डॉ. गणेश ढवळे यांच्या पाठपुराव्याला यश
बीड — जिल्हा परिषदेतील क व ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्यांनंतर “अतिरिक्त कामकाज” या गोंडस नावाखाली पुन्हा त्याच विभागात किंवा तालुक्यात कर्मचाऱ्यांना कार्यरत ठेवण्याच्या प्रकाराला अखेर आळा बसला असून मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रेहमान यांनी याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.
जिल्हा परिषदेमध्ये मागील काही वर्षांपासून प्रशासकीय बदल्या समुपदेशनाद्वारे केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात काही मर्जीतील कर्मचाऱ्यांना “अतिरिक्त कामकाज” या नावाखाली पुन्हा त्याच ठिकाणी ठेवण्यात येत असल्याची गंभीर बाब समोर आली होती. त्यामुळे बदल्यांची प्रक्रिया ही केवळ दिखाऊ ठरत असल्याची भावना कर्मचारी व सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाली होती.
या प्रकारामुळे प्रशासनात पारदर्शकता राहात नसून विभागप्रमुखांकडून मर्जीतील कर्मचाऱ्यांना संरक्षण दिले जात असल्याचा आरोप करत डॉ. गणेश ढवळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रेहमान यांची प्रत्यक्ष भेट घेऊन लेखी निवेदनाद्वारे हा प्रकार तात्काळ थांबवण्याची मागणी केली होती. तसेच याबाबत आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता.
या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रेहमान यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत जिल्हा परिषद बीड अंतर्गत विविध विभागांमध्ये अतिरिक्त कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आढावा घेतला. शासन स्तरावर कोणतीही नवीन योजना किंवा पदभरती प्रक्रिया सुरू नसल्याने अतिरिक्त कर्मचाऱ्यांची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी प्राप्त अधिकारांचा वापर करून तब्बल १३ कर्मचाऱ्यांचा अतिरिक्त कार्यभार कमी केला आहे.
याबाबत आज दि.१३ मे रोजी आदेश काढण्यात आले असून संबंधित कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ पदस्थापनेच्या ठिकाणी पूर्णवेळ काम करण्यासाठी कार्यमुक्त करण्यात आले आहे. तसेच तत्काळ मूळ ठिकाणी रुजू होऊन त्याचा अहवाल सादर करण्याचे स्पष्ट निर्देशही देण्यात आले आहेत.
या निर्णयामुळे जिल्हा परिषदेमध्ये “अतिरिक्त कामकाज” या नावाखाली सुरू असलेल्या प्रतिनियुक्तीच्या प्रकाराला काही अंशी तरी आळा बसणार असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, या निर्णयाबद्दल डॉ. गणेश ढवळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रेहमान यांचे आभार मानले आहेत.

