Home Blog Page 20

स्व. विलास घुले व उमेश माने यांच्या न्यायासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरू – धनंजय मुंडे

0

कुणाला मुद्दाम अडकवणे हेतू नाही, पण गुन्ह्यात सहभाग असल्यास, सुटला नाही पाहिजे – धनंजय मुंडेंची स्पष्टोक्ती

पीडितांच्या कुटुंबियांना धमकावले जात असेल तर पोलिस काय करतात? मुंडेंचा संताप

केज — चार दिवसांपूर्वी केज तालुक्यातील टाकळी परिसरात झालेल्या दुर्दैवी हत्याकांडात मृत पावलेल्या स्व. विलास घुले यांच्या कुटुंबियांची आज टाकळी येथे जाऊन माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी भेट घेत त्यांचे सांत्वन केले.

आरोपींनी संगनमत करून सामान्य गरीब कुटुंबातील उमेश माने या तरुणावर आधी जीवघेणा हल्ला केला. त्याला वाचवायला गेलेल्या विकासाचा निर्घृण खून करण्यात आला. त्यानंतर न्यायासाठी रस्त्यावर उतरलेल्या कुटुंबियांना विलासच्या मृतदेहासहित तीन दिवस तिष्ठत बसवण्यात आले, हे क्लेशदायक आणि संतापजनक असल्याचे धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.

या संपूर्ण घटनेच्या तपासासाठी स्वतंत्र एस आय टी समिती स्थापन करण्यात आली असली तरी त्यावर आणि त्यांच्या तपासावर घुले कुटुंबीय समाधानी नाहीत. पीडित उमेश माने व विलासच्या कुटुंबियांना देखील धमकावले जात असून वेगवेगळ्या केसेस मध्ये गुंतवण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याचे कुटुंबियांनी यावेळी सांगितले. याबाबत पोलिसांना निवेदनाद्वारे माहिती देण्यात आली असून, असे प्रयत्न दुर्दैवी असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.

एकूण तपासात पोलिस यंत्रणेमार्फत कोणाला वाचवण्याचा प्रयत्न होतोय का? जाती – पातीच्या भिंती ओलांडून निष्पक्ष तपास केला जाईल का? याबाबत शंका असून आवश्यकतेनुसार मी पुन्हा याबाबत सभागृहात बोलेन, असेही मुंडे माध्यमांशी बोलताना म्हणाले.

कुणाला मुद्दाम अमुक गुन्ह्यात अडकवा, अशी माझी अजिबात भूमिका नाही. मात्र सर्व साक्षीदार, वस्तुस्थिती, डंप डेटा अशा सगळ्या गोष्टी तपासून योग्य तपास व्हावा, ही अपेक्षा आहे. यामध्ये पोलिस यंत्रणा कमी पडल्या तर घुले आणि माने यांच्या न्यायासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरावे लागेल, असेही धनंजय मुंडे म्हणाले.

इतका संताप का?

जाती जातीचे राजकारण सोडून न्यायाच्या लढाईत आपण आपल्या एका बांधवासाठी सहभागी होतोय. उमेश मानेला वाचवायला गेलेल्या विलासचा खून झाला. यात जातीचे राजकारण कुठून आले? आम्ही न्यायासाठी लढायचे नाही का? फक्त तुम्हालाच न्याय हवा इतर लोकांनी न्याय मागायचा नाही का, असा संतप्त सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला.

माध्यमांमधील काहीजणांचा आततायीपणा थांबवा

अशी एखादी दुर्दैवी घटना घडली, तर त्याला ती गुन्हेगारी प्रवृत्ती जबाबदार असते, मात्र त्याआडून संपूर्ण जातीला गुन्हेगार ठरवणे योग्य नाही. तशा आशयाच्या बातम्या जाणीवपूर्वक पेरण्याचे प्रकार काही दिवसांपासून काही ठराविक लोकांनी केले. मात्र गुन्ह्याकडे गुन्हा, गुन्हेगारीकडे वृत्ती म्हणून बघितले पाहिजे, जातींना दूषणे देण्यापेक्षा गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे, असे परखड मत धनंजय मुंडे यांनी यावेळी व्यक्त केले.

गेवराई कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला प्रतिक्विंटल ३,३०० पर्यंत उच्चांकी भाव

0

रणवीर पंडित यांच्या हस्ते मोरेश्वर ट्रेडिंग कंपनीचा शुभारंभ

गेवराई — येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये शुक्रवारी (दि. २६ जून) कांद्याच्या लिलावाला उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला. दर्जेदार कांद्याला प्रतिक्विंटल तब्बल ₹३,३०० पर्यंतचा उच्चांकी भाव मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. बाजारातील चांगली मागणी आणि स्पर्धात्मक बोलीमुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळाल्याने हा लिलाव विशेष ठरला. याचवेळी कांदा मार्केटमधील प्रथमेश धोंगडे यांच्या ‘मोरेश्वर ट्रेडिंग कंपनी’ या कांदा आडत दुकानाचा शुभारंभ शारदा स्पोर्ट्स ॲकेडमीचे अध्यक्ष रणवीर पंडित यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला.

उद्घाटनप्रसंगी बोलताना रणवीर पंडित म्हणाले की, “गेवराई कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत कांदा उत्पादक शेतकरी, व्यापारी आणि आडतदार यांना दर्जेदार व आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहोत. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा, यासाठी बाजार समिती सातत्याने प्रयत्नशील राहील,” असे त्यांनी यावेळी सांगितले.

आजच्या लिलावात सुमारे ४०० गोण्यांची कांद्याची आवक झाली होती. उत्कृष्ट दर्जाच्या कांद्याला व्यापाऱ्यांकडून मोठी मागणी असल्याने चुरशीची बोली लागली आणि सर्वोत्तम कांद्याला प्रतिक्विंटल ₹३,३०० पर्यंत भाव मिळाला. इतर दर्जाच्या कांद्यालाही समाधानकारक दर मिळाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.

गेवराई कृषी उत्पन्न बाजार समितीने पारदर्शक आणि शिस्तबद्ध पद्धतीने लिलाव प्रक्रिया राबवून शेतकऱ्यांना न्याय्य बाजारभाव मिळवून देण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या. आगामी काळात कांद्याची गुणवत्ता कायम राहिली आणि बाजारातील मागणी टिकून राहिली, तर कांद्याचे भाव स्थिर राहण्याची शक्यता व्यापारी आणि बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली.
यावेळी बाजार समितीचे सभापती जगन्नाथ काळे यांनी शेतकऱ्यांना आवाहन करताना सांगितले की, “कांदा विक्रीसाठी बाजार समितीत आणताना स्वच्छ, निवड केलेला आणि दर्जानुसार वर्गीकृत माल आणावा. त्यामुळे लिलावात अधिक स्पर्धात्मक बोली लागून शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्यास मदत होईल.”

या कार्यक्रमाला उपसभापती श्रीहरी पवार, संचालक राम चाळक, दिलीपकुमार जैन, शेतकरी अशोक करांडे (कोळगाव), बाळासाहेब नलगे (पैठण), विकास झीरपे (सोमठाणा), नामदेव झीरपे (कोळगाव), रमेश विघ्ने यांच्यासह तालुक्यातील अनेक शेतकरी, व्यापारी व आडतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कांद्याला मिळालेला उच्चांकी दर आणि नव्या आडत दुकानाच्या शुभारंभामुळे गेवराई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये उत्साहाचे वातावरण असून, आगामी काळात अधिकाधिक शेतकऱ्यांनी आपला दर्जेदार माल येथे विक्रीसाठी आणावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

ऑनलाइन महादेव ॲप जुगारावर पोलिसांचा छापा; 8 आरोपींना अटक, 8 लाखांचा मुद्देमाल जप्त

0

केज — शहरात विनापरवाना सुरू असलेल्या ऑनलाइन जुगारावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे लोटस् 365. (LOTAS 365) नावाच्या ऑनलाइन जुगार अॅपच्या माध्यमातून लोकांना जास्त पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवत जुगार खेळणाऱ्या व खेळविणाऱ्या 8 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई चेतना तिडके आणि सहायक पोलीस अधीक्षक केज वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने ही कारवाई केली.
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, दिनांक 25 जून 2026 रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास केज पोलीस ठाणे हद्दीत LOTAS 365 ऑनलाइन जुगार चालवला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर विशेष पथकाने छापा टाकून आरोपींना ताब्यात घेतले.
या कारवाईत आरोपी अनंत नवनाथ खंदारे (रा. कारेगव्हाण, बीड),अक्षय अनिल गायकवाड (रा. पुणे),अनिल कबीर सानप (रा. बीड)
आसाराम बळीराम केकाण (रा. दरडवाडी, केज)
गणेश लक्ष्मण खंदारे (रा. कारेगव्हाण),हर्षल मनोहर खंडारे (रा. अमरावती),सुशील दत्तात्रय मुंडे (रा. वडवणी),विशाल उत्तम बारवाळ (रा. छत्रपती संभाजीनगर),यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार केज पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 397/2026 दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी कारवाईदरम्यान विविध कंपन्यांचे 34 मोबाईल, 4 दुचाकी आणि इतर साहित्य असा एकूण 8 लाख 14 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम यांच्या मार्गदर्शना खाली ग्रे.पो.उप.नि अमीरो‌द्दीन इनामदार, धोंडीराम योगीराज मोरे, राजु वंजारे, विशाल क्षिरसागर, अनिल मंदे, मिसबा इनामदार,मल्लीकार्जुन माने, जरगर, मयुर टकले या विशेष पथकातील कर्मचाऱ्यांनी केली आहे

बीड लातूर शिक्षक भरती घोटाळा : SIT चौकशीवर प्रश्नचिन्ह, ३० जूनपासून उपोषणाचा इशारा

0

बीड — बीड आणि लातूर जिल्ह्यातील खाजगी शिक्षक भरती तसेच थकीत वेतन प्रकरणाची एसआयटी चौकशी योग्य पद्धतीने होत नसल्याचा आरोप भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष इंजि. सादेक इनामदार यांनी केला आहे. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या संस्थाचालक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण आयुक्त पुणे कार्यालय आणि एसआयटी समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गेल्या वर्षभरापासून बीड आणि लातूर जिल्ह्यातील शिक्षक भरती व थकीत वेतन प्रकरणातील कथित अनियमिततेबाबत पुरावे सादर करण्यात आले आहेत. मात्र अद्याप अपेक्षित कारवाई झालेली नाही.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, इतर काही जिल्ह्यांमध्ये संबंधित प्रकरणांमध्ये दोषींवर कारवाई करण्यात आली असून, बीड आणि लातूर जिल्ह्यात मात्र केवळ काही अधिकाऱ्यांवरच कारवाई झाली आहे. या प्रकरणात मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला आहे.

मोडायची हिंमत नाही बोगस शाळांचे मणके; शिक्षणाधिकारी झालेत संस्थाचालकांचे पानके ?

एसआयटी चौकशीतील काही बाबी संशयास्पद असल्याचा आरोप करत शिक्षण आयुक्त कार्यालयातील संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या संपर्काची चौकशी करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
तक्रारीतील आरोपांची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्या संस्थाचालक, अधिकारी, कर्मचारी आणि संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, मागण्यांवर तातडीने निर्णय न झाल्यास ३० जून २०२६ रोजी मुख्यमंत्री निवासस्थानासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा इंजि. सादेक इनामदार यांनी दिला आहे.

भाशिप्रच कस तर भ्रष्टाचार आपल्या बुडाला अन् ज्ञान सांगे लोकांना ; “संस्कार, समर्पण की स्वार्थाचा अड्डा? संस्थेतील कारभारावर प्रश्नचिन्ह

बापऽऽरे एसपींच घरातलं हागणं चर्चेत: शाळांना नाही निधी अन् 17 लाखाचा एसपींचा प्रात:र्विधी?

0

बीड — जिल्ह्यात पडक्या शाळा इमारतींमधून विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून ज्ञानाचे धडे गिरवावे लागत आहेत. न्याय मागण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात जनतेला आंदोलन करावी लागत आहेत. न्याय मिळवायचा तर आंदोलनकर्त्यांना हागणं मुतन बंद करावं लागत आहे. अशी दयनीय स्थिती निर्माण झालेली असताना एसपींच्या निवासस्थानासाठी 93 लाखाचा झालेला खर्च त्यातल्या त्यात त्यांच्या संडास दुरुस्तीसाठी जवळपास 17 लाखाचा झालेला खर्च विजय माल्या नंतर दुसऱ्यांदा जिल्ह्यात सामान्य जनतेच्या चर्चेचा व आश्चर्याचा विषय बनला आहे.

अधिकाऱ्यांमध्ये संवेदनशीलतेचा अभाव असला तर जनतेचा पैसा कसा उधळायचा याचं कुठलंच भान ठेवलं जात नसल्याचं उदाहरण समोर आला आहे. पोलीस अधीक्षक पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर ‌ जनतेने ठेवलेल्या अपेक्षा कधीच्याच कवडीमोल झाल्या आहेत. अधिकारी कसा असावा याचा आदर्श जिल्हाधिकारी म्हणून कारभार पाहताना सुनील केंद्रेकर यांनी घालून दिला होता. 2012 — 13 च्या 17 महिन्याच्या कार्यकाळात दुष्काळ निवारण करताना शासनाचा पर्यायाने जनतेचा पैसा प्रचंड खर्च होतो. सीमेवरचा सैनिक मूलभूत सुविधांपासून वंचित असताना आपण टँकरवर उधळपट्टी करणं शोभणारं नाही असं सांगत अनेक गावांमधून बोअरवेल च्या माध्यमातून पाण्याची सुविधा त्यांनी कायमस्वरूपी उपलब्ध करून दिली. असे आदर्श पाहिलेल्या बीड जिल्ह्याला कपाळ करंटे अधिकारी पहायची वेळ जनतेवर आली आहे. जिल्ह्यात एकीकडे सरकारी शाळा पडक्या इमारती मधून भरत आहेत. ग्रामीण भागात 58 शाळांना इमारत नाही 174 शाळांमधील 313 वर्ग खोल्या मोडकळीस आलेल्या आहेत. सत्तर शाळांमध्ये 98 अतिरिक्त वर्ग खोल्यांची आवश्यकता आहे इमारत बांधकामांसाठी 57 कोटी रुपये आणि 290 वर्ग खोल्यांच्या दुरुस्तीसाठी 12 कोटी पन्नास लाख रुपयांची गरज आहे. यामध्ये पाठपुरावा केल्यानंतर आंदोलन निवेदन दिल्यानंतर 28 कोटी रुपये निधीची नाममात्र मंजुरी मिळाली
जीवाला धोका होऊ नये म्हणून विद्यार्थी झाडाखाली बसून ज्ञानाचे धडे गिरवत आहेत. एकीकडे एवढी भीषण वास्तविकता असताना विद्यार्थ्यांवरची दुर्दैवी वेळ मूलभूत सुविधा नसल्यामुळे आलेली असताना दुसरीकडे मात्र बांधकाम विभाग आणि पोलीस अधीक्षकांच्या कारभाराने जनतेला डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आली आहे. जनतेचा पैसा आहे कसाही उधळला तरी बघतो कोण? अशा अविर्भावात जिल्ह्याचा कारभार हाकला जात आहे. जिल्ह्यात एखाद्यावर अन्याय झाला तर फिर्याद नोंदवली जात नाही म्हणून पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस ठाण्यामधून आंदोलन करण्याची वेळ जनतेवर आणून ठेवली आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयातील अनेक आंदोलन चर्चेचा विषय बनले “न भूतो न भविष्यती“अशी दुर्दैवी वेळ जनतेवर आणली जात आहे. या आंदोलन काळात जनतेला पाणी मिळणं तर दूरच पण हागण मूतन बंद ठेवून आंदोलन करण्याची वेळ आणणारी नवी व्यवस्था नवनीत कावत यांनी निर्माण केली आहे.
जिल्ह्याचं वास्तविक चित्र हे निर्माण केलं गेलेल असताना सव्वा वर्षाच्या काळात पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानाच्या दुरुस्तीसाठी 93 लाखाच्या निधीची उधळपट्टी करण्यात आली.
पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानातील विविध कामांमध्ये उद्यान दुरुस्ती ८.१८ लाख, बाहेरील रंगकाम ७.७५ लाख, गेस्ट रूम व मास्टर बेडरूम फर्निचर ८.४ लाख, गार्ड रूम दुरुस्ती ७.५ लाख, स्टाफ शौचालय दुरुस्ती ८.२१ लाख, चेंबर दुरुस्ती ८.२८ लाख, पाईपलाईन दुरुस्ती ६.७६ लाख, किचन ड्रेनेज व वॉटरप्रूफिंग ८.४४ लाख, बेडरूम, गेस्ट रूम व डायनिंग हॉल सुशोभीकरण ८.४३ लाख आणि पेव्हर ब्लॉक ८.२० लाख अशा कामांचा समावेश आहे.

विजय माल्याची लाईफस्टाईल पुन्हा चर्चेत

उद्योगपती विजय माल्या याची लाईफस्टाईल नेहमीच चर्चेचा विषय असते. विजय माल्याचं शौचालयाचं भांड सोन्याचं असल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर पोलीस अधीक्षकांच्या शौचालय दुरुस्तीसाठी 17 लाखाचा झालेला खर्च जनतेच्या आश्चर्य युक्त चर्चेचा विषय बनला आहे. साधारणतः शाळा खोली दुरुस्तीसाठी दोन लाख रुपये व सार्वजनिक शौचालयासाठी तीन लाखाचा निधी देणाऱ्या बांधकाम विभागाने यातील काही निधी शाळा दुरुस्तीसाठी दिला असता तर निदान सात वर्ग खोल्या यामध्ये दुरुस्त झाल्या असत्या. यातून जीवाची बाजी लावून शिकणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असता.
काहीही असो पोलीस अधीक्षकांचा कुठला कारभार लक्षात राहो न राहो पण “हागणं” मात्र गावपारावरच्या चर्चेचा विषय बनला आहे.

हे एसपींना शोभणारं आहे का ?

ग्रामीण भागातील विद्यार्थी मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये जीव मुठीत धरून शिक्षण घेत आहेत. काही ठिकाणी झाडाखाली वर्ग भरतात, पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहांची सुविधा नाही. अशा परिस्थितीत निवासस्थानाच्या दुरुस्तीवर झालेला एवढा खर्च पोलीस अधीक्षक नवनीत कांवत साहेबांना तरी पटतोय का?” असा सवाल डॉ. गणेश ढवळे यांनी केला आहे.

कोयत्याने हल्ला करून चोरी करणारी टोळी जेरबंद; एलसीबी ची मोठी कारवाई

0

बीड — जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात कोयत्याने हल्ला करून जबरी चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून जबरी चोरी आणि घरफोडीतील मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे.


पोलिसांच्या माहितीनुसार, 22 जून 2026 रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास राजेंद्र अभिमान नागरे (रा. थेरला, ता. पाटोदा) हे मोटारसायकलवरून बीडकडून आपल्या गावी जात असताना रोहतवाडी शिवारात तीन अनोळखी इसमांनी त्यांची दुचाकी अडवली. आरोपींनी त्यांच्या खिशातील मोबाईल आणि रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. यावेळी विरोध केल्याने आरोपींनी कोयत्याने वार करून त्यांना गंभीर जखमी केले.
या प्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात गु.र.नं. 192/2026 नुसार जबरी चोरी व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याच आरोपींनी त्याच दिवशी पाटोदा-बीड रोडवरील थेरला फाटा परिसरातील सिताबाई महादेव सोनवणे यांच्या घर व संतकृपा चहाच्या हॉटेलमध्ये चोरी केल्याचे तपासात समोर आले. चोरट्यांनी घरातील टीव्ही, मोबाईल, सोन्या-चांदीच्या वस्तू असा सुमारे 85 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. याप्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात गु.र.नं. 189/2026 दाखल आहे.

सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासातून आरोपींचा शोध

या दोन्ही गुन्ह्यांचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींची माहिती मिळवली.
पोलीस अंमलदार बाळू सानप यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पथकाने पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे कारवाई करत तीन आरोपींना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे
माऊली नामदेव पवार (वय 26, रा. इंदापूर)
मयूर ऊर्फ ओंकार नितीन भोसले (वय 22, रा. इंदापूर),आदित्य ऊर्फ बाळा सिद्ध पवार (वय 19, रा. इंदापूर)
या आरोपींकडून चोरीचा मोबाईल, रोख रक्कम, टीव्ही, सोन्याच्या वस्तू तसेच गुन्ह्यात वापरलेला कोयता असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींना मुद्देमालासह पाटोदा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक औदुंबर मस्के करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोउपनि श्रीराम खटावकर व पथकातील अशोक दुबाले, सोमनाथ गायकवाड, बाळु सानप, अर्जुन यादव,राहुल शिंदे, अशफाक सय्यद, मनोज परजणे, अश्वीन सुरवसे, व  नितीन वडमारे यांनी केली आहे.

बीड शहराचे २० दिवसावरचे पाणी दोन दिवसांवर आणण्यासाठी १५ व्या वित्तची रक्कम महावितरणला वर्ग करा;  आ. क्षीरसागरांनी सभागृहात मांडला प्रश्न

0
मुंबई — योजना पूर्ण आणि पाणी उपलब्ध असतानाही केवळ महावितरणच्या थकबाकीमुळे नवीन वीज जोडणी मिळत नसल्याने शहराला २० दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. यामुळे शहरात पाणीटंचाई आहे. पाणीपुरवठा जर २ दिवसांवर आणायचं असेल तर बीड नगरपालिकेला आलेले १५ व्या वित्त आयोगाचे ४८ कोटी महावितरण कडे वळवले तर वीज जोडणी करुन पाणीप्रश्न सुटेल असे म्हणत शहराच्या जिव्हाळ्याचा विषय आ. संदीप क्षीरसागर यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात मांडला आहे.
                 बीड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पूर्वीची माजलगाव बॅकवॉटर योजना सुरू आहे. मात्र शहराची झपाट्याने होत असलेली वाढ ३ लाख लोकसंख्या यामुळे ही योजना पाणीपुरवठा करण्यासाठी अपुरी पडत आहे. त्यामुळे २०१७ मध्ये २४ टीएमएलटी ची नवीन अमृत अटल योजना मंजूर झाली. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते झाले होते. ती योजना सध्या पूर्ण आहे. मात्र महावितरण कंपनीची थकबाकी असल्याने या योजनेला नवीन वीज कनेक्शन मिळत नाही. याबाबत वारंवार सभागृहात आवाज उठविला आहे. अजितदादा यांना ही याप्रकरणी भेटलो त्यांनी हे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी ते सोडविले असते, पण दुर्दैवाने ते आज नाहीत. त्यामुळे पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडून अपेक्षा आहेत. तसेच यावर तोडगा काढण्यासाठी शासनाने जर नगरपालिकेला दिलेले १५ व्या वित्त आयोगाचे ४८ कोटी वळवून ते महावितरणला दिले तर थकबाकी निल होऊन नवीन वीज जोडणी मिळेल, यामुळे शहराला दोन दिवसांआड पाणी येईल असे आ.क्षीरसागर यांनी म्हटले आहे. यामुळे शासन आता यावर काय पाऊल उचलणार याकडे बीडकरांचे लक्ष लागले आहे.

वाळूतस्करांवर कारवाई मग ४२ कोटींच्या बोगस वृक्षलागवडीची चौकशी का नाही?

0

आ. विजय सिंह पंडितांनी वनविभागाच्या भ्रष्टाचार प्रकरणाचा पाठपुरावा करावा — डॉ. गणेश ढवळे 

बीड  —  गोदावरी पट्ट्यातील वाळू तस्करी प्रकरणात महसूल व पोलीस प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांवर चौकशी होऊन कारवाई होत आहे. मात्र बीड जिल्ह्यात वनविभागातील वनीकरण कामे आणि कागदोपत्री दाखविण्यात आलेल्या वृक्षलागवड प्रकरणाची साधी चौकशीही होत नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केला आहे.

आमदार विजय सिंह पंडित यांच्या तक्रारीनंतर वाळू तस्करीवर कारवाई झाली, त्याच धर्तीवर वनविभागातील ४२ कोटी रुपयांच्या कथित बोगस वृक्षलागवड प्रकरणाचा पाठपुरावा करावा, अशी मागणी डॉ. ढवळे यांनी आ. विजय सिंह पंडित यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी वनमंत्री गणेश नाईक, वन विभागाचे सचिव, मंत्रालय मुंबई तसेच जिल्हाधिकारी बीड यांना निवेदन दिले आहे.

बीड जिल्ह्यातील वनविभाग आणि सामाजिक वनीकरण विभागात मोठ्या प्रमाणावर अनागोंदी कारभार सुरू असून शासन निधीचा अपव्यय होत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत ७ ऑगस्ट २०२५ रोजी नियम डावलून वृक्षलागवड करण्यात आली असून केवळ रेकॉर्ड करण्यासाठी केलेल्या या कामामुळे शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा निधी वाया गेल्याचा दावा करण्यात आला आहे.

निवेदनात वृक्षलागवड नियोजनातील त्रुटी, निकृष्ट रोपांची लागवड, रोपवनाच्या वेळापत्रकाकडे दुर्लक्ष, निधी वितरणातील असमतोल, कंत्राटदारांशी संगनमत, तसेच साहित्य खरेदी प्रक्रियेतील अनियमिततेची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

फायर ब्लोअर, ड्रोन, जीपीएस मशीन आदी साहित्य खरेदी करताना शासन नियमांचे पालन झाले नसल्याचा आरोप करत मागील तीन वर्षांत वनविभाग व सामाजिक वनीकरण विभागाने केलेल्या कामांचे स्वतंत्र मूल्यांकन करण्याची मागणी करण्यात आली आहे.

“वाळू तस्करीप्रकरणी लोकप्रतिनिधींच्या तक्रारीनंतर प्रशासन हलते, मात्र वनविभागातील गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष केले जाते. जर आमदारांच्या तक्रारीनंतरही चौकशी होत नसेल तर सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींचे काय?” असा सवाल डॉ. गणेश ढवळे यांनी उपस्थित केला आहे.

सदर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकारी, कर्मचारी व संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा डॉ. गणेश ढवळे यांनी दिला आहे.

तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी 250 कोटींची ‘सुपारी’? जितेंद्र आव्हाडांचा विधानसभेत आरोप

0

मुंबई —  राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात अन्न व औषध प्रशासन विभागाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीवरून जोरदार खडाजंगी झाली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात गंभीर आरोप करत, मुंढे यांच्या बदलीसाठी आंतरराष्ट्रीय ड्रग लॉबीकडून तब्बल 250 कोटी रुपये गोळा करण्यात आल्याचा दावा केला.
आव्हाड यांनी आरोप केला की, तुकाराम मुंढे यांनी FDA विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर औषध, अन्नपदार्थ आणि भेसळीविरोधात कठोर कारवाई सुरू केली. त्यामुळे काही माफिया आणि लॉबी सक्रिय झाल्या असून त्यांना हटवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी म्हटले.
“मुंढे यांच्या विरोधात ड्रग्ज लॉबी, काही बड्या कंपन्या आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांची लॉबी काम करत आहे,” असा आरोप करत आव्हाड यांनी सरकारला जाब विचारला. महाराष्ट्रात गुटखा आणि भेसळीचे प्रकार कसे सुरू आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

लॅब तपासणीवरही गंभीर आरोप

अन्न आणि औषधांचे नमुने तपासणीसाठी पाठवल्यानंतर काही ठिकाणी गैरप्रकार होत असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला. नमुने फेल करण्यापासून ते सेटलमेंटपर्यंत मोठे रॅकेट असल्याचा दावा त्यांनी केला. या भेसळीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
“या प्रकरणातील मोठी नावे पुढील आठवड्यात उघड करणार,” असा इशाराही आव्हाड यांनी विधानसभेत दिला.

मुंढे यांना धमक्यांचा दावा

दरम्यान आमदार अर्जुन खोतकर यांनीही या विषयावर भूमिका मांडत तुकाराम मुंढे यांना धमक्या येत असल्याचा दावा केला. त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली.
भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनीही मुंढे यांच्या कामाचे कौतुक केले. “तुकाराम मुंढे यांच्या नावातील टी म्हणजे टायगरमधील टी आहे,” असे म्हणत त्यांनी मुंढे यांना किमान तीन वर्षे पदावर ठेवण्याची भूमिका मांडली.

सरकारची भूमिका काय?

अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सरकारची बाजू मांडत सध्या तुकाराम मुंढे यांच्या बदलीचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट केले.
“मुंढे FDA मध्ये चांगले काम करत आहेत. त्यांच्या माध्यमातून धडक कारवाई सुरू आहे,” असे झिरवाळ यांनी सांगितले. मात्र विभागाकडे पुरेशी साधनसामग्री, वाहने आणि सुविधा नसल्याची कबुली देत लवकरच त्या उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

विलास घुले हत्या प्रकरणात मोठी घडामोड; खासदार पुत्र सौरभ सोनवणेचे पुरवणी जबाबात नाव, तपास सुरू

0

बीड — केज तालुक्यातील टाकळी येथे हॉटेल चालक विलास घुले यांच्या हत्या प्रकरणाने जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. शनिवारी (दि. 20 जून) हॉटेलमधील वाद मिटवण्यासाठी गेलेल्या विलास घुले यांच्यावर टोळक्याने चाकूने हल्ला केला होता. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला होता.
या घटनेनंतर घुले कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत आरोपींना मदत केल्याचा आरोप असलेल्या खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरभ सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मृतदेह ताब्यात न घेता केज पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करण्यात आले. गेल्या तीन दिवसांत अनेक वेळा रास्ता रोको आंदोलन करून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी केजमध्ये दाखल होत परिस्थिती हाताळली. पुराव्यांच्या आधारेच पुढील कारवाई केली जाईल, अशी भूमिका पोलिसांनी घेतली होती.
दरम्यान, विधिमंडळ अधिवेशनात मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे यांनी हा मुद्दा उपस्थित करत आरोपींवर तसेच मदत करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आंदोलकांशी फोनवरून संवाद साधत दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले.
यानंतर पोलिसांनी तपासाला वेग देत हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक केली. बीड पोलिसांच्या विशेष पथकांनी विविध ठिकाणांहून आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
आंदोलकांच्या मागणीनंतर अखेर सौरभ सोनवणे यांचे नाव पुरवणी जबाबात नोंदवण्यात आले आहे. या प्रकरणात पुराव्यांच्या आधारे तपास करून पुढील कारवाई केली जाईल, असे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या हत्या प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. घटनेला जातीय रंग दिला जात असल्याचे आरोप-प्रत्यारोप होत आहेत. आंदोलकांनी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर आणि खासदार बजरंग सोनवणे यांचीही चौकशी करण्याची मागणी केली आहे.
खासदार बजरंग सोनवणे यांनीही “माझ्या मुलाविरोधात पुरावे आढळल्यास कारवाई करा, सरकार आणि पोलीस तुमचे आहेत” अशी भूमिका मांडत या प्रकरणात राजकारण आणले जात असल्याचा आरोप केला होता.
आता सौरभ सोनवणे यांचे नाव पुरवणी जबाबात आल्याने या प्रकरणातील पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.