Home Blog Page 19

परळी वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या सुधारित ३०१ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान

0

धनंजय मुंडेंनी मानले राज्य सरकारचे आभार

मुंबई — परळी वैद्यनाथ येथील पंचम ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या सुधारित ३०१.५४ कोटी रुपयांच्या एकूण ६३ कामांना राज्य सरकारने प्रशासकीय मान्यता प्रदान केली असून, याबाबतचा शासन निर्णय नियोजन विभागाने निर्गमित केला आहे.

माजी मंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केला असून, सुधारित आराखड्यास नव्याने प्रशासकीय मान्यता दिल्याबद्दल त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा ताई अजितदादा पवार तसेच मंत्री पंकजाताई मुंडे यांचे आभार मानले आहेत.

काही दिवसांपूर्वी या ६३ कामांना सुधारित मान्यता देण्याबाबत शिखर समितीने निर्णय घेतला होता. त्यानंतर आता प्रत्यक्षात प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

प्रत्यक्षात परळी वैद्यनाथ येथे मंदिर व परिसरात या विकास कार्यक्रमात भव्य दर्शन मंडप, दगडी पायऱ्या, प्रवेशद्वारे त्याचबरोबर भव्य असे भक्तनिवास अशी अनेक कामे प्रगतीपथावर असून काही कामे आता अंतिम टप्प्यात आहेत.

या सुधारित आराखड्याच्या माध्यमातून भक्त निवास, दर्शन मंडप, शौचालये, विद्युतीकरण, पादचारी मार्ग, पार्किंग, अशा विविध स्वरूपाची एकूण ६३ कामे करण्यात येत आहेत.

शाळांना निधी नाही मात्र अधिकाऱ्यांसाठी लाखोंची उधळपट्टी;अधिकाऱ्यांच्या निवासस्थान-कार्यालय दुरुस्तीचे ऑडिट करा — बीडमध्ये निदर्शने

0

बीड —  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मूलभूत सुविधांसाठी निधी देताना हात आखडता घेणारे जिल्हा प्रशासन मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निवासस्थान व कार्यालयांच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करत असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवार दि. २९ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री बीड सुनेत्राताई पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, जिल्हा शल्य चिकित्सक तसेच कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निवासस्थान व कार्यालयांच्या गेल्या २० वर्षातील दुरुस्ती कामांचे ऑडिट करण्याची मागणी करण्यात आली आहे.

पोलिस अधीक्षक बीड यांच्या निवासस्थानाच्या दुरुस्तीवर दीड वर्षात तब्बल ९३ लाख रुपयांच्या कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आल्याचा आरोप करत, या प्रकरणात अंदाजपत्रके तयार करणाऱ्या व मंजुरी देणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

पोलिस अधीक्षक निवासस्थानातील दुरुस्ती कामांमध्ये उद्यान दुरुस्ती, बाहेरील रंगकाम, गेस्ट रूम व मास्टर बेडरूम फर्निचर, गार्ड रूम दुरुस्ती, स्टाफ शौचालय, चेंबर दुरुस्ती, पाइपलाइन, किचन ड्रेनेज व वॉटरप्रूफिंग, बेडरूम-गेस्ट रूम-डायनिंग हॉल सुशोभीकरण तसेच पेव्हर ब्लॉक आदी कामांचा समावेश असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळांची अवस्था गंभीर असून इमारत नसलेल्या ५८ शाळा, मोडकळीस आलेल्या १७४ शाळांमधील ३१३ वर्गखोल्या, विद्यार्थी संख्या वाढल्याने आवश्यक असलेल्या ७० शाळांमधील ९८ अतिरिक्त वर्गखोल्या यासाठी ५७ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. तसेच २९० वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी १२ कोटी ५० लाख रुपयांची गरज असताना प्रशासनाकडून निधी देण्यात विलंब केला जात असल्याचा आरोप करण्यात आला.

शाळांसाठी निधी मिळवण्यासाठी सातत्याने आंदोलन व पाठपुरावा केल्यानंतर २८ कोटी रुपयांचा निधी मंजूर होतो, मात्र दुसरीकडे अधिकाऱ्यांच्या निवासस्थान व कार्यालयांसाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो, ही बाब दुर्दैवी असल्याचे डॉ. गणेश ढवळे यांनी म्हटले.

या आंदोलनात शेख युनुस, रामनाथ खोड,शेख मुबीन, शेख मुस्ताक,माजी सैनिक अशोक येडे, सय्यद सादेक,, प्राचार्य डी. जी. तांदळे (मार्गदर्शक मराठवाडा शिक्षक संघ), बाजीराव ढाकणे, डॉ. संजय तांदळे, शिवाजी मांडवे आदी सहभागी झाले होते.

नसरापूर अत्याचार प्रकरणात दोषी भीमराव कांबळेला फाशी; पुणे सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय

0

पुणे — भोर तालुक्यातील नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात दोषी ठरलेल्या भीमराव कांबळे (वय 65) याला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी 29 जून रोजी शिक्षा सुनावत हा खटला “दुर्मिळातील दुर्मिळ” असल्याचे निरीक्षण नोंदवले.
या प्रकरणात 25 जून रोजी न्यायालयाने भीमराव कांबळे याला दोषी ठरवले होते. त्यानंतर शिक्षेवरील युक्तिवादासाठी 29 जूनची तारीख देण्यात आली होती. सरकारी पक्षाने आरोपीच्या गुन्ह्याचे गांभीर्य, पुरावे आणि तत्सम प्रकरणांचा दाखला देत फाशीच्या शिक्षेची मागणी केली होती.

न्यायालयाचे गंभीर निरीक्षण

विशेष न्यायालयाने निकाल देताना सांगितले की, या प्रकरणात पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास पूर्ण करून ठोस पुरावे सादर केले. आरोपीचा गुन्हा क्रौर्यपूर्ण असून त्याच्या वर्तनातून पश्चात्ताप दिसून येत नाही. तसेच आरोपी सुधारण्याच्या पलीकडे असल्याचे न्यायालयाने नमूद केले.
सरकारी पक्षाने न्यायालयासमोर अशाच प्रकारच्या 12 प्रकरणांचा संदर्भ दिला होता. त्यातील अनेक प्रकरणांत फाशीची शिक्षा झाल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

काय आहे नसरापूर प्रकरण?

1 मे 2026 रोजी भोर तालुक्यातील नसरापूर येथून साडेतीन वर्षांची मुलगी बेपत्ता झाली होती. काही वेळानंतर तिचा मृतदेह आढळून आला. वैद्यकीय तपासणीत तिच्यावर लैंगिक अत्याचार करून हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
घटनेनंतर राज्यभर संतापाची लाट उसळली होती. पुणे ग्रामीण पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे, डीएनए तपासणी आणि साक्षीदारांच्या आधारे तपास करत संशयिताला अटक केली.

15 दिवसांत आरोपपत्र दाखल

पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास जलदगतीने पूर्ण करत अवघ्या 15 दिवसांत विशेष न्यायालयात सुमारे 1200 पानी आरोपपत्र दाखल केले होते.
यानंतर फास्ट ट्रॅक पद्धतीने सुनावणी झाली. सरकारी पक्षाने वैज्ञानिक पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारे बाजू मांडली.

प्रकरणाचा घटनाक्रम

1 मे 2026 : नसरापूरमधून चिमुरडी बेपत्ता; रात्री मृतदेह आढळला.
2 मे 2026 : पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले.
मे पहिला आठवडा : वैद्यकीय व न्यायवैद्यकीय पुरावे जमा.
16 मे 2026 : 1200 पानी आरोपपत्र दाखल.
28 मे 2026 : न्यायालयाने आरोप निश्चित केले.
20 जून 2026 : अंतिम युक्तिवाद सुरू.
25 जून 2026 : भीमराव कांबळे दोषी ठरला.
29 जून 2026 : फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

भाशिप्रची अमृत महोत्सवी वाटचाल; भ्रष्टाचाराने संस्थेचे हाल तर चोरट्यांचे गाल लाल

0

बीड — संघ संस्काराच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी निस्वार्थपणे भाशिप्रची मुहूर्तमेढ रोवली पण अमृत महोत्सवी वाटचालीच्या काळात मात्र वेतन घोटाळा,शालार्थ आयडी घोटाळा, पदभरती घोटाळा, टीईटी प्रमाणपत्र घोटाळा, बोगस शाळांच्या माध्यमातून पालकांच्या खिशावर टाकल्या जात असलेल्या दरोड्या “मुळे” भ्रष्टाचाराची शंभरी होऊन संस्थेचे हाल तर चोरट्यांचे गाल लाल अशी स्थिती सध्या तरी निर्माण झाली आहे. इतकंच नाही तर हेच का आरएसएस चे संस्कार गोळा झाला चोरांचा बाजार असं म्हणण्याची वेळ आली आहे.
अमृत महोत्सव खरे तर एखाद्या संस्थेच्या भरभराटीचा गौरव करण्याचा क्षण पण दुर्दैवाने विद्यमान संचालक मंडळाने संस्थेत चालवलेल्या नंगानाचाच गौरव मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. हे संस्थेचे दुर्दैव म्हणायचं पण सत्यावर प्रकाश टाकत “सह्याद्री माझा” ने हे प्रकरण उचलून धरले आहे. सेवा जेष्ठता डावलून सावरकर चा‌ मुख्याध्यापक बनलेल्या महाभागाने संस्थेच्या संस्काराच्या बूडात असे “मुळे” खूपसले की ते आतही जात नाही अन् बाहेरही निघत नाही अशी स्थिती निर्माण झाली. परिणामी मराठवाडा प्रशासकीय अधिकारी तथा समन्वयक म्हणून म्हणून देखील तो मिरवू लागला.”चंद्र” शितल असतो त्यामुळे संस्थेच्या वाटचालीत “हेमंत” ऋतू येऊन भरभराट होईल म्हणून “वैद्य“बनून उपचार सुरू केला.पण हाय रे दुर्दैव संस्थेचे दुखणं इतकं नासलं गेलं. शेवटी घुसलेले “मुळे” टोकरून काढताना “खुरपे” ही बोथट झाले. गुन्ह्यांच्या सडक्या घाणीने ते बरबटले गेले. सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या प्रवेशासाठी पालकांच्या खिशावर पंधरा हजाराचा दरोडा टाकला या प्रकरणात त्याच्यावर कलम 384,34 अन्वये माजलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला ही “अमर” नाथाची महती संस्थेच्या मध्यान्हाचा “प्रभाकर” अस्तंगत व्हायला सुरुवात करणारी झाली. संस्थेतल्या एका एका पदाधिकाऱ्याच्या “अ”सत्य नारायणाची कथा तर इतकी “लो“कप्रिय झाली की “आपण सारे भाऊ भाऊ मिळून सगळे चूरून खाऊ” हे ब्रीद बनून भ्रष्टाचाराचा “हिया” केला गेला. मग काय संस्थेच्या बुडात ‌घुसलेल्या त्या “मूळ्या” ने इतका धुमाकूळ घातला की संघ संस्कार, देश हित, शिस्त, त्याग, समर्पण यावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले. स्वतःला राजा “इंद्र”समजणाऱ्या सर्वे सर्वा अध्यक्षाला कारभाराचा “सूर”गवसलाच नाही. या सगळ्या खेळात आश्चर्याने “” होऊन सगळे अधिकार “लुळ लुळ” ‘कर‘त राहिले.

बोगस शाळांचे पेव फुटले

संघ संस्काराच्या आडून पालकांच्या खिशावर संस्थेच्या नावावर दरोडे टाकायचे यासाठी बोगस शाळा सुरू करण्यात आल्या.खोलेश्वर जीनियस इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल अंबाजोगाई,
माजलगावची सिद्धेश्वर सीबीएसई प्रायमरी स्कूल,उदगीर येथील रामकृष्ण इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल,लातूर मधील केशवराज रेनिसन्स इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल बोगसपणे चालू आहे.2018 पासून आतापर्यंत विद्यार्थ्यांच्या भविष्याची पैशासाठी खेळ खेळला गेला.

शालार्थ आयडी/वेतन घोटाळा

भाशिप्र मध्ये बोगस शिक्षक भरती मोठ्या प्रमाणावर केली गेली. या शिक्षक भरती घोटाळ्यातून कोट्यावधी रुपयांचा मलिदा संस्थेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी लुटला. इतकंच नाही तर थकीत वेतन घोटाळा देखील केला. शिक्षक भरती प्रक्रिया बंद झाल्यानंतर जे शिक्षक बोगस शालार्थ आयडीच्या जोरावर संस्थेत भरती केले. त्यांचा थकीत वेतन काढून त्याच्यावर देखील डल्ला मारला गेला. तीच स्थिती शिक्षक पात्रता परीक्षेची आहे. संस्थेमध्ये टीईटी परीक्षेसाठी शिक्षण विभागाने बंधन घालून देखील ते शिक्षक आजही संस्थेमध्ये कार्यरत आहेत. तिथेही टीईटी परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र बोगसपणे उपलब्ध करून दिले गेले. हे सगळे कमी की काय म्हणून शालार्थ आयडी घोटाळ्यात नियुक्त एसआयटी मॅनेज करण्याच्या नावाखाली शिक्षकांची लूट केली गेली. बरं या घोटाळ्याचे आकडे हजारोत नाही लाखोत नाही तर कोटीच्या कोटी उड्डाण मारली गेली आहेत.
बदल्या मधून वर कमाई चा धंदा तर राजरोस सुरू आहे. या शाळेवरून त्या शाळेवर प्रतिनियुक्ती द्यायची यातून चार दोन लाख रुपये त्या शिक्षकाकडून उकळायचे शेवटी संस्थेत राहायचं तर मगरीशी वैर नको म्हणून निमुटपणे सहन करायचं.
यासारखे एक ना अनेक सडके प्रकार संस्थेत सुरू झाल्यामुळे यातून देशाच उज्वल भविष्य कसं घडलं जाणार? भ्रष्ट पदाधिकाऱ्यांच्या जोरावर संस्काराचं पीक कसं येणार? या सगळ्या प्रकारातून देश हित राष्ट्र प्रथम न दिसता “स्वार्थ प्रथम” दिसू लागला आहे. कमीत कमी अमृत महोत्सवाच्या काळात तरी यामध्ये बदल होईल का? कुठेतरी मनाची नाही तर जनाची लाज बाळगली जाणार का? शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात भ्रष्टाचाराचीच बाळघुटी पाजली जाणार? यासारखे अनेक प्रश्न जनतेतून विचारले जात आहेत.

विठ्ठलाच्या पवित्र पंढरपुरात सरकारने दिलेला शब्द पाळला नाही;वेळ पडल्यास ‘जेल भरो’ आंदोलन

0

आ.रोहीत पवारांचा सरकारला बीडमधून इशारा

बीड — राज्यातील शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेली कर्जमाफी ही अटी व शर्तीमुळे फसवी ठरत असून, सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करता शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी राज्यभर सुरू असलेल्या दौऱ्याच्या निमित्ताने शनिवारी (दि.२७) रोजी त्यांनी बीड येथील राष्ट्रवादी भवन येथे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि शेतकरी प्रतिनिधींसोबत सविस्तर बैठक घेतली. यावेळी आगामी आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात आली. आ.रोहित पवार यांनी स्पष्ट केले की, हा संघर्ष कोणत्याही राजकीय लाभासाठी नसून राज्यातील अन्नदात्याला न्याय मिळवून देण्यासाठी आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. आवश्यक वाटल्यास ‘जेल भरो’ आंदोलन देखील करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी सरकारला यावेळी दिला आहे.
            आ.रोहित पवार म्हणाले की, शेतकऱ्यांना दिली जाणारी कर्जमाफी ही प्रत्यक्षात अनेक अटी व शर्तीमुळे निष्प्रभ ठरत आहे. पंढरपूर येथे अन्नत्याग आंदोलन करत असताना सरकारच्या वतीने मंत्री गिरीश महाजन यांनी कर्जमाफीवरील अटी व शर्ती काढून टाकण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यानंतरही सरकारने त्या आश्वासनाची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांची फसवणूक झाली असून, त्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे, असे त्यांनी सांगितले.
         बैठकीदरम्यान शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. कर्जमाफी, पीकविमा, शेतीमालाला हमीभाव, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान, वीजपुरवठा आणि शेतीसंदर्भातील इतर प्रश्नांवर कार्यकर्ते व शेतकरी प्रतिनिधींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या सर्व प्रश्नांवर सरकारला जाब विचारण्यासाठी राज्यभर तीव्र जनआंदोलन उभारण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.
               या बैठकीस आ.संदीप क्षीरसागर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी काळात जिल्हानिहाय दौरे, जनसंवाद आणि आंदोलनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आवाज अधिक बुलंद करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांच्या घामाचा, कष्टाचा, स्वाभीमानाचा आवाज बुलंद करण्यासाठी हा संघर्ष अधिक तीव्र करू- आ.संदीप क्षीरसागर

अन्नदात्यावरच अन्याय होत असेल तर ही गंभीर बाब आहे‌. शेतकरी राजावरील होत असलेल्या अन्यायाविरुद्ध रोहीत दादांनी आवाज उठवला आहे. हा शेतकऱ्यांचा घामाचा, कष्टाचा आणि स्वाभिमानाचा आहे, आणि हा आवाज बुलंद करण्यासाठी हा संघर्ष अधिक तीव्र करू, असे आ.संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त होताना म्हटले.

शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटला; परीक्षा रद्द, मुख्यमंत्री फडणवीसांनी SIT चौकशीचे आदेश दिले

0

मुंबई —  महाराष्ट्रात पुन्हा एकदा स्पर्धा परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2026 चा पेपर फुटल्याचा प्रकार समोर आल्यानंतर 28 जून रोजी होणारी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षक पात्रता परीक्षा 2026 ही राज्यातील 1028 केंद्रांवर घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, 27 जून रोजी पहाटे भिवंडी परिसरात काही व्यक्तींकडे टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्नांची माहिती असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीच्या आधारे भिवंडी पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. त्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रश्नपत्रिकेची पडताळणी करण्यात आली. तपासणीदरम्यान संबंधित व्यक्तींकडे असलेल्या माहितीतील काही प्रश्न हे टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेशी जुळत असल्याचे समोर आले.
या प्रकरणी भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

मुख्यमंत्री फडणवीस अॅक्शन मोडवर; SIT चौकशीचे आदेश

टीईटी पेपरफुटी प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी ठाण्याचे सह पोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी पोलिस महासंचालकांना सूचना देत दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

परीक्षा रद्द; विद्यार्थ्यांमध्ये चिंता

टीईटी परीक्षा ही शिक्षक भरतीसाठी अत्यंत महत्त्वाची परीक्षा मानली जाते. पेपरफुटीमुळे परीक्षा रद्द झाल्याने हजारो परीक्षार्थींमध्ये नाराजी आणि चिंता निर्माण झाली आहे. यापूर्वीही विविध परीक्षांमधील गैरप्रकारांमुळे राज्यात मोठी चर्चा झाली होती. आता टीईटी पेपरफुटी प्रकरणामुळे पुन्हा एकदा परीक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

बीड मधील टीईटी परीक्षा घोटाळ्याचा काय?

बीड जिल्ह्यातही गेल्या अनेक दिवसापासून शिक्षक पात्रता घोटाळा होत आलेला आहे. शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अनेक शिक्षकांना अपात्र ठरविण्यात आला असलं काहीजणांवर गुन्हे दाखल असले तरी या प्रकरणात शिक्षणाधिकाऱ्यासह संस्थाचालकांचे हितसंबंध जोडले गेलेले असल्याने कधी कारवाई झाली नाही. दरम्यान टीईटी पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे या पेपर फुटीचे धागेदोरे बीड पर्यंत पोहोचण्याची शक्यता शिक्षण क्षेत्रातील जाणकार वर्तवित आहेत. अशाच प्रकारे यापूर्वी फुटलेल्या पेपरच्या माध्यमातून अनेक जण पास झाले असल्याचं सांगितलं जात आहे. बीडमध्ये टीईटी पात्रता परीक्षेत संदर्भात पसरलेल्या भ्रष्टाचाराच्या “चंद्र”कळानी पुन्हा एकदा नव्या चर्चेला तोंड फुटले असून स्वतःला भ्रष्टाचारातले “कांत” समजणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. बीड मधील शिक्षक पात्रता परीक्षेत संदर्भात एस आय टी ने लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

बस पकडण्याच्या घाईत अंबाजोगाई बसस्थानकावर भीषण दुर्घटना; चाकाखाली येऊन प्रवाशाचा मृत्यू.

0

अंबाजोगाई (बीड) : बसमध्ये जागा मिळवण्याच्या घाईत धावत गेलेल्या एका प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना अंबाजोगाई बसस्थानकावर घडली आहे. या घटनेचा थरारक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंबाजोगाई बसस्थानकातून एसटी बस बाहेर पडत असताना प्रवाशांमध्ये बसमध्ये जागा मिळवण्यासाठी लगबग सुरू होती. काही प्रवासी बसच्या मागे धावत बस पकडण्याचा प्रयत्न करत होते. याचवेळी लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील ढळेगाव येथील रहिवासी बालाजी देवकाटे हे बस पकडण्यासाठी धावत असताना अचानक त्यांचा तोल गेला.
तोल गेल्याने ते बसच्या मागील चाकाजवळ पडले आणि या दुर्घटनेत ते गंभीर जखमी झाले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या घटनेमुळे बसस्थानक परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, काही अधिकाऱ्यांकडून प्राथमिक स्वरूपात हृदयविकाराच्या झटक्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असली तरी अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास सुरू आहे. बसस्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संपूर्ण घटना कैद झाली असून त्यातून घटनेची तीव्रता समोर आली आहे.
या दुर्दैवी घटनेनंतर अंबाजोगाई बसस्थानकावरील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रवाशांनी बस पकडताना घाई न करता काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

“पिंगळे” ओरडले अन् अपशकुनाने एसपीं च्या कारभाराचे गाडे आडले; लोकप्रतिनिधी एसपींच्या गृहदुरुस्तीचा प्रश्न विधानसभेत मांडणार?

0

बीड — एसपींच्या कारभाराच्या रथाच्या चाकांच्या कुरकुरण्याच्या आवाजात जनतेची आर्त हाक त्यांच्यापर्यंत कधी पोहोचलीच नाही. पीडित व्यक्ती रथाला आडवी उभी राहिल्याशिवाय न्यायाची भीक मिळालीच नाही.
पण हाच रथ नियमितपणे मार्गस्थ होत असताना दुर्दैवाने रस्त्यातून उजव्या बाजूने “पिंगळे” ओरडले गेले.तिथेच अपशकूनाची सुरुवात झाली. त्याचा काही क्षण आवाज मधुर वाटल्याने सम्मोहित झालेल्या एसपींच्या हातून चूक झाली. यातून 93 लाखाच्या घर दुरुस्तीत भ्रष्टाचाराच “विपुल” कुरण निर्माण झालं तर नाही ना? शौचालयाच्या दुरुस्तीसाठी 17 लाखाचा खर्च झाला. यासारखे आश्चर्य करायला लावणारे मुद्दे जनतेसमोर आले. दरम्यान मोडकळीस आलेल्या शाळांमधून जीवावर उदार होऊन विद्यार्थी ज्ञानार्जनाचे धडे घेत आहेत तिथे इतका मोठा खर्च तोही दुरुस्तीसाठी यामुळे होत असलेल्या चर्चांनी जिल्हा ढवळून निघाला.
विधानसभेच्या पटलावर बीड जिल्ह्यातील स्वाभिमानी आमदार मांडणार का? की आमदारांनी जिल्हा अशा कारभारी मंडळींना आंदण दिला आहे का असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.
बीड जिल्हा या ना त्या कारणाने चर्चेचा केंद्रबिंदू च राहावा जनतेचे हाल आहेत त्याच स्थितीत राहावेत जनतेला कोणीच वाली नाही. असंच धोरण बीडच्या लोकप्रतिनिधींनी धरलं आहे.खून, मारामाऱ्या, महिला अत्याचाराच्या घटना रोजच्याच झाल्या आहेत. बरं न्याय मागावा म्हणून पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवण्याची वेळ जनतेवर येऊन ठेपली आहे. पोलीस ठाण्यातच नाही तर पोलीस अधीक्षक कार्यालयात देखील अनेक आंदोलन झालेली राज्यभरात गाजली. जर साधा गुन्हा दाखल होत नसेल त्यासाठी आंदोलन करावे लागत असेल तर तपास आणि नंतर न्याय कसा मिळणार? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. इतकंच नाही तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं भवितव्य देखील धोक्यात आला आहे. शाळांच्या पडक्या, गळक्या इमारती मधून विद्यार्थ्यांना जीवावर उदार होऊन शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहेत. ग्रामीण भागात 58 शाळांना इमारती नाहीत. 174 शाळांमधील 313 वर्ग खोल्या मोडकळीस आल्या आहेत.98 अतिरिक्त वर्ग खोल्यांची आवश्यकता आहे त्यासाठी 57 कोटीहून अधिकचा निधी आवश्यक आहे. एकीकडे हे भयान वास्तव असताना दुसरीकडे मात्र पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानाच्या दुरुस्तीसाठी कोटीच्या घरात खर्च केला गेला. एवढ्या पैशांमध्ये जुनी इमारत पाडून सुख सुविधांनी युक्त टोलेजंग इमारत उभी राहिली असती. नुसत्या संडासच्या दुरुस्तीसाठी जवळपास 17 लाखाचा खर्च केला गेला. यामुळे तर जिल्ह्यात नव्या चर्चेला उधाण आलं गेलं.गावपारावर तर ग्रामीण बोली भाषेत
” जिल्ह्यात दुखणं अन् एसपींच हागणं” चर्चील जाऊ लागलं.
निवासस्थानातील विविध कामांमध्ये उद्यान दुरुस्ती 8.18 लाख, बाहेरील रंगकाम 7.75 लाख, गेस्ट रूम व मास्टर बेडरूम फर्निचर 8.4 लाख, गार्ड रूम दुरुस्ती 7.5 लाख, स्टाफ शौचालय दुरुस्ती 8.21लाख, चेंबर दुरुस्ती 8.28 लाख, पाईपलाईन दुरुस्ती 6.76 लाख, किचन ड्रेनेज व वॉटरप्रूफिंग 8.44 लाख, बेडरूम, गेस्ट रूम व डायनिंग हॉल सुशोभीकरण 8.43 लाख आणि पेव्हर ब्लॉक 8.20 लाख अशा कामांचा समावेश आहे. दीड वर्षाच्या काळात बांधकाम विभागाकडून निघालेल्या कामाच्या कार्यारंभ आदेशामुळे वादळ उठल्यानंतर आंदोलनाचा इशारा देण्यात आला. हे आंदोलन होऊ नये यासाठी बांधकाम विभागाने आपले हात झटकले. पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून आलेल्या मागणीनुसार अंदाजपत्रक तयार करून संबंधित कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आल्याचे लेखी कळवले. या सर्व कामांना प्रशासकीय मान्यता पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत लेखाशीर्ष 2055 – 1068 अंतर्गत देण्यात आली होती. दरम्यान हा खर्च पोलीस अधीक्षक कार्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या निधीतून खर्च करण्यात आला आहे. असाही खुलासा बांधकाम विभागाने केला आहे. त्यामुळे आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती देखील केली गेली आहे.

विधानसभेत विषय गाजणार?

जिल्ह्यातील पीडित कुटुंबाला गुन्हा नोंद व्हावा यासाठी आंदोलन करावे लागत आहेत. गुन्हेगारीवर वचक तर सोडाच पण न्यायासाठी होणाऱ्या आंदोलनामुळे जिल्ह्याची बदनामी मोठ्या प्रमाणावर होत आहे. शाळा मोडकळीला आलेल्या असताना एसपींच्या निवासस्थानाच्या दुरुस्तीच्या नावाखाली 93 लाखाचा निधी खर्च केला जात आहे. साध्या शौचालयासाठी 17 लाखाचा खर्च केला गेल्याने नव्या चर्चेला उधाण आलेले असताना इतकं मोठं कांड होऊन देखील जिल्ह्यातील आमदार खासदार तोंडावर पट्टी बांधून मूकाट गप्प आहेत. पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा एखादा तरी संवेदनशील आमदार उचलणार का? सर्वसामान्यांना न्याय मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहणार का? लोकप्रतिनिधींनी जिल्हा एसपींना अंदन दिला आहे काय? असे एक ना अनेक प्रश्न जनतेतून विचारले जात आहेत.

प्रेस मॅनेजमेंट आणि पत्रकारांची लायकी ?

दिवाळीच्या कालावधीमध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीमध्ये पोलीस अधीक्षकांनी बीडचे पत्रकार काय लायकीचे आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा असा मोलाचा उपदेशाचा डोस पाजल्याची चर्चा त्यावेळी झाली होती. मात्र संडास दुरुस्तीवर 17 लाखाच्या केलेल्या खर्चावर पडदा पडावा. हा प्रश्न वर्तमानपत्रातून छापून येऊ नये यासाठी एका पोलीस अधिकाऱ्याने “प्रेस मॅनेजमेंट” केल्याची कुजबुज आता ऐकू येऊ लागली आहे. मग पत्रकारांची लायकी काढणारे, वर्तमानपत्राकडे दुर्लक्ष करा म्हणणारे मॅनेजमेंट करण्यावर का भर देऊ लागले? असा प्रश्न देखील उपस्थित होऊ लागला आहे.

गेवराईचा वादग्रस्त तहसीलदार संदीप खोमणेवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

0

बीड —  घरकुल लाभार्थ्यांच्या नावावर झालेल्या कथित अवैध वाळू उपसा प्रकरणामुळे आधीच चर्चेत असलेले गेवराईचे तहसीलदार संदीप केशव खोमणे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. बारामती तालुक्यातील जळगाव सुपे येथील एका व्हॉट्सॲप ग्रुपवरील कथित जातीय अपमानाच्या प्रकरणी तहसीलदार खोमणे आणि सुनील दत्तू खोमणे (रा. जळगाव सुपे, ता. बारामती) यांच्याविरोधात अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यानुसार माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी संदीप रमेश खंडाळे (वय ३६, रा. जळगाव सुपे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ एप्रिल २०२५ रोजी रात्री ‘आपला गाव, आपला विकास’ या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीतील आरक्षणासंदर्भातील पत्र शेअर करण्यात आले होते.
या पत्रावरून ग्रुपमध्ये चर्चा सुरू असताना, फिर्यादी हे हिंदू मांग समाजातील असल्याची माहिती असतानाही त्यांच्याबाबत जातीय हेतूने अपमानास्पद वक्तव्य करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच या वक्तव्यामुळे ग्रुपमधील इतर सदस्यांमध्ये फिर्यादीविषयी तिरस्कार व द्वेषाची भावना निर्माण होईल, अशा प्रकारचे वर्तन झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, फिर्यादीला संबंधित व्हॉट्सॲप ग्रुपमधून हटवण्यात आल्याचा उल्लेखही करण्यात आला आहे. या तक्रारीच्या आधारे माळेगाव पोलिसांनी तहसीलदार संदीप खोमणे आणि सुनील खोमणे यांच्याविरोधात अॅट्रॉसिटी कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक कुलदीप दत्तात्रय करीत आहेत.
दरम्यान, गेवराई तालुक्यातील कथित अवैध वाळू उपसा प्रकरणातही तहसीलदार संदीप खोमणे यांच्यावर यापूर्वी आरोप झाले होते. गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात कथित अवैध वाळू सिंडिकेट सुरू असल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाची प्रशासकीय चौकशी आणि प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
तसेच खोमणे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव बीड जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल विभागाच्या वरिष्ठांकडे पाठविल्याची माहिती समोर आली होती. आता त्यांच्या मूळ गाव परिसरात अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाल्याने तहसीलदार खोमणे पुन्हा चर्चेत आले आहेत. या प्रकरणात प्रशासनाकडून कोणती भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागले आहे.

स्व. विलास घुले व उमेश माने यांच्या न्यायासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरू – धनंजय मुंडे

0

कुणाला मुद्दाम अडकवणे हेतू नाही, पण गुन्ह्यात सहभाग असल्यास, सुटला नाही पाहिजे – धनंजय मुंडेंची स्पष्टोक्ती

पीडितांच्या कुटुंबियांना धमकावले जात असेल तर पोलिस काय करतात? मुंडेंचा संताप

केज — चार दिवसांपूर्वी केज तालुक्यातील टाकळी परिसरात झालेल्या दुर्दैवी हत्याकांडात मृत पावलेल्या स्व. विलास घुले यांच्या कुटुंबियांची आज टाकळी येथे जाऊन माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी भेट घेत त्यांचे सांत्वन केले.

आरोपींनी संगनमत करून सामान्य गरीब कुटुंबातील उमेश माने या तरुणावर आधी जीवघेणा हल्ला केला. त्याला वाचवायला गेलेल्या विकासाचा निर्घृण खून करण्यात आला. त्यानंतर न्यायासाठी रस्त्यावर उतरलेल्या कुटुंबियांना विलासच्या मृतदेहासहित तीन दिवस तिष्ठत बसवण्यात आले, हे क्लेशदायक आणि संतापजनक असल्याचे धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.

या संपूर्ण घटनेच्या तपासासाठी स्वतंत्र एस आय टी समिती स्थापन करण्यात आली असली तरी त्यावर आणि त्यांच्या तपासावर घुले कुटुंबीय समाधानी नाहीत. पीडित उमेश माने व विलासच्या कुटुंबियांना देखील धमकावले जात असून वेगवेगळ्या केसेस मध्ये गुंतवण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याचे कुटुंबियांनी यावेळी सांगितले. याबाबत पोलिसांना निवेदनाद्वारे माहिती देण्यात आली असून, असे प्रयत्न दुर्दैवी असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.

एकूण तपासात पोलिस यंत्रणेमार्फत कोणाला वाचवण्याचा प्रयत्न होतोय का? जाती – पातीच्या भिंती ओलांडून निष्पक्ष तपास केला जाईल का? याबाबत शंका असून आवश्यकतेनुसार मी पुन्हा याबाबत सभागृहात बोलेन, असेही मुंडे माध्यमांशी बोलताना म्हणाले.

कुणाला मुद्दाम अमुक गुन्ह्यात अडकवा, अशी माझी अजिबात भूमिका नाही. मात्र सर्व साक्षीदार, वस्तुस्थिती, डंप डेटा अशा सगळ्या गोष्टी तपासून योग्य तपास व्हावा, ही अपेक्षा आहे. यामध्ये पोलिस यंत्रणा कमी पडल्या तर घुले आणि माने यांच्या न्यायासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरावे लागेल, असेही धनंजय मुंडे म्हणाले.

इतका संताप का?

जाती जातीचे राजकारण सोडून न्यायाच्या लढाईत आपण आपल्या एका बांधवासाठी सहभागी होतोय. उमेश मानेला वाचवायला गेलेल्या विलासचा खून झाला. यात जातीचे राजकारण कुठून आले? आम्ही न्यायासाठी लढायचे नाही का? फक्त तुम्हालाच न्याय हवा इतर लोकांनी न्याय मागायचा नाही का, असा संतप्त सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला.

माध्यमांमधील काहीजणांचा आततायीपणा थांबवा

अशी एखादी दुर्दैवी घटना घडली, तर त्याला ती गुन्हेगारी प्रवृत्ती जबाबदार असते, मात्र त्याआडून संपूर्ण जातीला गुन्हेगार ठरवणे योग्य नाही. तशा आशयाच्या बातम्या जाणीवपूर्वक पेरण्याचे प्रकार काही दिवसांपासून काही ठराविक लोकांनी केले. मात्र गुन्ह्याकडे गुन्हा, गुन्हेगारीकडे वृत्ती म्हणून बघितले पाहिजे, जातींना दूषणे देण्यापेक्षा गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे, असे परखड मत धनंजय मुंडे यांनी यावेळी व्यक्त केले.