बिअर शॉपीवर गोळीबार करणारा फरार मकोका आरोपी अशीष आठवले याला कबाड गल्लीत फिल्मी स्टाईलने पाठलाग करून अटक. गावठी पिस्तूल जप्त.
बीड — शहरात दहशत निर्माण करुन गेल्या दीड दोन वर्षापासून फरार असलेला मकोका आरोपी अशीष श्यामराव आठवले याला बीड पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. बिअर न दिल्याच्या कारणावरून बिअर शॉपी चालकावर गावठी पिस्तुलाने गोळीबार करून फरार झालेल्या आरोपीचा पोलिसांनी पाठलाग करून कबाड गल्लीत मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस आणि रिकामी पुंगळी जप्त करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अशीष आठवले याच्यावर पोलीस ठाणे पेठ बीड येथे गुरनं 383/2024 कलम 109, 115(2), 190, 191(2), 191(3) व इतर कलमान्वये मकोका अंतर्गत गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यातील इतर सर्व आरोपींना अटक झाली होती, मात्र अशीष आठवले गुन्हा घडल्यापासून फरार होता. तो वारंवार राहण्याचे ठिकाण बदलत असल्याने पोलिसांना तो सापडत नव्हता.
दरम्यान, रात्री 11 वाजता बीड शहरातील समर्थ बिअर शॉपी येथे त्याने उधारीने बिअर मागितली. चालकाने नकार दिल्याने त्याने जवळील गावठी पिस्तुलातून गोळीबार करून फिर्यादीस जखमी केले. या प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुरनं 92/2026 कलम 109, 352, 351(2) बी.एन.एस. सह कलम 3/25 शस्त्र अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड आणि बीड शहर पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांच्या टीमने आरोपीचा शोध सुरू केला. आरोपी कबाड गल्ली येथून मोटारसायकलवर जात असल्याची माहिती मिळताच पथकाने त्याचा पाठलाग केला. पोलीस अंमलदार अश्फाक सय्यद यांनी आरोपीस मिठी मारून पकडले.
या यशस्वी कारवाईत पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, पोहवा सोमनाथ गायकवाड, अशोक दुबाले, राहुल शिंदे, मनोज परजणे, चालक नितीन वडमारे, पोह शहेंशाह सय्यद, राम पवार, संतोष शिंदे, इलियास शेख, चालक फिरोज पठाण यांचा समावेश होता.

