बीड — जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले असून गेवराईचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित आणि बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यातील वाद उफाळून आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत विकासकामांच्या मुद्द्यावरून दोन्ही आमदारांमध्ये जोरदार शाब्दिक संघर्ष झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

विकासकामांवरून संघर्ष तीव्र
गेवराई मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत चर्चा करण्यासाठी आमदार विजयसिंह पंडित यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत बैठक आयोजित केली होती. या बैठकीत बीड आणि गेवराई परिसरातील तब्बल 11 विकासकामांवर चर्चा झाली. मात्र, बीड मतदारसंघातील कामांमध्ये हस्तक्षेप होत असल्याचा आरोप करत आमदार संदीप क्षीरसागर यांनी तीव्र आक्षेप नोंदवला.
“बीड माझा मतदारसंघ आहे. येथे दुसऱ्या कोणाचाही हस्तक्षेप सहन केला जाणार नाही. जनतेने दोन वेळा माझ्यावर विश्वास ठेवून निवडून दिले आहे. विकासाच्या नावाखाली मतदारसंघातील योजना दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न झाला तर त्याला विरोध करणार,” असा इशारा क्षीरसागर यांनी दिला.
“संघर्षाची सवय आहे” – क्षीरसागर
आमदार संदीप क्षीरसागर यांनी आक्रमक भूमिका घेत “मला संघर्षाची सवय आहे. संघर्षाशिवाय काम करण्यात मजा नाही. बीडच्या विकासाशी तडजोड होऊ देणार नाही. गरज पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू,” असा थेट इशारा दिला.
नगर परिषद निवडणुकीपासून दोन्ही नेत्यांमधील राजकीय वाद वाढत असल्याचे दिसत असून आता हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
“बीडकरांचे प्रेम वाढल्याचा त्रास होतोय का?” – पंडित
क्षीरसागर यांच्या वक्तव्यानंतर आमदार विजयसिंह पंडित यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. “मी घेतलेली बैठक ही गेवराई मतदारसंघातील विकासकामांसाठी होती. त्याचबरोबर बीड नगर परिषदेच्या काही प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली,” असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी क्षीरसागर यांच्यावर निशाणा साधत, “माझं बीडवर प्रेम उतू जाण्यापूर्वी बीडकरांचे माझ्यावर प्रेम उतू गेले आहे. बीडकरांनी मला कौल दिला आहे. मग त्या प्रेमाचा काहींना त्रास का होतो?” असा टोला लगावला.
तसेच, “तुमचे कुटुंब गेली तीन दशके नगरपालिकेत सत्तेत होते. मग 165 कोटी रुपयांच्या योजनेचे काय झाले?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
बीडच्या राजकारणात नवा संघर्ष
बीड जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर हा संघर्ष महत्त्वाचा मानला जात आहे. दोन्ही आमदारांतील वाढता वाद भविष्यात आणखी तीव्र होण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.




