धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन घोटाळ्यात माजी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक. २४१ कोटींच्या वाढीव मोबदला प्रकरणात न्यायालयाने ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
बीड — धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनातील वाढीव मोबदल्याच्या प्रकरणात तब्बल २४१ कोटी ६२ लाख रुपयांच्या कथित घोटाळ्याने राज्यभर खळबळ उडाली आहे. या प्रकरणात तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक याला बीड पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले. जिल्हा न्यायाधीश एस. आर. शिंदे यांनी त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

या प्रकरणात भूसंपादनासाठी देण्यात आलेल्या वाढीव मोबदल्यातील सुमारे ७२ कोटी रुपयांच्या अपहाराचा आरोप आहे. बीडच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात या संदर्भात दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान वाढीव मोबदल्याच्या आदेशांवरील स्वाक्षऱ्यांची पडताळणी करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी लातूर येथून अविनाश पाठकला चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि नंतर त्याला अटक करण्यात आली.
दुपारी न्यायालयात हजर करताना पोलिसांनी आरोपीची दहा दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. आरोपीचा लॅपटॉप जप्त करणे, आवाजाचे नमुने घेणे, कॉल रेकॉर्डिंगची तपासणी करणे तसेच लातूर, पुणे आणि मुंबई येथील घरांची झडती घेणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.
तपासादरम्यान १५४ पैकी १४८ संचिका पोलिसांना मिळाल्या असून सहा संचिका अद्याप गायब असल्याचे समोर आले आहे. त्या शोधण्यासाठी अधिक तपासाची गरज असल्याचे पोलिसांनी नमूद केले.
दरम्यान, आरोपीच्या वकिलांनी पोलीस कोठडीला विरोध करत सर्व कागदपत्रे कार्यालयीन स्वरूपाची असल्याचा दावा केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर उशिराने अटक करण्यात आली असल्याने पोलीस कोठडीची आवश्यकता नसल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाने केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अ ‘विनाशी’ पा ‘ठका’ला सात दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.
आरोपीच्या वतीने अॅड. के. पी. ठिगळे आणि अॅड. मिलिंद वाघिरकर यांनी बाजू मांडली, तर सरकारच्या वतीने अॅड. अजय सरवदे यांनी काम पाहिले.

