशनात मुद्दा उचलून धरणार

गेवराई चे तहसीलदार संदीप खोमणे याच्या नेतृत्वात घरकुलाच्या नावाखाली वाळूचे सिंडिकेट बिनधास्त चालू होते. तहसीलदार संदीप खोमणे चौकशीला सामोरे गेल्यानंतर सध्या दीर्घ रजेवर गेले आहेत. स्वतःला वाचवण्यासाठी मंत्र्यांच्या संपर्कात ती असल्याची माहिती मिळत आहे. या सिंडिकेट प्रकरणात गुन्हे दाखल झाल्यानंतर संदीप खोमणे याचं नाव वगळण्यात आलं असलं तरी “बकरे की अम्मा कब तक खैर मनायेगी” या म्हणीप्रमाणे बडे मासे वगळले गेले असले तरी आ. विजयसिंह पंडित हे प्रकरण 22 जून रोजी होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात उचलून धरणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान या प्रकरणात बड्या माशांना वाचवण्याचा प्रयत्न झाला असला तरी ते देखील लवकरच जेलमध्ये गेलेले दिसतील. अधिवेशनाच्या तोंडावर जिल्हाधिकारी आणखी कुठली पावले उचलतात ?. 90 कोटीहून अधिकची दंडासह होणारी रक्कम संदीप खोमणे व इतर आरोपींकडून वसूल करणार का? या प्रकरणात आणखी किती जणांवर गुन्हे दाखल केले जाणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

मोडायची हिंमत नाही बोगस शाळांचे मणके; शिक्षणाधिकारी झालेत संस्थाचालकांचे पानके ?

0

बोगस शाळांच्या जीवावर संस्कारी राष्ट्र निर्माण कसं होणार?

बीड — सध्या संस्थाचालकांच्या भ्रष्ट “चंद्रकला आणि शिक्षण विभागात पसरलेली त्यांची पाळेमुळे” मिंधेपणातून मिळणारी साथ यातून होणारी लूट राज्यात चर्चेचा विषय ठरलेली असतानाच जिल्ह्यात अनेक बोगस शाळा सध्या सुरू असून शिक्षणाधिकाऱ्यांच्या नाकावर टिच्चून हा प्रकार सुरू आहे असं नव्हे तर शिक्षणाधिकारी संस्थाचालकांचे पानके झाल्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी आणि पालकांची लूट करण्याचा खेळ सध्या सर्रास सुरू आहे.
बीड जिल्ह्यात बोगस शाळांना मोठे पीक आलेले असतानाही त्यांच्यावर कुठलीच कारवाई केली जात नाही. परिणामी मुलांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण होऊन पालकांची मोठ्या प्रमाणावर लूट होत असल्याचं पाहायला मिळतं. भ्रष्टाचाराच्या “चंद्र” कलांनी बोगस शाळांच्या माध्यमातून कोवळ्या बालकांचं भविष्य झाकोळून टाकण्याचं काम केलं जात आहे. याला शिक्षणाधिकाऱ्यांसारख्या महत्त्वाच्या पदावरील व्यक्ती देखील खतपाणी घालत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे संस्कार देशभक्तीच्या देश प्रथम म्हणणारांच्या संस्थांमध्ये देखील असाच कारभार पाहायला मिळत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संस्था म्हणून ओळख असलेली भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई मधून असे धंदे केले जात असतील तर देशाचं भवितव्य काय असेल हे सांगणं अवघड होऊन बसला आहे. भाशिप्र संस्था संचलित खोलेश्वर जीनियस इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल अंबाजोगाई 2018 पासून बोगस पद्धतीने अजूनही सुरूच आहे. या शाळेला महाराष्ट्र शासनाची परवानगी नाही. सीबीएसई बोर्ड एफिलेशन प्रमाणपत्र अद्याप मिळालेले नाही. शाळेला परवानगी मिळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा उपलब्ध नाहीत. तीच स्थिती माजलगावच्या सिद्धेश्वर सीबीएसई प्रायमरी स्कूलची आहे. या शाळेला देखील कुठलीच मान्यता मिळालेली नाही. बीडचे शिक्षणाधिकारीच शिक्षण क्षेत्रासारखं पवित्र काम करायच सोडून संस्थाचालकांचे पाणी भरण्यात धन्यता मानत नाहीत तर इतर जिल्ह्यात देखील तीच परिस्थिती आहे.
भाशिप्र संस्थेने लातूर मधील उदगीर येथे देखील रामकृष्ण इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल अशीच बेकायदेशीर सुरू आहे. याबरोबरच लातूर मधील केशवराज रेनिसन्स इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल 2018 पासून बोगस पद्धतीने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत पालकांच्या खिशावर दरोडे टाकण्याचं काम जोरात सुरूच आहे. 22 मे 2026 रोजी या शाळेला महाराष्ट्र शासनाची परवानगी मिळाली मात्र अजूनही सीबीएसई ची परवानगी मिळालेली नाही. गेले नऊ वर्ष या शाळेने बोगस पद्धतीने कारभार करत पालकांची लूट केली.
या भाशिप्र च्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा बोगस पद्धतीने चालवून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत पालकांच्या खिशावर दरोडे घालताना कसलं राष्ट्र निर्माण करणार आहेत? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून विचारला जाऊ लागला आहे ‌

अंबाजोगाईत एलसीबीने दुचाकी चोर पकडला; सहा मोटार सायकल जप्त

0

बीड —  जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यांमध्ये दुचाकी चोरी करणाऱ्या आरोपीला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) यश आले आहे. अंबाजोगाई येथील संतोष बाबासाहेब मुंडे (रा. वरवटी, ता. अंबाजोगाई) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीच्या सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईत तब्बल २ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

बीड जिल्ह्यात वाढत असलेल्या दुचाकी चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांनी मोटारसायकल चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे स्वतंत्र पथक आरोपींच्या मागावर होते.

अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात दाखल गु.र. नं. 132/2026 कलम 303(2) बी.एन.एस. अन्वये दुचाकी चोरी प्रकरणाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता. तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित आरोपींची माहिती मिळाली होती. मात्र आरोपी पोलिसांच्या हाती लागत नव्हता.

दरम्यान, १५ जून २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, संतोष मुंडे याने बीड तसेच शेजारील जिल्ह्यांमधून अनेक दुचाकी चोरी करून त्या घराच्या पाठीमागे लपवून ठेवल्या आहेत.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी वरवटी येथे जाऊन संतोष मुंडेला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने चोरीच्या दुचाकी घराच्या पाठीमागे लपवून ठेवल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्या ठिकाणाहून सहा मोटारसायकली जप्त केल्या.

चोरीचे उघड झालेले गुन्हे

अंबाजोगाई शहर पोलीस ठाणे

गु.र. नं. 132/2026 कलम 303(2) बी.एन.एस.

अंबाजोगाई शहर पोलीस ठाणे

गु.र. नं. 324/2025 कलम 303(2) बी.एन.एस.

गंगाखेड पोलीस ठाणे, जि. परभणी

गु.र. नं. 29/2026 कलम 303(2) बी.एन.एस.

जप्त केलेल्या दुचाकींमध्ये अंबाजोगाई, पुणे, लातूर आणि परभणी येथून चोरी केलेल्या वाहनांचा समावेश आहे. उर्वरित तीन दुचाकींच्या चोरीबाबत पोलीस अभिलेख तपासण्याचे काम सुरू आहे.

आरोपी संतोष मुंडे व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी अंबाजोगाई शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

ही कारवाई प्रभारी पोलीस अधीक्षक चेतना तिडके, पोलीस उपअधीक्षक ऋषिकेश शिंदे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, पोलीस हवालदार रामचंद्र केकान, मारोती कांबळे, विष्णू सानप, गोविंद भताने, पोलीस अंमलदार सचिन आंधळे, विकी सुरवसे आणि चालक अतुल हराळे यांनी केली.